शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय !

शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा संबंध काय !

‘द वायर मराठी’मध्ये १७ मे २०२० रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. दिलीप चव्हाण यांचा ‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…’ हा लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखावरील प्रतिक्रिया.

व्हिलेज डायरी भाग ८ : आणि आम्ही
हिंदीः राष्ट्रभाषा की संपर्कभाषा?
भाषिक अंतराचे काय ?

‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…’ हा दिलीप चव्हाण यांचा लेख ‘द वायर मराठी’मध्ये १७ मे २०२० रोजी प्रकाशित झाला. या लेखाचं प्रयोजन स्पष्ट झालं नाही. १४ मे रोजी अरुण फडके यांचं निधन झालं. हा काही त्यांचा मृत्युलेख नाही. या लेखाच्या सुरुवातीला मराठी भाषेच्या शुद्धलेखनासंबंधीच्या फडक्यांच्या भूमिकेसंबंधी आक्षेप आहेत. कोणत्याही भाषेच्या संदर्भात मतमतांतरं प्रकट होणं हे स्वागतार्हच आहे. शिवाय मृत्युलेख म्हणजे दिवंगत व्यक्तीचे निव्वळ गुणगान करावं असेही नाही, तरी एखादी व्यक्ती गेल्यानंतर लगेचच तिच्याविषयी निर्माण झालेल्या उत्सुकतेचा आधार घेत, तिचे लेखन न वाचता तिच्याविषयी शेरेबाजी करणं यातून काय सिद्ध होतं ते मात्र उमगत नाही. फडक्यांच्या शुद्धलेखनासंबंधीच्या भूमिकेचा नीटस परामर्श घेणं हा तर उद्देश या लेखाचा अजिबात नाही. ‘दुर्मिळ’ हा एकच शब्द घेऊन त्यावरून फडक्यांना शुद्धिवादी ठरवून लेखाचे लेखक मोकळे झाले आहेत. फडक्यांच्या ‘दुर्मीळ’ या लेखनामागील भूमिका काय होती, ती शासनमान्य नियमावलीला धरून होती की नाही याबाबत विचार करावा असं लेखकाला अजिबात वाटलेलं नाही. डहाके, शेख, भावे इत्यादी लेखनकोशात तसे आहे म्हणजे ते बरोबर आणि फडके दुसरं सांगतात म्हणून ते चूक आणि म्हणून ते शुद्धिवादी असा सरळसोट निष्कर्ष ते काढून मोकळे होतात. पुढे भाषाशुद्धी आणि संस्कृतव्याकरण यावर तर फारच ढोबळ विधाने प्रा. चव्हाण यांनी  केली आहेत. लेखात अनेक विषयांबाबतची अस्पष्टता दिसते.
फडक्यांच्या मते सूर्योदय या शब्दात ‘सु’ र्‍हस्व लिहावा व त्याचं लेखन सुर्योदय असं करावं असं आहे, हे शासन नियमावलीला धरून नव्हतं, तसेच संस्कृतला धरूनही नव्हतं. चव्हाण यांच्या तर्कानुसार फडके इथे ‘शुद्धिवादी’ भूमिका सोडतात. मग त्यासाठी प्रा. चव्हाण याबद्दल फडक्यांचा उदोउदो करणार का? संस्कृतला अनुसरून अमुक काहीतरी न करणं हे चव्हाणांनी श्रेयस्कर ठरवल्याने त्यांच्याच तर्कानुसार त्यांना हे करणं भाग आहे. फडके हे कसे शुद्धिवादी हे ठरवून लेखक मोकळे झालेल्या प्रा. चव्हाण यांच्या लेखाची धुरा ‘दुर्मीळ’च्या खांद्यावर असल्याने  ‘सुर्योदय’ची दखल घेणं त्यांना गरजेचं वाटत नाही. ते त्यांच्याच पक्षास हिताचं नाही. आपला पक्ष काय आहे हे समजून घेण्यासाठी समोरच्याचा पक्ष डोळसपणे बघणं आवश्यक असतं, परंतु चव्हाणांना फडक्यांचं काही वाचायचं नसल्यानं सगळी चर्चाच खुंटते.

डॉ. चव्हाण म्हणतात, “आम्ही अरूण फडके यांचे कोणतेही पुस्तक वाचलेले नाही. वाचूही इच्छित नाही. मुळात, ‘शुध्दलेखन’ ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. कोणतीही भाषा ही अनेक पद्धतींनी बोलता-लिहिता येते, यावर आमचा अढळ विश्वास आहे. भाषेत ‘शुध्दाशुद्धविवेक’ जोपासणे आणि समाजात स्पृश्यास्पृश्यभेद जोपासणे यात तत्त्वत: कोणताही फरक नाही, असे आम्हाला वाटते.या वाक्यात केवळ अराजकप्रियता दिसते. इतकंच नव्हे, तर शुद्धलेखन आणि स्पृश्यास्पृश्यता यांचा अद्भुत संबंध त्यांनी लावलेला आहे. भाषेच्या प्रमाणीकरणात सर्वच भाषांत लेखनव्यवस्था प्रमाणीकृत केली जाते, त्याबद्दल लोकशाही समाजात चर्चा होतात, व्हाव्यात. पण स्वतः इंग्रजीचे प्राध्यापक असलेले प्रा. चव्हाण फडक्यांची नाही, तर मराठी भाषेतील कोणतीच लेखनव्यवस्था आपल्याला मान्य नाही असे म्हणतात. हीच भूमिका ते इंग्लिशच्या स्पेलिंग्सबाबतही घेतात का? सर्व भाषांच्या संदर्भात त्यांची हीच भूमिका आहे असं क्षणभर गृहीत धरकं तरी एखादं पुस्तक न वाचता, आणि ते वाचण्याची गरजच नाही असं म्हणत त्याविषयी विधानं करणं हे अभ्यासकाला शोभणारं नाही.

अरुण फडक्यांचं पुस्तक वाचलं नाही तर वाचा आणि वाचून त्याचं परीक्षण करा, त्यावर युक्तिवाद करा. त्यातील कोणतीही भूमिका न स्वीकारण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक अभ्यासकाला आहे, पण ते का नाकारत आहात आणि दुसरं मत का स्वीकारत आहात, याचं भाषाविज्ञानाच्या दृष्टीने दखल घेण्याजोगं स्पष्टीकरण द्या.  असे ढोबळ लेख लिहू नका. एखादं पुस्तक का वाचू इच्छीत नाही याचं पटेल असं कारण द्या. शुद्धलेखन याबाबत आणि प्रमाणभाषेबाबत एका भाषाविषयाच्या प्राध्यापकाने इतकी अनभ्यासपूर्ण भूमिका घ्यावी हे दुर्दैवी आहे.

शेवटी तुकाराम आणि जोतिबा ही नावं घेतली की लेखकाला आपली भूमिका प्रमाणित झाली असं वाटतं हा म्हणजे कहरच आहे. आपल्या पुरेश्या विवेकाधिष्ठित नसलेल्या भूमिकेला सांस्कृतिक विद्रोहाच्या प्रणेत्यांची नावं घेऊन प्रति-संस्कृतीचा मुलामा देऊन सुटका करून घेण्याची भूमिका खेदजनक आहे. सुरुवातीला भाषेची शुद्धाशुद्धता आणि सामाजिक स्पृश्यास्पृश्यता यांचा मेळ घालून दिला म्हणजे कोणी आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रमाणलेखनाबाबत विचार होणं आवश्यक आहे असं म्हंटलं की त्याला सरसकटपणे अस्पृश्यतावादाचा समर्थक म्हणून ठरवण्याची सोय होते! एखाद्या भाषेच्या प्रमाणलेखनाचे नियम बनवणं, ते पाळणं आणि अस्पृश्यता पाळणं यात अर्थाअर्थी काय संबंध तो लेखकाने स्पष्ट करावा.

लोकशाही व्यवस्थेत भाषिक प्रमाणीकरण, प्रमाणलेखन नियमावलीची रचना या लोकमतानुसार विचारविनिमयातून ठरवता येण्यासारख्या गोष्टी आहेत. अर्थात त्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी प्रमाणलेखनासाठीची शासनमान्य नियमावाली पाहावी लागेल, ती अभ्यासावी लागेल पण ते लेखक टाळत आहेत कारण त्यांना तसं करणं अस्पृश्यता जोपासण्यासारखं वाटत असावं – हा अजब तर्क आहे. शासनमान्य लेखन-नियमावलीच्या तुलनेत फडके यांची मतं वेगळी होती – ती वेगळी कशी होती, का वेगळी होती हा विचार व्हायला हवा, तो न होता एका शब्दावर चर्चा करून, फडक्यांना शुद्धिवादी ठरवून, प्रमाणलेखनाचा आग्रह आणि अस्पृश्यता जोपासणं यांना तत्त्वतः समान ठरवून लेखक लेख लिहीत जातात.

अभिनजनवाद, संस्कृतोत्पन्नता आणि सामाजिक-भाषाविज्ञान

भाषेच्या प्रमाणीकरणात अनेक हितसंबंध गुंतलेले असतात आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिकदृष्ट्या वरचढ असणार्‍या लोकांची, प्रदेशांची भाषा प्रमाण म्हणून स्वीकृत होताना दिसते हे खरं आहे. यात अभिजनवादाचा प्रभाव निश्चितच असतो. मात्र म्हणून प्रमाणलेखन नसावं असा त्याचा अर्थ होत नाही. लेखनाच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया लोकशाही मार्गाने चर्चा, वाटाघाटी करून सोडवता येते. अमुक एका जातीची भाषा प्रमाण किंवा अमुक एका भागातील भाषा प्रमाण अशी भूमिका भाषाविज्ञान घेत नाही. प्रमाणभाषा  विकसित करण्यासाठी लोकशाही पद्धतीने काम करणारी समिती असते. तिच्या धोरणावर प्रभाव टाकण्यासाठी सुसंघटित प्रयत्न करता येतात. समितीपुढे वेगवेगळ्या बोली भाषांना, भाषेच्या अभ्यासकांना, भाषाविषयक भूमिका असणाऱ्यांना आपली मतं मांडता येतात. समविचारी लोकांशी युती करून भाषेच्या नियमांविषयीची आपली भूमिका स्वीकारायला भाग पाडता येऊ शकतं. पण त्यासाठी प्रमाणलेखन एक लोकव्यवहारार्थ उपयोगी बाब आहे हे आधी स्वीकारलं पाहिजे. खरेतर शासनाने प्रमाण ठरवलेल्या नियमांविषयी आक्षेप उपस्थित करण्याची मुभाही भाषाविज्ञानाच्या अभ्यासकांकडे आहे. अरुण फडके यांनी ती मुभा घेतली होती. शासकीय प्रमाण नियमावलीपेक्षा वेगळे नियम मांडणारं लेखन त्यांनी केलं होतं. प्रा. चव्हाणही प्रमाणभाषेविषयीची शासकीय नियमावली आणि फडके यांची भूमिका याविषयीचे त्यांचे आक्षेप नोंदवू शकले असते, पण तसं न करता प्रमाण भाषेचा संबंध स्पृश्यास्पृश्यतेशी लावण्याचे सोपी पळवाट ते स्वीकारतात.

संस्कृत आणि मराठी, किंबहुना संस्कृत आणि इतर भारतीय भाषा यांच्या नात्याविषयी काही धारणा जनमानसात रुजलेल्या आढळतात. संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, किंवा इंडो आर्यन या उपकुळातील भारतीय भाषा या संस्कृतातून उद्भवलेल्या आहेत या त्यातील सर्वात लोकप्रिय धारणा आहेत. वास्तविक आधुनिक भारतीय भाषांची नाळ प्राकृतांशी जोडलेली आहे. प्राकृत आणि संस्कृत या समकालीन भाषा होत्या. सर्व भारतीय भाषा या सरसकटपणे संस्कृतोद्भव आहेत या धारणेचा भाषाविज्ञानात सुस्पष्ट प्रतिवाद झाला आहे. किंबहुना भाषाविज्ञानात ही गोष्ट कॉमन सेन्सचा भाग झालेली आहे. कोणत्याही कुळातील भाषा त्या कुळातील प्राचीनतम भाषेतून निघालेल्या नसतात. त्या कशा हे समजून घेण्यासाठी पाहा धारूरकर (२०१३अ) – हे सोस्यूर यांच्या एका प्रकरणाचे भाषान्तर आहे व त्यापूर्वी छोटी प्रस्तावना आहे. संस्कृत ही कशी जननी ठरत नाही हे समजून घेण्यासाठी पाहा  धारूरकर (२०१३आ). हे दोन संदर्भ इथे देण्याचे कारण म्हणजे मी प्रमाणलेखनाच्या पक्षात बोलत असलो तरी मी कोणत्याही प्रकारे संस्कृतधार्जिणेपण स्वीकारत नाही. ते का घातक आहे, त्यामागील विवेक काय याबद्दल मी विस्ताराने लिहिले आहे. इतरही अनेक अभ्यासकांनी याविषयी लिहिले आहे.

भारतीय भाषा संस्कृतोत्पन्न होत्या असं मत एकोणिविसाव्या शतकाच्या आरंभी होतं. ते यथावकाश क्षीण होत गेलं. काल्डवेल यांनी १८५६ साली प्रथम मांडलेल्या द्रविडभाषाकुलाच्या प्रस्तावानंतर [पाहा कालडवेल (१८७५)] आणि द्रविड चळवळीने दक्षिणेत ते मत क्षीण केलं आणि उत्तरेतही त्याचा प्रतिवाद होत आहे. मी वर म्हंटल्याप्रमाणे आता विद्यापीठीय वर्तुळातील मानव्यविद्यांच्या ज्ञानशाखांत तो कॉमनसेन्सचा भाग बनला आहे. त्यावर लेखक तीन-चार परिच्छेद लिहून नेमकं काय साधत आहेत ते कळत नाही आणि वर त्या संस्कृतोद्भव कशा नाहीत हेदेखील सांगत नाहीत. पर्यायाने मराठी संस्कृतोद्भव नाही या चावून चोथा झालेल्या आणि आकादमिक कॉमन सेन्सचा भाग झालेल्या मुद्द्याबाबत लेखक डॉ. चव्हाण लांबट चर्चा करतात पण ती संस्कृतोद्भव कशी नाही हे काही खुलासेवार सांगत नाहीत. उलट  फडके न वाचताच ते त्यांना शुद्धिवादी आणि संस्कृतधार्जिणे वगैरे ठरवून टाकतात. फडक्यांवर टीका अवश्य करा, पण त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांची भूमिका काय हे लक्षात घेऊन करा. फडक्यांबाबतचं माझं मत माझ्या प्रतिक्रियेच्या अखेरीस मी संक्षेपात मांडणार आहे.

भाषाविज्ञान आणि सामाजिक-भाषाविज्ञान

केवळ भाषाविचार आणि व्याकरणाच्या चर्चेला भाषाविज्ञान म्हणत नाहीत. भाषाविज्ञानाच्या पायाभरणीतच व्याकरणविषयक पुनर्विचार रुजलेला आहे. परंतु लेखकाने काही ठिकाणी अतिशय मोघमपणे भाषाविज्ञान असा प्रयोग केला आहे. उदाहरणार्थ प्रा. चव्हाण लिहितात “दादोबा पांडुरंग तर्खडकर (१८१४-८२) यांच्यासारखे इतर अनेक व्याकरणकार आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर (१८२४-७८) यांच्यासारख्या भाषावैज्ञानिकांप्रमाणे गुंजीकरदेखील (?) हे गृहीत धरतात की, मराठी ही संस्कृतोत्पन्न आहे.
मुळात आधुनिक भाषाविज्ञानाची पायाभरणीच १९१६ नंतर सोस्यूर यांच्या व्याख्यानांनंतर झाली. त्यामुळे वरील ओळीतील कोणीच भाषावैज्ञानिक नाहीत. शिवाय मराठीच काय तमाम भारतीय भाषांच्या व्याकरणांवर त्याकाळी संस्कृतचा पगडा होता आणि त्यावर मानव्यविद्यांमध्ये पुरेशी चर्चा झालेली आहे. इथे मुद्दा इतकाच आहे की भाषाविज्ञान कशाला म्हणतात याबाबत वरील विधान दिशाभूल करणारे आहे. वरील मंडळी मराठीची व्याकरणकार म्हणता येतील, त्यांना भाषावैज्ञानिक म्हणता येणार नाही.

भाषाविज्ञानात भाषिकवैविध्याचा विचार नक्कीच आहे. शिवाय शुद्धाशुद्धतेच्या, पारंपरिकदृष्ट्या चूक-बरोबरच्या पलीकडे जाऊन भाषेचा विचार केला जातो हेदेखील योग्य. परंतु – भाषाविज्ञानात चूक-बरोबरचा, वैध-अवैध याचा विचार होता आणि सामाजिक-भाषाविज्ञानाने त्याचा प्रतिवाद केला असे म्हणता येणार नाही. तसेच भाषाविज्ञानाच्या पायाभरणीतच आदेशात्मक (prescriptivism) व्याकरण हद्दपार झालेले आहे त्यामुळे त्याबाबतीत सामाजिकभाषाविज्ञानाने भाषाविज्ञानाचे डोळे उघडले असं म्हणण्यात काही तथ्य नाही. वर्णनात्मक भाषाविज्ञानातच वर्णनाचा आशय प्रधान होता तो समजावून देणं हे काम सामाजिकभाषाविज्ञानाने केलं असं नाही. सामाजिक-भाषाविज्ञानाने समाजलक्ष्यी भाषाविचारावर भर दिला. एरव्ही वर्णनात्मक आणि ज्ञानात्मकतावादी भाषाविज्ञानात हा विचार भाषकलक्ष्यी म्हणजे व्यक्तिलक्ष्यी स्वरूपाचा होता. सामाजिक-भाषाविज्ञानाने भाषाविज्ञानाला भाषेच्या अमूर्त व्याकरणाचा पाठपुरावा करणार्‍यांना भाषेच्या सामाजिक संदर्भांबाबत सजग केलं असे म्हणता येईल. परंतु व्याकरण म्हणजे काय, व्याकरणाला धरून असणं म्हणजे काय, धरून नसणं म्हणजे काय या प्रश्नांना हाताळण्यासाठी आधुनिक सेक्युलर दृष्टी विकसित करण्यात भाषाविज्ञान आणि सामाजिक भाषाविज्ञान दोन्ही ज्ञानशाखांचं तितकंच योगदान आहे.

शुद्धता आणि प्रामाण्य यांतील भेदाकडे लेखक सोयीस्कर दुर्लक्ष करतात. सामाजिक-भाषाविज्ञानाचा ३-४ वेळा उल्लेख करणारे लेखक भाषेच्या आणि पर्यायाने भाषेच्या लेखनाच्य प्रमाणीकरणाचा उल्लेख का टाळतात? सामाजिक-भाषाविज्ञानाचे दाखले देणार्‍याला भाषेचे प्रमाणीकरण अज्ञात असण्याचे कारण नाही. शुद्ध आणि अशुद्ध यांत एक मूल्यनिश्चिती असते तिच्यापलीकडे प्रमाण आणि अप्रमाण किंवा प्रमाणेतर यांत एक तटस्थ आकलन असतं – त्याबाबत लेखक काहीच बोलत नाहीत. मराठीला शुद्धतेची लागण संस्कृतातून झाली असे सांगतात. परंतु, मराठी लेखनपद्धती आता संस्कृतचे जोखड सोडण्याच्या प्रयत्नात काही अन्तर पार करून एका टप्प्यावर आली आहे (उदा० संस्कृतातले दृष्टि, भक्ति, शक्ति, युक्ति इत्यादी शब्द मराठीत आपण दृष्टी, भक्ती, शक्ती, युक्ती असे लिहितो), त्याकडे लेखक सपशेल दुर्लक्ष करतात. मराठी साहित्य आणि भाषादेखील संस्कृतप्रचुरतेबाबत सजग आणि संवेदनशील झाली आहे.  या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी लेखनात अजून कोणते बदल लेखकांस अपेक्षित आहेत, त्यातील अडचणी काय आहेत याची चर्चा फडक्यांच्यासंदर्भात करता आली असती, ती काही इथे होताना दिसत नाही.

लेखक डॉ. चव्हाण यांनी माधव देशपांड्यांचं मत दिलं आहे. ‘भाषेचं रक्षण हे व्याकरणशास्त्राचं एक प्रयोजन आहे’ असं महाभाष्यकार पतंजलींचं म्हणणं आहे असं बहुधा चव्हाणांना सुचवायचं आहे आणि त्यासाठी ते देशपांड्यांचे मत उद्धृत करत असावेत, पण त्याचा इथे संदर्भ काय ते काही स्पष्ट होत नाही. पतंजलींचे ते मत हे संस्कृतव्याकरणाच्या बाबतीतलं आहे, त्याचा मराठी व्याकरणाशी काय संबंध? संस्कृतव्याकरणाची सुरुवात भाषा टिकवण्यासाठी झाली असं म्हंटल्यास व  रक्षा (रक्षण) हे एक व्याकरणाचे प्रयोजन मानल्यास तो संस्कृतचा संदर्भ आहे आणि संस्कृतचं त्यास्वरूपाचं कार्यदेखील आहे. काळाच्या ओघात भाषाबदल अटळ असतो. तो थोपवणं हे आजच्या आधुनिक दृष्टीला कितीही घातक वाटत असले, कितीही व्यक्ति-अभिव्यक्ति-स्वातंत्र्याचा संकोच करणारं वाटत असलं तरी हे निकष प्राचीन भारताच्या आकलनासाठी लावणं नक्कीच सयुक्तिक नाही. कारण संस्कृतशास्त्रांची ज्ञानपरंपरा नंतर चालू राहिली, हजारो वर्षे शास्त्रपरंपरेत लोकांना शास्त्रांची भाषा कळत राहिली कारण भाषाबदल थोपवण्याचं काम संस्कृतव्याकरणानं केलं. शास्त्रीय ज्ञानाच्या चौकटीची ती गरज होती, आणि या अर्थी संस्कृतव्याकरणाची संस्कृतशास्त्रांच्या संदर्भात कार्यात्मकता (functionality) लक्षात घ्यायला हवी. ती न घेता संस्कृतपरंपरेला आधुनिकतेच्या न्यायालयात आरोपीच्या पिंजर्‍यात उभी करून तिला कॉन्ज़र्वेटिव म्हणून हिणवणं सोपं असलं तरी तोही कालविपर्यासच आहे. थोडक्यात प्राचीन जगाचं इतिहासलेखन, त्याचं आकलन करताना विशेष डोळस असणं आवश्यक आहे.

फ़ुको [१९७० (२००५): २३५]  म्हणतो तसं खरंतर, Philology, as the analysis of what is said in the depths of discourse, has become the modern form of criticism [ वाङ्मयविदयेकडे सम्भाषिताच्या गहनतेमध्ये काय ठेवलं आहे त्याचं विश्लेषण म्हणून पाहिलं तर ती खरंतर आधुनिक समीक्षेचा एक प्रकारच बनलेली आढळते]. त्यामुळे संस्कृतशास्त्रपरंपरेचं सम्भाषित मुळातून तपासून त्याच्या संदर्भात त्या संभाषिताचे काय अर्थ आहेत, अर्थाचे किती पदर आहेत हे पाहणं आगत्याचं आहे. मुळात आजच्या मानव्यविद्यांत गंभीर वाङ्मयविद्या मागे पडली आहे आणि राजकीय अभिनिवेशातून निर्माण होणारी गरज भागवण्यासाठी आकादमिक बाबींना वेठीला धरलं जात आहे. यातून आकादमिक ज्ञानोपासना आणि लोकप्रबोधन दोन्हीचा घात होत आहे. हा स्वतंत्र लेखाचाच विषय होईल.

आणखीन एक खटकणारी गोष्ट म्हणजे लेखाच्या शेवटी तुकाराम आणि जोतिराव यांची नावं टाकून दिली आहेत. मला माहीत असलेल्या फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रीय परंपरेत तरी एखाद्याचं लेखन न वाचताच त्याला एका पक्षात ढकलून अनेक विषयांवर स्वैर चर्चा करणं याचं समर्थन तुकाराम आणि जोतिरावांच्या नामोल्लेखाने होऊ शकत नाही. विवेकाधिष्ठित युक्तिवाद न करता भावनिक ऐवजावर हेतू साध्य करण्याचं सत्योत्तरयुगाचं हे लक्षणच म्हणता येईल.

प्रस्तुत लेखात साहजिकच लेखनाच्या अनेक चुका [लेखन-वैविध्य! म्हणूया] आहेत –

काय लिहिलेले आहे प्रमाण लेखनानुसार
शुध्दाशुद्धविवेक शुद्धाशुद्धविवेक
अरूण अरुण
अध्या­ऱ्हुत अध्याहृत
सामाजिक भाषा विज्ञान सामाजिक-भाषाविज्ञान
भागिदारी भागीदारी
इच्छित नाही इच्छीत नाही
शुध्दलेखन शुद्धलेखन
तपशीलांचे तपशिलांचे

याच्या अनुषंगाने खालील मुद्दे विचारात घेता येतील –

एकीकडे प्रमाणलेखन ही कल्पनाच आपल्याला मान्य नाही असे म्हणणारे लेखक मात्र आपल्या जवजवळ १४०० शब्दांच्या लेखात केवळ वरीलप्रमाणेच लेखनाच्या चुका करतात. त्यातील काही या टंकनदोषाच्या असू शकतात. हे पाहता त्यांनी केलेला दावा (त्यांना शुद्धलेखन ही संकल्पनाच मान्य नाही) आणि त्यांचं वर्तन (जवळजवळ ९९% हून जास्त मजकूर प्रमाणलेखनाला अनुसरून असणं हे) यात विसंगती दिसते.

शुद्धाशुद्धविवेक याचं लेखन करतना लेखन शुध्दाशुद्धविवेक असं करतात. अर्थात त्यांचा मुद्दा पटवण्यासाठीच ते एकाच शब्दात द्ध दोन वेगळ्याप्रकारे लिहीत असावेत.

वर नोंदवलेल्या शब्दांखेरीज इतरही काही लेखन-वैविध्ये डॉ० चव्हाणांच्या लेखात असू शकतील पण मुद्दा एवढाच आहे की ‘दुर्मीळ’साठी आपटे, डहाके, शेख आणि भावे यांचे कोश पाहणारे लेखक या शब्दांच्या लेखनासाठी मात्र हे कोश पाहात नाहीत.

बाकी वरील लेखनवैविध्यांमागील कारणमीमांसा करण्याचे हे स्थान नव्हे म्हणून ते टाळत आहे.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील ग्रामर स्कूल्सबाबत दाखले विवेचन करून आणि लोवेथ आणि जॉनसन यांच्या कोशाचा संदर्भ देऊन डॉ०चव्हाण इंग्रजीच्या भाषावैविध्याकडे दुर्लक्ष करत सुशिक्षित वर्गाच्या इंग्रजी भाषेच्या आधारे व्याकरण आणि कोश रचले असे सांगतात. मराठीला हीच लागण झाली आहे असे सांगतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की वसाहतकाळात वसाहतकार त्यांच्या धोरणांची दृष्टी घेऊन येऊन वसाहती चालवू पाहात होते. ती दृष्टी अर्थातच निर्मळ आणि न्याय्य नव्हती. आज स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांत आपण आपल्या भाषावैविध्यावर आधारून एका प्रमाणीकरणापर्यंत पोचलो आहोत. अर्थातच कोणत्याही भाषेतिहासात जसे राजकारण असतं तसं इथेही आहे. मुद्दा असा आहे की बदल घडवून आणण्यासाठी एका समावेशक प्रयत्नाची गरज आहे. भाषेच्या प्रमाणीकरणात सगळ्याच बोलींचं प्रतिनिधित्व होणं अवघड असतं. तरी एक समताधिष्ठित समाजात एखाद्याच्या बोलीवरून त्याला डावललं जाणं हा अन्यायच ठरतो. तेव्हा भाषा व लेखन यांच्या प्रमाणीकरणाची प्रक्रिया अधिक समावेशक कशी होईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. भाषेचे प्रस्थापित संकेत आणि समावेशकता यांतील हे द्वन्द्व अर्थातच आह्वानात्मक आहे. कारण भाषेच्या वापरातून तिची अशी एक अभिरुचिव्यवस्था निश्चित झालेली असते. ती बदलण्यासाठी संघटित आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतील. दलित साहित्याने साहित्यिक अभिरुचीचा पुनर्विचार करण्यास मराठी साहित्याला भाग पाडलं आणि भारतीय साहित्यात एक आदर्श घालून दिला. दलित साहित्याने जसा विद्रोह साहित्यक्षेत्रात उपस्थित केला तसा काही अंशी तमीळमध्ये साठच्या दशकांत भाषेच्या बाबतीत उद्भवला होता. तसे महाराष्ट्रात भाषिकक्षेत्रात होणे आवश्यक वाटत असल्यास डॉ०चव्हाण यांनी मराठीभाषेच्या प्रमाणीकरणाचा आणि प्रमाणलेखनाचा फेरविचार कसा व्हावा यावर प्रकाश टाकावा. प्रमाणलेखन मान्य नाही असे म्हणण्यापेक्षा समावेशक लेखनपद्धती कशी असू शकेल यावर ऊहापोह करावा.

हा ऊहापोह आवश्यक आहे कारण डॉ. चव्हाणींनीच लेखाच्या शेवटी उपस्थित केलेला मुद्दा महत्त्वाचा आहे – तो म्हणजे घरात बोलली जाणारी भाषा आणि औपचारिक, कार्यालयीन, पुस्तकं, वर्तमानपत्रं यांत वापरली जाणारी भाषा यांतील तफावतीमुळे अर्थातच बहुसंख्यकांची गैरसोयच होत आली आहे. ग्रामीणक्षेत्रांतील शाळांत ही तफावत अधिकच प्रकर्षाने जाणवते. अशा वेळी भाषेचे प्रमाणीकरण – बोली आणि लेखन या दोन्ही पातळीवर तपासून पाहणं आगत्याचंच आहे. ते आपल्याला मान्य नाही असं म्हणून हात वर करून काही साध्य होणार नाही!

आता शेवटी थोडे फडक्यांनी सुचवलेल्या लेखनपद्धतीविषयी. फडक्यांचा ‘मराठी लेखन-कोश’ आत्ता माझ्या हाताशी नाहीये, पण त्यातील आठवणीतल्या काही भागावर आधारून खालील टिपा नोंदवत आहे –

मराठीच्या प्रमाणलेखन नियमावली (१९८७/२०१२) नुसार सामासिकशब्दांत तत्सम शब्दांतील स्वर मुळातल्याप्रमाणे राहतो. उदा० दृष्टिक्षेप, दृष्टिकोन यांत दृष्टी हा शब्द ‍र्‍हस्व लिहिला जातो. फडक्यांनी यात सुलभीकरण सुचवलेले आहे. त्याच न्यायने त्यांच्यासाठी सूर्योदय नाही तर सुर्योदय हे योग्य ठरतं. समासातील स्वर र्‍हस्व करा असा त्यांचा साधा नियम होता. फडक्यांच्या मते सर्दी असं न लिहिता सरदी असं लिहावं, तसेच सर्रास असं न लिहिता सररास असा लिहावा, तसेच, खात्री, कात्री, भित्रा या शब्दांचं लेखनही त्यांच्या मते खातरी, कातरी, भितरा असं करावं असं होतं. असं का तर त्यात ‘र’ अर्धा असल्याचा भास होतो म्हणून असं अजब स्पष्टीकरण फडके देतात. या स्पष्टीकरणाचे भाषाविज्ञानाच्या आधारे समर्थन करता येत नाही – अशा अनेक तर्कहीन बाबी फडक्यांच्या कोशात आणि त्यांनी सुचविलेल्या लेखनपद्धतीत आहेत, त्यांची नीटस समीक्षा होणं आवश्यक आहे.

हा लेख ज्या ‘दुर्मीळ’बाबत आहे, तो काही संस्कृतशब्द नाही म्हणजेच तो तत्सम नाही. त्यामुळे प्रमाणलेखन नियमावलीतील नियम ७ नुसार त्याचा इकार दीर्घ होईल. याच नियमानुसार गरीब, वकील, भाकीत, ठरीव, ठरावीक, लवचीक हे शब्द अशा प्रकारे लिहिले जातील. डॉ. चव्हाणांनी सांगितलेले कोशकार मात्र प्रमाणलेखन नियमावली न वापरता रूढी अनुसरतात आणि दुर्मिळ असं लेखन देतात. त्या लेखनाचं नियमावलीनुसार तरी समर्थन करता येऊ शकत नाही. अर्थातच यावर रूढी विरुद्ध नियमावली याप्रकारची चर्चा संभवते आणि तशी व्हावीदेखील.

तर एकुणात प्रमाणलेखनाबद्द्ल खालील मुद्दे लक्षात घेतले जावेत

शासनमान्य नियमावली ही प्रमाणलेखनासाठीची मार्गदर्शक तत्त्वं म्हणून पाहावी ती वाहतुकीच्या नियमांप्रमाणे दंडात्मक कारवाईची नियमावली नव्हे. एका समताधिष्ठित समाजात एखाद्या व्यक्तीच्या बोलीवरून, भाषेवरून तिला भेदभावाला सामोरं जाऊ लागू नये हे खरं आहेच. तसंच प्रमाणलेखनातील काही वैविध्यांमुळेदेखील एखाद्या व्यक्तीला हीन लेखलं जाऊ नये. मुद्दा एवढाच आहे की लेखनाबाबत काही एक भूमिका घेऊन तिचा पाठपुरावा व्हावा. कारण आपण कसं लिहितो यातून अर्थातच आपले अनेक दृष्टिकोन आणि विचारप्रणालीच्या भूमिका स्पष्ट होतात. उदा० जोतिराव की ज्योतिराव हे कसं लिहावं हा केवळ अक्षरांचा प्रश्न नाही, तो त्यापेक्षा अर्थातच गंभीर आहे. बोलीभाषेचं जसं सामाजिक भाषाविज्ञान असतं तसं लिखितभाषेचं देखील सामाजिकभाषाविज्ञान असतं आणि त्याआशयाचे प्रवाह भाषाविज्ञानात आहेत [पाहा लिलिस (२०१३)]. गणित आणि व्याकरण, प्रमाणलेखन यांच्या अध्यापनातून भीती बसणार असेल, न्यूनगंड बळावणार असतील तर शिक्षणात त्याप्रमाणे बदल होणं आगत्याचं आहे.

प्रमाणलेखनाचा आग्रह अर्थातच कुठे होतो हेदेखील पाहण्यासारखं आहे. कार्यालयीन कामकाज, शासनव्यवहार, वृत्तपत्रं, शिक्षण, उच्चशिक्षण, न्यायदान इत्यादी क्षेत्रात याचा आग्रह आणि प्रसंगी निकड अधिक असेल तर व्यक्तींमधील अनौपचारिक संवाद, कलात्मक-साहित्यिक अभिव्यक्ती यांच्याबाबतीत प्रमाणपणाचा तसा आग्रह धरता येत नाही. थोडक्यात प्रमाणलेखन हे अर्थातच एका प्रमाणात काही ठिकाणी जास्त स्पृहणीय तर काही ठिकाणी कमी आणि इतर काही ठिकाणी अजिबातच आग्रहाचा विषय . त्यामुळे त्याचा धाक बाळगण्यापेक्षा किंवा त्याबाबत हात वर करण्यापेक्षा त्यात योग्य ते बदल घडवून आणण्याच्या दिशेने कृती करणं आवश्यक आहे.

संदर्भ 

काल्डवेल रॉबर्ट [Caldwell Robert] (१८७५) अ कम्पॅरिटिव ग्रामर आव ग्रामर आव दि द्रविडियन ऑर साऊथ इंडियन फ़ॅमिली आव लॅंग्विजिज़. लंडन: ट्र्युबनर आणि कंपनी लडगेट हिल.

चव्हाण दिलीप (२०२०) ‘मराठी ‘दुर्मीळ’ होऊ नये यासाठी…’ द वायर १७ मे २०२० रोजी प्रकाशित लेख.

धारूरकर चिन्मय (२०१३ अ) ‘प्राचीनतम भाषा आणि आदिमभाषा’. सोस्यूर यांच्या The Oldest language and the protoype या प्रकरणाचे मराठी भाषान्तर. भाषा आणि जीवन पावसाळा २०१३ वर्ष ३१ अंक ३. पुणे: मराठी अभ्यास परिषद. पृ. १८-२५

धारूरकर चिन्मय (२०१३ आ) ‘भाषेचे मायपण’. अक्षर दिवाळी २०१३. गोरेगाव, मुंबई: अक्षर प्रकाशन. पृ० १०१ – १०४

(१९८७) प्रमाणलेखन नियामवली (पुनर्मुद्रण २०१२) मुंबई: भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन.

फुको, मिशेल [१९७० (२००५)] ऑर्डर आव थिंग्ज़. राऊटलिज : लंडन व न्यू यॉर्क.

लिलिस तेरेसा [Lillis Theresa] (२०१३) सोसिओलिंग्विस्टिक्स आव रायटिंग. एडिनबर्ग: एडिनबर्ग युनिवर्सिटी प्रेस.

डॉ. चिन्मय धारूरकर, हे केरळ केंद्रीय विद्यापीठ, कासरगोड येथे भाषाविज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0