वंशश्रेष्ठत्वाला सुरुंग लावणारी साहित्यकृती

वंशश्रेष्ठत्वाला सुरुंग लावणारी साहित्यकृती

‘द ग्रास इज सिंगिंग’ या कादंबरीतील आशयसूत्र वंशश्रेष्ठत्वाच्या भूमिकेला सुरूंग लावते. एका टप्प्यावर मेरीसारखी राज्यकर्त्या वर्गातील एक स्त्री हतबल होऊन मोझेससारख्या कृष्णवर्णीय तरूणाच्या मदतीवर जगायला लागते. तिच्या मदतीला आजुबाजूचा गौरवर्णीय समाज येत नाही, एक कृष्णवर्णीय तरूण येतो. हे बघून वाचकांना प्रश्न पडतो, की येथे कोण कोणावर सत्ता गाजवत आहे? कोण कोणाची मदत करत आहे? वंशश्रेष्ठत्वाच्या भूमिकेला प्रत्यक्षात काही शास्त्रीय आधार आहे का?

सार्वजनिक कंपन्यांचे पीएम केअरला २,१०५ कोटी दान
अखेर न्याय झाला : निर्भयाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया
फेसबुकच्या धोरणावर कंपनीतल्या ११ कर्मचाऱ्यांचे पत्र

फ्रिकन साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे या साहित्यात कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय समाज यांच्यातील गुंतागुंतीच्या संबंधांचे चित्रण हमखास असते. जसं मराठीतील दलित साहित्यात जातिव्यवस्था, मनुस्मृती वगैरेंनी निर्माण केलेल्या आणि आर्थिक शोषणावर आधारित असलेल्या व्यवस्थेचे चित्रण असते. आफ्रिकन साहित्याचे दुसरे (आणि माझ्या मते जास्त महत्त्वाचे) वैशिष्ट्य म्हणजे, आफ्रिकन लेखक दोन गटात मोडतात. एका गटात कृष्णवर्णीय लेखक आहेत. या संदर्भात जेम्स बॉल्डविन, टोनी मॉरिसन वगैरेंची नावं आठवतात. दुसर्‍या गटात गौरवर्णीय लेखक आहेत. या गटात जे. एम. कोएत्झी, डोरिस लेस्सिंग ही नावं आढळतात. मराठी साहित्यात अजूनही मोठ्या प्रमाणात सवर्ण साहित्यिकांनी दलित साहित्य लिहिलेले नाही. श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर वगैरे तुरळक अपवाद आहेत. या दोघांच्या लेखनाला दलित साहित्य म्हणायचे का, असा प्रश्न उपस्थित करणारे अनेक अभ्यासक आहेत.

आफ्रिकेतील वांशिक आणि आर्थिक गुंतागुंतीचं प्रभावी चित्रण करणारी महत्त्वाची लेखिका म्हणजे, श्रीमती डोरिस लेस्सिंग (१९१९-२०१३). डोरिसचा जन्म २२ऑक्टोबर १९१९ रोजी इराणमध्ये झाला. तिचे आईवडील गौरवर्णीय ब्रिटिश होते. ती वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत इराणमध्ये होती. नंतर तिच्या आईवडिलांनी झिम्बाब्वे (तेव्हाचा दक्षिण र्‍होडेशिया) या देशात स्थलांतर केले. डोरिस १९४९ मध्ये इंग्लंडला येईपर्यंत झिम्बाब्वेमध्ये राहत होती. तिथे तिचे आई-वडील शेती करत होते. या व्यवसायात त्यांना कधीच फारसा पैसा मिळाला नाही. डोरिसची आई मात्र मौजमजा करणारी होती. डोरिसला वयाच्या तेराव्या वर्षी शाळा सोडावी लागली. गरिबीमुळे तिचे वडील शाळेची फी भरू शकत नव्हते. डोरिसने वयाच्या पंधराव्या वर्षापासून छोट्यामोठ्या नोकर्‍या करायला सुरूवात केली.

डोरिसने याच काळात लेखन करायला सुरूवात केली. ती मिळेल ते वाचायची. तिने १९३७ मध्ये पहिले लग्न केले. या लग्नापासून तिला दोन अपत्यं झाली. हे लग्न १९४३ सालापर्यंत टिकले. एव्हाना डोरिसच्या राजकीय जाणिवा ठळक होऊ लागल्या होत्या. ती लंडनमधील पुरोगामी लेखकांच्या ‘लेफ्ट बूक क्लब’ मध्ये सहभागी झाली होती. ती समाजवादी विचारांची होती. लंडनमध्ये तिने १९४६ मध्ये दुसरे लग्न केले, जे तीन वर्षं टिकले. नंतर मात्र तिने कुटुंब, मुलं सोडून फक्त लेखनावर लक्ष केंद्रित केले. या संदर्भात तिने एका मुलाखतीत सांगितले, “For a long time I felt I had done a very brave thing. There is nothing more boring for an intelligent woman than to spend endless amounts of time with small children. I felt I wasn’t the best person to bring them up. I would have ended up an alcoholic or a frustrated intellectual like my mother…”

लढवय्या डोरिस

डोरिस दिवाणखान्यात बसून गोडगुलाबी लेखन करणारी लेखिका नव्हती. तिने सातत्याने अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला. दक्षिण आफ्रिकेतील वंशवादी राजवट, अण्वस्त्रं वगैरेंच्या विरोधात निघालेल्या मोर्चात डोरिस आघाडीवर असायची. म्हणूनच तिच्या पुस्तकांवर दक्षिण आफ्रिकेत अनेक वर्षे बंदी होती. स्वतंत्र विचार करण्याची सवय असलेली डोरिस झापडबंद विचार करू शकत नव्हती. यथावकाश तिचे ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाशी वैचारिक मतभेद झाले आणि ती पक्षातून बाहेर पडली. सोव्हिएत युनियनने जेव्हा डिसेंबर १९७९मध्ये अफगाणिस्तानात रणगाडे घुसवले तेव्हा डोरिसने या घटनेचा कडाडून निषेध केला होता.

तिची पहिली कादंबरी ‘द ग्रास इज सिंगिंग’ १९५० मध्ये प्रकाशित झाली. या कादंबरीचे जबरदस्त स्वागत झाले. १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द गोल्डन नोटबुक’ या कादंबरीनेही रसिकांचे लक्ष वेधून घेतले. तिने जवळपास पन्नास कादंबर्‍या लिहिल्या. यातील काही कादंबऱ्या ‘जेम्स सॉमस’ या टोपण नावाने लिहिल्या आहेत. याद्वारे तिला तरूण लेखकांना लेखन प्रसिद्ध करवून घेताना किती त्रास होतो, हेच दाखवायचे होते. १९९२ मध्ये डोरिसला ब्रिटनच्या सरकारने DBE हा किताब दिला होता. DBE म्हणजे Knight or Dame of the Most Excellent Order of the British Empire. अस्तित्वात नसलेल्या साम्राज्याने दिलेला हा किताब पुरोगामी विचारांच्या डोरिसने नाकारला, यात नवल ते काय!

डोरिसला २००७ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. तेव्हा तिचं वय ८८ वर्षं होतं. हा पुरस्कार स्वीकारताना तिने केलेले भाषण फार गाजलं. यात ती म्हणाली होती की लेखक/कलाकारांनी जगातील विषमतेच्या विरोधात लेखन केले पाहिजे. या भाषणातील महत्त्वाचं वाक्य म्हणजे “It is our imaginations which shape us, keep us, create us – for good and for ill. It is our stories that will recreate us, when we are torn, hurt, even destroyed…”

१७ नोव्हेबर २०१३ रोजी म्हणजे, वयाच्या ९४ व्या वर्षी लंडन येथे तिचे निधन झाले. काही अभ्यासकांच्या मते डोरिसची ‘द ग्रास इज सिंगिंग’ ही कादंबरी बरीचशी आत्मचरित्रात्मक आहे. यात वावगं काही नाही. जवळपास प्रत्येक लेखक लेखनाची सुरूवात आत्मचरित्रात्मक लेखनानेच करतो. या कादंबरीतील कथानक १९४० च्या दशकातील दक्षिण ऱ्होडेशिया या देशात घडते. आफ्रिकेतील अनेक देशांप्रमाणे हा देशसुद्धा पाश्चात्यांची वसाहत होता. १८८० मध्ये ब्रिटनमधील सुप्रसिद्ध (आणि कुप्रसिद्धसुद्धा) हिऱ्यांचे व्यापारी सर सेसिल ऱ्होड्स यांनी व्यापारानिमित्त या भागात पाय ठेवला. या ऱ्होड्स महाशयांनी व्यापारात अफाट संपत्ती कमावली. या संपत्तीत त्यांनी कृष्णवर्णीयांच्या केलेल्या अमानुष शोषणाचाही मोठा वाटा होता. सर सेसिल यांनी नंतर मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. जागतिक पातळीवरील अभ्यासकांच्या जगात तीन शिष्यवृत्ती फार मानाच्या समजल्या जातात. अमेरिकेची फुलब्राइट, जर्मनीची गुगेनहाइम आणि इंग्लंडची ऱ्होड्स. (ऱ्होड्स शिष्यवृत्ती गिरीश कार्नाडांना मिळाली होती.) ही शिष्यवृत्ती सुरू करणारे महाशय म्हणजे, सर सेसिल ऱ्होड्स. मात्र एकविसाव्या शतकात जेव्हा मानवी प्रज्ञा अधिक प्रगत झाली, तेव्हा सर ऱ्होड्स यांच्या योगदानाबद्दल पुनर्विचार सुरू झाला. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथील विद्यापीठाच्या आवरात असलेला सर ऱ्होड्स यांचा पुतळा विद्यापीठाने काढून टाकला.

धगधगती पार्श्वभूमी

झिम्बाब्वे या देशाला १९६५ मध्ये अंशतः आणि १८ एप्रिल १९८० रोजी इंग्लंडने पूर्ण स्वातंत्र्य दिले! या देशाची राजधानी हरारे आणि लोकसंख्या दीड कोटी आहे. लोकसंख्येपैकी सुमारे ९९.६ टक्के लोक आफ्रिकन आहेत. या देशात आज सोळा अधिकृत भाषा आहेत. येथील ८५ टक्के लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत. हे तपशील डोळ्यांसमोर ठेवत डोरिसच्या ‘द ग्रास इज सिंगिंग’ या कादंबरीला सामोरे जावे लागते. या कादंबरीत सुमारे पंधरा वर्षांचा काळ चितारलेला आहे.

वर उल्लेख आलेला आहे की कादंबरीचे कथानक ४०च्या दशकात घडते. याचा अर्थ तेव्हा ऱ्होडेशिया इंग्लंडचा गुलाम देश होता. याचा दुसरा अर्थ असा की तिथे असलेला गोरा समाज राज्यकर्त्या वर्गाचा प्रतिनिधी होता. या भावनेचं सततचे दडपण लेखिकेच्या पात्रांवर असलेलं वाचकांना जाणवतं. म्हणजे, आजुबाजूला कृष्णवर्णीय असतील तर खाजगी बोलायचं नाही. त्यांच्यासमोर वाद घालायचे नाहीत. जरी त्यांना इंग्रजी भाषा नीटशी अवगत नसली तरी त्यांच्यासमोर आपसातले वाद उघड होऊ द्यायचे नाहीत… त्यांना फारसं जवळ येऊ द्यायचं नाही..सतत त्यांच्या मागे लागून कामं करून घ्यायची… वगैरे वगैरे साम्राज्यवादी मानसिकता या कादंबरीतील प्रत्येक गोऱ्या पात्राची असल्याचे दिसून येते. कादंबरीभर वाचकांना गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील सूक्ष्म ताण जाणवत राहतो.

रहस्यकथेकडून सामाजिक वास्तवाकडे

कादंबरीची सुरूवात एखाद्या रहस्यकथेसारखी होते. डिक टर्नरची पत्नी मेरी टर्नरचा खून झालेला आहे. खुनाच्या आरोपाखाली त्यांच्या घरी घरगडी म्हणून काम करणार्‍या मोझेस या कृष्णवर्णीय तरूणाला अटक झालेली आहे. हा खून पैशासाठी झालेला आहे, याची पोलिसांना खात्री असते. टर्नर कुटुंबियांचा मित्र आणि शेजारी चार्ली स्लेटर पोलिसांना खुनाबद्दल कळवतो. त्याकाळी झिंम्बाब्वेत प्रत्येक गोऱ्या व्यक्तीकडे भरपूर शेती असायची. टर्नरकडे सुमारे पाचशे एकर, तर स्लेटरकडे एक हजार एकर शेती असते. मात्र टर्नरची आर्थिक स्थिती स्लेटरपेक्षा फार खालची असते. शिवाय त्याकाळी टेलिफोन, मोटार सायकल/ कार फारशा नसत. त्यामुळे गोऱ्या कुटुंबियांचा एकमेकांशी फारसा संपर्क फारसा नसे.

सर्वांना आश्चर्य वाटते की मोझेसने मेरी टर्नरचा खून का केला. तेथे टोनी नावाचा गोरा तरूण असतो, जो काही महिन्यांपूर्वीच इंग्लंडहून इथे नोकरी करायला आलेला असतो. टोनीला जाणवते की पोलिसांना खून का झाला हे हुडकून काढण्यात फारसा रस नाही. त्यांच्या दृष्टीने खुनी सापडला आहे आणि त्याने खुनाची कबुली दिली आहे. त्यांच्या दृष्टीने केस दफ्तरबंद झाली. टोनीला खात्री वाटते की यात एक प्रकारचा अन्याय होत आहे. त्याला हे सहन होत नाही. तो दुसर्‍याचं दिवशी ते गाव सोडून दुसरीकडे नोकरी करायला निघून जातो. कादंबरीच्या सुरूवातीलाच लेखिका फार सफाईने वाचकांच्या मनांत संशय निर्माण करते. इथं कादंबरी जी गती नि पकड घेते, ती शेवटपर्यंत. याचा अर्थ ही कादंबरी नेहमीची रहस्यप्रधान कादंबरी आहे, असं मात्र नाही. ही कादंबरी एक अभिजात कलाकृती आहे.

वैयक्तिक ताणतणावाचा छेद

पुढच्या प्रकरणांत डोरिसने त्याकाळच्या र्‍होडेशियातील एका खेड्यातील जीवन, तिथला निसर्ग, शेतीची पद्धत, तिथली जीवनशैली, दुकानं, बाजार इत्यादींचे वर्णन करून वातावरण निर्मिती केली आहे. यामुळे वाचक कथानकाच्या गाभ्यात शिरतो. या टप्प्यावर डोरिसने ‘फ्लॅशबॅक’ या तंत्राचा वापर करून मेरी, डिक वगैरे पात्रांचे जीवन, त्यांचे लग्न, त्यांची आर्थिक स्थिती वगैरेंचे तपशील दिले आहेत. मेरीचे बालपण, तिचे आईवडील, त्यांच्यातील विसंवाद वगैरेतून मेरीचे एकटेपण लक्षात येते. ती लहानपणीच अनाथ होते आणि शहरात राहून शॉर्टहँड, टायपिंग शिकून एका छोट्या कंपनीत नोकरी करायला लागते. शहरात ती नोकरी करणार्‍या पण अविवाहित महिलांच्या वसतिगृहात राहत असते. फटकळ स्वभावाची, मजामारू वृत्तीची मेरी बघताबघता समाजात एकटी पडते. तिच्या समवयस्कांची लग्नं होतात. त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टोमण्यांना आणि एकटेपणाला कंटाळून मेरी खेड्यात शेती करत असलेल्या डिकशी लग्न करून खेड्यात जाते. इथे कादंबरी वेगळे वळण घेते.

सुरूवातीचे नव्हाळी दिवस संपल्यावर मेरीला खेड्यातील जीवनात आणि डिकच्या जीवनात असलेला ठार एकटेपणा आणि कंटाळा जाणवतो. शिवाय त्यांच्या संबंधांत सूक्ष्म ताण असतो. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे डिकच्या शेतीवर आणि घरात काम करायला कृष्णवर्णीय तरूण असतात. डिकला अनुभवाने त्यांच्याशी कसं वागायचं हे समजलेलं असते. ही स्थिती मेरीची नसते. तिने तिच्या संबंध आयुष्यात एक कृष्णवर्णीय व्यक्ती सतत आजूबाजूला, स्वयंपाक घरात वावरताना बघितलेली नसते. शिवाय भाषेची अडचण. परिणामी तिचे सतत कृष्णवर्णीय नोकरांशी खटके उडत असतात. ती नवर्‍याच्या मागे लागून याला नोकरीवरून काढून टाक, त्याला ताकीद दे वगैरे भूणभूण लावत असते.

आर्थिक पातळीवर डिक एक अयशस्वी शेतकरी समजला जातो. त्याला गेले अनेक वर्षांत नफा झालेला नसतो. शेजारचे अनेक गोरे शेतमालक आता तंबाखूची शेती करायला लागलेले असतात. डिक मात्र जुनी, कमी उत्पन्न देणारी पिकं घेत असतो. लग्नाला एवढी वर्षे झालेली असूनही त्यांना मूलं होत नाही. या सर्वांमुळे मेरीच्या एकटेपणात भर पडत असते. कथानकाच्या एका टप्प्यावर मेरी शहरात पळून जाते. तिला वाटते की शहरात जाऊन जुनी नोकरी मिळवू, पुन्हा एकदा शहरी जीवनात मिसळून जाऊ आणि मस्त मजेत जगू. शहरात तिचा भ्रमनिरास होतो. जुना मालक तिला नोकरी द्यायला नाराज असतो. तिच्या जागी मालकाने आता एक तरूण, सुंदर, स्मार्ट मुलगी नोकरीवर ठेवलेली असते. शिवाय ती आधी ज्या मुलींच्या वसतिगृहात राहात होती तिथंसुद्धा तिला राहायला मिळत नाही. ते वसतिगृह अविवाहित मुलींसाठी असते!

तिकडे डिकलासुद्धा मेरीचे पळून जाणं मान्य नसते. याला अनेक कारणं असतात. त्यातले पहिलं कारण म्हणजे सामाजिक बदनामी आणि दुसरं म्हणजे एव्हाना डिकला मेरीची सवय झालेली असते. त्याला पुन्हा घर चालवण्याची जबाबदारी नको असते. तो शहरात येतो मेरीला हुडकून काढतो आणि परत आणतो. मेरीसुद्धा परत यायला तयार होते. तिच्या लक्षात आलेले असते की आताचे शहरी जीवन तिला स्वीकाणार नाही. या प्रकारे ते दोघे पराभूत मानसिकतेत खेड्यात परत येतात.

मेरीचं एकटेपण दूर करायला आणि शक्य झाल्यास थोडं उत्पन्न मिळावं म्हणून डिक मेरीला त्याच्या शेतावर एक छोटंसं किराणा सामानाचे दुकान काढून देतो. सुरूवातीला मेरीला मजा वाटते, पण लवकरच त्याचाही तिला कंटाळा येतो आणि दुकान अपेक्षेप्रमाणे बंद पडते. एवढ्या दिवसांत मेरी कधीही शेतीच्या कामात रस घेत नाही. डिकने या वर्षी काय पेरलं, किती पिकं आलीत, किती पैसे मिळाले वगैरेबद्दल तिला काहीही रस नसतो. एकदा डिक आजारी पडतो. त्याला बरेच दिवस आराम करावा लागतो. अशा स्थितीत शेतीकडे दुर्लक्ष होऊ नये, आळशी कृष्णवर्णीय कामगारांनी नीट काम करावं या हेतूने मेरी शेतावर दररोज चक्कर मारायला लागते. यामुळे तिचा संबंध आता अनेक कृष्णवर्णीय कामगारांशी यायला लागतो. एकदा ती रागाच्या भरात मोझेस नावाच्या कामगाराला चाबकाने मारते. नंतर तिला पश्चाताप होतो. पण कृष्णवर्णीय कामगाराला असं चाबकाने मारणे यात काही वावगं समजलं जात नाही. मात्र मोझेस याचा डुख धरतो. नंतर बरा झाल्यावर डिक याच मोझेसला घरकामासाठी ठेवतो. आता मोझेस आणि मेरी यांच्यात वेगळे नातं निर्माण व्हायला लागते.

आत्मनाशी गुंता

एव्हाना मेरी तिच्या आयुष्यात पूर्णपणे निराश झालेली असते. तिला जाणवते की आपले उरलेले आयुष्य असंच रसहिन, चैतन्यहिन जाणार आहे. डिकच्या हाताला यश नाही हा असंच वर्षानुवर्षे शेती करत राहील आणि एक दिवस मरून जाईल. यामुळे मेरीला नैराश्येचे तीव्र झटके येतात. तिचं घरातलं लक्ष उडते. ती छोट्याछोट्या गोष्टींसाठी मोझेसवर अवलंबून राहायला लागते. हे अवलंबून राहणं एवढं वाढतं, की मोझेस तिला कपडेसुद्धा घालून देऊ लागतो, डिक घरी नसताना तिच्या बेडरूममध्ये सहजतेने वावरतो. मात्र त्यांच्यात लैंगिक संबंधं निर्माण होत नाही. इथे मला लेखिकेचे खास कौतुक करण्याची इच्छा आहे. ज्या टप्प्यावर कादंबरी आलेली आहे तिथं जर डोरिसने मोझेस आणि मेरीत संबंध असल्याचे दाखवले असते तर ते स्वाभाविक वाटले असते. पण मोठे लेखक असे स्वाभाविक मोह टाळतात. नेमका हाच फरक आहे Good art आणि Great art यांच्यातील.

डिकला त्याचा शेजारी स्लेटर पटवून देतो, की डिकने त्याचे शेत स्लेटरला विकावे, चारसहा महिने दूर कोठे तरी सुट्टीवर जावे आणि नंतर स्लेटर डिकला त्याच्याच शेतावर मॅनेजर म्हणून नोकरी देईल. शेती विकून आलेल्या पैशातून डिकने सर्व छोटीमोठी कर्जं फेडावी आणि पत्नीला घेऊन सुट्टीवर जावे. डिक मोठ्या मुश्किलीने याला तयार होतो. तेवढ्यात इंग्लंडहून टॉम नावाचा तरूण नोकरीच्या शोधात आलेला असतो. स्लेटर टॉमला डिक नसताना सहा महिन्यांसाठी डिकची शेती सांभाळण्याची नोकरी देतो. शेतीची व्यवस्थित माहिती होण्यासाठी तरूण टॉम डिकच्या घरी मुक्काम करतो. इथं कादंबरी शेवटच्या टप्प्यावर येते.

वंशश्रेष्ठत्वाला आव्हान

टर्नर कुटुंबांची काय स्थिती आहे, हे टॉमच्या लक्षात येते. जमीन विकून स्थलांतर करण्यास कमालीचा नाराज असलेला डिक, टोकाच्या नैराश्याने अर्थवट वेडी झालेली मेरी आणि मेरीवर मानसिक पातळीवर ताबा मिळवलेला त्यांचा कृष्णवर्णीय नोकर मोझेस, यांच्यातील परस्परसंबंध कसे आहेत, हे टॉमच्या लक्षात येते. त्याला हेही दिसते की डिकचे घरात काय, या जगातच लक्ष नाही. मेरीवर मिळवलेल्या मानसिक विजयामुळे मोझेसचा आता एका गोऱ्या कुटुंबात मनसोक्त संचार सुरू आहे. ही स्थिती आजुबाजूला असलेल्या इतर गौरवर्णीय कुटुंबांत चर्चेचा विषय झालेला आहे. मेरी आणि मोझेसबद्दल दबक्या आवाजात गावगप्पा सुरू झालेल्या आहेत, अशा स्थितीत एक दिवस टॉमला दिसते की मोझेस बेडरूममध्ये मेरीला कपडे बदलण्यात मदत करत आहे! गेले अनेक पिढया कृष्णवर्णींवर सर्व प्रकारची सत्ता गाजवत असलेल्या गोऱ्या वंशातील टॉमला हे बघवत नाही. तो मोझेसला अद्वातद्वा बोलतो आणि हाकलून देतो. तोपर्यंत मोझेसलासुद्धा समजलेले असते की डिक टर्नरने जमीन विकली असून लवकरच ते गाव सोडून जाणार आहेत.

या बातमीने मोझेस मनातल्या मनात दुःखी होतो. एव्हाना त्याला मेरीवर सत्ता गाजवण्याची चटक लागलेली असते. अशी मेरी आता गाव सोडून जात आहे म्हटल्यावर मोझेस कमालीचा भडकतो. मेरीवर मानसिक पातळीवर सत्ता मिळवल्यापासून त्याच्या कृष्णवर्णीय वंशाच्या वतीने मोझेस मनातल्या मनात फार खूश असतो. आता मेरीच गाव सोडून जात आहे म्हटल्यावर त्याचा सूड अपूर्ण राहणार असतो. शेवटी तो एका उद्ध्वस्त मनःस्थितीत मेरीचा खून करतो. टॉमला खुनामागची खरी कारणं माहिती असतात. मात्र ही कारणं तेथील गोऱ्या समाजाला माहिती करून घेण्याची इच्छा नसते. आपण एवढी वर्षे कृष्णवर्णीय समाजावर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या विरोधात उमटलेली ही प्रतिक्रिया आहे, हे सत्य कोणालाही नको असते. म्हणून घाईघाईने मेरीच्या खुनाची केस बंद करण्यात येते.

वंशश्रेष्ठत्वाच्या संदर्भात मोझेसने मेरीचा खून करणे हे सर्व संबंधित गोऱ्या समाजाला (डिक सोडून) हवेच असते. एका कृष्णवर्णीयाने एका गोऱ्या स्त्रीवर अशी सत्ता गाजवायची म्हणजे काय? ‘पायातील चप्पल पायात ठेवलेली बरी’ ही मानसिकता वरचढ ठरते.(येथे मला नागराज मंजुळेच्या ‘सैराट’मधील शेवटचा प्रसंग आठवला. वंशश्रेष्ठत्वाच्या भाकड समजुतींमुळे स्वतःच्या बहिणीला आणि तिच्या अपत्याला निर्घृणपणे मारायला कमी करत नाहीत).

अर्थपूर्ण तपशीलावर भर

ही कादंबरी वाचताना मला अधूनमधून नेदिन गोर्डिमेरच्या ‘जुलै’ज पीपल’ या कादंबरीची आठवण येत होती. डोरिस लेस्सिंगचे लेखनकौशल्य वादातीत आहे. ज्या शांतपणे आणि योग्य तपशील देत ती ही कादंबरी उभी करते त्या कौशल्याला सलाम. कृष्णवर्णीय समाजावर सत्ता गाजवत असलेल्या आणि कमालीचे अल्पसंख्याक असलेला गोरा समाज… हा समाज सतत एका अनामिक भीतीखाली वावरत असतो. सर्व गोऱ्या समाजाला जाणीव असते की शारीरिक शक्तीच्या पातळीवर ते कृष्णवर्णीय समाजाचा सामना करू शकत नाही. अशा स्थितीत सतत कृष्णवर्णीयांचा अपमान करणे, तेजोभंग करणे ही सर्व गोऱ्या समाजाची गरज बनते. जी कुजबूज मेरी आणि मोझेस यांच्याबद्दल गावात सुरू होते, तशी अनेक प्रकरणं तिथे घडलेली असतात, घडत असतात. धडधाकट, पिळदार शरीर असलेला कृष्णवर्णीय पुरूष आणि गोऱ्या कातडीची स्त्री, यांच्यातील शरीरसंबंधांतून जन्मास आलेली अनेक मुलं त्याकाळी त्या देशात होती.

डोरिस लेस्सिंगची शैली कथानकाना साजेशी अशी संथ गतीची आहे. एक लेखक म्हणून डोरिसची नजर सूक्ष्म पण अर्थपूर्ण तपशील सहज टिपते आणि या तपशिलांना रूपकासारखे वापरते. एकमेकांवर मुळीच प्रेम नसलेले मेरी आणि डिक यांचा संसार कसा निरस आहे, हे डोरिस फार सफाईने वाचकांसमोर मांडते. त्यांच्यात कोणत्याच प्रकारचा संवाद नाही. सुसंवाद नाही तसाच विसंवादसुद्धा नाही. या कौटुंबिक ताणतणावाच्यामागे असलेले कृष्णवर्णीय आणि गोरा समाज यांच्यातील ताणलेले संबंध वगैरेमुळे कादंबरी वाचताना एक प्रकारची उत्कंठा लागलेली असते.

लेखिकेने ‘टॉम’ या पात्राच्या माध्यमातून कादंबरीत आधुनिक मूल्यं आणली आहेत. मेरी काय, डिक काय यांचे दृष्टिकोन वंशश्रेष्ठत्वाच्या भूमिकेला पूरक असतात. मात्र टॉमसारख्या तरूणाला ही भूमिका समजत नाही. त्याच्यावर ‘समानता’, ‘स्वातंत्र्य’, ‘मूलभूत हक्क’ वगैरेसारख्या मूल्यांचा स्वाभाविक प्रभाव असतो. थोडक्यात म्हणजे, लेखिकेने टॉमच्या माध्यमातून आफ्रिकेतील गौरवर्णीय समाज तिथल्या स्थानिक कृष्णवर्णीय समाजाकडे कसा बघत असतो, यावर प्रकाश टाकला आहे. एके काळी आपल्या देशातसुद्धा पतीच्या मृत्यूने सती जाणे समाजमान्य होतं. लॉर्ड विल्यम बेंटींकने १८२९ मध्ये कायदा करून बंदी घातली. आपल्याच देशात एकेकाळी तीनचार वर्षांच्या मुलींचे लग्न लावून देत असत. हेसुद्धा त्याकाळी समाजमान्य होतं. हे अमानुष प्रकार बंद करण्यासाठी इंग्रजांनी १८९१ मध्ये संमती वयाचा कायदा आणला. ऑगस्ट १९४७ मध्ये भारत जेव्हा स्वतंत्र झाला, तेव्हा साम्राज्यवादी मानसिकतेचा अर्क असलेले इंग्लंडचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल म्हणाले होते ‘या भारतीयांना स्वातंत्र्य कशाशी खातात हे समजत नाही. हा समाज गुलाम होण्याच्याच लायकीचा आहे लवकरच हा समाज आम्हाला परत बोलवेल.’ मी हा लेख जून २०२२ मध्ये लिहीत आहे. स्वातंत्र्य मिळून ७५वर्षं होत आहेत. आजपर्यंत एकदाही एकाही भारतीयाने ‘इंग्रजांना परत बोलवू’ असं म्हटलेलं नाही! किंबहुना, त्यानंतर देशाने अशी देदीप्यमान प्रगती केली की, १९८४ मध्ये कॅप्टन राकेश शर्मा नावाचा एक भारतीय तब्बल आठ दिवस अवकाशाला गवसणी घालून पृथ्वीवर परत आला! चर्चिलसाहेबांचं नशीब चांगलं की त्यांना १९६५ मध्येच मृत्यूने गाठलं.

‘द ग्रास इज सिंगिंग’ या कादंबरीतील आशयसूत्र वंशश्रेष्ठत्वाच्या भूमिकेला सुरूंग लावते. एका टप्प्यावर मेरीसारखी राज्यकर्त्या वर्गातील एक स्त्री हतबल होऊन मोझेससारख्या कृष्णवर्णीय तरूणाच्या मदतीवर जगायला लागते. तिच्या मदतीला आजूबाजूचा गौरवर्णीय समाज येत नाही, एक कृष्णवर्णीय तरूण येतो. हे बघून वाचकांना प्रश्न पडतो, की येथे कोण कोणावर सत्ता गाजवत आहे? कोण कोणाची मदत करत आहे? वंशश्रेष्ठत्वाच्या भूमिकेला प्रत्यक्षात काही शास्त्रीय आधार आहे का? नसेल तर मग गोरा समाज कशाच्या आधारे स्वतःला श्रेष्ठ समजतो आणि गौरेतर समाजाला गुलाम? इथं प्रश्न फक्त आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांचा नाही तर आशियातील तपकिरी कातडीच्या (ब्राऊन स्कीन) लोकांचासुद्धा आहे. भारताबद्दलसुद्धा युरोपात हीच भावना होती. जर्मनीचा सर्वेसर्वा हिटलर तर उघडपणे म्हणायचा की भारतीय लोक कशासाठी स्वातंत्र्याची मागणी करत आहेत? ते गुलाम होण्याच्याच लायकीचे आहेत. आज त्यांच्यावर इंग्रज राज्य करत आहेत. इंग्रज नसते तर फ्रेंचांनी राज्य केलं असतं. नाही तर जर्मनांनी केलं असतं. कोणत्या तरी युरोपियन देशाने भारतावर राज्य केलं असतं. याचं साधं कारण भारतीय समाज गुलाम होण्याच्याच लायकीचा आहे. हीच भावना अनेकांची आफ्रिकेतील कृष्णवर्णीय समाजाबद्दल होती (आणि काही प्रमाणात आजही आहे). डोरिस लेस्सिंगने फार समर्थपणे या भावनेची मोडतोड केली आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर हे महत्त्वाचे बदल दृग्गोचर झाले. म्हणून कादंबरीत एक गौरवर्णीय स्त्रीचा खून झालेला असला तरी बाहेरचे गवत मात्र गात आहे, ‘द ग्रास इज सिंगिंग’…

(लेखक निवृत्त प्राध्यापक आणि पुरस्कारप्राप्त कथा-कादंबरीकार आहेत.)

(१ जुलै २०२२ रोजी प्रकाशित मुक्त-संवाद नियतकालिकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0