तामिळनाडूमध्ये भाजपला द्राविडी इंगा

तामिळनाडूमध्ये भाजपला द्राविडी इंगा

के टू के म्हणजे काश्मिर ते कन्याकुमारी अशी केवळ आपल्याच पक्षाची एकहाती सत्ता असावी यासाठी साम, दाम, दंड आणि भेद याचा मुक्तहस्ते वापर करत सहकारी अथवा तेथील प्रादेशिक पक्षाचे खच्चीकरण करणाऱ्या भाजपला तामिळनाडूमध्ये मात्र द्राविडी इंगा अनुभवयास मिळत आहे.

एप्रिलमध्ये रजनीकांत यांच्या राजकीय एंट्रीची शक्यता
रजनीकांत यांचा राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय
रजनीकांत ते गांगुली व्हाया पश्चिम बंगाल

के टू के म्हणजे काश्मिर ते कन्याकुमारी अशी केवळ आपल्याच पक्षाची एकहाती सत्ता असावी यासाठी साम, दाम, दंड आणि भेद याचा मुक्तहस्ते वापर करत सहकारी अथवा तेथील प्रादेशिक पक्षाचे खच्चीकरण करणाऱ्या भाजपला तामिळनाडूमध्ये मात्र द्राविडी इंगा अनुभवयास मिळत आहे.

तामिळनाडू विधानसभेची निवडणूक मार्च २०२१ मध्ये होण्याची शक्यता आहे. एकीकडे पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही स्थितीत आपले सरकार यावे यासाठी भाजपने तेथे मोठ्या प्रमाणात तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची फोडाफोडी सुरू केली आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा एकहाती सत्ता असावी यासाठी भाजप विविध क्लृप्त्या करत आहे. पण तामिळनाडूमध्ये आजपर्यंत अण्णा द्रमुक अथवा डीएमके या दोन प्रादेशिक पक्षांची आलटून पालटून सत्ता असते. त्यामुळे भाजपच्या प्रयत्नांना मर्यादा पडत आहेत. त्यातच आम्ही स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो, राष्ट्रीय पक्षाच्या म्हणजे भाजपच्या साथीने आघाडीचे सरकार आम्हाला आणि येथील सर्व जनतेला अजिबात मान्य नाही असा इशारा अण्णा द्रमुकचे खासदार आणि राज्याचे संयोजक के. पी. मुनूस्वामी यांनी दिला आहे.

भाजप हा छोटा भाऊ आहे त्याने छोटा भाऊ म्हणूनच राहावे, येथे मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न अजिबात करू नये असेही त्यांनी भाजपला सुनावले आहे. भाजपबरोबर जरी आमची युती असली तरी आगामी निवडणूक ही मुख्यमंत्री ए. पलानी स्वामी यांच्या नेतृत्वाखाली होतील, आणि तेच पुढचे मुख्यमंत्री असतील असेही मुनूस्वामी यांनी स्पष्ट केले आहे.

पलानी स्वामी हेच मुख्यमंत्रीपदी राहतील की नाही हे आताच सांगता येत नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकतेच केले होते. त्याला भाजपचे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष गुरुस्वामी यांनीही दुजोरा दिला होता. त्या अनुषंगाने भाजपला हा खणखणीत इशारा देण्यात आला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री ओ पलानीस्वामी यांच्या संपर्कात राहून भाजप अण्णा द्रमुकमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सध्या पक्षातर्फे करण्यात येत आहे.

रजनीकांतचा राजकारणापासून अचानक यू टर्न

अण्णा द्रमुकबरोबर भाजप २०१७ पासून युतीमध्ये आहे. येथेही स्वबळावर सत्तेत येण्याची स्वप्ने भाजप पाहात आहे. दरम्यान कॉलीवुड सुपरस्टार रजनीकांत हा सक्रिय राजकारणात सहभागी होणार होता आणि त्यासाठी भाजपने आवतन ही दिले होते. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजनीकांतने तूर्तास ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या छुप्या प्रयत्नावर पाणी पडल्याचे मानले जाते. कारण रजनीकांतच्या नवीन पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अण्णा द्रमुकची शिकार करण्याचा बिहार पॅटर्न करण्याच्या विचारात भाजप असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज होता. अभिनेता कमल हसन याच्या पक्षाने आधीच नवीन कृषी कायद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. त्यामुळे भाजपचा भरवसा केवळ रजनीकांत यांच्यावर होता. पण तिथेही अपयश पदरी पडले आणि दुसरीकडून द्राविडी इंगा सुद्धा अनुभवायला मिळत आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0