नवी दिल्लीः त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या विरोधात जनतेत राग वाढत असून, त्यांचा मनमानीपणाचा स्वभाव आणि हुकुमशाहसारखा कारभारामुळे कम्
नवी दिल्लीः त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या विरोधात जनतेत राग वाढत असून, त्यांचा मनमानीपणाचा स्वभाव आणि हुकुमशाहसारखा कारभारामुळे कम्युनिस्टांची सत्ता परत येऊ शकते, म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवावे अशी मागणी सत्ताधारी भाजपच्या काही आमदारांनी केली आहे.
भाजपचे आमदार सुदीप रॉय बर्मन यांच्या नेतृत्वाखाली ९ आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारले असून हे सर्व आमदार दिल्लीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा व अन्य वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी धडकले आहेत.
६० सदस्य असलेल्या त्रिपुरा विधानसभेत भाजपचे ३६ आमदार असून ९ आमदारांनी बंड पुकारले आहे त्यामुळे सरकार संकटात येऊ शकते. पण मुख्यमंत्री देव यांनी आपले सरकार सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. नाराज आमदारांमध्ये सुशांता चौधरी, आशिष साहा, आशीष दास, दिवा चंद्र रंखल, बर्ब मोहन त्रिपुरा, परिमल देव बर्मा व रामप्रसाद पाल असून वीरेंद्र किशोर देब बर्मन व बिप्लब घोष हे दोन अन्य आमदार आमच्यासोबत असल्याचा सुदीप रॉय बर्मन यांचा दावा आहे. हे दोन आमदार कोरोना संक्रमित असल्याने दिल्लीस येऊ शकले नाही, असे स्पष्टीकरणही बर्मन यांनी दिले आहे.
‘सरकार सुरक्षित’
दरम्यान पक्षात बंड झाले असले तरी आमचे सरकार सुरक्षित असल्याचा दावा मुख्यमंत्र्याबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांनीही केला आहे. हे ७-८ आमदार सरकार पाडू शकत नाही असेही साहा म्हणाले.
मुख्यमंत्री बिप्लब देब हे पंतप्रधान मोदी यांच्या विश्वासातील असून देब यांच्या पदाला धक्का लागेल अशी शक्यता दिसत नसल्याचे भाजपमधल्या काही सूत्रांचे म्हणणे आहे.
बंडखोर आमदारांची मागणी
बंडखोर आमदारांची मागणी आहे की, बिप्लव देब यांचे वर्तन हुकुमशाह सारखे असून त्यांचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांनी डझनभर खाती आपल्याचा हाती ठेवली आहेl. जर त्रिपुरात भाजपाला प्रदीर्घ काळ राज्य करायचे असेल तर देब यांना आताच पदावरून हटवले पाहिजे, असे बंडखोर आमदारांचे म्हणणे आहे. त्यांना न हटवल्यास राज्यात पुन्हा कम्युनिस्टांचे सरकार येईल. देब यांचे राजकारण कम्युनिस्टांना पुन्हा येण्याची वाट तयार करत आहे, त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही, त्यांच्याकडे राजकीय कौशल्य नाही, अशा अनुभव नसलेल्या नेत्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याने पक्षाची प्रतिमा खराब होत असल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे.
बंडखोरी करणारे चौधरी व बर्मन हे २०१७मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झाले होते.
मूळ बातमी
COMMENTS