हिंगोली येथे होत असलेल्या, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित १४ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश
विद्रोही साहित्य संमेलनाचा आरंभ होऊन दोन दशके झाली. हे चौदावे साहित्य संमेलन हिंगोली येथेसंपन्न होत आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीची अपरिहार्यता म्हणून विद्रोही साहित्य संमेलनाची चळवळ सुरु झाली. वर्तमानातील अशांत, अस्वस्थ आणि असमाधानी समाजाचा आक्रोश आणि आकांत, सामुहिक स्वरुपात अभिव्यक्त करण्याचा हेतू यामागे आहे. सध्या समाजात पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक व्यवस्था नव्या पेहरावासह समाजाचे शोषण करीत आहेत. जात, वर्ण आणि धर्म या व्यवस्था नव्या रुपात अधिक आक्रमक झाल्या आहेत. सामान्य माणसाच्या जगण्याचा अवकाश कमी होतो आहे. तथाकथित प्रस्थापित व्यवस्था नवे बुरखे परिधान करून भूलभूलय्या निर्माण करते आहे. त्यात प्रस्थापित शोषकांचे स्वार्थ दडलेले आहेत. त्यामुळे सामान्य माणूस सर्वार्थाने नागवला जातो आहे.
लोकशाही व्यवस्थेतही सारी शस्त्रे प्रस्थापित सत्तेच्या हाती एकत्रित केंद्रित झाली आहेत. जात आणि धर्माने माणसाचे विखंड केले. आता जात आणि धर्माच्या टोकदार अस्मितेने माणसे एकमेंकांविरूद्ध लढायला उभी केली. प्रत्येक माणसाला अशा लढण्याशिवाय पर्याय नाही अशी स्थिती निर्माण केली. एका बाजूला आर्थिक दृष्ट्या बलदंड माणसे सत्तेच्या बळासह मैदानात आहेत. त्यांच्या बाजूने राजकीय, धार्मिक, जातीय, सामाजिक, सांस्कृतिक सत्ता उभी केली आहे. आणि हेच सारे योग्य आहे असा आभास निर्माण केला आहे. त्यामुळे माणसामाणसांमधील अंतर वाढले आहे. दुसर्या बाजूला आर्थिक दुबळे असलेले शस्त्रहीन जग आहे. हे बहुजनांचे जग प्रस्थापितांनी निर्माण केलेल्या तुच्छतेमुळे जातीय आणि धार्मिकदृष्ट्या टोकदार अस्मितांसह माणसाला आपसात झुंजायला भाग पाडत आहेत. बहुजन आपसात झुंजत राहतील असे धुमसते वातावरण निर्माण केले आहे. एकलव्य शंबुकापासून हे विभाजनाचे बीज पेरले. त्या बीजाचे आता ठायीठायीच्या विशाल विषवृक्षात रुपांतर झाले आहे. अभिजनांच्या मानसिक क्रौर्याने कळस गाठला आहे. लोकशाही जातीय आणि धर्मिक बहुमतावर चालते असा नवा अलिखित चेहरा समाजाला दिला.
या भिषण वास्तवाला संपवून नवे जीवन घडवण्याचा प्रयत्न लोकशाही व्यवस्थेने करायला पाहिजे. मात्र भीषण अग्नितांडवात अधिक तेल ओतण्याचे काम सहिष्णुतेच्या नावाने नित्य चालले आहे. ’आपण फार सहिष्णू आहेत,’ ’जगात सर्वात अधिक सहिष्णू आम्हीच आहोत’ असे वारंवार सांगितले जाते. जे वारंवार सांगितले जाते हे सत्य नसते. उलट असत्य हेच सत्य आहे सांगण्यासाठी वारंवार सहिष्णू असल्याचे ढोल वाजवले जात आहेत. आपण आपला विवेक जागवला पाहिजे आणि हे खरे आहे का? इतिहासासह वर्तमान तपासून आपली सहिष्णूता सिद्ध होते का? याचा शोध घेतला पाहिजे. बहुसंख्यांक माणसे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक दृष्टीने शस्त्रहीन, सत्ताहीन आहेत. त्यामुळे ती दुबळी आहेत. ती निमूटपणे खाली मान घालून जगतात. त्याला सहिष्णूता म्हणायचे असेल तर ’स्वातंत्र’ नसलेली सहिष्णूता आमच्यात आहेच. मात्र उर्वरित शस्त्रधारी सत्ता असलेली प्रस्थापित मुखंड सहिष्णू आहेत का? हे तपासणे महत्वाचे आहे. ज्यांच्या हाती सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय आणि यामुळे आलेली आर्थिक सत्ता सहिष्णू नाही त्याचे प्रत्यंतर रोजच येते. जात आणि धर्माची उन्मादी असहिष्णूता आमचे जीवन नासवते. त्याचे काही उत्तरदायित्व प्रस्थापित तथाकथित स्वीकारतील का? महात्मा गांधी हत्या करणारे सहिष्णू आहेत असे म्हणणे कोडगेपणाचे ठरते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची हत्या करणारे कोणत्या सहिष्णू प्रकारचे आहेत? नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या सहिष्णू भारतीयांनी केल्या आहेत असे मानायचे का? सामान्य बहुजनांचा आवाजच संपवण्याचे हे कारस्थान सहिष्णूतेचा वेगळा अवतार समजावे लागेल. जगाच्या शब्दकोशातील सहिष्णूतेचा अर्थ बदलावा लागेल असे वातावरण सध्या आहे.
विशेष म्हणजे मानसिक गुलाम झालेल्या बहुजनांचा बहुजनांच्या विरोधात वापरण्याचे कौशल्य मनुसंस्कृती समर्थकांनी विकसित केले आहे. आपले शोषण होते आहे आणि त्यासाठी आपला वापर केला जातो हे न कळणारे हे गुलाम असतात. अशा मानसिक गुलामीत असणार्या बहुजनांना हेच Skill India आहे आणि Startup India आहे. एकलव्याचा अंगठा मागण्यापेक्षा एकलव्यच संपला पाहिजे असे कारस्थान रचले जाते आहे. त्यातून हैद्राबाद विद्यापीठात जानेवारी २०१६ मध्ये संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मार्च २०१७ मध्ये संशोधक विद्यार्थी मथुकृष्णन जीवनांथामिन यांच्या आत्महत्या घडवून आणल्या. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्गीयांच्या शिक्षणाची दारे पुन्हा बंद करण्याचे हे प्रयत्न आहेत. या प्रश्नाचे अभ्यासक आणि अर्थतज्ञ डॉ. सुखदेव थोरात, एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. यांच्या हिताला बाधा आणणार्या केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल म्हणतात, ’केंद्रीय विद्यापीठाच्या प्रत्येक प्राध्यापकाकडे एम.फिल. किंवा पीएच.डी.च्या फक्त सहाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जावा असा नियम करण्यात आला. हा निर्णय एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. विद्यार्थ्यांच्या हिताच्या पूर्णपणे विरोधात होता. या नियमामुळे केंद्रीय विद्यापीठातील प्रवेशामध्ये मोठी घट झाली. उदाहरणार्थ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात २०१६-१७च्या ५०२ वरून एकूण प्रवेशांची संख्या २०१७-१८ मध्ये १३० वर घसरली. त्याचप्रमाणे एस.सी.च्या विद्यार्थ्यांना घेण्याचे प्रमाणही घसरले. २०१६-१७मध्ये १४१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. हा आकडा २०१७-१८मध्ये ३७ पर्यंत खाली आला. एस.टी.च्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणतही अशीच घट झाली आणि या कालावधीत ७५ वरून १६ वर घसरली; तर ओ.बो.सी. विद्यार्थ्यांच्या संख्येत याच कालावधीत २६५ वरून ७६ पर्यंत घट झाली. हे समजून घेतले तर सरकारचे धोरण मागासवर्गीयांच्या विरोधात आहे हे लक्षात येते. एकूण प्रवेशाच्या ७०% जागा कमी केल्या. अघोषित शिक्षणबंदी घालण्याचा हा प्रकार संतापजनक आहे. जे शिक्षण दिले जाते त्यात घटनात्मक मूल्यांचा संबंध आहे का? याचा शोध घेतला पाहिजे. कुठल्याही ज्ञानाचा आणि विज्ञानाचा बौद्धिक परिणाम होणार नाहीत असे अभ्यासक्रम ठरवून लादले जातात. तरूण वयातच बौद्धिक आणि मानसिक गुलाम करण्यात येत आहे.
इतिहासच सोयीप्रमाणे सांगण्याचा सामुहिक प्रयत्न होतो आहे. इतिहासाचे हे विकृतिकरण जाणीवपूर्वक होते आहे. शहरांची नावे बदलण्याचा दुराग्रह यातूनच आला आहे. हिंदू-मुस्लिम भेदनीती हा राजकारणाचा मुद्दा केंद्रस्थानी आणला जातो.
ग्रामीण माणसाच्या भ्रामक प्रतिष्ठेच्या कल्पना, ग्रामीण भागातील काही मानवी समूहाला अजिबात नसलेले स्थान, शेतीचे वाढत चाललेले प्रश्न, पावसाची लहरी स्थिती, पाण्याची कमी होत चाललेली पातळी, शहरालगतची कमी होत चाललेली जमीन, रोजगाराचे कमी होणारे प्रमाण, त्यामुळे शेतीवरील वाढलेला बोजा, यांत्रिकीकरण-नागरीकरणामुळे ग्रामीण माणसाची बदलत चाललेली मानसिकता, या आणि या सारख्या प्रश्नांनी ग्रामीण जीवन ग्रासले आहे. विविध योजनांचा मिळणारा लाभ परिवर्तनासाठी आहे असे समजण्याऐवजी हा लाभ मोफतचा आहे अशी समजण्यात झालेली गफलत फारच विचित्र स्थिती निर्मिणारी ठरली. कमालीची चांगली शेती करणारे मूठभर शेतकरी आणि कमालीची तोट्यात शेती करणारे बहुसंख्य शेतकरी, बँकांच्या पतपुरवठ्याच्या मर्यादेनंतर सारे काही सावकाराच्या हवाली करणारा शेतकरी आणि आपल्या आशा-आकांक्षाच्या पूर्ततेसाठी विश्वासार्हता नसलेल्या राजकारण्याच्या मागे लागलेला शेतकरी सतत ’कंगालाचे अर्थशास्त्र’ अधिक पक्के करतो आहे. देशभर 3 लाखावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अलिकडे या आत्महत्येचे कुणालाच काहीच वाटत नाही. टोमॅटो कांद्यापासून ऊस-कापसापर्यंत सारेच बेभाव चालले आहे. कर्जमाफीच्या Online खेळात त्याला अडकवले जाते.
या दृष्टीने आम्ही साहित्यासंबंधी आणि साहित्य संमेलनाविषयी स्वतंत्र भूमिकेतून विचार केला पाहिजे. ’आमचा आम्हीच विचार केला पाहिजे’ आणि ’आमचे आम्हीच लिहिले पाहिजे’ ही भूमिका शूद्रातिशूद्रांनी घेतली पाहिजे. महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाचा विचार हाच आमच्या साहित्याचा विचार असला पाहिजे. त्यातूनच आमच्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीला आणि साहित्याला श्रीमंती लाभेल.
वैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमधले प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेशभूषा वेगवेगळी आहे. आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्माचे आचरण करतो. सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन, बहुसांस्कृतिक, सामाजिक व्यवस्था जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वात मोठे, विलक्षण असे यश आहे, जे अन्य कुठल्याही देशाला माहीत देखील नाही. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणार्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे.
राग, संताप, क्षोभ आणि प्रक्षोभ परिवर्तनाच्या दिशेने जात नसतो आणि आपल्या भोवतालची स्थिती बदलतही नसते. केवळ आपल्या भोवतीच नव्हे तर समाजव्यवस्था आणि समाजस्थिती बदलण्यासाठी, नवा समाज निर्माण करण्यासाठी, माणूस हे मूल्य निर्मिण्यासाठी नवाच संघर्ष मांडला जातो. हा संघर्ष म्हणजे सर्व स्तरांवर विवेकाधिष्टित परिवर्तन करण्यासाठी दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे नाव आहे ’विद्रोह’.
सध्याचे वर्तमान भयंकर आहे. मत व्यक्त करायला मज्जाव केला जातो. स्त्रियांच्या पेहरावाची चर्चा होते. सत्तेचा उन्माद सर्व बाजूनी आक्रमण करतो आहे. समतावादी, न्यायवादी भूमिका घेऊन संघर्ष करावाच लागेल. संविधान मूल्यांवर आधारलेली नवी संस्कृती निर्माण करायची आहे. त्यातूनच शोषित-वंचित शोषणमुक्त होतील. मूक माणसे निर्भयपणे व्यक्त होतील. प्रतिक्रांतीचा पराभव करतील आणि क्रांती विजयी होईल. ’माणूस’केंद्री लोकशाही निर्माण करण्याचा हा संकल्प आहे. साहित्याने अशी ऐतिहासिक भूमिका घ्यावी. सत्तेला साहित्य, कला, ज्ञान, विज्ञान यांच्याशी संवाद साधावा लागेल. सत्तेच्या आसनाभोवती फिरत ’दास’ होण्यापेक्षा समृद्ध, संपन्न जीवनाचे ’पसायदान’ मागावे. ऐहिक जीवनाची समतेच्या, न्यायाच्या आधारे नवे वर्तमान निर्माण करण्यासाठी संकल्प करावा लागेल. त्यासाठी ’सत्यशोधकी’ विचाराने, ’अत्तदीपभव’च्या मार्गावर मार्गस्थ व्हावे लागेल. ’संविधान संस्कृती’ निर्माणासाठीच अक्षरांतून ’उलगुलान’ करावाच लागेल. तरच वर्तमान वास्तव बदलेल.
COMMENTS