आंबेडकरी विचारांचा रेनेसॉं काळाच्या पडद्याआड

आंबेडकरी विचारांचा रेनेसॉं काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ ‘सुगावा’च्या कामाला परिवर्तनवादी चळवळींचा रेनेसॉं म्हणायचे. या रेनेसॉंचा महत्वाचा खांब स्मृतीशेष झाल्याने आव्हान अधिक वाढले आहे.

उद्दाम माणूस आणि नव्या व्यवस्थेची गरज
असे कसे नेहरु? जसे-तसे मोदी!
डॉ. गेल ऑमव्हेट समतावादी, मानवतावादी आदर्श

आजचा दिवस धक्कादायक बातमीने सुरु झाला. आमच्या एका मित्राने फोन करुन विलास वाघ स्मृतीशेष झाल्याचे सांगितले. बोलताना त्यांनी आपण विलास वाघांना भेटायला गेल्याची आठवणही आवर्जून सांगितली.

मी स्वतः होम क्वारंटाईन असल्याने बाहेरचा संपर्क तुटला आहे. ही बातमी सांगितल्याबद्दल मित्राचे आभार मानले. डोक्यात विचारचक्र सुरु झाले. साधारणतः ८० च्या दशकातला, जेव्हा आम्ही चळवळीत उमेदवारी करीत होतो, तो काळ आठवला. त्या काळात आम्हाला घडविण्यासाठी डाव्या, फुले-आंबेडकरी, परिवर्तनवादी  चळवळीतील ज्या व्यक्तींनी प्रयत्न केले त्यात विलास वाघसर हे महत्वाचे नाव होते. अनेक प्रवाहातील कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले विलास वाघ हे अफलातून व्यक्तिमत्व होते. त्या काळात कार्यकर्त्यांवर शिक्का मारणारे, आपलाच विचार कसा श्रेष्ठ आहे, हे छाती बडवून सांगणारे महाभाग कमी नव्हते. पण विलास वाघ व उषा वाघ हे वेगळे होते. आपण आंबेडकरवादी आहोत हे सांगत असतानाच दुस-या विचारांचे अवमूल्यन न करता कार्यकर्त्यांशी विलास वाघ संवाद साधत असत. त्यांची काही ठाम मते असत. पण आपली मते इतरांवर लादण्याचा कर्मठपणा त्यांनी कधीच दाखवला नाही. अनेकदा आम्ही जातीप्रश्नाचा आग्रह धरुन पारंपरिक कम्युनिस्टांवर टीका करायचो, त्यावेळी कार्यकर्त्याला जमिनीवर आणण्याचे काम वाघसर करायचे तेही न दुखावता!

सुगावा प्रकाशन” सारखी आघाडीची प्रकाशन संस्था उभी करण्याबरोबरच वाघसरांनी शाळा, काॅलेजेस, वसतिगृहासारख्या अनेक शैक्षणिक संस्थाही अतिशय कष्टाने उभ्या केल्या व यशस्वीपणे चालविल्या. “सुगावा प्रकाशना”च्या व “सुगावा” मासिकाच्या माध्यमातून वाघसरांनी अनेक तरुणांना लिहिते केले. साहित्यिकांची पिढीच्या पिढी घडविण्याचे काम वाघसरांनी कोणताही गाजावाजा न करता सातत्याने केले.

त्यावेळी आम्ही “सत्यशोधक” प्रवाहात काम करीत असल्याने वर्णजाती प्रश्नाच्या संदर्भात वाघसरांशी सातत्याने चर्चा होत असे. काम्रेड शरद पाटलांचे महत्वाचे ग्रंथ विलास वाघ सरांनी प्रकाशित केले. त्यावेळी या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाची जबाबदारी आमची असे. त्यानिमित्ताने सातत्याने चर्चा होत. वाघसर हे कर्मठ आंबेडकरवादी कधीही नव्हते. महापुरुषांच्या विचारांचा विकास प्रत्येक कालखंडात होत असतो. त्याची मांडणी करणा-या लेखकांना वाघसरांनी सातत्याने प्रोत्साहीत केले. रावसाहेब कसबे यांचा “आंबेडकर व मार्क्स” हा ग्रंथ असो किंवा गं. बा. सरदारांचे “गांधी आंबेडकर” असो वाघसरांनी प्रचंड टीका सहन करुनही वेगवेगळ्या प्रवाहातील साम्य व मतभेद शोधण्याचा प्रयत्न करणा-या अभ्यासक, विचारवतांचे लिखाण प्रसिध्द केले. वेगवेगळे प्रयोग करण्याच्या व ते यशस्वीपणे करण्याच्या सवयीमुळे वाघसर सतत कार्यरत राहिले. मी दोन वर्षापूर्वी त्यांना धुळ्यात अण्णा भाऊ साठे संमेलनात भेटलो. या वयातही त्यांची काम करण्याची उर्जा प्रचंड होती.

मला बुध्दविचारांच्या संदर्भात आकर्षण निर्माण झाले ते सुगावा प्रकाशनचे साहित्य वाचून व वाघसरांशी सातत्याने चर्चा करुन. त्याकाळात मला इगतपुरीला दहा दिवसांच्या विपश्यना शिबीरासाठी जायचे होते. वाघसरांनी मला माहिती तर दिलीच पण माझ्या फाॅर्मवर ओळखीसाठी सहीदेखील केली.

त्यावेळी जातीअंत कसा होईल, हा आमच्या चर्चेचा विषय होता. फार गंभीर वाचन कुणाचेही नव्हते पण जणू काय आपणच याचा विचार करणारे पहिले आहोत, असा बिनकामाचा अविर्भाव मात्र प्रचंड होता. “माफुआ”च्या तत्वज्ञानाचा प्रभाव होता. त्यातून नंतरच्या काळात अनेक कर्मठांना जन्म दिला पण वाघसरांशी सातत्याने केलेल्या चर्चांनी आम्ही जमीनीवर राहिलो.

साधारणतः १९९५ च्या सुमारास “सुगावा”चा आंबेडकर जयंतीनिमित्त “दलितांना ब्राह्मणी संस्कृतीचे आकर्षण”या विषयावर विशेषांक काढण्यात आला होता. त्याच्या संपादनाची जबाबदारी वाघसरांनी विद्यार्थी कार्यकर्त्यावर दिली होती. या अंकातील डॉ. प्रदीप गोखले यांचा “माझ्या ब्राह्मण्याच्या आठवणी” अशा शिर्षकाच्या लेखाचा माझ्यावर प्रचंड परिणाम झाला. आपण ज्या जातीत अपघाताने जन्माला आलो तिचे संस्कार मोडण्यासाठी आपण आपल्या वयैक्तिक जीवनांत काय प्रयत्न केले, हे सांगणारा हा लेख मला प्रचंड भावला. चळवळीत डिकास्ट झालेले कार्यकर्ते त्यावेळी नव्हते असे नाही पण आपल्याबाबतीत ही प्रक्रिया कशी घडली, हे कोणताही अविर्भाव न ठेवता मांडणी करणा-या लेखाचा माझ्यावर आजही प्रभाव आहे. दुस-यांना डिकास्ट होण्याचे उपदेश करणारे आपण कोणत्या यत्तेत आहेत हे मात्र कधीच सांगत नाहीत. वाघसरांनी काढलेला हा अंकच दलित मध्यमवर्गीयांना ब्राह्मणी संस्कृतीचे आकर्षण कसे असते याची मांडणी करणारा महत्त्वाचा अंक होता.

परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जाती अंतासाठी आंतरजातीय विवाह जाणीवपूर्वक केले पाहिजेत, असा वाघसरांचा आग्रह असायचा. त्यादृष्टीने ते कार्यकर्त्यांची तयारी करुन घ्यायचे. त्यांनी स्थापन केलेल्या मिश्र विवाह संस्थेच्या माध्यमातून वाघसरांनी अनेक विवाह लावले.

जाती नष्ट करण्यासाठी बौध्द धर्मांतराचा मार्ग असल्याचे वाघसर आवर्जून सांगत व हिंदू धर्माला चिकटून राहणारे पुरोगामी कार्यकर्ते वेगवेगळे बहाणे करुन हिंदू धर्माला कसे चिकटून राहतात याबद्दल ते खंत व्यक्त करीत. आंबेडकरी चळवळीच्या कर्मठपणावरदेखील ते सडकून टीका करत. पण माणसाला ओरबाडणे, रक्तबंबाळ करण्याऐवजी त्याच्या बदलाला वेळ देणे, त्यासाठी त्याला सर्व प्रकारची मदत करणे, हे वाघसर सातत्याने करत. जाती मोडल्या पाहिजेत पण आतला माणूस संपता कामा नये, यावर त्यांचा कटाक्ष असे.

‘सुगावा’ ही केवळ एक प्रकाशन संस्था नव्हती तर विविध पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांसाठी ते हक्काचे विचारपीठ होते. त्याचे कर्तेपण अर्थातच आंबेडकरी चळवळीकडे होते.

विलास वाघांनी सर्व प्रवाहातील कार्यकर्त्यांना सतत लिहिते राहण्याचा आग्रह धरला. महाराष्टातील व देशातील अनेक चळवळींशी वाघसरांचे जैविक संबंध होते.

माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वाघसरांचा सहवास लाभला व त्यातून स्वतःच्या संस्कारांवर मात करण्याची प्रेरणा मिळाली.

ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ ‘सुगावा’च्या कामाला परिवर्तनवादी चळवळींचा रेनेसॉं म्हणायचे. या रेनेसॉंचा महत्वाचा खांब स्मृतीशेष झाल्याने आव्हान अधिक वाढले आहे. या प्रचंड धामधुमीच्या काळात वाघसरांसारखी कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणारी मोठी चळवळ पुन्हा उभी करणे हीच वाघसरांना खरी आदरांजली असेल!

त्यांना अखेरचा जय भीम!,लाल सलाम!!

महादेव खुडे, हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीचे सदस्य आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0