रत्नाकर मतकरी केवळ क्रिएटीविटीवर न विसंबता तपशीलावर प्रचंड मेहनत घेणारा लेखक आणि माणूस होता. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना आली की ती ते एका कागदावर लिहून तो कागद संदर्भ ग्रंथालयात असते तशा आडव्या कागदी पिशवीत ठेवून देत. समजा ती कल्पना एखाद्या बातमीवरून, लेखावरून सुचली असेल तर त्या बातमी, लेखाचे कात्रण त्यात असे.
साधारणपणे ७७च्या सुमारास रूपारेलमध्ये असताना नाटक करण्याबाबत सल्ला घ्यायला आणि काही एखादे स्क्रिप्ट मिळेल का ते बघायला मी रत्नाकर मतकरींच्या घरी गेलो. वय, अनुभव, नाव याचे कोणतेही दडपण आणू न देता त्यांनी वेळ दिला आणि माझ्याशी बोलले. माझ्याकडून नाटक काही झाले नाही पण मी मतकरींकडे परत परत जाऊ लागलो. मग एक वर्षानी त्यांच्या सूत्रधार, बालनाट्यमध्ये ‘लोककथा७८’ च्या निमित्ताने सामील झालो.
‘लोककथा’ हे नाटकच केवळ वेगळे नव्हते तर ते बसवलेही होते वेगळ्या पद्धतीने. तालमींच्या सुरूवातीच्या दिवसात मतकरींनी कलाकारांच्या हातात संहिताच दिली नव्हती. सर्वजण रिंगण धरून बसायचे आणि मतकरी नाटकतील एकेक प्रसंग समजावून सांगून उपस्थित कलाकारांना त्यांची भूमिका कोणाची ते सांगून उस्फुर्तपणे तो प्रसंग रिंगणाच्या मधे उभा करायला सांगत. हळूहळू कलाकार वाढत गेले तसतसे रिंगण मोठे होत गेले. एकेकाची भूमिका ठरू लागली. मग हळूहळू संहिता त्यात आणली गेली. ते नाटक हॅपनिंग स्वरूपाचे होते. गावातील लोक आपल्यावर झालेला अन्याय येऊन लोकांना सांगताहेत असे त्याचे स्वरूप होते. त्या प्रकारच्या नाट्यबंधाला आवश्यक असणारी उस्फुर्तता आणण्याकरता त्यांनी हा तालमीचा वेगळा बंध आणला होता.
नाटक बसविण्याच्या या वेगळ्या पद्धतीविषयी काहीतरी लिहिले गेले पाहिजे असे मतकरींना वाटले. हे काम त्यांनी चक्क माझ्याकडे सोपवले. त्यावेळी त्यांच्या संस्थेतील मी सर्वात नवखा. त्यांच्याबरोबर काम केलेले संस्थेतील अनेक दिगज्ज तेथे होते. पण तरीही त्यांनी मला ‘लोककथा’ नाटक बसवण्याच्या सर्व प्रक्रियेची डायरी लिहायला सांगितली. जवळजवळ रोज मी काय लिहितोय ते बघून ते त्यात सूचना करायचे, बदल करायचे, काही मोकळ्या जागा भरायचे. सर्व लिखाण पूर्ण झाल्यावर त्यांनी परत एकदा त्याची पूर्ण चिकित्सा केली, वाक्ये बदलली. यात माझी मेहनत ३० टक्के तर त्यांची ७० टक्के होती. पुढे ती डायरी ‘मनोहर’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली ती माझ्या नावाने.
तो दिवाळी अंक बाजारात आला तेव्हा आमचा अंबेजोगाईला प्रयोग होता. तेथील प्रेक्षकांपैकी कोणीतरी तो डायरीवजा लेख वाचला होता. नाटक सुरू होण्यापूर्वी सर्व प्रेक्षक सभागृहाबाहेर आत येण्याकरता उभे असताना त्या प्रेक्षकाने कोणाकडे तरी त्या लेखाचा उल्लेख केला. बाहेर प्रेक्षकांमध्येच असलेल्या मतकरींच्या कानावर ती चर्चा पडली. आम्ही सारे तयार होत असताना ते लगेचच आत मेकअप रूममध्ये आले आणि माझा लेख छापून आला असून त्यावर बाहेर लोक बोलताहेत असे त्यांनी आवर्जून आत येऊन सर्वांना सांगितले.
पुढे ‘लोककथे’बाबत अजून एक प्रयोग घडला. पुण्यातील ‘तेरे देस होम्स’ या जर्मन संस्थेने ‘लोककथा’ व ‘अलिबाबाचे खेचर’ हे बालनाट्य यांचे प्रयोग मराठवाड्यातील १६ लहान गावात करण्याकरता आर्थिक मदत दिली (यात माध्यम तज्ज्ञ विजय परूळकर यांचा मोठा सहभाग होता). युवक क्रांती दलाने (युक्रांद) आयोजनाची जबाबदारी घेतली. सुभाष लोमटे, शांताराम पंदेरे संपूर्ण दौ-यात बरोबर होते. नीलम गो-हे, आनंद करंदीकर मधे एका ठिकाणी बरोबर होते. परूळकर आणि ‘तेरे देस होम्स’चे आदि पटेलही ब-याच प्रयोगांना हजर होते. मराठवाड्यात नुकत्याच नामांतराच्या दंगली होऊल गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर हे नाटक होत होते. त्यामुळे काही ठिकाणी चक्क तणावाच्या वातावरणात प्रयोग झाले. इतक्या लहान लहान गावात प्रयोग झाले की सभागृह व रंगमंच तर बहुतांश ठिकाणी कुठेच नव्हता. काही ठिकाणी चक्क बाकांवर पत्रे टाकून त्यावर ताडपत्री टाकून रंगमंच तयार केला होता. एका गावाला जायला मोटार रस्ताच नव्हता. तिथे चक्क बैल गाडीत सामान टाकून सर्व कलाकार चार पाच किमी चालत गावापर्यंत गेले. एका गावात गावाच्या एका बाजूला असलेल्या टेकडीवर जुन्या ग्रीक थियेटरप्रमाणे प्रेक्षक पसरून बसले आणि खाली असलेल्या मोकळ्या जागेत, देवळापुढच्या मोकळ्या जागेत आणि एका मोठ्या झाडाच्या पारावर वेगवेगळे प्रसंग करून आम्ही नाटक केले. एक विलक्षण अनुभव होता तो प्रयोग म्हणजे.
या दौ-यात मतकरींना जाणवलेला विशेष म्हणजे लहान गावात प्रयोग आहे, साधने व्यवस्थित नाहीत, त्या लोकांना काय कळतय, कसाही प्रयोग करा अशी कोणतीही तडजोड त्यांनी केली नाही. प्रत्येक प्रश्नावर, अडचणीवर अगदी शेवटपर्यंत विचार करून मार्ग शोधायचा प्रयत्न ते करायचे. प्रयोग हा परफेक्टच झाला पाहिजे, त्यात तडजोड नाही हे त्यांचे तत्व होते. हे त्यांचे तत्व पुढे मला त्यांच्या अनेक गोष्टींमध्ये बघायला मिळाले. मराठवाड्यातील त्या वैशिष्ट्यपूर्ण दौ-याबद्दलही निशिकांत भालेराव याच्या सांगण्यावरून त्यांनी माझ्याकडून लेख लिहून घेतला आणि मराठवाडा दैनिकाच्या रविवार पुरवणीत छापून आणला. पुढे एनसीपीएने ‘लोककथा’चे डॉक्युमेंटशन केले त्यात माझ्या दोन्हीही लेखांचा समावेश असल्याचे मतकरींनीच मला सांगितले. ‘लोककथा’ला ४० वर्षे झाल्याबद्दल एक समग्र पुस्तक निघत असून त्यातही या दोन लेखांचा समावेश असल्याची बातमी त्यांनी अगदी अलीकडे मला दिली.
मतकरींकडे आधी मी जात होतो, पण खूपच कमी आणि त्यांच्या घरचा झालो नव्हतो. मी त्यांच्या फक्त ‘लोककथा’ या एकाच नाटकात काम केले (आणि ‘अलिबाबाचे खेचर’ व ‘निम्मा शिम्मा राक्षस’मध्ये काही थोड्या प्रयोगात). पण या निमित्ताने त्यांच्या घरात माझा पूर्ण प्रवेश झाला आणि इतर जुन्या कलाकारांप्रमाणे त्यांच्या घरचा झालो. दौ-याची बस रात्री खूप उशीरा आली तर त्यांच्याकडेच राहायचे. केव्हाही खोदादाद सर्कल भागात गेले की त्यांच्याकडे चक्कर मारायची. त्यांच्याकडची पुस्तके वाचायला न्यायची (आणि परत द्यायची). घरी गेले की प्रतिभाताईंनी केलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा.
या सर्व भेटीत मला त्यांच्यातला एक कमालीचा शिस्तबद्ध, बारीक सारीक तपशीलाबद्दल विलक्षण जागरुक, केवळ क्रिएटीविटीवर न विसंबता तपशीलावर प्रचंड मेहनत घेणारा लेखक आणि माणूस दिसायला लागला. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना आली की ती ते एका कागदावर लिहून तो कागद संदर्भ ग्रंथालयात असते तशा आडव्या कागदी पिशवीत ठेवून देत. समजा ती कल्पना एखाद्या बातमीवरून, लेखावरून सुचली असेल तर त्या बातमी, लेखाचे कात्रण त्यात असे. त्यानंतर त्या विषयाबाबात जी जी माहिती त्यांना मिळत जाई ती ती ते त्या फाईलमध्ये जमा करत जात. आणि मग त्यांचा विचार पूर्ण झाला असे वाटले की ते लिहायला सुरूवात करत. एकदा लिहिलेला मजकूर परत परत वाचत त्यात बदल करत जात.
अशी स्वतःच स्वतःच्या लेखनावर परत परत दुरूस्त्या केलेल्या अनेक स्क्रिप्टसचे पहिले, दुसरे, तिसरे खर्डे मी त्यांच्याकडे बघितले होते. ते बघितल्यावर एकेक वाक्यावर ते किती परत परत विचार करत ते लक्षात येते. माझ्या दोन्ही लेखांमध्ये त्यांनी इतके बदल का केले व ते कसे बरोबर होते ते तेव्हा मला लक्षात आले. स्क्रिप्टमध्ये परत परत बदल करण्याच्या या सर्व प्रक्रियेतून शेवटी मजकूर तावून सुलाखून निघून फायनल होत असे. गंमत म्हणजे ते नाटक असेल आणि ते स्वतः दिग्दर्शन करणार असतील तर दिग्दर्शक म्हणून अत्यंत कटथ्रोट पद्धतीने ते लेखक मतकरींचा मजकूर कापत, बदलत, दुरुस्त करत.
ही सर्व प्रक्रिया अगदी थोड्या प्रमाणात का होईना मला त्या काळात पाहायला मिळाली आणि मतकरींनीही तू कोण, किती ज्युनियर, या सगळ्याला हात का लावतोस वगैरे प्रश्न न विचारता ती मला पाहू दिली. नोकरी सोडून पूर्णवेळ लेखक झाल्यावर ते कामाला जातो तसे सकाळी लेखन करायला, लेखनाच्या संदर्भातील वाचन करायला बसत ते संध्याकाळपर्यंत. दिवसभरात अनेक लोक भेटायला येतात व व्यत्यय येतो म्हणून मग त्यांनी त्यांच्या शेजा-यांच्या घरात दिवसभर कोणी नसे तेथे बसायला सुरूवात केली. ऑफिसला जात असल्याप्रमाणे सकाळी ते तेथे जात आणि कामाला लागत. दुपारी जेवायला घरात येत ते परत संध्याकाळपर्यंत त्या शेजारच्या घरात.
ही शिस्त, मेटीक्युलस स्वभाव, परफेक्शनचा ध्यास केवळ त्यांच्या लेखनातच नव्हता तर तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचाच भाग होता. लेखक आहे म्हणून कसेही गबाळ्यासारखे राहणे त्यांना मान्य नव्हते. त्यांचे कपडे, राहणे एकदम व्यवस्थित व आधुनिक असे. आपली तब्ब्येत प्रयत्नपूर्वक त्यांनी जोपासली होती, उत्तम राखली होती. ते लेन्सेस वापरत. ‘लोककथा’च्या एका दौ-यात त्यांची लेन्सची डबी चोरीला गेली, त्यामुळे त्यांना चष्मा लावावा लागला. मी त्यांना सहज म्हटले की तुम्हाला खरतर चष्मा चांगला दिसतो तुम्ही का लेन्स वापरता. त्यावर ते मला म्हणाले उद्या तू एखाद्या लंगड्या माणसाला सांगशील की तुम्हाला कुबडी चांगली दिसते तेव्हा खोटा पाय लावू नका, कुबडीच वापरा. लेन्ससारखी एक चांगली सोय उपलब्ध आहे ना मग केवळ चष्मा चांगला दिसतो म्हणून ती का वापरायची नाही.
उत्तम खाण्यापिण्याचीही त्यांना आवड होती. त्यांच्यामुळेच मला त्यांच्या घराजवळ असलेल्या एका छोट्या पारशी रेस्टॉरंटची (पारशी कॉलनीतील ते रेस्टॉरंट बंद झाले आणि आता त्याचे नावही मी विसरलो) ओळख झाली होती. एकदा ते मला आणि अरविंद औंधेला घेऊन षण्मुखानंद हॉलजवळच्या एका पत्र्याच्या टपरीवजा जागेत उत्कृष्ट तंदूर फिश खायला घेऊन गेले होते. ते, मी आणि औंधे एकदा पत्रकार संघाच्या लोणावळ्याच्या विश्रामधाममध्येही जाऊन राहिलो होतो.
मी पुढे पत्रकारितेत जायचा निर्णय घेतला आणि नाटक संपले. कामाच्या व्यापात हळूहळू मतकरींकडे जाणेही कमी झाले. मतकरी मात्र नंतर केवळ लिहितच राहीले नाहीत तर त्यांनी नंतरच्या काळात काही महत्त्वाच्या सामाजिक चळवळींशी स्वतःला जोडून घेतले. नर्मदा बचाव आंदोलन समजावून सांगण्याकरता त्यांनी केलेला एकपात्री प्रयोग ‘तुम्ही तिथे असायला हवे’ गाजला. अलीकडे गांधींवरच्या त्यांच्या नाटकाच्या वाचनाचे प्रयोग ते ठिकठिकाणी करत होते. हाच नाट्यवाचनाचा प्रयोग चार, पाच महिन्यांपूर्वी मुलुंडला झाला. त्यावेळी खूप वर्षांनी त्यांची आणि प्रतिभाताईंची भेट झाली. त्यांच्याशी झालेली ती शेवटची भेट. जो थोडा काही काळ त्यांच्या सहवासात आलो त्यातून जाणवलेले मतकरी म्हणजे कमालीचा मेटीक्यूलस लेखक आणि माणूसही.
लेखाचे छायाचित्र – मायमहानगर
COMMENTS