झारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या

झारखंडमध्ये जमावाकडून बेदम मारहाणीत मुस्लिम युवकाची हत्या

संतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले.

रांची : भारतात गोवंश रक्षणावरून हिंदू कट्‌टरतावादी गटाकडून मुस्लिमांना लक्ष्य केले जात असलेला अमेरिकेतील एका संस्थेचा अहवाल भारताने फेटाळल्याला एक दिवस होत असतानाच रविवारी झारखंडमध्ये एका मुस्लिम युवकाची हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे.  ही घटना झारखंडमधील सेरईकेला खारसवान जिल्ह्यातील धतकिधीह गावात घडली.

मृत तरूणाचे नाव तबरेज अन्सारी असून तो २२ वर्षाचा होता. मोटार सायकल चोरी केल्याच्या आरोपावरून गावातल्या जमावाने तबरेजला पकडले व त्याला विजेच्या खांबाला बांधण्यात आले.  जवळपास सात तास जमाव त्याला लाठ्या-काठ्यांनी मारत होता. तबरेजला मारहाण करताना जमावाकडून ‘जय श्रीराम’, जय हनुमान’ अशा घोषणा दिल्या जात होत्या आणि तबरेजलाही या घोषणा देण्यास जमाव उद्युक्त करत होता. प्रचंड प्रमाणात मारहाण होत असताना तबरेज आपली सुटका करावी अशी याचना करत होता, तो माफीही मागत होता पण जमावाकडून त्याला मारहाण केली जात होती.

या संतापजनक प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. जमावाने तबरेजला इतके मारले होते की तो जवळपास बेशुद्ध पडला होता. त्या अवस्थेत जमावाने त्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याचा जाबजबाव घेतला त्यात तबरेजने चोरी केल्याची कबुली दिली. तबरेजला न्यायालयीन कोठडी दिली पण तेथेच अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण तेथे तो मरण पावला.

पोलिसांनी या प्रकरणी ५ संशयितांना अटक केली असून दोन पोलिसांनाही कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित केले आहे.

या घटनेनंतर धतकिधीह गावात तणाव होता. पोलिसांनी वेळीच उपचार केले असते तर तबरेज वाचला असता असा आरोप तबरेजच्या कुटुंबियांनी केला आहे.

या घटनेनंतर शोकाकूल अवस्थेत तबरेजची पत्नी शाहिस्ता परवीनने माझ्या नवऱ्याला तो मुस्लिम होता म्हणून जमावाने अत्यंत क्रूरपणे मारले असा आरोप केला. मला सासर, माहेरकडून कोणीही नातेवाईक नाही. तबरेज माझा एकमेव आधार होता, मला न्याय हवा अशी मागणी तिने केली.

ही घटना उघडकीस आल्यानंतर झारखंड पोलिसांच्या विरोधात देशभर तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिसांनी या प्रकरणात आपल्या बाजूने कर्तव्यच्युती झाल्याचे कबूल केले व एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. शिवाय चंद्रमोहन ओरांव व बिपिन बिहारी या दोन पोलिसांना निलंबित केले. या पोलिसांना हे प्रकरण गंभीर आहे याची कल्पना आली नाही आणि त्यांनी वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली नाही शिवाय जमावावर केसही लावली नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.

COMMENTS