मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाराज असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतून आपला पक्ष बाहेर
मुंबई: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाराज असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीतून आपला पक्ष बाहेर पडत असल्याची मंगळवारी घोषणा केली. शेतकऱ्यांना महापुरातील नुकसान भरपाई, दिवसा वीज, कर्जमाफी, प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान अशा विविध मागण्या आमच्या संघटनेने सरकारकडे केल्या होत्या. या सर्व मागण्याबाबत फारशी सकारात्मक भूमिका सरकारने घेतली नाही. त्यामुळे आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली.
सरकार स्थापन झाल्यानंतर अडीच वर्षात अनेकदा मागणी करूनही संघटनेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्याने शेट्टी यांच्यासह सर्वच नेते नाराज होते. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली. आघाडीचे प्रमुख शरद पवार यांनाही पत्राद्वारे आपली नाराजी कळवली. पण सरकारने याबाबत कोणतीच दखल न घेतल्यामुळे अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केल्याचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिले आहे.
राजू शेट्टी हे भाजपसोबत जाणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत पण तूर्त आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपली स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार असल्याचेही सांगितले. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभा केली नाही. तर चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणुकीचा मार्ग स्वीकारला असं राजू शेट्टी म्हणाले. सध्या भाजप सोबत जाण्याचा विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेला नाही असंही ते म्हणाले.
राजू शेट्टी म्हणाले की, “महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही. ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले. आमदाराच्या पुढ्यात बोलणार नाहीत ते कारखानदार यांच्यासमोर काय बोलतील. एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही अशा समितीच्या अहवालावरून निती आयोगाने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत निर्णय घेण्याचं सांगितलं. निती आयोगाने सांगितलेल्या सूचनापेक्षा महाविकास आघाडी सरकारने आणखी कडक भूमिका घेतली.”
महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले होतं.
COMMENTS