शेतकरी आंदोलनात भाजप हस्तकांचा शिरकाव?

शेतकरी आंदोलनात भाजप हस्तकांचा शिरकाव?

गेली ३४ दिवस नवी दिल्लीच्या चारी सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलनात आता भाजपशी संबंधित काही शेतकरी कार्यकर्ते घुसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्री अजय मिश्रांची पत्रकारांवर दादागिरी
केंद्र सरकारच्या मदतीला अण्णा हजारे
मध्य प्रदेशमधील विजय रा.स्व.संघामुळे

कृषी कायदे विना विलंब रद्द करण्यात यावेत यासाठी पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश तसेच देशातील विविध राज्यातील शेतकरी गेल्या महिन्यापासून राजधानीच्या वेशीवर ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी तसेच त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रमधून सुद्धा काही शेतकरी आणि त्यांचे नेते गेले आहेत. यामध्ये संदीप गिड्डे आणि शंकर दरेकर हेही सहभागी आहेत. या दोघांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आंदोलनाबाबत चर्चा केली.

यातील संदीप गिड्डे हे नाव भाजपशी संबंधित घेतले जाते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना १ जून २०१७ रोजी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. हे आंदोलन त्यावेळी फडणवीस यांनी फोडण्यासाठी संदीप गिड्डे या आपल्या समर्थकाचा वापर केला होता. किमान हमीभाव आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यासाठी मुंबई वगळता संपूर्ण राज्य बंद सुद्धा करण्यात आले होते. या आंदोलनाच्या सातव्या दिवशी जयराज सूर्यवंशी आणि संदीप गिड्डे यांच्याशी रात्री चर्चा करून फडणवीस यांनी या आंदोलनात फूट पाडली. गिड्डे आणि सूर्यवंशी यांनी हे आंदोलन समाप्त करत असल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत केली. याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान मोर्चा, प्रहार संघटना या सर्वांनी गिड्डे हे मुख्यमंत्र्यांचे हस्तक असल्याचा आरोप करत आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

गिड्डे यांनी केवळ शेतकरी आंदोलन नव्हे तर मराठा मोर्चा आंदोलनात सुद्धा शिरकाव करून त्यात उभी फूट पाडण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही पदाधिकारी नसताना गिड्डे यांची ढवळाढवळ पाहून कोल्हापूर येथील एका सभेत त्यांना चोप देण्यात आला होता. त्यावेळी गिड्डे हे फडणवीस यांचे जवळचे हस्तक असल्याचा आरोप करण्यात आला होता.

आता नवी दिल्ली मधील आंदोलनात पुन्हा एकदा संदीप गिड्डे हे सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. आपण महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करत आहोत असे दाखवून त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हे आंदोलन मोडण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. त्याला जातीय तसेच धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण त्यात सरकार यशस्वी झाले नाही. मग आंदोलनात आपली लोक घुसवून ते कमजोर करण्याचा भाजपचा हा प्रयत्न तर नाही ना असा सवाल गिड्डे यांच्या उपस्थितीमुळे विचारला जात आहे.

(लेखाचे छायाचित्र केवळ प्रातिनिधिक आहे.)

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0