फॅमिली डॉक्टरची गोष्ट

फॅमिली डॉक्टरची गोष्ट

फॉर्च्युनेट मॅन हे पुस्तक म्हणजे जॉन सस्सॉल या फॅमिली डॉक्टरची गोष्ट आहे. १९६० च्या आसपासचा काळ आहे. गावाचं नाव आहे फॉरेस्ट ऑफ डीन. जंगलातलं गाव आह

सनातन जीवनलीला
मिथकीय हिंसेचे रचनाशास्त्र
इस्लाम ज्ञात आणि अज्ञात – अब्दुल कादर मुकदम

फॉर्च्युनेट मॅन हे पुस्तक म्हणजे जॉन सस्सॉल या फॅमिली डॉक्टरची गोष्ट आहे.

१९६० च्या आसपासचा काळ आहे. गावाचं नाव आहे फॉरेस्ट ऑफ डीन. जंगलातलं गाव आहे, दुध आणि लाकूड हे व्यवसाय. शहरापासून दूर, म्हटलं तर साधारण गरीब गाव आहे. सस्सॉल या गावात काम करतात. छोट्या गावात मोठं हॉस्पिटल नाही, लंडनमधे असत तशा सोयी नाहीत. बाळंतपण ते शेवटले उपचार असं सबकुछ सस्सॉल करत. एकटाच डॉक्टर. घरोघरी जाऊन पेशंट तपासत. जंगलात लाकूड तोड करताना अपघात होत. दुर्गम डोंगरात पडलेल्या झाडाखाली अडकलेल्या लाकूडतोड्यावर उपचार करायला सस्सॉल जात. डॉक्टर पोचले यानंच अपघातात सापडलेला माणूस अर्धा बरा होत असे, वेदना विसरत असे.

सारं गाव सस्सॉलना माहीत होतं. लग्न झालेलं नसताना मूल होऊ घातलेल्या मुलीची सुटकाही सस्सॉलनी केलेली होती आणि स्त्री म्हणून वावरणारा एक पुरुष फक्त डॉक्टरनाच माहीत होता.

फोटोग्राफर जीन मॉर सस्सॉल आणि लेखक जॉन बर्जर

फोटोग्राफर जीन मॉर सस्सॉल आणि लेखक जॉन बर्जर

डॉक्टर सस्साल हा गावातल्या लोकांचं सर्वस्व होता. मित्र होता, सल्लागार होता, कुटुंबाचा भाग होता, विश्वासू माणूस होता, गावातल्या सर्व समस्यांवर डॉक्टरकडे उपाय असत. गावात एक पडीक जमीन होती, तिचं रूपांतर एका छानश्या उद्यानात करायचं हा विचार डॉक्टरचाच आणि तिथं राबून तो विचार अमलात आणण्यात प्रत्यक्ष सहभागही डॉक्टरचाच.

लेखक जॉन बर्जर आणि फोटोग्राफर जीन मॉर सस्सॉल यांच्या सोबत काही आठवडे राहिले. डॉक्टर पेशंटना तपासत असताना, उपचार करत असताना, जंगलात जखमी झालेल्या लाकूडतोड्यावर उपचार करताना दोघं हजर असत, पेशंट आणि डॉक्टरांच्या परवानगीनं. लेखक बर्जर सस्सॉल यांना पूर्वीपासून ओळखत असल्यानं डॉक्टरांबरोबरचा संवाद सुकर आणि सखोल झाला.

जॉन बर्जरनी स्वतंत्रपणे वरील पुस्तक एका निबंधाच्या रूपात लिहिलं. जीन मॉर यांनी स्वतंत्रपणे काढलेले फोटो संकलीत केले. दोघांनी एकमेकाला न भेटता कामं स्वतंत्रपणे केली आणि नंतर मजकूर आणि फोटो एकत्र आणले. गंमत अशी की मजकूर न वाचतानाही फोटोतून सस्सॉल कळू शकत होते आणि फोटो न पहाताही सस्सॉल कळत होते.

तर हे पुस्तक म्हणजे सस्सॉल यांचं व्यक्तिचित्र नाही. सस्सॉल यांनी हाताळलेल्या १२ केसेस पुस्तकात असल्या तरीही त्यावरून तयार केलेलं प्रोफाईल असं या निबंधाचं रूप नाही.

हा निबंध म्हणजे डॉक्टरी व्यवसाय, एकूण समाज या विषयावरचं एक तात्वीक चिंतन आहे. पुस्तकात सस्सॉल यांचं व्यक्तिमत्व  येतं, ते गाव आपल्याला दिसतं, तिथली माणसंही आपल्याला दिसतात. फोटो आणि मजकुर चित्रदर्शी आहे, गाव दिसतं, जंगल दिसतं, धूसर धुकं दिसतं, गुडुप अंधारात धरातून लुकलुकणारे दिवे दिसतात. फोटोमधून पेशंट दिसतात, गावातल्या बैठका दिसतात, चिंतेत पडलेले चेहरे दिसतात, किचनमधे चाललेली शस्त्रक्रिया दिसते. म्हटलं तर फिक्शन म्हटलं तर नॉन फिक्शन आपल्यासमोर उलडतं.

पण त्या बरोबरच बर्जर यांनी केलेलं विश्लेषण आपल्याला एका तात्विक, मेटॅफिजिकल विश्वात घेऊन जातं.हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्यं आहे, हा पुस्तकाचा बाज, रचना हे सारं पहाण्यासारखं  आहे.

पेशंट आणि डॉक्टर यांच्यातलं नातं या विषयावर लेखक बोलतो. वैद्यकीचा इतिहास लेखक त्यासाठी तपासतो.

हज्जारो वर्षांपूर्वी चिकित्सक किंवा उपचार करणारा माणूस म्हणजे मांत्रीक होता. देवदेवस्की करत असे, देव भूतपिशाच्च इत्यादींच्या करवी उपचार करत असे. नंतर जसजसा धर्म संघटित होत गेला तसतसा पुरोहीत-कर्म पार पाडणारा माणूस उपचार करू लागला. सुरवातीला उपचार औषधं आणि मानसीक मदत अशा स्वरूपाचे होते. नंतर त्यातला मानसीक भाग अलीकडं स्वतंत्र झाला.

डॉक्टरवर पेशंटचा विश्वास हवा. डॉक्टरला पेशंट समजायला हवा. पेशंटची व्याधी किंवा रोग येवढंच कळून भागत नाही तर पेशंट, त्याचं कुटुंब, त्याचा इतिहास, त्याचा परिसर साऱ्या गोष्टी डॉक्टरला समजायला हव्यात. सस्सॉल पेशंट आणि पुर्ण गाव समजून घेत असत. अलीकडं हे नातं नाहिसं होतंय. शरीर आणि माणसाचं मन वेगळं करता येत नाही हे डॉक्टर समजून घेत नाहीत. स्टेथोस्कोप आणि चाचण्या यानं भागत नाही, त्या पलीकडं जावं लागतं याकडं लेखक लक्ष वेधतो.

आणि पेशंट पूर्ण बरा तरी कसा होणार? तो जर आर्थिक दृष्ट्या वाईट स्थितीत असेल, त्याचा परिसर त्याला पोषक नसेल तर निव्वळ औषधं देऊन कसं भागणार? लेखक सस्सॉल यांची डॉक्टरकी पहात असताना वरील व्यापक प्रश्नही उपस्थित करतात, कारण खुद्द सस्सॉलनाही त्या प्रश्नानं पछाडलं होतं.

लेखक आपल्याला कॉनरॉडच्या कादंबऱ्यांची आठवण करून देतात. कॉनरॉडच्या कादंबऱ्यांत सागर असतो, सागरी सफरीवर निघालेला मरीनर म्हणजे नाविक असतो. सागरातली वादळं, संथपणा इत्यादी अवस्थांना नाविक तोंड देत देत सागराचा थांग घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण सागराचा थांग लागणार तरी कसा? कारण तो तर अथांगच असतो.

सस्सॉलना पेशंट समजून घ्यायचे असतात. कारण पेशंटला समजून घेता घेता त्यांना स्वतःला समजून घ्यायचं असतं. पेशंटशी एकरूप होणं पण त्या बरोबरच स्वतंत्रपणे आणि समांतरपणे पेशंटशी अंतर राखणं अशी मारामारी सस्सॉलना करायची असते. अंतर ठेवल्याशिवाय चिकित्सा जमणार नाही आणि अंतर ठेवूनही चिकित्सा जमणार नाही अशा कात्रीत सस्सॉल सापडलेले असतात.

सस्सॉलच कां? सर्वच डॉक्टर त्यात सापडायला हवेत. डॉक्टरच कां सर्व कलाकार, चिंतन करणारे, वैचारिक इत्यादी त्यात सापडायला हवेत. जगाचा अभ्यास करायला निघालं की आपले दोष उघड होऊ लागतात.  ओपन झालं, आपलं मन उघडं केलं की आपोआपच आपल्यातल्या त्रुटी कळायला लागतात. विहीरीत सुखावलेल्या बेडकाला कधी त्रास होत नाही. जो जगाच्या सफरीवर निघतो, बंदरं बदलत असतो, त्यालाच जग कळतं आणि स्वतः स्वतःला कळतो.

सस्सॉल गावाशी एकरूप होते, तरीही गावापासून वेगळे होते. गाव गरीब होतं, सस्सॉल सुस्थितीत होते. गावही सुस्थितीत असावं असं त्याना वाटे पण ते एका डॉक्टरच्या हातातलं प्रकरण नव्हतं. गाव आणि माणसांच्या अपूर्णतेची जाणीव सस्सॉलना होत असे आणि स्वतःची अपूर्णतःही त्याना जाणवत असे. त्यातून त्याना अनेक वेळा नैराश्यही येत असे. पंचवीस वर्षाच्या डॉक्टरीत अनेक वेळा ते निराशावस्थेत सापडले होते.

पत्नी वारल्यावर सस्सॉलनी आत्महत्या केली. लेखक म्हणतात की आत्महत्या म्हणजे काही वाईट घडलं असं ग्रीक तत्वज्ञान मानत नाही. माणूस संपणं किंवा माणसानं स्वतःला संपवणं ही जगण्याचीच एक अवस्था आहे असं ग्रीक तत्वज्ञान सांगतं. त्यामुळं सस्सॉलनी आत्महत्या केली याचं वैषम्य लेखकाला नाही.

कसं आहे पहा पुस्तक. एक डॉक्टर झाडाखाली अडकलेल्या झाडतोड्याला उपचार करायला जातो तिथून पुस्तक सुरु होतं. मग सावकाशीनं त्या डॉक्टरच्या घरात पोचतं. नंतर सावकाशीनं काही पेशंटना पहातं. नंतर हळूहळू गावभर फिरतं, गावाची अर्थव्यवस्था पहातं. नंतर डॉक्टर बाजूला रहातो, व्यापक प्रश्न आपल्यासमोर येतात. मग कॉनरॉडची कादंबरी येते, ग्रामची आणि मार्क्स यांचं चिंतन आपल्याला भेटतं.

१६८ पानांचं पुस्तक त्यात ७५ पानं फोटो.

सावकाशीनं पुस्तक सरकत रहातं. पुढं सरकलं की मागचं पान आठवू लागतं. पुढला फोटो पाहिला की मागला फोटो आठवतो. सतत पुढं मागं होत रहातं. पुस्तक संपतं, पण संपतच नाही.

काही काळानं पुन्हा पुस्तकाची आठवण येत रहाते.

साताठ वर्षांपूर्वी हे पुस्तक वेवर्ड अँड वाईजमधे मला विराट चांडोकनं दिलं. अजूनही मी ते मधून मधून वाचतो.

मी गॉड फादरही असाच मधून मधून पहात असतो, प्रत्येक वेळी नवीन काही तरी त्यात दिसतं. स्पीलबर्गची ड्युएल ही फिल्मही किती तरी वेळा पाहिली. अजूनही पहात असतो.

मला सांगा की फॉर्च्युनेट मॅन हे पुस्तक चार मिनिटात लेखक सांगू शकेल? चणेफुटाणे खाताना, बारमधे बकाबका दारू पीत असताना, कामासाठी बाहेर पडताना फक्त दोनच मिनिटांचा  वेळ हाताशी असताना, कंटाळा आलाय काही तरी वाचूया अशी अवस्था असताना, काही मिनिटांचा विरंगुळा म्हणून  फॉर्च्युनेट मॅन वाचता येईल?

पाच मिनिटात, दहा मिनिटात, चारशे पन्नास शब्दात फॉर्च्युनेट मॅन नाही समजू शकत.

A Fortunate Man
The Story of a Country Doctor
John Berger. Jean Mohr

निळू दामले, लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: