यूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू

यूएपीएतंर्गत ६ वर्षे तुरुंगात असलेल्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू

मुंबईः माओवादी आंदोलनात कथित सहभागी असल्याचा आरोपावरून २०१४ पासून तुरुंगात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक कार्यकर्त्या कांचन ननावरे यांचा पुण्यात सस

राफेल व्यवहाराची पुन्हा चौकशी व्हावीः काँग्रेस
सीबीएसईने नोटबंदी, धर्मनिरपेक्षता, संघराज्यवाद वगळले
पियुष गोयल यांचा बॉलीवूड शो फसला

मुंबईः माओवादी आंदोलनात कथित सहभागी असल्याचा आरोपावरून २०१४ पासून तुरुंगात असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक कार्यकर्त्या कांचन ननावरे यांचा पुण्यात ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना हृदय व मेंदूंचा आजार होता. कांचन ननावरे ३८ वर्षांच्या होत्या, त्या आदिवासी समाजाच्या होत्या. जन्मापासून त्यांना हृदयासंबंधी आजार होता व गेल्या काही दिवसांपासून त्यांना मेंदूसंबंधी आजार झाला होता.

१६ जानेवारी रोजी त्यांच्या मेंदूंवर शस्त्रक्रिया झाली होती. पण या शस्त्रक्रियेची माहिती त्यांच्या कुटुंबियांना ना तुरुंग प्रशासनाने दिली ना रुग्णालयाने दिली असा आरोप ननावरे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे.

गेली दोन वर्षे ननावरे यांनी सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयात जामीनाचे अर्ज अनेक वेळा केले होते पण त्यांना वेळोवेळी जामीन नाकारण्यात आला, अशी माहिती त्यांचे वकील पार्थ शाह यांनी दिली.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे जामीन द्यावा अशी विनंती याचिका मुंबई उच्च न्यायालयात ननावरे यांनी केली होती. त्यावेळी सुनावणी दरम्यान ननावरे यांनी हृदयरोपण शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचे डॉक्टरांनी न्यायालयात सांगितले होते. पण या याचिकेवरचा निर्णय अद्याप झालेला नाही.

न्यायालयाने ननावरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यासंदर्भात एक समिती नेमण्याचे आदेश दिले होते पण या प्रकरणाच्या सुनावणीतच त्यांचा मृत्यू झाला.

कांचन ननावरे यांच्यावर एकूण ९ प्रकरणांचे गुन्हे दाखल झाले होते. त्यातील ६ प्रकरणातून त्यांची सुटका झाली होती. उरलेली ३ प्रकरणे गडचिरोली, पुणे व गोंदियामधील असून त्याची सुनावणी सुरूच आहे. या प्रकरणांमुळे गेली ६ वर्षे त्या महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगात होत्या त्यांचे पती अरुण बेलके यांनाही त्यांच्याबरोबर पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यावरही यूएपीए कायदा लावण्यात आला असून ते तुरुंगात आहेत.

कांचन ननावरे यांची प्रकृती गंभीर होत असतानाही त्यांच्या कुटुंबियांना ही माहिती देण्यात आली नव्हती. बेलके कुटुंबियांना २४ जानेवारीला एक पत्र मिळाले होते, त्यात कांचन यांची प्रकृती ढासळत असल्याचे नमूद करण्यात आले होते. नंतर त्यांचे निधन झाल्याचे फोन आला, अशी माहिती वकील शाह यांनी दिली.

कांचन यांचा मृतदेह चंद्रपूरनजीक बल्लारशाहमधील बेलके कुटुंबियांकडे सुपूर्द करावा अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

२००४ मध्ये विद्यार्थी चळवळीतून कांचन ननावरे यांनी आपले सामाजिक कार्य सुरू केले होते. त्या देशभक्ती युवा मंचशी जोडल्या गेल्या होत्या. अरुण बेलके व अन्य काही विद्यार्थी कार्यकर्ते २००४पासून एकमेकांना जोडले गेले होते, अशी माहिती कांचन यांच्या सहकारी अनुराधा सोनुले यांनी दिली. सोनुले यांना २०११मध्ये कबीर कला मंचशी संबंधित असल्याने अटक करण्यात आली होती. पण २०१४मध्ये त्यांना जामीन मिळाला.

२००८मध्ये देशभक्ती युवा मंच हा माओवादी संघटनांशी संबंध ठेवून असल्याच्या आरोपावरून कांचन ननावरे व अरुण बेलके या दोघांना अटक झाली होती. हे दोघे व अन्य काही कार्यकर्त्यांवर नक्षलवादी कारवायांना मदत करण्यासंदर्भात यूएपीए अंतर्गत आरोप लावण्यात आले होते. त्यामुळे हे सर्व जण ७ महिने तुरुंगात होते, नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी कांचन ननावरे यांची बिघडत चाललेली प्रकृती पाहून त्यांना पाहण्यासाठी अनुराधा सोनुले या ससून रुग्णालयात गेल्या असता त्यांना भेटू दिले नाही. पण कांचन यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. कांचन यांना डोकेदुखी व ब्लड क्लॉटचा त्रास असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.

पुण्यातील एक वकील गायत्री कांबळे यांना मात्र कांचन यांची भेट घेण्याची परवानगी दिली होती. त्यांनी भेट घेतली त्यावेळी कांचन शस्त्रक्रिया झाल्याने बेशुद्धावस्थेत होत्या.

कांचन यांचे पती अरुण बेलके यांना न्यायालयाने भेटण्याची परवानगी दिली होती पण त्यांच्या वकिलांचा आरोप आहे की, तुरुंग प्रशासनाने कांचन यांना तात्काळ मदत दिली नाही, त्यामुळे त्यांचे निधन झाले.

गेल्या वर्षी मार्चमध्ये देशात कोरोनाची महासाथ पसरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगातील कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र राज्यानेही ११ हजार कैद्यांना सोडण्याचे जाहीर केले होते. पण सरकारने अनेक कैद्यांना जामीन दिला नाही उलट काहींना त्यांनी तुरुंगात टाकले.

राज्याच्या गृहखात्याने गंभीर गुन्हे, बँक घोटाळा, मोक्का, पीएमएलए, एमपीआयडी, एनडीपीएस व यूएपीए अंतर्गत तुरुंगात असलेल्या कैद्यांना जामीन दिला नाही.

कांचन ननावरे यांच्यावर यूएपीएतंर्गत गुन्हा दाखल झाला होता, त्यामुळे त्यांना जामीन मिळाला नाही. पण त्यांच्या गंभीर प्रकृतीकडे सरकारने दुर्लक्ष केले. कांचन यांना ज्या आरोपाखाली २०१४मध्ये अटक करण्यात आली होती, त्यात त्यांना दोषी ठरवले नव्हते अशी माहिती ननावरे यांचे वकील रोहन नाहर यांनी दिली. ननावरे यांची प्रकृती ढासळली असतानाही न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही. त्या माओवादी कारवायांमध्ये आहेत की नाही याची माहिती नाही असे नाहर म्हणाले.

कांचन ननावरे यांच्या मृत्यूसंदर्भात येरवडा मध्यवर्ती कारागृह व ससून रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: