दिवाळी  फटाकेविना?

दिवाळी फटाकेविना?

कोविड-19च्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद समितीने याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना नोटीस बजावली आहे. याचाच परिणाम म्हणून नवी दिल्ली, राजस्थान, येथे यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार ही याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची चर्चा आहे. तसेच कर्नाटक सरकारही फटाकेबंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अंगणवाडी सेविकांना २ हजार भाऊबीज भेट
एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; २८ टक्के महागाई भत्ता
दिव्यांचा अंधःकार

दिवाळी हा प्रकाशाचा सण. अंधःकारमय दुनियेत प्रकाशमय वातावरणाने प्रफुल्लित होण्याचा तो एक दीपमय सण. पण गेल्या काही वर्षापासून कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांचा आवाज आणि त्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी धुरांमुळे होणारे वायूप्रदूषण यामुळे हा सण केवळ आतषबाजी पुरता सीमित राहिला आहे. पण यंदा या आतषबाजीला अटकाव लागण्याची दाट शक्यता आहे. कोविड-19च्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद समितीने याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना नोटीस बजावली आहे. याचाच परिणाम म्हणून नवी दिल्ली, राजस्थान, येथे यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकार ही याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची चर्चा आहे. तसेच कर्नाटक सरकारही फटाकेबंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

देशभरातील वाढते प्रदूषण ही मोठी समस्या आहे. विशेषतः उत्तरेकडील राज्यात हिवाळ्यात जमिनीच्या मशागतीसाठी शेतात अनेक पिके जाळली जातात. त्यामुळे होणाऱ्या धुराचा परिणाम दिल्ली, हरियाणा या राज्यांना बसतो. त्यातच दिवाळीच्या वेळी मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. त्यामधून निघणाऱ्या धुरामुळे तर आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. विशेषतः श्वसन यंत्रणेवर याचा थेट परिणाम होतो. सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला असताना जर दिवाळीत फटाक्यांच्या वापरामुळे त्यातून निघालेला धूर हा कोरोनाची साथ पसरवण्यास कारक ठरेल, असे राष्ट्रीय हरित लवाद समितीने म्हटले आहे.

दीपावली काळात भारतात किती फटाके फोडले जातात आणि त्यामधून होणारे वायू प्रदूषण याबाबत एक सर्व्हे करण्यात आला आहे. त्यानुसार या काळात फुटणाऱ्या फटाक्यांमुळे हवेत सल्फर डाय ऑक्साईड, कार्बन डाय ऑक्साइड, आणि मोनो ऑक्साइड आणि काही घातक पदार्थ हवेत मोठ्या प्रमाणात पसरतात. त्याचा परिणाम श्वसन यंत्रणा, मेंदू यावर जादा होतो. विशेषतः लहान मुले तसेच आजारी व्यक्ती, मधुमेह असलेल्या व्यक्ती या मुळे बाधित होतात. फटाक्यामध्ये असणारे अनेक लहान शीशाचे तुकडे हे थेट परिणाम करतात. सध्या कोरोना काळात हे प्रदूषण अजिबात परवडणारे नाही. आधीच काही मायक्रो मिलिमीटर तुकड्यांमध्ये हवेतील खालच्या थरात हा विषाणू पसरत असल्याने धोका कायम आहे. फटाक्यांच्या वापरामुळे प्रदूषण स्तर आणखी खालावून कोरोना उसळी मारण्याची शक्यता एम्समधील काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

यावर तोडगा म्हणून ‘ग्रीन फटाके’ ही संकल्पना सध्या जोर धरत आहे. आवाज विरहित आणि केमिकल मुक्त असे हे फटाके असून त्यामुळे अजिबात प्रदूषण होणार नाही असा दावा केला जातोय. दिल्लीमध्ये तर नेहमीचे फटाके कोणी फोडताना दिसले तर १ लाख रु.चा दंड आकारण्यात येणार आहे. तर राजस्थानमध्ये फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी आहे.

महाराष्ट्र सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत असून यातून काय मार्ग काढता येईल याची माहिती घेण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

राज्य मंत्रिमंडळामध्ये झालेल्या चर्चेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फटाका विक्रीसाठी बंदी घालण्याची मागणी केली. पण विक्रेत्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यंदा फटाके विरहित दीपावली साजरी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

दीपावलीमध्ये फटाके विक्रीमधून किमान ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. यावर अनेक कुटुंबे आपली रोजी रोटी कमावत असल्याचे फटाका विक्री संघटनेचे म्हणणे आहे. तामिळनाडू येथील शिवकाशी हे फटाका निर्मितीचे मुख्य केंद्र आहे. येथून संपूर्ण देशात फटाके विक्रीसाठी पाठवले जातात. काही हजार कोटी रुपयांची उलाढाल दीपावली काळात येथून होते. राज्यातील अनेक घाऊक फटाका विक्री करणाऱ्या लोकांनी येथून आधीच फटाके विक्रीस आणले आहेत आणि ते किरकोळ व्यापायांनी खरेदी केले आहेत. आता या क्षणी जर राज्य सरकारने फटाका विक्री वर बंदी घातली तर काही कोटी रुपयांचे नुकसान आमचे होणार आहे, असे या विक्रेत्यांनी सांगितले.

एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आणि त्यातच फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषण हे कोरोना विषाणूला फायदेशीर ठरण्याची भीती या सावटात यंदाची दीपावली कशी साजरी होणार ? हरित फटाके खरच लोक स्वीकारणार का ? की स्वयंस्फूर्तीने यंदा कोणीही फटाकेच फोडणार नाही ? याचे उत्तर कोणाकडे नाही.

अतुल माने, हे मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0