जनाब शायर डॉ. राहत इंदौरी असा पुकारा होताच सर्व आसमंत उसळत असायचा, प्रत्येक श्रोता त्याला ऐकताना भारावून जायचा आणि हा ऊर्जावान शब्दरूपी धबधबा मंचावरून मनसोक्त बरसायचा...हो बरसायचाच...
ज्या शायराने व्यवस्थेविरूद्ध शब्दांच्या अस्त्राने आवाज उठवता येतो हे सांगितलं, ज्याने राजकारणाचे विषारी वारे संबंधांच्या आड येऊ नयेत यासाठी प्रेमाचं गाणं गावं हे सांगताना, “आओ इश्क करे ” अशी साद मानवजातीला घातली. ज्यानं तरुणाईच्या भाषेत तरुणाईला प्रेम कसं करायचं हे शायरीनं शिकवलं. शिवाय हे शिकवतानाच “मेरे बेटे इश्क कर लेकीन हद से गुजर जानेका नही” असं वडिलकीच्या नात्याने सांगितलंही. त्याच्या शब्दांनी लढण्यासाठी बळ दिलं आणि संकटालाही आपण धाडसानं सामोरं गेलं पाहिजे असं म्हणत संकटालाही खडसावताना, “आंधीयोसे कहो अपनी औकात में रहे” असं तो म्हणाला. शिवाय आयुष्याने त्याला शिकवलेले धडे इतरांना सांगताना, “जिंदा रहना है तो तरकीबे बहुत सारी रखो” असा मंत्रही त्यानं दिला. माणसाशी संबंधित प्रत्येक गोष्टीवर तो बोलला, आपलं स्वतःचं मत त्यानं व्यक्त केलं. जीवनाचं सार त्यानं शायरीतून उलगडवून सांगितलं ..आणि आयुष्याची अखेर कमाई काय?? तर मरणाला याचं श्रेय देताना तो म्हणाला, ‘ऐ मौत तुने मुझे जमीदार कर दिया…’, खरंतर त्याचा शब्दन्शब्द अनेकांना आधार देणारा होता. त्याच्या नावासारखाच “राहत”भरा होता. जनाब शायर डॉ. राहत इंदौरी असा पुकारा होताच सर्व आसमंत उसळत असायचा, प्रत्येक श्रोता त्याला ऐकताना भारावून जायचा आणि हा ऊर्जावान शब्दरूपी धबधबा मंचावरून मनसोक्त बरसायचा…हो बरसायचाच…वाईट आणि अत्यंत दुःखदायी हे आहे की हे बरसणं आता थांबलंय..कायमचंच..पण जाता जाता हा जिंदादिल शायर आपल्या ओंजळीत मावणार नाही इतकं अक्षरधन आपल्याला देऊन गेलाय..त्यामुळे त्याची आठवण आपल्याला येत राहणार आहे.
सादरीकरण करतानाची देहबोली, तो मिश्कील स्वभाव, तो ठहराव, ती शब्दफेक, नेमका पॉज हे सगळं सगळं आपल्या डोळ्यासमोर येत राहील.. हे जरी खरे असले की त्यांच्या चित्रफितीतून येणाऱ्या पिढ्यांनाही त्यांना ऐकता येईलच आणि आपल्यालाही. पण खंत हीच की या शायरीच्या धबधब्याला बरसताना आता प्रत्यक्ष पाहता येणार नाही. इथल्या विसंगतीवर अर्थपूर्ण टोचणी देण्यासाठी अजून ते राहायला हवे होते असं मात्र वाटत राहील, वाटत राहील हेही की, अंधार गडद होत चाललेला असताना शब्दांनी प्रकाशवाट दाखवणारा हा शिलेदार इतक्यात जायला नको होता. वाटत राहील आपल्याला हे नेहमी की, द्वेषाची भाषा करणाऱ्यांना ठणकावणारा शायर अजून आपल्यात असता तर?.. जो हे ठणकावतांना म्हणाला होता,
“सभीका खून शामिल है यहाँ की मिट्टी में,
किसीके बापका हिंदोस्तान थोडी है.”…
हे सर्व आणि याहून खूप काही आपल्याला वाटत राहील पण या शायराने मागे ठेवलेली शायरीच आपल्याला भेटत राहील हा शायर मात्र आपल्याला भेटणार नाही.. हे खरंय..पण ते असणार नाही हे माहीत असूनही असं वाटणं हेच त्यांचं “असणं” अधोरेखित करत राहील..हेही खरंय..
आपण जे लिहितो आहोत, जे बोलतो आहोत ते अनेकांना आवडतं आहे, पटतं आहे हे जसं त्यांना माहीत होतं. त्याप्रमाणेच ते अनेकांना आवडत नाहीये, ते विरोध करतायत याचीही त्यांना जाणीव होती.. म्हणूनच ऐकवायला सुरूवात करण्याआधी, इसके लिए या तो “मै मशहूर हूँ, या बदनाम हूँ”, अशी सुरूवात करायला हा शायर कधी विसरला नाही..
पण खरंतर इथल्या प्रत्येक संवेदनशील माणसांमध्ये हा शायर मशहूरच होता. बदनाम तो त्यांच्यासाठी होता ज्यांना त्याचं सत्य सांगणं रुचलं नाही, त्याचं स्पष्ट बोलणं पचलं नाही. पण त्यांना हे दिसलं नाही की शायरीला खऱ्या अर्थाने श्रीमतं करणाऱ्या शायरांपैकी हा शायर होता..ज्याने शेवटपर्यंत जोडण्याची भाषा केली तोडण्याची नाही, ज्याच्या चाहत्यांमध्ये जातपात, वय, सीमा असे कुठले बंधन दिसले नाही..आपल्या झोळीतील शब्दरुपी धन वाटता वाटता त्याचं अंतिम उद्दिष्ट म्हणून, “मी प्रेम करणारा, प्रेम करा असं म्हणणाराच शायर आहे हेच तो सांगत राहिला…म्हणूनच की काय आपण गेल्यावर आपल्यामागे काय उरावं, आणि जगाने आपल्याला काय म्हणून ओळखावं हेही तो आपल्या शायरीतूनच जगाला सांगून गेलाय..
“जनाजे़ पर मेरे लिख देना यारो,
मोहब्बत करनेवाला जा रहा है”…
अशा मोहब्बत करणाऱ्या शायराला विनम्र आदरांजली…राहत साहब हमेशा याद आओगे…
COMMENTS