निसर्ग बघण्यासाठी लांब मोठ्या जंगलात जाण्याची गरज नाहीच. आपण बारकाईने सगळ्याचं निरीक्षण केलं, अगदी लहान मुलाच्या कुतूहलाने झाडं, किडे बघितले तर आपल्या भोवती खूप काही सापडत जातं. आपल्या जवळच्या मानवनिर्मित बागांमध्येही आश्चर्य वाटेल एवढी जैवविविधता आणि निसर्गाची चक्र बघायला मिळतात.
कोव्हिडचं भीतीदायक पहिलं वर्ष. वर्क फ्रॉम होमचे नावीन्य उतरून दिवसात कंटाळा भरत चाललेला. जून उजाडला होता. पावसाळी ढगांनी अंधारलेली संध्याकाळ जास्तच निराश वाटत होती. काम थांबवून (काम कधी संपत नाही आणि घरून करताना तर नाहीच नाही!) खाली एक चक्कर मारावी असं वाटलं. लोक थोडे थोडे आपापल्या परिसरात फिरायला लागले होते. फिरून आपल्यालाही बरं वाटेल म्हणून मी मास्क बांधून निघाले. आमच्या इमारतीच्या अवतीभवती, गाड्यांच्या मध्ये थोडीशी बाग होती. पण ह्या शहराच्या मधोमध माणसाने आपल्याला हवी तशी चार झाडं लावलेल्या बागेत काय नवीन दिसणार होतं? जरा ताजी हवा तरी मिळेल (मास्कमुळे तेवढंही मिळू नये अशी सोय झाली होतीच), असं म्हणून मी स्वतःला घराबाहेर ढकललं. इतर लोक फिरत होते त्या डांबरी रस्त्यावरून मीही चालायला लागले.
झाडं बघून कोणालाही आनंद होतोच. वनस्पतीशास्त्र शिकल्यामुळे मला झाडं जास्तच आवडतात. झाडांचं निरीक्षण करत मी चालत होते. सोनमोहोर, पिवळी घंटी, ऑस्ट्रेलियन बाभळ अशी झाडं दिसत होती. त्यांची पिवळी फुलं फुललेली दिसत होती ती बघून पहिल्यांदा जाणवलं, ‘ह्यांचं तर अगदी सुरळीत सगळं चालू आहे की!’. रस्त्याच्या कडेला गुडघ्याच्या उंचीची झुडपं होती. त्यावर पिवळ्या बारीक दोऱ्यांचं जाळं पसरलेलं दिसलं. बागा, शेतांसारख्या मुबलक पाणी असलेल्या ठिकाणी येणारी ही एका प्रकारची अमरवेल. ‘गोल्डन डॉडर’ तिचं नाव. आपण ‘सोशल डिस्टंसिंग’ करत असताना ही अमरवेल मात्र मजेत ह्या झुडपांवर पहुडली होती. फक्त पहुडलीच नव्हती तर त्या झुडपांकडून त्यांचं अन्नपाणीही शोषून घेत होती. तिच्या अशा वृत्तीमुळे बिचारी बदनाम आहे. पण ह्या वेलीही निसर्गसाखळीचा महत्त्वाचा भाग आहेत. त्या त्यांची परिसंस्था पूर्ण करतात. ह्या लहानशा बागेत परिपूर्ण परिसंस्था दिसत होती. अगदी माझ्या बिल्डिंगजवळ!
ह्या विचाराने बरं वाटतच होतं तेवढ्यात माझी नजर एका जुन्या कारकडे गेली. कारचा मागचा लाल दिवा नसून तिकडे नुसतंच भगदाड होतं. मी उगाचच कारच्या जवळ गेले आणि त्या काळोखात नीट बघू लागले. त्या काळोखातून माझ्याकडे एक पिवळा डोळा बघत होता! मी दचकले! कारपासून एक पाऊल लांब झाले. तो डोळाही सावकाश आतल्या अंधारात गडप झाला. मी रोमांचित झाले, माझ्या अंगावर काटा उभा राहिला! भीतीही वाटत होती. कोणाचा असावा तो डोळा? छोटीशी घोरपड? साप? देव जाणे. हृदयाचे वाढलेले ठोके शांत करायचा प्रयत्न करत तिथेच उभी राहिले. येणारे जाणारे लोक माझ्याकडे बघत होते. तो प्राणी इतरांना दिसू नये आणि त्याला कुणी इजा करू नये अशी प्रार्थना केली. मनातल्या मनातच मी त्याला ‘तू आतच रहा!’ असं सांगितलं आणि पुढे चालायला लागले. ह्या लहानशा शहरी बागेत अजून काय काय दिसू शकेल?
आता मी आनंद आणि उत्सुकतेने चालत होते. एक दोन पाऊस पडून गेल्यामुळे गवत नव्या जोमाने वाढत होते. लाइटचे खांब, जवळ उभ्या असलेल्या (अजून किती दिवस कुठेही जाऊ न शकणाऱ्या) मोटरसायकलीवर चढून वेली आपली नवपालवी गाडीच्या आरशात बघत होत्या. काही जमिनीवर वाढणाऱ्या वेली फुटपाथच्या फरश्यांच्या कलानी पसरत सुंदर नक्षीकाम करत होत्या. ओल्या मातीवर मॉसची नाजूक हिरवळ पसरली होती. उन्हाळ्याची ऊर्जा घेतलेला मोगरा अजूनही थोडा थोडा फुलत होता. त्याच्याशेजारीच शतावरीची वेल कुंपणावर चढत होती. कुंपण ओलांडून बाहेर फिरायला तर जायचं नसेल तिला? पश्चिम घाटातल्या जंगलात फिरताना दिसलेला ‘सोनतारा’ मला दिसला. त्याच्या गवतासारख्या पातींमधून इवलीशी पिवळी कळी डोकावत होती. हे गवतफूल पावसाळ्यातच दिसतं. ते उंच डोंगराळ भाग सोडून इकडे कसं आलं ह्या विचारात आजूबाजूला नजर फिरवत असताना जंगलात येणारा दिंडाही दिसला! ‘लिया इंडिका’ नावाच्या ह्या झुडुपाची फळं पक्षी खातात. म्हणजे फलाहार करून एवढ्या लांब प्रवास करणारे पक्षीही माझ्या आजूबाजूला आहेत तर! जंगलाच्या ह्या लहानशा दर्शनाने मला खूपच छान वाटून गेलं. घरात बसून बाहेर ऋतू हळू हळू बदलत होते हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. पावसाळ्याच्या ह्या साऱ्या निशाण्या बघून मला टवटवीत वाटत होतं. तिथेच अवतीभवती एक निळा चतुर भिरभिरत होता. अंधार पडत चालला तसा एक शांत फांदी शोधून तो रात्रीसाठी स्थिरस्थावर झाला. त्याचा फोटो काढून मी अजून उत्साहात पुढे निघाले.
पिवळा कांचन कधी तुम्ही पाहिला आहे का? माझ्या ह्या बागेत तो बहरलेला दिसतो. पांढऱ्या मंद सुवासाचा चाफा दिसतो. त्याच्याखालून चालत जाताना एक फूल टपकन माझ्या खांद्यावर पडलं. झाडाने मला भेटवस्तू दिली की काय? हे फूल देऊन ते ‘धीर धर, सगळं नीट होईल. मी आहेच इथे!’ असं सांगू पाहत होतं का? फूल कुरवाळत मी चालत राहिले. फुललेले ताम्हण, लाल भोकर खूपच मनोहर दिसत होते. सोनचाफा कळ्यांनी लगडलेला दिसत होता. ह्या कळ्यांची फुलं होतील, फुलांची फळं, फळांतून बिया आणि बियांतून नवीन झाडबाळं! असं आयुष्य पूर्ण केलेलं एक मेलेलं झाड परत मातीत न्यायला बुरशी आली होती. ते मातीत मिसळून नव्या झाडांचं संगोपन करणार होतं. मला हा सगळा विचार करून खूप सकारात्मक वाटायला लागलं. हिरवी पालवी, रंगीत फुलं, रसदार फळं, फळाफुलांवर येणारे किडे, पक्षी, इतर प्राणी, जुन्या झाडाच्या खोडांवर आलेली वैविध्यपूर्ण बुरशी… निसर्गाचं सगळं काम रीतसर सुरू होतं, सुरू राहणार होतं.
हे सातत्य, ऋतुंसोबत सहज बदलणं, बदलाचा स्वीकार करणं निसर्ग आपल्याला शिकवतो. निसर्ग आपला आहे, आपल्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. अत्यावश्यक प्राणवायू, अन्न-वस्त्र-निवारा हे सगळं आपण निसर्गाकडून घेतोच; शिवाय निसर्गात वावरून, त्याचं निरीक्षण करून जगण्याची नवी उमेद येते. घरी राहून जे वाईट, नकारात्मक विचार येतात, ते निसर्गाकडे बघताना दूर जातात. निसर्ग बघण्यासाठी लांब मोठ्या जंगलात जाण्याची गरज नाहीच. आपण बारकाईने सगळ्याचं निरीक्षण केलं, अगदी लहान मुलाच्या कुतूहलाने झाडं, किडे बघितले तर आपल्या भोवती खूप काही सापडत जातं. आपल्या जवळच्या मानवनिर्मित बागांमध्येही आश्चर्य वाटेल एवढी जैवविविधता आणि निसर्गाची चक्र बघायला मिळतात. ह्या खुल्या जागांचं संगोपन करायला हवं. आपल्या निसर्गापासून दूर झालेल्या जीवनशैलीचा विचार करण्याची गरज आहे. पुन्हा निसर्गाकडे वळण्याची, त्याचं निरीक्षण करत त्याला समजून घेण्याची गरज आहे. निसर्ग समजता समजता आपण स्वतःच्या जवळ जातो, मनाने सकारात्मक आणि सुदृढ होतो. मानसशास्त्राने हे मान्य केलं आहेच. तुम्हीही स्वतः हा अनुभव घ्या.
सई गिरधारी, वनस्पती शास्त्राच्या विद्यार्थिनी आहेत.
(ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन’ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.)
NatureNotes
COMMENTS