शाह फैजल गुंड नाही, कुटुंबियांचा संताप

शाह फैजल गुंड नाही, कुटुंबियांचा संताप

कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार रासुकाच्या अंतर्गत फैजलला स्थानबद्ध करून ठेवण्याला आव्हान द्यायचे का याबद्दल ते लवकरच निर्णय घेतील.

सिंचन घोटाळा नव्हताच का?
अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
पँथर राजा ढाले यांचे निधन

श्रीनगर:भारतीय प्रशासकीय सेवेतील पद सोडून राजकारणात उतरलेल्या शाह फैजल यांचे कुटुंबीय म्हणतात,त्यांच्यावर कठोर अशा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) केलेले आरोप ही आश्चर्याची गोष्ट होती कारण अगदी काही काळापूर्वीच त्यांच्याकडे जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी ‘आदर्श नागरिक’ म्हणून पाहिले जात होते.

द वायर बरोबर बोलताना फैजल यांच्या कुटुंबियांनी सांगितले, त्यांनी काहीही घडू शकेल अशी मानसिक तयारी केली होती, तरीही रासुकाखालील आरोप हा वाईट धक्का होता.

“अगदी कालपर्यंत ते लोकांसाठी एक आदर्श नागरिक होते, आणि आता त्यांना या (गुन्हेगारांच्या) वर्गात टाकण्यात आले आहे, फैजल गुंड नाही. ते अत्यंत बुद्धिमान व्यक्ती असून त्यांनी हार्वर्डमधून पदवी घेतली आहे. इथे कोणीही त्यांच्या चांगुलपणाबाबत खात्री देऊ शकेल. त्यांच्यावर हे असे आरोप करणे योग्य नाही.”

नरेंद्र मोदी सरकारने घटनेतील कलम ३७० निष्प्रभ केल्यानंतर आणि जम्मू-काश्मीरचा खास दर्जा काढून घेतल्यानंतर फैजल यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. १४ फेब्रुवारी रोजी त्यांची ६ महिन्यांची प्रतिबंधात्मक स्थानबद्धता संपल्यानंतर त्यांना रासुकाखाली आरोपी करण्यात आले. सध्या त्यांना श्रीनगर येथील लाल चौकातील एमएलए होस्टेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या फाईलनुसार, फैजल हे त्यांचे लेख, ट्वीट आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट यांच्यामार्फत “मवाळ फुटीरतावादा”ची वकिली करत असतात. त्यामध्ये मागच्या वर्षी त्यांनी केलेल्या तथाकथित भडकाऊ वक्तव्यांबद्दलही नोंद आहे.

मात्र त्यांच्या कुटुंबियांच्या मते फैजल यांनी कधीही शांततेला बाधा येऊ शकेल असे काहीही केलेले नाही. “तुम्ही त्यांचे शेवटचे ट्वीट पहा, त्यांनी अहिंसावादी चळवळीचाच पुरस्कार केला आहे. ते शांततेला धोका कसे असू शकतात?” ते म्हणतात.

मागच्या वर्षी १३ ऑगस्ट रोजी, त्यांच्या अटकेच्या एक दिवस आधी फैजल यांनी केंद्राच्या कलम ३७० बाबतच्या निर्णयाच्या विरोधातील मत ट्विटरवरून व्यक्त केले होते.

फैजल यांच्या रासुकाखालील स्थानबद्धतेला आव्हान देण्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे कुटुंबसदस्यांनी सांगितले.

“आत्ता आम्ही अजून या पर्यायाबाबत फैजल यांच्याशी बोललेलो नाही. त्यांच्याबरोबर अनेक लोकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यांचे काय होते तेही पाहू. त्यानंतर काय करायचे याबाबत आम्ही एकत्रित निर्णय घेऊ शकतो,” असे त्यांनी सांगितले.

रासुकाच्या आरोपांपूर्वी, फैजल यांच्या कुटुंबाने त्यांच्या स्थानबद्धतेनंतर लगेच दिल्ली उच्च न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. मात्र त्यांनी लगेचच ती याचिका मागे घेतली. तसे का केले आणि त्यांच्या विरोधात रासुका आरोप लावण्यात येईल अशी धमकी मिळाली होती का असे विचारले असता कुटुंबातील सदस्याने सांगितले, हा निर्णय फैजल यांचा होता आणि याचिका मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आलेला नव्हता.

इतर स्थानबद्ध सहकाऱ्यांबरोबर एकता दर्शवण्यासाठी ती याचिका मागे घेण्याचा निर्णय फैजल यांनीच विचारपूर्वक घेतला होता.

“त्यांच्या अटकेनंतर लगेचच त्यांना बाँडवर सही करून (ते कोणत्याही राजकीय कृतीमध्ये सामील होणार नाहीत असे म्हणणाऱ्या) सुटण्याचा पर्याय देण्यात आला होता, पण त्यांनी तो प्रस्ताव स्विकारला नाही,” असे कुटुंबियांनी सांगितले.

२०१० साली नागरी सेवा परीक्षेमध्ये अव्वल आलेले फैजल हे आठ प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक आहेत ज्यांच्यावर रासुकाखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी, माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनाही त्यांचा प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कालावधी समाप्त झाल्यानंतर रासुकाखाली अडकवण्यात आले होते.

फैजल यांना नागरी सेवांमध्ये मिळालेल्या यषानंतर भारत सरकार आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रसारमाध्यमांनी त्यांना एक आदर्श तरुण म्हणून प्रदर्शित केले होते, जी शासनाच्या विरोधात हत्यार उचलणाऱ्या तरुणाच्या प्रतिमेच्या पूर्ण विरोधी प्रतिमा होती.

मात्र फैजल यांनी काश्मीरमधील सततच्या हत्या आणि भारतीय मुस्लिमांना कडेला ढकलले जाणे या दोन गोष्टींकरता नोकरीचा राजीनामा दिला होता.

मार्च २०१८ मध्ये, त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला – द जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (JKPM). बडी नोकरी सोडून लोकसेवेकरिता राजकारणात येण्याच्या त्यांच्या निर्णयाचा त्यांना आणि आमच्यापैकी कोणालाही अजिबात पश्चात्ताप होत नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले.

त्यांच्या सुटकेनंतर ते राजकारणातच राहतील का?“ते नक्कीच लोकांची सेवा करत राहतील, मग ते राजकारणी म्हणून असेल, कार्यकर्ता म्हणून किंवा अन्य स्वरूपात!”

फैजल यांच्या अनुपस्थितीमुळे कुटुंबियांवर काय परिणाम झाला आहे? कुटुंबातील इतर सदस्य सांगतात, त्यांच्या आईने “असामान्य धैर्य” दाखवले आहे. “त्यांना स्थानबद्ध करून ठेवलेले पाहताना त्रास होतो, पण आम्ही ठीक आहोत. आमची हिम्मत टिकून आहे.”

फैजल यांचा पाच वर्षांच्या मुलाला मात्र वडिलांची कमतरता नक्कीच जाणवत असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. “आम्ही फैजलला पुस्तके पाठवत असतो त्यामुळे आम्ही त्याच्या मुलाला सांगितले आहे की पापा शाळेत एक प्रोजेक्ट पूर्ण करायला गेले आहेत. त्यामुळे आता त्यालाही त्याच शाळेत जायचे आहे, त्याने बॅगही भरून ठेवली आहे,” ते म्हणाले. “त्या शाळेचे नाव एमएलए होस्टेल असल्याचेही आम्ही त्याला सांगितले आहे.”

कुटुंबियांनी सांगितले, कुराण वाचून झाल्यानंतर फैजल आता राज्यशास्त्र, हॉलोकॉस्ट आणि टॉलस्टॉयची पुस्तके वाचत आहेत.

जुनैद काठजू हे श्रीनगर स्थित पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0