विशाखापट्टणममध्ये विषारी वायूने ११ जणांचा मृत्यू

विशाखापट्टणममध्ये विषारी वायूने ११ जणांचा मृत्यू

७ मे २०२० रोजी पहाटेची वेळ. आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणममधील एका प्लॅस्टिक निर्मिती कारखान्यात विषारी वायूची गळती झाली आणि या वायूने कारखान्याच्या आसपासच्या चार-पाच खेड्यांना आपल्या विळख्यात घेतले. या गळतीत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शेकडोहून अधिक आजारी पडले. काही बेशुद्ध पडले. वायू गळतीची घटना लक्षात आल्यानंतर काही तासातच नॅशनल डिझास्टर टीमची पथके घटनास्थळी पोहोचली व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

ज्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली तो कारखाना विशाखापट्टणमनजीक गोपालपट्टणम येथे ६० एकर भागात वसला आहे. त्याचे नाव एलजी पॉलिमर्स असे आहे. कडक उन्हाळा असतानाही गुरुवारी सकाळी हवेत धुके दिसू लागले. पण काही वेळात त्या परिसरात राहणार्यांना श्वासोच्छावास घेणे अवघड होऊ लागले. काही जणांच्या त्वचेला खाज येण्यास सुरवात झाली. काही जण चालता चालता रस्त्यावर बेशुद्ध पडले.

ग्रेटर विशाखापट्टणमच्या आयुक्त श्रीजन गुम्माला यांनी ट्विटवर सांगितले की, अनेक जणांच्या नाकावाटे विषारी वायू गेल्याने ते बेशुद्ध पडले.

रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार विषारी वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ५ हजारहून अधिक जण आजारी पडले. त्याचबरोबर कारखान्याच्या परिसरात राहणार्या सुमारे दीड हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

हा विषारी वायू कोणता यावर अनेक वृत्ते प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाली आहेत. त्यानुसार या वायूचे नाव स्टायरेने (फिनीलइथेन) असून तो बेन्झिनमधील घटक आहे. पॉलिस्टायरेने या घटकाचे उत्पादन या कारखान्यात होत होते. या पॉलिस्टायरेनेपासून वापरा आणि फेकून द्या या तत्वावर सर्व ठिकाणी उपलब्ध असलेले चहा, कॉफीचे कप तयार केले जातात. साधारण तापमान व दाबात स्टायरेने वायू हा रंगहीन असतो आणि त्याला गोड वास असतो. खूप दिवस साठवलेल्या स्टायरेनेला पिवळसर रंग येतो.

स्टायरेने जेव्हा शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो श्वसनमार्गात जातो आणि त्याचे स्टायरेने ऑक्साइड तयार होते. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर या अमेरिकेतील संस्थेच्या मते स्टायरेने ऑक्साईड हा कर्करोगाला कारणीभूत घटक आहे. स्टायरेनेने हवेत पसरला की त्याने डोळ्यांची जळजळ होते, नाकात व पोटात गेल्याने मळमळ, अस्वस्थपणा जाणवतो. या वायूच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास व्यक्तिच्या मेंदूवर, यकृत, मूत्रपिंड व रक्तावर त्याचे परिणाम दिसू लागतात.

पण विशाखापट्टणममधील विषारी वायूमध्ये नेमके कोणते घटक आहेत, याची माहिती प्रशासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. आयुक्त गुम्माला यांनी द न्यूज मिनिट या वृत्तसंस्थेला सांगितले की, या वायूची गळती लक्षात आल्याने तो स्टायरेने असल्याचे सांगितले गेले आणि या वायूची गळती होण्याअगोदर त्याचे कारखान्यातच बाष्पीकरण झाले होते.

काही प्रसार माध्यमांनी हा वायू विनिल क्लोराइड असल्याचे सांगितले. विनिल क्लोराइड हे पॉलीविनिल क्लोराइड- पीव्हीसी तयार करण्यासाठी प्रामुख्याने वापरले जाते.

स्टायरेनेचा उत्कलनांक उच्च असतो. त्यामुळे या वायूची गळती कारखान्यातून कशी झाली याची माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. त्याचबरोबर विनिल क्लोराइड हा रंगहीन व वासहीन वायू आहे आणि त्याची घनता हवेपेक्षा कमी असल्याने तो हवेत राहतो.

त्यामुळे एक शक्यता अशी आहे की, एलजी पॉलिमर्स कंपनीतून एकापेक्षा अधिक विषारी वायूंची गळती झाली असावी. या संदर्भात पोलिस उपायुक्त स्वरुपा राणी यांची हिंदूस्तान टाइम्सला दिलेली प्रतिक्रिया वेगळी आहे. त्यांच्या मते जेव्हा गळती झाली तेव्हा वायूच्या कुबट घाण वासाने पोलिस अनेक कॉलनीमध्ये शिरू शकले नाहीत. म्हणून पोलिसांनी कॉलनीच्या बाहेरूनच लोकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले. स्टायरेने वायूचा वास कुबट घाण येत नाही.

नंतर दुपारी अडीच वाजता केंद्रीय गृहखात्याने एक ट्विट केले. त्या ट्विटमध्ये विशाखापट्टणमपासून २० किमी अंतरावर स्टायरेने नावाच्या विषारी वायूची गळती झाल्याचे नमूद करण्यात आले होते. या संदर्भात एलजी केमचे प्रवक्ता यांनी ब्लूमबर्गला सांगितले की, स्टायरेने साठवण्याच्या टाकीतून या वायूची गळती झाली आहे.

गेले ४० दिवस हा कारखाना कोरोना लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आला होता. पण तो चालू केला असे समजते. रात्रपाळीच्या कामगारांना स्टायरेने साठवण टाकीतून वायू गळत असल्याचे लक्षात आले होते. पण या कारखान्यातल्या उपस्थित एकाही कर्मचार्याचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे वायू गळती व मरण पावलेल्या व्यक्तींचे रिपोर्ट यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

आपल्या देशात भोपाळ वायू गळती दुर्घटनेने किती हाहाकार माजवला होता हे सर्वांना माहिती आहे. १९८४मध्ये घडलेली ही घटना जगातील सर्वात दुर्दैवी घटना समजली जाते. २ डिसेंबरला पहाटे युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड या कारखान्यातून मिथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती झाली आणि त्यात ३,७०० हून अधिक जण मृत झाले (पण अनधिकृतपणे मृतांचा आकडा १६ हजार सांगितला जातो) तर ३,९०० कायमचे अपंग झाले तर साडेपाच लाखाहून अधिक नागरिकांना त्याचा शारिरीक त्रास भोगावा लागला होता.

मूळ लेख

COMMENTS