एम.जे.अकबरांच्या नियुक्तीला पत्रकारांचा विरोध

एम.जे.अकबरांच्या नियुक्तीला पत्रकारांचा विरोध

नवी दिल्लीः माजी संपादक, भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांची ‘वियोन न्यूज’ (WION News) या वाहिनीवरची सल्लागार संपादक म्हणून झालेली नियुक्ती रद्द करावी अशी मागणी करणारे सुमारे १५०हून अधिक पत्रकारांच्या स्वाक्षरीचे पत्र झी न्यूज व वियोन न्यूजच्या प्रशासनाला पाठवण्यात आले आहे. वियोन न्यूज वाहिनी ही झी मीडियाचे इंग्लिशची वाहिनी आहे. या वाहिनीवर गेल्या ऑगस्टमध्ये सल्लागार संपादक म्हणून एम. जे. अकबर यांना नियुक्त केले होते.

एशियन एज या वृत्तपत्राच्या संपादक सुपर्णा शर्मा यांनी ट्विटरवर १५० हून अधिक पत्रकार व प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. यात पत्रही आहे. या पत्रात एम. जे. अकबर यांच्यावर ते संपादक असताना त्यांनी २०हून अधिक महिला सहकार्यांवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे आरोप आहेत. अशा व्यक्तीला कामावर ठेवणे अयोग्य असून आरोप असलेल्या पत्रकाराला कामावर ठेवण्याचा निर्णय घेणे व या पीडित महिला पत्रकारांनी सहन केलेल्या शारीरिक व मानसिक अत्याचाराकडे दुर्लक्ष करून वायोन व झीने आपली पत्रकार म्हणून असलेली जबाबदारी झटकली आहे, असा पत्रात आरोप आहे.

या पत्रावर स्वाक्षर्या करणार्या प्रमुख पत्रकारांमध्ये बरखा दत्त, आकार पटेल, निधी राझदान, पल्लवी गोगोई, अक्षय मुकुल, नेहा दीक्षित, सुपर्णा शर्मा, तिस्ता सेटलवाड, चिन्मयी श्रीपदा, हैमा देशपांडे, नमिता भंडारे हे प्रमुख आहेत.

मूळ बातमी

COMMENTS