‘टाइम्स नाऊ’, ‘रिपब्लिक’च्या विरोधात उतरले बॉलीवूड

‘टाइम्स नाऊ’, ‘रिपब्लिक’च्या विरोधात उतरले बॉलीवूड

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे आत्महत्या प्रकरण, हिंदी चित्रपटसृष्टीत होत असलेली अंमली पदार्थाची विक्री या विषयावरून बॉलीवूडविरोधात काही वृत्तवाहिन्यांनी चालू केलेल्या बदनामीविरोधाला सोमवारी वेगळे वळण लागले. ३४ बॉलीवूड निर्माते व ४ बॉलीवूड असोसिएशननी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी व प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे संपादक राहुल शिवशंकर व नाविका कुमार या पत्रकारांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या दोन वृत्तवाहिन्यांनी बॉलीवूडच्या विरोधात स्वैर आरोप करण्यास सुरूवात केली असून चुकीचे, दिशाभूल करणारे वार्तांकन, अभिनेते, अभिनेत्री यांच्यावर सरसकट होणारी अवमानजनक टीका यांना पायबंद बसावा अशी मागणी या निर्मात्यांनी व संघटनांनी केली आहे.

ही मागणी करणार्यांमध्ये करण जोहर, यशराज, आमीर खान व शाहरुख खान, सलमान खान यांच्या चित्रपट निर्मिती कंपन्या आहेत.  टाइम्स नाऊ व रिपब्लिक वृत्तवाहिन्यांकडून बॉलीवूडची न्यायव्यवस्थेसारखी चौकशी सुरू असून अशा वृत्तांकनावर पायबंद घालावा अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे.

या याचिकेत वृत्तवाहिन्या व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने बॉलीवूडमध्ये काम करणारे सदस्य यांच्याविरोधात बेजबाबदार व अवमानकारक टिप्पण्या व्यक्त केल्या जात असून अशा टिप्पण्या रोखण्याची व त्या प्रसिद्ध होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे, असा मुद्दा मांडण्यात आला आहे.

त्याचबरोबर या याचिकेत, काही वृत्तवाहिन्यांनी बॉलीवूडमधील फिल्म अभिनेते, व्यावसायिक यांच्याविरोधात मीडिया ट्रायल सुरू करणे व त्यांच्या खासगी आयुष्याचा डोकावणे यावरही आक्षेप घेण्यात आला आहे.

मूळ बातमी

COMMENTS