भाजपचा पंढरपूर पॅटर्न यशस्वी होणार?

भाजपचा पंढरपूर पॅटर्न यशस्वी होणार?

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना गळाला लावून भाजपने पुन्हा एकदा देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारी केली

जागतिक तापमानवाढ आणि फॅसिझमचा फास
‘नाथा’ पर्वाची अखेर
मिझोराममध्ये आयोग – भाजप- स्थानिक पक्षात वाद

शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना गळाला लावून भाजपने पुन्हा एकदा देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारी केली आहे. या आधी पंढरपूर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने समाधान अवताडे या एके काळच्या राष्ट्रवादीमध्ये असणाऱ्या उमेदवाराला आपल्याकडे खेचत ही निवडणूक जिंकली होती. आता तोच प्रयोग भाजप या मतदार संघात करत आहे. काँग्रेसने भाजपचे हे आव्हान स्वीकारत जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे ही लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदार संघाची ही पोटनिवडणूक होत आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर होत असलेली विधानसभेची ही दुसरी पोटनिवडणूक आहे. या आधी झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. देगलूर बिलोलीची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला दुसरा धक्का देण्याची जोरदार तयारी भाजपने केली आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना गळाला लावून भाजपनं त्यांना उमेदवारी जाहीर केली. केवळ उमेदवारी जाहीर करून भाजप थांबलेला नाही, तर प्रचाराची राळही उडवून दिली आहे. भाजपच्या नेत्यांकडून अशोक चव्हाण यांनाही लक्ष्य केलं जात आहे. तर, शिवसेना सोडणारे सुभाष साबणे हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दगाबाज राजकारणाकडे लक्ष वेधत शिवसैनिकांना चुचकारत आहेत. या सगळ्यामुळं ही निवडणूक काँग्रेसला जड जाईल, असे सध्या तरी बोलले जात आहे.

माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. नांदेड हा चव्हाण यांचा गृहजिल्हा असल्याने पक्षाचा उमेदवार निवडून आणणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीनं काँग्रेसनेही तयारी केली असून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव आहेत. सहानुभूतीच्या लाटेचा फायदा जितेश यांना मिळेल, असा काँग्रेसचा कयास आहे. सोबतच शिवसेना व राष्ट्रवादीचीही साथ काँग्रेसला मिळणार आहे. त्यामुळं भाजपवर सहज मात करता येईल, असा विश्वास काँग्रेसला आहे.

सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. १९९९ ते २००९ या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर २००४ मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१९) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता. काँग्रेसने रावसाहेब यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना मैदानात उतरवून मतदारांना भावनिक साद घातली आहे.  या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जर एक दिलाने काम केले तर काँग्रेससाठी ही जागा पुन्हा आपल्या ताब्यात ठेवणे अवघड जाणार नाही. या मतदारसंघात  ३० ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0