कोविडमध्ये विधवांवर संकटाची मालिका सुरूच

कोविडमध्ये विधवांवर संकटाची मालिका सुरूच

जेव्हा जगात एखाद्या रोगाची महासाथ आणि युद्धासारख्या घटना घडतात तेव्हा त्याची सर्वाधिक झळ स्त्रियांना सोसावी लागते. यात स्त्रियांवर बलात्कार, लैंगिक छळ, लैंगिक शोषण, स्त्रिया-बालकांची अनैतिक मानवी वाहतूक, गुलामगिरी सारख्या घटनांना सोसावे लागते.

२२ जून, रोजी ‘द वायर मराठी’मध्ये ‘प्रश्न कोविड विधवांचे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाची दखल दिल्ली, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यातील काही सामाजिक संस्था-संघटनांनी घेतली. अनेक फोन कॉल आले. या फोन कॉलमध्ये काही स्त्रिया अशा होत्या ज्यांनी कोविडमध्ये त्यांचा पती गमावला होता. त्यांचे अनुभव ऐकून मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांना अजून किती संकटांना झेलावे लागणार आहे हाच विचार सातत्याने मनात येत आहे.

पहिला फोन गौरीचा होता. वय वर्ष २६. एका दोन वर्षाच्या मुलाची आई. लग्नाला ४ वर्ष झाली होती. सासरी एकत्र कुटुंब. सासू-सासरे, दोन दीर आणि त्यांच्या पत्नी आणि मूल. खासगी कंपनीमध्ये तिचा पती काम करत होता. गौरीही खासगी क्षेत्रात काम करत होती. मुलाच्या जन्मानंतर पती आणि सासरच्या लोकांच्या म्हणण्यानुसार तिने काम करणे थांबवले होते. गौरी सांगत होती. तिच्या पतीला मार्च महिन्यात कोविडचे निदान झाले. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यासाठी धावाधाव झाली. जिथे जिथे जात होतो तिथे बेड उपलब्ध नाही हेच उत्तर मिळत होते. दोन दिवस बेड नाही हेच ऐकत होतो. शेवटी तिसर्‍या दिवशी एका खासगी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला. तो पर्यंत माझ्या नवर्‍याची  प्रकृती जास्तच बिघडली होती. अॅडमिट केल्याबरोबर त्यांना ऑक्सिजन लावावे लागले. मूल लहान असल्यामुळे मला हॉस्पिटलला जाता येत नव्हते. शेवटी तीन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. नवर्‍याची मृत्युची बातमी ऐकून माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार पसरला होता. काय करावं सुचेनासं झालं. गेल्या वर्षी माझे वडील कोविडमुळे गेले होते.  या धक्क्यातून कसेबसे सावरत असतांना हा आघात झाला. संकट चहूबाजूंनी येतात हे मी अनुभवत होते. नवरा गेल्यानंतर तेरवीचा विधी झाला.  मुलाला सांभाळून पुढचं आयुष्य जगण्यासाठी काहीतरी करावं लागणार हा विचार माझ्या मनात सुरू होता. कशात लक्ष लागत नव्हतं. पुन्हा एखादे संकट यावे आणि पायाखालची जमीन सरकावी असा धक्कादायक अनुभव मला आला होता. माझ्या दिराने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. हा छळ मी अजूनही भोगतीये. मनात सारखी धाकधूक असते. आईकडे जाता येत नाही.  केवळ माझं लहान मूल पाहून मी दिवस काढत आहे. सगळं नॉर्मल झाल्यावर नोकरी करून वेगळं राहण्याचा विचार गौरी करत आहे.

या दिवसात वेगवेगळ्या नऊ ठिकाणच्या स्त्रियांनी फोन करून संपर्क केला होता. या सगळ्या स्त्रियांनी कोविडमुळे त्यांचा पती गेल्यानंतर कुटुंबातून लैंगिक छळ, शारीरिक जबरदस्तीच्या त्रासातून जात असल्याचे व्यक्त केले. यात असाच एक फोन देवीचा होता. तिच्या पतीला कोविड निदान झाले आणि उपचारासाठी हॉस्पिटलला दाखल केले. दुसर्‍याच दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. तिला एक १० वर्षाचा मुलगा   आणि ७ वर्षांची एक मुलगी आहे.  सासरी सासू, लहान दीर आणि तिचे मूल असे सध्याचे कुटुंब आहे. तिचा पती खासगी क्षेत्रात काम करत होता.  त्याच्या नावे कंपनीत असलेले २ ते ३ लाख रु. पीएफ आणि कंपनीने २ लाख रु.ची मदत असे एकूण ५ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती तिला देण्यात आली होती. तेव्हापासून घरी तिला त्रास सुरू झाला.  तिच्या दिराने कंपनीत जाऊन मिळणारी रक्कम त्यांच्या आईला मिळाली पाहिजे याचा दावा केला आहे. सोबतच देवीकडून तिच्या पतीचे बँक एटीएम तिला न सांगता काढून घेण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीला तिने विरोध केला त्यावेळी तिच्यावर जबरदस्ती केली. ‘तू एकटी कशी राहते बघतोच’. ‘मीच तुला ठेवणार’. असे म्हणून तिच्यावर तिचा दीर परत परत जबरदस्ती करतो असे देवीने सांगितले.

मीराचा पती पहिल्या (वर्ष २०२०) लॉकडाऊनच्या काळात गेला. पुढे दिवाळीच्या काळात मीरा आईवडिलांच्या घरी राहायला आली.  वृद्धापकाळामुळे एक-एक महिन्याच्या कालावधीतच तिचे आईवडिल वारले. एक भाऊ आहे. तोही लग्न झाल्यानंतर वेगळा राहत आहे. मीरा पती गेल्यानंतर चुलत दिराच्या त्रासाला कंटाळून ७ वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी राहायला आली होती. तिच्या सासरी ती एकटीच आहे.  तिच्या पतीचे घर चुलत दिराला बळकवायचे आहे म्हणून त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. मीरा सांगत होती, माझा नवरा गेल्यानंतर माझा चुलत दीर सतत घरात येऊ लागला. माझ्यावर दमदाटी करणे, अंगावर धावून येणे, माझ्या अंगाला जबरदस्तीने स्पर्श करणे. मी काही बोलले की, आजूबाजूला कोणी नाही हे पाहून मला अतिशय घाणेरड्या पद्धतीने हात लावायचा, बोलायचा. सासू सासर्‍यांना सांगितलं तर त्यांनी मलाच दोषी ठरवले. या त्रासाला कंटाळून माहेरी आले. माहेरी येऊन महिना होत नाही की, आई वडिल एका पाठोपाठ एक दोघेही गेले.  या सगळ्यातून सावरत होते तोच माझ्या भावाने मला घर सोडून जायला सांगितले. माझ्या बरोबर भांडण करू लागला. शेवटी आई वडिलांच्या घरावर माझाही हक्क आहे हे त्याला सांगितले. एक दोन दिवस सगळं शांत होत तिसर्‍या दिवशी घरात लाईट लागेना, नळ असून पाणी मिळेना. चौकशी केली तेव्हा माझ्या भावाने लाईट कनेक्शन आणि नळ कनेक्शन दोन्ही तोडून कट करून घेतले असे समजले. सासरी दिराकडून होणार्‍या त्रासाला कंटाळून माहेरी आले होते तर भाऊही त्रासच देत आहे.  घरावर मला राहण्यापुरता हक्क पाहिजे आहे पण तेही भाऊ नाकारत आहे. बहिणीच्या घरी कायमचं जाऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे कोठे नोकरीही मिळत नाहीये. एका मुलीला घेऊन जगावं कसं हाच प्रश्न माझ्या समोर आहे, असे मीरा सांगत होती.

गेल्या दोन वर्षापासून कोविड महामारीने अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोविड महामारीचा सर्वाधिक परिणाम गरीब आणि  असंघटित क्षेत्रातील स्त्रियांवर झालेला दिसून येत आहे. स्त्रियांवर होणार्‍या  परिणामाला  अनेक कंगोरे आहेत. शिक्षणाचा अभाव, गरीबी, बेरोजगारी, स्त्रियांवर होणारे अत्याचार, लिंगभेदभाव, जाती-धर्माची उतरंड आणि समाजात स्त्रियांना कायम असणारे दुय्यम स्थान या कारणामुळे त्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असते. जेव्हा स्त्रिया एकट्या राहत असतात त्यावेळी त्यांच्या वाटेला येणारे दु:ख, कुटुंब आणि समाजातून एकट्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोण, स्त्रिया एकट्या राहतात म्हणजे त्यांच्यातच काही प्रॉब्लेम असेल ही कलुषित विचारपद्धती यामुळे अनेक प्रसंगांना स्त्रियांना तोंड द्यावे लागते.

जेव्हा जगात एखाद्या रोगाची महासाथ आणि युद्धासारख्या घटना घडतात तेव्हा त्याची सर्वाधिक झळ स्त्रियांना सोसावी लागते. यात स्त्रियांवर बलात्कार, लैंगिक छळ, लैंगिक शोषण, स्त्रिया-बालकांची अनैतिक मानवी वाहतूक, गुलामगिरी सारख्या घटनांना सोसावे लागते.  कुटुंबात राहणार्‍या स्त्रियांना लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार आणि संपत्तीच्या अधिकारातून बेदखल केले जाते. कोविड महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लस आली आहे मात्र महामारीच्या काळात स्त्रियांवर होणारे शारीरिक, लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी आणि पुरुषसत्ताक पद्धतीला प्रतिबंध करण्यासाठी कायद्याची लस पुरेशा प्रमाणात प्रभावी ठरू शकत नाही हेच वारंवार सिद्ध होत आहे. भारतात नव्हे तर संपूर्ण जगात कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रिया आणि त्यांच्या मुलांचे जगण्याचे प्रश्न बिकट बनले आहे.

या संदर्भात उत्तर प्रदेशच्या राशीने एका वाक्यात तिचे दु:ख व्यक्त केले, ‘कोविडमुळे आमच्या घरातील माणूस निघून गेला आहे पण इथल्या सामाजिक व्यवस्थेने  कोविड आमच्या घरात कायमस्वरूपी ठेवला आहे’.  ‘लोक हे विसरू देत नाहीये की, कोविडमुळे एका व्यक्तीचा मृत्यू होणं काय असत. त्याच्या कृतीतून त्यांची वृत्ती ते व्यक्त करतात’.   

या महासाथीने अनेक स्त्रियांना दु:खाच्या खाईत लोटले आहे, अनेक मुलींचे बाल वयातच लग्न लावून दिले जात आहे. लाखो मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडली आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात स्त्रिया-बालकांवरील अत्याचारात वाढ होईल अशी शंका, भीती आंतरराष्ट्रीय संस्था, संघटना, समाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. कोविड महामारी रोखण्यासाठी मास्क, अंतर आणि लस हा उपाय येणार्‍या काळात प्रभावी ठरेल पण स्त्रियांवर सासर आणि माहेरच्या कुटुंबातून होणारे अत्याचार, अन्याय रोखण्यासाठी कायदे आणि स्त्रियांच्या संवैधानिक हक्क वेळोवेळी सर्व स्तरावर रुजवावे लागणार आहे.

COMMENTS