सिडनी/कॅनबेरा/नवी दिल्लीः ऑस्ट्रेलियात सत्तांतर झाले असून सत्तारुढ पुराणमतवादी-उदारमतवादी आघाडीचा मजूर पक्षाने पराभव केला आहे. मजूर पक्षाचे प्रमुख नेत
सिडनी/कॅनबेरा/नवी दिल्लीः ऑस्ट्रेलियात सत्तांतर झाले असून सत्तारुढ पुराणमतवादी-उदारमतवादी आघाडीचा मजूर पक्षाने पराभव केला आहे. मजूर पक्षाचे प्रमुख नेते अँथनी अल्बानीस हे ऑस्ट्रेलियाचे ३१ वे पंतप्रधान असतील. अल्बानीस पंतप्रधान झाले असले तरी अद्याप संपूर्ण मतमोजणी पार पडलेली नाही, त्यामुळे त्यांच्या मजूर पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. पण ऑस्ट्रेलियात ९ वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. विद्यमान पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आपला पराभव मान्य केला आहे. मॉरिसन यांच्या नेतृत्वाखाली लिबरल पार्टीच्या आघाडीला चौथ्यांदा सत्ता मिळेल असे अंदाज वर्तवले जात होते. पण कोविड-१९ नंतरची देशातील परिस्थिती, महिलांचे अधिकार, राजकीय एकीकरण, महागाई, घराच्या वाढत्या किमती, सामाजिक सुरक्षा, किमान वेतन व पर्यावरणीय प्रश्न मॉरिसन यांना हाताळता आले नसल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
ऑस्ट्रेलियात सरकार स्थापन करण्यासाठी कनिष्ठ सभागृहात ७६ जागांची गरज असते. रविवारी दुपारपर्यंत मजूर पक्षाला ७१ जागा मिळाल्या होत्या तर लिबरल नॅशनल आघाडीला ५२ जागा मिळाल्या होत्या. अपक्ष व काही छोट्या पक्षांनी १५ जागा मिळवल्या होत्या, त्यात ग्रीन पार्टीला ३ व १२ जागा अपक्षांनी मिळवल्या होत्या.
दरम्यान नवे पंतप्रधान अल्बानीस यांनी सामाजिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवण्याबरोबर, किमान वेतन कायद्यात बदल, हवामान बदलाचे संकट घालवण्यासाठी आपला पक्ष कसून प्रयत्न करेल असे देशाला संबोधित केलेल्या भाषणात प्रतिपादन केले. माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा क्षण असून हा देशाच्या इतिहासातही असावा अशी माझी इच्छा आहे, मला देश बदलायचा आहे, देशातील राजकारणाची रित बदलण्याची माझी इच्छा असल्याचे अल्बानीस म्हणाले.
मूळ वृत्त
COMMENTS