श्रीनगरः जम्मू व काश्मीर निवडणूक आयोगाने गुरुवारी २० जिल्ह्यांमध्ये जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका व पंचायत पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या
श्रीनगरः जम्मू व काश्मीर निवडणूक आयोगाने गुरुवारी २० जिल्ह्यांमध्ये जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुका व पंचायत पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुका २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या दरम्यान ८ टप्प्यात होणार आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर व या राज्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका घेतल्या जात आहेत. या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याची तयारी काश्मीरमधील राजकीय पक्षांची सुरू आहे.
गेल्याच महिन्यात केंद्र सरकारने जम्मू व काश्मीर पंचायत राज्य कायद्यामध्ये दुरुस्ती केल्या होत्या. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा विकास परिषदांच्या स्थापना होणार असून त्याचे थेट निवडून आलेले प्रतिनिधी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून १६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
२८ नोव्हेंबरला सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मतदान घेतले जाणार असून या पंचायत पोटनिवडणुकांची मतमोजणी त्याच दिवशी तर जिल्हा विकास परिषदांची मतमोजणी २२ डिसेंबरला घेतली जाणार आहे.
निवडणूक आयोगाने या पूर्ण केंद्रशासित प्रदेशात २८० जिल्हा विकास परिषदा निश्चित केल्या आहेत. या जिल्हा परिषदांच्या सदस्याचा कार्यकाल ५ वर्षांचा असून या निवडणुका राजकीय पक्ष लढवतील तर तालुका पंचायत निवडणुका या बिगर राजकीय पक्षांच्या घेतल्या जाणार आहेत.
या निवडणुकांत पहिल्यांदाच पश्चिम पाकिस्तानचे शरणार्थी, वाल्मिकी व गोरखा नागरिकांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.
१२,१५३ सरपंच व पंचांच्या जागांसाठी ८ टप्प्यात मतदान होईल. काश्मीर खोर्यातील १० जिल्हे व जम्मूमधील ६ जिल्हे यात निवडणुका होणार आहेत.
मूळ बातमी
COMMENTS