सक्तीचे मराठी : शिक्षणाचा पूल

सक्तीचे मराठी : शिक्षणाचा पूल

डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर, होमी भाभा यांचे सहकारी डॉ. भा. मा. उदगांवकर या सर्वांचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. हायस्कूल नंतर विज्ञान शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्याने त्यांना आपापल्या विषयात प्राविण्य मिळवण्यात कसलीही अडचण आली नाही.

जेएनयू : एक महान विद्यापीठ बरबाद झाले त्याची गोष्ट
जेएनयू साबरमती हॉस्टेलच्या वॉर्डनचा राजीनामा
एनसीईआरटीने काश्मीरातील चळवळीचा इतिहास वगळला

महाराष्ट्र शासनाने दहावीपर्यंत सर्व शाळेमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करायचा निर्णय घेतल्यावर बहुतेक शाळा व संस्थाचालकांनी याविरुद्ध पवित्रा घायचा विचार सुरू केला आहे. १९९०च्या सुमारास स्थानिक मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी माध्यमातून त्यातल्या त्यात विज्ञान शिक्षण इंग्रजी व इतर विषय मराठीतून द्यायच्या शाळा चालू केल्या. १९४७ साली ब्रिटिश भारतातून निघून गेल्यावर त्यांची भाषा शिक्षणाचे माध्यम असावे असे सैनिकी शाळा राजघराण्यातील मुले जेथे शिकत होती किंवा कॉन्व्हेट स्कूलमध्ये आपली मुले जावीत असे धनाढ्य कुटुम्बातील पालकानावाटणे साहजिक होते. प्रत्येक पालकाचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या किंवा सेमी इंग्लिश माध्यमाच्या शाळेकडे जात राहिला तर स्थानिक माध्यमांच्या शाळेचे काय होणार हा प्रश्न दिवसेदिवस अधिकच अवघड झाला आहे. मुंबई सारख्या बहुभाषिक शहरातूनच नव्हे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक नामवंत (?) इंग्रजी माध्यमाची शाळा व त्याभोवती असलेल्या खुरटलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळा असे केविलवाणे चित्र दिसायला लागले. त्यातूनच मग शिक्षण विभागाने २०पेक्षा कमी संख्या असलेल्या शाळा बंद करायचे ठरवले.

खरेच स्थानिक भाषेतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान समजत नाही. संशोधन करताना त्यांना अडचणी येतात. मात्र इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या सोबत्यांना अधिक चांगली संधी मिळते असे काही होते काय याचा ऊहापोह मला करायचा आहे. आजचे इस्रोचे डायरेक्टर कैलास वादिवू शिवन यांचे शिक्षण शासकीय तामीळ माध्यमाच्या शाळेत झाले. महाराष्ट्रात आजच्या घडीला वैज्ञानिक म्हणून त्यांची ख्याती आहे असे डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. काकोडकर, होमी भाभा यांचे सहकारी डॉ. भा. मा. उदगांवकर या सर्वांचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. हायस्कूल नंतर विज्ञान शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्याने त्यांना आपापल्या विषयात प्राविण्य मिळवण्यात कसलीही अडचण आली नाही.

स्थानिक भाषा हीच कुटुंबातील मातृभाषा असल्याने व ती कानावर सतत पडत असल्याने ती वेगळी शिकावी लागत नाही. भाषा वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तुलनात्मक बाबींची जाण अधिक असते. मातृभाषा कसल्याही दडपणाशिवाय शिकल्याने त्या भाषेत विचार करणे व मांडणे सुलभ असते. भाषेच्याच शब्दात सांगायचे तर मातृभाषेची ‘ऊब’ तुम्हाला शिकताना सुखदायक ठरते. अन्य देशी-परकीय भाषेचा अनाठायी ताण येत नाही. दुसऱ्या भाषेत शिकताना मातृभाषेतील शब्दाचा अर्थ काय असेल याचा तर्क करण्याने मातृभाषा एखाद्या तरफेसारखे काम करते. मातृभाषेचे उत्तम ज्ञान असल्यास दुसरी भाषा शिकणे अधिक सोपे जाते. स्वभाषेबरोबर परकीय भाषेचे व्याकरण उत्तम प्रकारे समजते. स्वत:च्या भाषेत मातृभाषेचा वाटा अधिक असतो. भाषा सांस्कृतिक , सामाजिक व व्यक्तिगत ओळख यांची जाणीव ठेवते. जीवन समृद्ध करताना स्थानिक भाषेमुळे जी नाळ समाजाशी जोडलेली असते ती इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जवळजवळ तुटलेली असते.

जागतिकीकरणामुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे दोनहून अधिक भाषा येणे आवश्यक बनले आहे. त्यातून नवी भाषा शिकणे अनिवार्य झाले आहे. या अनिवार्यतेतून शाळांनी दुसरी किंवा तिसरी भाषा शिकण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना द्यायला सुरवात केली. शहरी पालक यामुळे वाढत्या वयात पाल्याशी इंग्रजीत बोलू लागले. जगभर जेव्हा द्वैभाषिक शिक्षण चालू झाले तेव्हा भारतीय शाळानी गेल्या ७० वर्षांत तीन भाषांचा स्वीकार केला. मातृभाषेऐवजी इंग्रजी माध्यम व दुसरी तिसरी भाषा फ्रेंच किंवा जर्मन भाषा शिकवणाऱ्या शाळांची चलती सुरू झाली. या प्रकारात मराठी शिकणे, बोलणे व वाचणे जवळजवळ बंद झाले. याचा विचार करून दहावीपर्यंत प्रत्येक शाळेतून मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय झाला. यात मराठी शाळा, मराठीचे शिक्षक व भाषा टिकून राहतील असा प्रयत्न होता.

गोवा राज्याचे शैक्षणिक धोरण आपण घेण्यासारखे आहे. १०० टक्के साक्षर असलेल्या गोव्याला जाण्याचा जेव्हा प्रसंग आला त्यावेळी बोलीभाषा कोकणी, एक कोकणीतील वर्तमानपत्र सोडून सर्व वर्तमानपत्रे मराठी, शाळेत चवथ्या इयत्तेपर्यंत प्रत्येकास मराठी लिहिता वाचता आलेच पाहिजे, हे लक्षात आले. इंग्रजी वाचण्याऐवजी मराठी वाचणे हे गोव्यात जर शक्य होत असेल तर महाराष्ट्रात का नाही? गोव्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुद्धा मराठीचे शिक्षक आहेत. बोली भाषा कोकणी. प्रत्येक सभा कोकणीमध्येच सुरू होते, बातमी मात्र मराठीत प्रसिद्ध होते. इंग्रजी बातमी ‘हेराल्ड’मध्ये छापून येते.

आता एक मुद्दा उरला तो म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाचे काय? विज्ञान शिक्षणाचे पारिभाषिक शब्द इंग्रजी असल्याने इंग्रजी माध्यमात विज्ञान शिकावे व विज्ञानात पुढे जावे असे वाटणे स्वाभाविक आहे. याचे उत्तर मी जरा वेगळ्या पद्धतीने देतो. फ्रेंच, जर्मन, जपान, कोरिया, रशिया, स्पेन, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, नॉर्वे येथे विज्ञान त्यांच्या स्थानिक भाषेतून दिल्याने त्यांची वैज्ञानिक प्रगती खुंटली आहे काय? त्यांच्या शोधनिबंधांचे भाषांतर इंग्रजीतून वाचले जाते. त्यांच्या भाषेत पारिभाषिक शब्द आंतरराष्ट्रीय भाषेतील वापरले जातात. असा प्रयत्न आपण करून पाहायला काय हरकत आहे?

‘बालभारती’ ही महाराष्ट्रातील क्रमिक पुस्तके बनवणारी भारतातील एक अग्रगण्य संस्था आहे. पण धोरणानुसार आजही कोणत्याही इयत्तेचा अभ्यासक्रम इंग्रजीत तयार होतो. अभ्यासमंडळ पुस्तक लिहून घेताना लेखकांना इंग्रजीत पुस्तक लिहा असे सांगतात. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर छापून शाळेमध्ये पुरवले जाते. त्याऐवजी मराठी पुस्तकाचे भाषांतर इंग्रजीत करा, असे सांगितले तर मराठी लिहिणारे लेखक नेमावे लागतील. या उपक्रमामधून मी गेलो आहे. जे क्रमिक पुस्तकाचे तेच शिक्षक पुरवणी पुस्तकाचे. ती सुद्धा आधी इंग्रजीत करायची. त्यामुळे ‘बालभारती’ची मानसिकता बदलावी लागेल. इंग्रजी किंवा सेमी इंग्रजी माध्यमातील विज्ञान  पुस्तकांची वितरण संख्या आता मराठी विज्ञान पुस्तकाहून अधिक झाली आहे. दहावी-बारावी बोर्डाचा निकाल जर पाहिला तर ज्या चुका इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी करतो त्याच चुका मराठी माध्यमाचा करतो. यात त्याला समजले नाही त्यात माध्यमाचा दोष नाही. उलट इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याला आपले काय चुकले आहे हे घरी व शाळेत कधीच समजत नाही.

अझीम प्रेमजी फाउंडेशनने केलेल्या चार राज्यातील १,२१० कुटुंबातील २,४६४ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यात जी बाब पुढे आली ती म्हणजे, पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल योग्य पर्याय निवडत नाहीत. ज्या शाळेत इंग्रजीवर भर अधिक दिला जातो अशा शाळेत घालण्याकडे पालकांचा कल असतो. केवळ इंग्रजी बोलण्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढेल हा हेतू त्यामागे असतो.

‘लोक (lok) फाउंडेशन’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार इंग्रजी ही शहरी भाषा बनली आहे. केवळ तीन टक्के ग्रामीण भागातील व्यक्तींना इंग्रजी समजते. शहरी भागात हेच प्रमाण १२ टक्के आहे. ४१ टक्के उच्च शहरी व्यक्ती इंग्रजी बोलू शकतात. तर हेच प्रमाण ग्रामीण भागात २ टक्के आहे . पालकांनी स्थानिक व इंग्रजी भाषेस केवळ बोधनाचे माध्यम समजून दोन्ही भाषेत पाल्याला शिकवले तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे.

विज्ञान शिक्षणावर काम करणारी भारतातील डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा असलेली संस्था म्हणून होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘कॉग्निजन’ म्हणजे बोधन क्रियेवर संशोधन करणाऱ्या या संस्थेमध्ये शिक्षणाचे माध्यम कोणतेही असो, विद्यार्थ्यांना समजणाऱ्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याने कसलाही अडथळा येत नाही हे त्यांच्या संशोधनातून पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व माध्यमाच्या शाळेतून मराठी शिकवण्याने मराठीचे भले होईल. मराठी हा अडथळा मुळीच नाही हा एक शिक्षणाचा पूल आहे.

मोहन मद्वाण्णा, निवृत्त सहाय्यक प्राध्यापक, दयानंद महाविद्यालय सोलापूर आणि समन्वयक प्राणीविज्ञान ज्ञानमंडळ , मराठी विश्वकोश.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0