उत्तराखंडमध्ये परदेशी पर्यटकांना शालेय शिक्षा

उत्तराखंडमध्ये परदेशी पर्यटकांना शालेय शिक्षा

नवी दिल्ली : उत्तराखंड राज्यातल्या ऋषिकेशमधील तपोवन भागात लॉकडाऊन झुगारून राहणार्या १० परदेशी पर्यटकांना पोलिसांनी अनोखी शिक्षा सुनावली आहे. या सर्वांना ताब्यात घेऊन प्रत्येकाला कागदावर “I did not follow the rules of the lockdown, so I am sorry.” हे वाक्य ५०० वेळा लिहायला लावले. एखाद्या विद्यार्थ्याने शाळेत चूक केली की जशी शिक्षा शाळेत सुनावली जाते तशी शिक्षा लॉकडाऊनचे नियम धुडकावणार्या पर्यटकांना केल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली. या १० पर्यटकांमध्ये ६ पुरुष व ४ महिला असून ते लाटव्हिया, इस्रायल, मेक्सिको व ऑस्ट्रेलियाचे नागरिक असल्याचे कळते.

लॉकडाऊनच्या काळात गंगेच्या किनार्यावर आपण ध्यानधारणा करण्यासाठी आलो होतो, पण पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. आम्ही पोलिसांची माफी मागितली पण पोलिसांचे त्यावर समाधान झाले नाही. त्यांनी कागद मागवून घेतले आणि आम्हा सर्वांकडून ५०० वेळा माफीनाफा लिहून घेतला असे पर्यटकांचे म्हणणे होते.

पण या संदर्भात पोलिस उपनिरीक्षक कुमार शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, तपोवन भागात सध्या ५०० पर्यटक राहात असून त्यांच्याकडून रोज लॉकडाऊनचा भंग होताना दिसत आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यामागे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी सर्वांना करता यावे हे मुख्य कारण असते पण त्याकडे अनेक पर्यटक दुर्लक्ष करतात आणि रस्त्यावर रेंगाळत, फिरत बसतात. त्यामुळे या १० पर्यटकांना दिलेली शिक्षा योग्य आहे. त्याने अन्य पर्यटकांना जरब बसेल, असा शर्मा यांनी दावा केला.

मूळ बातमी

COMMENTS