नवी दिल्ली/कोलकाताः प. बंगालच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने केंद्रातील भाजप सरकार व प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये तणाव वाढत चालला आहे. याच तणावात शांतिनिकेतन विद्यापीठातील काही जमीन अवैधरित्या बळकावल्यावरून कुलपती विद्युत चक्रवर्ती यांनी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत त्यांनी शांतिनिकेतनमधील काही जमीन प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी बळकावल्याचा आरोप केला आहे.
या आरोपावर आपली प्रतिक्रिया देताना अमर्त्य सेन यांनी शनिवारी (२६ डिसेंबर) कुलपती हे केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन करत असल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ममतादिदींनी सेन यांच्यामागे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमधील बुद्धिजीवी वर्ग सेन यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे.
अमर्त्य सेन व शांतिनिकेतन यांचे संबंध
१९०८मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी संस्कृत पंडित व विद्वान क्षितीमोहन सेन यांना शांतिनिकेतनमध्ये आमंत्रित केले होते. क्षितीमोहन सेन हे अमर्त्य सेन यांचे आजोबा असून त्यांचा शांतिनिकेतनच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण वाटा आहे.
१९२१मध्ये विश्व भारतीची स्थापना झाली होती. तर १९३३मध्ये अमर्त्य सेन यांचा जन्म झाला होता. अमर्त्य हे नाव रवींद्रनाथ टागोर यांनी सूचवले होते ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे.
टागोर जिवंत असताना त्यांनी विश्व भारतीमधील काही प्लॉट हे ९९ वर्षांच्या भाडेतत्वावर अनेक प्रतिष्ठित, विद्वानांना दिले होते. यातल्या एका प्लॉटवर अमर्त्य सेन यांच्या वडिलांनी ‘प्रतिची’ हा बंगला बांधला. या बंगल्यात सेन यांचे तरुणपण व आयुष्यातला बराचसा काळ गेला व ते या घरात अनेकवेळा राहायला येत असतात.
मे १९५१मध्ये संसदेने एका कायद्याद्वारे विश्व भारतीला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देऊन या विद्यापीठाला राष्ट्रीय संस्था म्हणून घोषित केले.
नेमके काय प्रकरण घडले?
इंडियन एक्सप्रेसने ९ डिसेंबरला दिलेल्या वृत्तानुसार विश्व भारतीचे कुलपती विद्युत चक्रवर्ती यांनी काही फॅकल्टी सदस्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत चक्रवर्ती यांनी असे सांगितले की, अमर्त्य सेन जे स्वतःला ‘भारतरत्न अमर्त्य सेन’ म्हणवून घेतात, यांनी त्यांच्या मुलीला अडचण होऊ नये म्हणून विश्व भारती परिसरात त्यांच्या घरापाशी असलेले फेरीवाले हटवू नये अशी विनंती विद्यापीठाला केली होती. त्यावर कुलपतींनी सेन यांना सांगितले, तुम्हाला तसा त्रास होत असेल तर आपली संपत्ती फेरीवाल्यांना द्यावी. त्यावर सेन यांनी चक्रवर्ती यांचा फोन कट केला.
यानंतर विद्यापीठातील फॅकल्टी असो.चे अध्यक्ष सुदीप्त भट्टाचार्य जे या बैठकीत हजर होते, त्यांनी चक्रवर्ती यांच्या मताच्या पुष्ट्यर्थ एक इमेल अमर्त्य सेन यांना लिहिला.
या इमेलवर सेन यांनी आपण कुलपतींना असे काहीच म्हटले नव्हते असे स्पष्टीकरण दिले. माझी व कुलपतींची अशी काही चर्चाच झालेली नाही. माझ्या घरापुढे फेरीवाले राहातही नाहीत. माझी मुलगी कुठल्या फेरीवाल्याकडून भाजी विकत घेते याची मला माहिती नाही. आणि असे कोणतेही कारण घडलेले नाही की फेरीवाल्यांविरोधात काही कारवाई करावी आणि मी कधीच स्वतःला ‘भारतरत्न अमर्त्य सेन’ म्हणवून घेत नाही, अशी प्रतिक्रिया सेन यांनी दिली.
विश्व भारती सामान्य लोकांच्या आयुष्यात काहीवेळा फारच दखल घेते. विद्यापीठाने लोकांच्या येण्या-जाण्याच्या रस्त्यावर भिंत बांधली आहे आणि यावर मी पूर्वी एका वर्तमानपत्रात लेख लिहिला होता. काही वर्षांपूर्वी माझी आई याच घरात राहायची तिने फेरीवाल्यांना हटवू नये अशी भूमिका घेतली होती पण हे फेरीवाले आमच्या घरापुढे उभे राहात नव्हते. आता कुलपती हा जो दावा करत आहे तो अजबच म्हटला पाहिजे, असे सेन म्हणाले.
भट्टाचार्य यांना नोटीस
विद्यापीठातील अंतर्गत पत्रव्यवहार प्रसार माध्यमांपुढे उघड केल्याने सुदीप्त भट्टाचार्य यांना विद्यापीठ प्रशासनाने आचार संहिता उल्लंघनाबाबत कारण दाखवा नोटीस बजावली आहे.
तर गेल्या २४ डिसेंबरला विश्व भारती प्रशासनाने प. बंगाल सरकारला एक पत्र लिहून त्यात विद्यापीठ परिसरातील अनेक प्लॉटची नोंदणी चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगत अमर्त्य सेन यांनी प्लॉट बळकावल्याचा आरोप केला होता. मूळ भाडेतत्वात सेन यांना १२५ डेसिमल जागा दिली असताना त्यांचा प्रतिची बंगला १३८ डेसिमलवर बांधण्यात आला आहे, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
अमर्त्य सेन यांचे उत्तर
या सगळ्या वादावर सेन यांनी द टेलीग्राफला एक प्रतिक्रिया दिली आहे, त्यात ते म्हणतातः शांतिनिकेतनची संस्कृती व विश्व भारतीचे कुलपती यांच्यात मोठे अंतर आहे. विश्व भारतीच्या कुलपतींमागे बंगालवर नियंत्रण वाढवणारी दिल्लीतील केंद्र सरकारची शक्ती असून मी भारताच्या कायद्यांवर विश्वास ठेवणे पसंत करेन. कुलपती विद्यापीठातील अतिक्रमण हटवण्याच्या नादात आहेत पण आजपर्यंत विद्यापीठाच्या प्रशासनाने अशा अनियमितेबाबत कधीच कुणाबाबत तक्रार केली नव्हती. या विद्यापीठाच्या जमिनीवर आमचे घर आहे ते दीर्घकालीन भाडेतत्वावर आहे, त्याचा अवघी संपण्यास अनेक वर्षे आहेत. माझ्या वडिलांनी काही अतिरिक्त जमीन खरेदी केली व त्याची नोंद जमीन महसूल खात्याकडे आहे.
कुलपतींवर बुद्धिजीवींची टीका
भारतरत्न व नोबेल पुरस्काराने सन्मानित अशा एका प्रकांड अर्थशास्त्रज्ञावर विद्यापीठाच्या कुलपतींकडून जमीन बळकावण्याचा आरोप केला जातो, यावर अनेक विचारवंतांनी, बुद्धिजीवींनी संताप व्यक्त केला आहे.
कुलपतींचे हे वर्तन हुकुमशाह व निरंकुश स्वरुपाचे असल्याचा आरोप केला गेला आहे. यात कवी जॉय गोस्वामी, सुबोध सरकार, गायक कबीर सुमन, चित्रकार जोगेन चौधरी, अभिनेता व राजकीय नेते ब्रत्या बसू, व ललित कला अकादमीतील अनेक बुद्धिजीवींचा समावेश आहे.
मूळ लेख
COMMENTS