३४०० वर्षांपूर्वीचा राजवाडा प्रकट झाला

३४०० वर्षांपूर्वीचा राजवाडा प्रकट झाला

इराकच्या दुष्काळामुळे मोसूल धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळेच हा शोध घेणे शक्य झाले.

राज्याला वित्त आयोगातून १ हजार २९२ कोटी निधी
‘सरकारच्या विनंती’वरून तेजस्वी सूर्यांचे ट्विट काढले
कमला हॅरिसः डेमोक्रेट्सतर्फे उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

जर्मन आणि कुर्दिश पुरातत्त्ववेत्त्यांनी ३,४०० वर्षांपूर्वीच्या एका राजवाड्याचा शोध घेतला आहे, जो रहस्यमय अशा मित्तानी साम्राज्यातील आहे. २७ जून रोजी टुबिंजेन विद्यापीठाने ही घोषणा केली. दुष्काळामुळे मोसूल धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळेच हा शोध घेणे शक्य झाले.

“अलीकडच्या काळात या प्रदेशात लागलेल्या सर्वात महत्त्वाच्या पुरातत्त्ववेत्तीय शोधांपैकी हा एक आहे. कुर्दिश-जर्मन सहकार्याचे हे यश आहे,” असे त्या साईटवर काम करणारे दुहोक डायरेक्टोरेट ऑफ अँटिक्विटिसचे कुर्दिश पुरातत्त्ववेत्ते हसन अहमद कासिम म्हणाले.

रहस्याने वेढलेले

मागच्या वर्षी मागे हटलेल्या पाण्यामुळे तिग्रिसच्या काठावर याचे काही अवशेष दिसून आल्यानंतर पुरातत्त्ववेत्त्यांच्या एका गटाने त्या अवशेषांसाठी तातडीचे बचाव कार्य हाती घेतले होते. हे अवशेष म्हणजे मित्तानी साम्राज्यातील सापडलेल्या अगदी मोजक्या अवशेषांपैकी एक आहेत.

“पूर्वेकडच्या प्राचीन साम्राज्यांमध्ये मित्तानी साम्राज्याबाबत सर्वात कमी संशोधन झाले आहे,” टुबिन्जेन विद्यापीठातील पुरातत्त्ववेत्त्या इवाना पुलजिझ म्हणाल्या. “मित्तानी साम्राज्याची राजधानी कोणती होती तेही अजून समजलेले नाही.”

‘पुरातत्त्व क्षेत्रातील खळबळजनक शोध’

पाण्याच्या पातळ्या पुन्हा वाढायला सुरुवात झाल्यामुळे पुरातत्त्ववेत्त्यांच्या गटाकडे खूपच कमी वेळ होता. लवकरच हा राजवाडा पुन्हा पाण्याखाली गेला. किमान १०कीलाकार (cuneiforms) मातीच्या विटा राजवाड्याच्या आतून मिळाल्या.

“आम्हाला लाल आणि निळ्याच्या चमकदार छटांमधील भिंतीवरच्या रंगाचे अवशेषही सापडले,” पुलजिझ म्हणाल्या. “ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सहस्त्रकामध्ये पूर्वेजवळच्या प्राचीन भागात भित्तीचित्र हे बहुधा राजवाड्याचे नमुनेदार गुणवैशिष्ट्य होते. मात्र ती जपलेली फार क्वचित सापडतात. केमूनेमध्ये भिंतीवरील रंगकाम आढळणे ही पुरातत्त्वक्षेत्रातील खळबळजनक घटना आहे.”

जर्मनीमधील संशोधक आता कीलाकार विटांवरील लेखांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतील. त्यांना आशा आहे की मातीच्या या विटांमधून मित्तानी साम्राज्याबद्दल आणखी माहिती मिळेल. सीरियाचा काही भाग आणि उत्तर मेसोपोटेमियामधील जीवनामध्ये एके काळी याच साम्राज्याचे वर्चस्व होते.

हा लेख प्रथम DWमध्ये प्रकाशित झाला होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1