व्हिलेज डायरी भाग ८ : आणि आम्ही

व्हिलेज डायरी भाग ८ : आणि आम्ही

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग
एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण ‘द वायर मराठी’वर

मानव इतिहासात मानवाच्या दोन वेगवेगळ्या प्रजातींनी हा ग्रह योगायोगाने एकदाच एकत्रित वाटून घेतला आणि त्यातल्या कदाचित दोन्ही सर्व्हाईव्ह झाल्या असत्या..
शेतीच्या शोधाने प्रगत प्रजातीने या ग्रहाला स्वतःला जगण्यासाठीच्या उपलब्धतेतला सर्वात मोठा साठा बनवत इतर सर्व जीवित गोष्टींना सर्व्हाईवल चं आवाहन दिलं..
आज त्या शेतीला आणि ही जीवनपद्धती टिकवून ठेवलेल्या त्या जुन्या पहिल्या प्रगत मानवांच्या शेतकरी वंशजांना सर्वाईव्हल आवाहन दिलेलं आहे थोड्याफार फारकत घेतलेल्या उर्वरित अतिप्रगत गणल्या गेलेल्या मानवाने !
चुनखडीच्या गुहांमध्ये प्रतिकूल निसर्गास टक्कर देत जगणाऱ्या थकलेल्या निएंडरथाल चे अवशेष मिळाले त्याच्या औजारांसाहित..
कदाचित या पृथ्वीवर कल्पनेतून गोष्टी साकारत जगणारा एकटा आत्ताचाच माणूस नाही याची जाणीव द्यायसाठी शिल्लक असावा..
इथल्या शिवारांत बांधा बंधाऱ्यात महामार्गत काही वर्षांनी असेच अवशेष सापडतील का प्रतिकूल सरकारांशी टक्कर देत जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतीचा शोध लावलेल्या त्या पहिल्या प्रगत मानवांच्या शेतकरी वंशजांचे?
उद्याच्या येणाऱ्या मानवी पिढ्यांसाठी अस्तित्वाच्या क्षणभंगुरतेचं पुन्हा एक उदाहरण बनन्यासाठी कृषी औजारांसाहित बेडग्या खुरप्या नांगरासहित अवशेष मिळावेत..
……
ग्रामीण भाषेत लिहिणारा आणि ग्रामीण भाषेतला लिहिणारा यात फार मोठी दरी आहे.
एक ऐकीव लिहितो दुसरा जगलेलं ओकतो.
एक अभ्यास करून ग्रामीण भाषा अशी अशी असते म्हणून तिला बांधतो, दुसरा तिला जन्म देतो तीचं बाळंतपण करतो.
एक टेबला वर पाय टाकून चेअर वर रेलून ग्रामीण कसं बोलतात हे हसत दाखवतो,
दुसरा रातपाळ्यात कॅनॉल ला पेंगलेल्या लाल डोळ्यानं अविरत बडबडतो..
स्वतःशी
पाण्याशी
लाईटीच्या पोल शी
वाळलेल्या लिंबाशी ..
फरक आहे पहाटं पाच ला शिळी भाकरी दाळ चटणी खाऊन बैलं घिऊन जाणाऱ्या माझ्या भावकी पूर्वजांच्या भाषेत आनी प्रदर्शनात सवलतीत लावलेल्या चिपडछाप पुस्तकांच्या लेखक लेखिका कवी कवयित्री समीक्षकामध्ये.
क्रो मॅग्नन चं लिपीलेस रेखाटणं व्याकरणशुद्ध होतं का बे
…….
शेतीव्यवस्था संपुष्टात येईल पण आज नाही. उद्या नाही.. किंवा पुढचे १००० वर्षही नाही.
त्यापुढील सिव्हीलयझेशन शोषण मुक्त शेती कदाचित घडवू शकेल. टाईप २ सिव्हीलयझेशन जिथे मूलभूत गरजा माणसाच्या जन्मासोबत त्याच्या आयुष्यभराच्या कार्यकाळासाठी पूर्ण करून दिलेल्या असतील.
कालचा संघर्ष दोन समाजगटांमधला नसून दोन मानवी प्रजातींमधील होता आणि तो गेली कित्येक वर्षे अखंड चालू आहे.
…..
शेतीचा शोध उगम उत्क्रांती हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा आहे असं वारंवार अधोररखीत केलं जातं, एखादं पुस्तक येतं सेपियन सारख आणि भारतील त्यातल्या त्यात राज्यातील हुषार लोक शेतीविरोधात पुरावा मिळाल्याच्या अविर्भावात गप्पा मारू लागतात.
युवाल आणि इतर काही संशोधकांच्या म्हणण्या नुसार हे असं आहे याला त्यांची कारणं वेग वेगळी आहेत पण ही विचारसरणी शेतकऱ्यांना दोष देत नाही तर शेतकऱ्यांना शोषित मानते किंबहुना आजचा अस्तित्वात असलेला संपूर्ण माणूस हा शेतकऱ्याचा वंशज तरी आहे किंवा शेतकरी तरी. ही पुस्तकं जगभर सहज उपलब्ध झाल्यामुळे, अनुवादित झाल्यामुळे किंवा हे विचार जग जवळ आल्यामुळे सार्वत्रिक झाले आणि त्याकारणाने भारतातील त्यातल्या त्यात महाराष्ट्र या अतिविद्वान लोकांच्या प्रदेशात येथील महान अडनचोटांनि शेतकऱ्याला मानवद्रोही ठरवत मानवी आरोग्याच्या पतनास सर्वस्वी शेतकरी जबाबदार धरत शेतकऱ्याला पावलोपावली ठोकायला सुरुवात केली. कित्येक विचारधारेणुसार मानवी अस्तित्व हे पृथ्वीच्या ह्रासास कारणीभूत आहे मग तुम्ही आत्महत्या करणार आहात का? किंवा हे मत मांडणारे पर्यावरणवादी स्वतःपासून जीव देऊन सुरुवात करतात का?
पण ८-१० विविध सजीव प्रजाती या स्वतःच अन्न उगवून खातात म्हणजे कल्टीवेट करून म्हणजेच शेती करून.
माणूस सोडून विविध प्रजाती आहेत ज्या लाखो वर्षांपासून एकाच प्रकारचं पीक घेऊन सर्वाईव्ह करतायत.
त्यामुळे फ्रॉड काय असेल तर कॉग्निटिव्ह रिव्हॉल्युशन, अक्कल येणे.
निइंडरथाल टिकला असता तर काळाच्या ओघात शेतीचा शोध त्यांनाही लागला असता किंबहुना अन्न उगवून खाता येतं ही थोडीफार आयडिया असणारी ही मानवप्रजाती होती, तिनेही शेती केली असण्याची शक्यता आहे जिला छंदी म्हणता येईल असं कॉलिन टज सांगतो. प्रोटो फार्मिंग च्या आधी हॉबी फार्मिंग अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. निइंडरथाल हा माणूस इतर मानव प्रजातींपेक्षा जास्त वनस्पती खात होता.
४० हजार वर्षांपूर्वी ऑर्गनाईझ्ड ऍग्रीकल्चरल बिहेवीयर आढळून आल्याने टज पटवून देतो.
२३ हजारवर्षांपूर्वी ट्रायल प्लांटेशन झालेले पुरावे हावर्ड आणि बर्लिन यांच्या संयुक्त विद्यमानाने काम करणाऱ्या इतिहास तज्ञांनी शोधून काढले आहेत.
माणसाला नीच बनवायला, पृथ्वीच्या र्हासाला शेती नाही तर मानवी मेंदू मध्ये झालेली उत्क्रांती कोग्निटिव्ह रिव्हॉल्युशन कारणीभूत आहे.
….
शेती आणि शेतकरी ही संपूर्णतः नैसर्गिक आणि अत्यंत जुनी व समृद्ध जीवनपद्धती आहे.
डुम्स डे नंतर माणसाकडे ध्येयं नसतील कुठलीच, जिवंत राहण्याशिवाय. आज डु वि रिअली निड फार्मर्स हा प्रश्न उपस्थित केला जातोय, भारतात सामूहीकरीत्या शेतकरी नष्ट करण्यासाठी सक्षम पावले उचलली जात आहेत.
डुम्स डे म्हणजे फार काही वेगळा असेल असं वाटत नाही, मानवाचा मानवाशी शेवटचा संघर्ष.
दीड लाख वर्षांखाली निएंडर वॅली मध्ये सेपियन्स आणि निएंडरथाल यांच्यात तुंबळ हाणामारी झालेली, मानवाच्या प्रगत अशा जमातीने म्हणजे सेपियन्स ने निएंडरथाल या जमाती वर हल्ला केलेला, त्यामध्ये त्यांची पीछेहाट झाली व त्यातून वाचलेले नाईल च्या दिशेने पळाले, निएंडरथाल ने या मानवी प्रजातीस जाण्यास मार्ग दिला.
आजचा शहरी भाग हा त्याच प्रगत सेपियन च्या वृत्ती चा आहे आणि शारीरिक क्षमतेवर जगणारा शेती आधारित कृषक समाज हा त्या निएंडरथाल च्या वृत्तीचा.
दीड लाख वर्षांपूर्वी सेपियन पळालेला आणि पुढे तब्बल एक लाख वर्षे निएंडरथालने या पृथ्वी वर स्वतःच साम्राज्य अबाधित ठेवत काळरेषेवर स्वतःच नाव कोरलं.
काळाच्या बदलत्या धावत्या आलेखानुसार एक लाख नाही पण एक हजार वर्षे तरी अजूनही या इथल्या कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची भूमीपुत्रांची आहेत. येणारा काळ तो संघर्ष उघडा करेल, प्रगतीच्या झेंड्यांना पेलणारे हातही याच कष्टकऱ्यांच्या पिकांवर पोसलेले आहेत हे लक्षात यायच्या आधी उशीर झालेला असेल.
कदाचित पुढे हजार वर्षांनी होईल मानवाविना शेती, कदाचित या उत्क्रांतीत गाडले जाऊ पण आज नाही, उद्या नाही आणि पुढचे हजार वर्षे तरी नाहीच नाही.
हा संघर्ष चालू झालेला आहे, या प्रगत मानवाकडून होणारी कृषक समाजाच्या कष्टाची हक्कांची लूट ही एक प्रकारची हिंसाच आहे आणि याचा पुढचा अध्याय हा शारीरिक हिंसेत असेल कदाचित. भविष्याच्या उदरात काय साठलेलं आहे हे आज फक्त एखाद्या काळातीत प्रवाशालाच माहीत असावं.. पण एका स्थिरस्थावर वळणावर त्या विध्वंसानंतर सगळी सगळी ध्येयं संपतील तेव्हा थांबलेला माणूस पोटातली भुकेची आग भागवण्यासाठी इतिहासातून शेतीची पाळंमूळं खोदून काढण्यात पिढ्या खर्ची घालील.
तो शिल्लक राहिलेला माणूस अन्नासाठी दिशा भटकेल..
तो शिल्लक राहिलेला माणूस अन्नासाठी दिशा भटकेल…
……
चौथ्या डायमेंशन च्या फिरणाऱ्या 3D सावल्या आहोत आपण. त्या चौथ्यातले आपल्या अंतरातला दंभ समोरच्या, वरच्या किंवा खालच्या तिन्ही प्रतलात दिसणार नाही अशा स्वरूपात थ्रीडी संसाराचा डाव मांडून बसलेले आहेत, जसा फुटलेल्या सुंदर मातीच्या भांड्याची भग्न बाजू पाठीमागे करून दोन डायमेंशन मध्ये भांडं अजूनही अमूर्त कलेचा अविष्कार असल्याचा भ्रम आपण निर्माण करून देतो तसा… कदाचित आपल्याच हातून फोडलेली कृती झाकोळून टाकायसाठी..
चौथ्या डायमेंशन ची दृष्टी लाभलेला तोच ज्याने आतला दंभ कपट नीच भाव आहे असा वर दाखवला, त्याला सूत्रसमजलं डायमेंशन च, वरच्या डायमेंशन मधून खालच्या डायमेंशन मधलं पाप लपत नाही.. कदाचित या तिसऱ्या स्पेस मधल्या बरबटलेलया भावना चौंथ्यांच्या ट्रायल अँड एरर च्या सावल्या असतील.
अकरा आहेत माहीत असलेल्या डायमेंशन च्या जाती..
खालची वरच्याच्या दृष्टीने नागडी..
वरच्या साठी खलच्याचं अस्तित्व म्हणजे कागदावरल्या रेघांचा खेळ..
खालच्यासाठी वरच्याचं अस्तित्व म्हणजे पिढ्या गेल्या तरी समजणार नाही इतकं किचकट..
नकाशावर गोल काढून शेतजमिनी अधिग्रहण करणारा तो कलेक्टर मंत्री त्या चौथ्या डायमेंशन मधले तर नसावेत?
की शेतकरी दुसऱ्या डायमेंशन मधला असावा?
कष्ट केलं पीक पिकवलं तरीही फास च दिसतो समोर आणि ओल्या कोरड्यानं वरबडून नेलं तरीही फासच दिसतो समोर !
नक्कीच शेतकरी दुसरी डायमेंशन मधला घटक असावा ज्याच्या समोर थ्रीडी क्युब ठेवला तरी दुसर्या डायमेंशन मध्ये फक्त एक आडवी रेघ दिसते आणि एखादा सुंदर चकचकीत गोल ठेवला तरीही आडवी रेघ च दिसते !
तिसऱ्या डायमेंशन मध्ये जगणार्या शहरांना वरून तो दिसत असावा क्युब आणि स्पिअर आणि वाटत असेल मग अरे काय शेतकरी चुत्याय सरळ सरळ दिसतंय क्युब आहे, सरळ सरळ कळतंय एक्स्पोर्ट करा माल, घरोघरी नेऊन विका..
आरे पण हे न सुटणारं कोडं आहे त्याच्यासाठी, त्याच्या डायमेंशन मध्ये उंची च नाही ! त्याच्या डायमेंशन मध्ये पैसा च नाही पुढील सर्व प्रोसेस साठी लागणारा, तो मिळवायसाठी च तो शेती करतो आणि शेती करायला तोच पैसा घालवतो !
हा पॅराडॉक्स आहे शेतीच्या व्यथेचा. पैसे कमवायला शेती करतो आणि शेती करायला पैसा लागतो..!
……..
या मातीशी जबरदस्ती नातं सांगणाऱ्या स्वार्थी उपऱ्यांकडून सुरक्षेचा किंबहुना वाली असण्याचा भ्रम निर्माण करून भूमीपुत्रांचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे..
वोल्डेमोर्ट ते सुपरमॅन पासून नामपानी मोदी फडणवीस पर्यंत सर्वांनी आव आणत नुकसान जास्त केलेलं आहे. अर्थात असेल यातला एखादा इंटेंशन्स चांगले असूनही सुपरमॅन सारखं न भरून येणारं नुकसान करून गेलेला..
बॅटमॅन सारखा भूमिपुत्र त्या दैवी भासवणार्या ताकतीसमोर हतबल होतो मग..
आणि मग अस्तित्वाची शेवटची लढाई लढावी लागते, डु यु ब्लिड? यु विल.. सारखा एखादा डायलॉग हाणत.
यु नो डिफीट? यू विल
त्या माजोरड्या शहरांना या मातीत गाडला गेलेला रात्रीच्या अंधारात शहरांच्या पोटाची काळजी वाहणारा घोंगडं पांघरून दारं धरणारा उपरण्यानं तोंड लपेटल्याला समाजाने घरा दारा परिवारासहीत लुटून ओरबडून नेलेला कधीकाळचा श्रीमंत सरंजाम दुष्काळात गावाला भरभरून दिऊन काळजात जपल्याला पाटील उभाय बांधाबांधावर कमरेवर हात ठिवून…
त्याच्या हाडांना माती लागायच्या आधी आमच्या पिढ्या पिढ्या लेकरं बाळं म्हातारी विचारतील प्रश्न तयार रहा…
” डु यु नो हंगर? यु विल !! ”
या शहरांची प्रेतं आमच्याच खांद्यावरून वाहू, लिहून ठेवा.
…….
क्रमशः
आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS