पितापुत्राच्या नात्याचा कोलाज

पितापुत्राच्या नात्याचा कोलाज

आई ही मातीसारखी असते तिच्यात आपली मुळं घट्ट रुतलेली असतात. पण बाप हा त्या मुळांना, मातीला आतून ओलावा देणारा असतो.. आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही. ‘फादर्स डे’ निमित्ताने पित्याचे हृदगत मांडणारा हा लेख

माहितीआयुक्तांना माहितीचा अधिकार आहे का?
रियाज अत्तार हा डबल एजंट म्हणून काम करत होता का?
काश्मीरात ‘फोर जी’साठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार

वडील :   ते माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस होते.
मुलगा :  जे तुम्ही विकले..
वडील : तस नाहीये, तू म्हणाला होतास  की माझ्यावर लिहा..
मुलगा :  नाही.. मी म्हटलं होतं  माझ्यासाठी लिहा…

‘विनी द पुह’

‘विनी द पुह’

या अत्यंत लोकप्रिय व जगातील अव्वल ठरलेल्या पुस्तकाचे लेखक अँलन म्हिल्न आणि त्यांच्या मुलांच्यात घडलेली सत्यघटना. ‘विनी द पुह’ ही कथा ख्रिस्तोफरच्या बालपणातील भावविश्वावर बेतलेली. प्रसिद्धीच्या झोकात ख्रिस्तोफरचे बालपण वेठीस धरले गेले होते. वाढत्या वयात ही ओळख त्याला नकोशी होते. आपल्या भावविश्वाचा असा बाजार मांडल्याबद्दल त्याच्या मनात वडिलांबद्दल राग साठलेला असतो, तो उफाळून बाहेर पडतो ते युद्धावर जात असताना.. निरोप घेते वेळी. वडिलांना बोलायची संधी न देता ख्रिस्तोफर रेल्वेत झटकन बसतो. बापामुळे मिळालेली ओळख पुसून, आपले पौरुषत्व दाखवायला युद्धावर ख्रिस्तोफर निघालेला असतो..
दुखावलेल्या वडिलांना मागे सोडून…

मुलगा आणि वडील यांचे भावबंध हे काहीसे अदृश्य स्वरूपातले असतात. आईशी असणार भावविश्व हे थेट स्वरूपाचं. त्याचे दार सदा न् कदा सताड उघडे ..
त्या सर्वात काही वेळा वडील हे उपरे, आगंतुक.. बऱ्याचदा आई आणि मुलांच्या प्रेमातील वाटेकरी. पोटातून मांडीवर, मांडीवरून बोट धरून वाढवणाऱ्या आईचा स्पर्श, गंध हा शरीर- मनाला सुपरिचित. बापाच्या घामाचा उग्रदर्प ओळखीचा होतो जेव्हा सुरक्षित जगाचे बोट सोडून, मोठ्या जगात वावरायला लागल्यावर..

‘पोस्टमन इन द माऊंटन’ या सिनेमात वडील आपल्या मुलाला या ‘घामाच्या सुगंधाची’ ओळख करून देतानाचा प्रवास अतिशय हळुवार हाताळला आहे. उंच डोंगर रांगात जाऊन पत्र वाटप करणारा पोस्टमन आदल्या दिवशी निवृत्त झाला असतो, ती जागा त्याच्या मुलाने घेतली असते. कामावर जाण्याचा पहिला दिवस. मुलाला डोंगरातील रस्ता अपरिचित, त्यामुळे पोस्टमन आपल्या मुलाला कामाची आणि रस्त्याची ओळख व्हावी म्हणून नेहमीच्या जोडीदार कुत्र्याला सोबत घेऊन निघतो. मुलाचे वडिलांशी फारसे सख्य नसते. महिन्यातून कधीमधी दिसणारा हा माणूस ! जास्त संवाद असा कधी निर्माण झालेला नसतो. डोंगरातून जाणारे अवघड, अरुंद रस्ते. आजूबाजूला मनोरम्य निसर्ग. चालत असताना मुलाचे लक्ष इकडे तिकडे जाते. त्यावर वडिलांच्या सूचनांचा मारा सुरू होतो.
“रस्त्याकडे बघ..”
“कडेने चाल, उतरणाऱ्या लोकांना आधी रस्ता दे..” बापाच्या या अशा सूचनांचा मुलाला भयंकर राग येत असतो. जसे जसे टपाल वाटप करत पुढे पुढे जातात, तसे तसे मुलाला वडील समजायला लागतात. गावकऱ्यांच्या कडून वडिलांना मिळणाऱ्या आपुलकी, मान, आदर याचे दर्शन होते.

“आता माझा मुलगा येत जाईल, त्यालाही असेच प्रेम द्या.” असे वडील लोकांना आवर्जून सांगत असतात. प्रवासात कुत्र्याला सुद्धा आपल्या नव्या मालकाची ओळख होते. रस्त्यात एक ठिकाणी नदी आडवी असते. नदीचे थंड पाणी बापाला बाधेल म्हणून मुलगा वडिलांना पाठीवर घेतो…

वडिल गहिवरून जातात, कोणे एकेकाळी याच मुलाला खांद्यावर बसून जत्रा दाखवली होती. नदी पार करत असताना दोघांच्या भूमिकेची अदलाबदल झालेली असते.
मुलगा म्हणतो “तुम्ही तर पोस्टाच्या बॅगेपेक्षा हलके आहात.”
अवजड वाटणारे हे नाते कल्पनेपेक्षा कितीतरी  हलके असते…
असाच एक चौदा वर्षांचा मुलगा बेशुद्ध पडलेल्या सावत्र बापाचे जड धूड झऱ्याकडे घेऊन जातानांचे दृश्य ‘फादर’ या चित्रपटात दिसते. आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर शहरात जाऊन पैसे कमावण्याची जबाबदारी घेतलेला कुमारवस्था आणि तारुण्य या सीमेरेषेवर असलेला हा मुलगा, सुट्टी घेऊन गावात येतो. येतांना कर्त्या माणसाप्रमाणे आई, छोट्या बहिणींसाठी खरेदी करतो. गावात आल्या वर समजते आईने एका पोलिस अधिकाऱ्याशी लग्न केले आहे. त्याचे अर्धवट वयातील रक्त खवळून उठतं. आपण आई आणि बहिणींचा सांभाळ नीट करू शकत असताना, आईने दुसरे लग्न कशाला केलं ? याचा राग येऊन तो बरेच मोठे गोंधळ करून ठेवतो व सावत्र वडिलांचे पिस्तूल घेऊन पळून जातो. ते सावत्र वडील त्याला शोधून घरी घेऊन येत असतानांच्या प्रवासात, मुलाला हा सावत्र पिता भला माणूस आहे, हे उमजते. वाळवंटातील उष्णतेमुळे बेशुद्ध पडलेल्या या सावत्र पित्याला जिवाच्या आकांताने ओढत झऱ्यापाशी घेऊन येतो. झऱ्याच्या पाण्यात दोघाचे शरीरं -मन थंड होत जातं. वाहण्याऱ्या झुळझुळ पाण्याबरोबर दोघांच्यातला ताण वाहून जातो..

पिता-पुत्रामधील हा ताण एकट्या मुलांकडून तयार होतो असे नाही. जगाचे व्यवहारी नियम पित्याला माहिती असल्याने, काही अनुभवांमुळे, पूर्वग्रहांमुळे पित्याकडूनही मुलांवर काही सक्तीचे निर्णय लादले जातात. जे मुलांना अमान्य असतात. मग मुलं स्वतःच्या वाटा शोधतात. याचे उदाहरण आहे सुप्रसिद्ध संगीतकार मदन मोहन आणि त्यांचे वडील राय बहाद्दर चुनीलाल यांचे. आधी आर्मीची, नंतर रेडिओ स्टेशनची नोकरी सोडून मदन मोहन यांनी संगीताला वाहून घ्यायचे ठरवले तेव्हा तो निर्णय चुनीलाल यांना अजिबात मान्य नव्हता. स्वतः बॉम्बे टॉकीजचे भागीदार असून त्यांना मदन मोहन यांची या क्षेत्रात येऊ नये, असे वाटत होते. असा अव्यवहारी निर्णय घेतल्यामुळे, त्यांनी मदन मोहन यांना घराच्या बाहेर जायला सांगितले. तीन वर्षे हा श्रीमंत बापाचा पोरगा अत्यंत हलाखीत जगला. ‘आँखे’ या पहिल्या स्वतंत्र सिनेमाला संगीत दिल्यावर, मदन मोहन यांनी आपल्या वडिलांना खास शो साठी बोलावले. सिनेमा संपला. ते म्हणाले, “मला आयुष्यात पश्चाताप वाटेल, असे कधी वागलो नाही. एक यशस्वी व्यक्ती म्हणून जगलो. फक्त तुझ्याबाबत माझं चुकलं. माझी खात्री पटली की तू यासाठीच जन्माला आला आहेस..”
दोघांच्याही डोळ्यात पाणी होत..

शेक्सपिअर म्हणतो तसं,
When a father gives to his son, both laugh, when a son gives to his father, both cry.

फादर

फादर

लहानपणी मुलांना आपले वडील धाडसी, हुशार, सुपर हिरो वाटत असतात. या कल्पनेला तडा जायला लागतो, जेव्हा तो समाजात वावरायला लागतो. तेव्हा आपल्या वडिलांसारखे इतरही लोक आहेत. हळूहळू त्यांच्या लक्षात येते की वडील नामक माणूस एक सर्वसाधारण व्यक्ती आहेत. त्याच्यातील उणिवा, कमतरता दिसायला लागतात. वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे आकर्षण वाटायला लागते. बाहेर जगातील मित्र, कंपू याचा प्रभाव जास्त असतो. बापाचा पगडा नकोसा होतो. कामासाठी बाहेर पडणारा बाप म्हणजे जणू निर्धास्त पुरुष आणि आई ही राबणारी, सर्वांचे करणारी, बिचारी. त्यात नोकरी करून घर सांभाळणारी असेल तर अजून बिचारी. नकळत अशी सहानुभूती मुलं आईला देत असतात. आई आणि वडील यांच्यातील तुलना मुलं अजाणतेपणी करत असतात. अशावेळी आईची भूमिका ही फार संतुलित असणे गरजेचे.

‘शामची आई’ हा संपूर्ण सिनेमा मातृप्रेमाने ओथंबलेला. तरीही एका ठिकाणी त्यातील वडील या व्यक्तिरेखेवर अप्रतिम भाष्य केले आहे. एकदा शाम काही कारणाने वडिलांवर रुसलेला असताना, आई परमेश्वराचा दाखला देत वडिलांचे महत्त्व सांगणारी एक सुरेख अंगाई  म्हणते.

अंगावर पांघरूण ओढुनिया काळे
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून
पिता जो जगाचा बैसे जागत अजून
नीज नीज माझ्या बाळा, करू नको चिंता
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता !

त्याच्या पुढच्या दृश्यामध्ये आश्रमात असलेल्या श्यामसाठी त्याचे वडील सहा कोस चालून, घरी व्यायलेला गाईचा खरवस घेऊन आलेले असतात. मित्र विचारतात, हे कोण  आहेत ? चुलते? गडी माणूस? तेव्हा श्याम ताठ मानेने म्हणतो, “माझे वडील !”
आई इतकेच पितृहृदय श्यामला समजतं.

आई ही मातीसारखी असते तिच्यात आपली मुळं घट्ट रुतलेली असतात. पण बाप हा त्या मुळांना, मातीला आतून ओलावा देणारा असतो..
आईचं काळीज समजणाऱ्या पोरांना बापाची तळमळ समजत नाही.
वडिलांशी ‘आरेला कारे’ करणारी मनोवृत्ती तयार होते ती त्याच्यात होणाऱ्या कुमारवयीन बदलामुळे. टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन आपले रंग दाखवत असतो. स्व-विषयकची जाणीव, जग जिंकण्याची उर्मी, ताकद, अहंकार याचा आविष्कार दाखवायला तरुण रक्त सळसळत असत. त्याची सुरवात घरापासून होते. मुलाच्या या बदलत्या आक्रमक रूपामुळे वडील ही गोंधळतात, भयचकित होतात. बाहेरच्या जगामध्ये होणारी स्वतःची कुतरओढ, जीवनाचे फटके खाल्लेल्या, रग जिरलेल्या वयात हा सामना दुखावणारा, अहंकाराला धक्का पोचवणारा असतो. दोघांच्यात एक अदृश्य ताण तयार होतो.

बाप हा मध्यान्हीच्या उन्हासारखा असतो, जो मुलाला सावली देत नाही. त्याला स्वप्रत्ययी होण्यास तयार करत असतो. उन्हाचे चटके मुलाला बसत असल्याचे बघून कळवणारा ‘पाडस’मधील बाप पेनी हा आपल्या मुलाला जे सांगतो ते अत्यंत हृदयगत आहे..
तो म्हणतो “जीवन सुंदर आणि सोपं असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. जीवन सुंदर आहे मुला, फार सुंदर पण ते सोपं मात्र नाही.
एका फटक्यात आपल्याला जमीनदोस्त करतं. आपण उठतो आणि जीवन आणखी एक फटका मारतं ! आयुष्यभर मी असाच बैचेन, असुरक्षित राहिलो आहे. निदान तुझं आयुष्य अडचणीचं असू नये, कमीतकमी ते माझ्यापेक्षा सुखाचं असावं अशी माझी इच्छा. पोटची पोरं जगाला तोंड देण्यासाठी उभी ठाकताना पाहून बापाचं हृदय भडभडून येत असतं. आपली ससेहोलपट झाली तशी आपल्या पोरांची व्हायची आहे, हे माहिती असतं. जमेल तितका काळ त्यापासून वाचवण्याची माझी इच्छा होती.”

रागावून  गेलेला मुलगा परत घरी आलेला असतो, दोन दिवसांच्या रिकाम्या पोटाने त्याला अक्कल शिकवलेली असते. बापाच्या बोलण्यातली कळकळ त्याला समजते.

या सर्वात जाणवलेली गोष्ट म्हणजे प्रवास झाल्याशिवाय जगणं समजत नाही. आणि दुसऱ्याची बाजूही कळत नाही. म्हणून तो प्रवास व्हायला हवा बाहेरचा.. आतला..
आयुष्याच्या ट्रॅकवर अपेक्षा, जबाबदारीचे ओझे घेऊन धावणाऱ्या बापाने अजून जोरात पळायला हवे, सर्वांच्या पुढे अजून पुढे…
असे प्रेक्षक असणाऱ्या मुलाला नेहमी वाटत असत. पण जेव्हा ते बॅटल घेऊन तो स्वतः पळायला लागतो, तेव्हा या जीवघेण्या शर्यतीचे खरे नियम समजतात. दमलेला बाप आपल्या मुलाला त्या शर्यतीचे धोके, चकवे सांगण्याचा अतोनात प्रयत्न करत असतो..

जावेद अख्तर हे पहिल्यापासून  बंडखोर.
आपल्या पित्याचे सर्व नियम, आदेश धुडकावून आयुष्य आपल्या पद्धतीने जगणारे जावेद, हे वडिलांशी फटकून वागणारे. त्यांच्या वडिलांनी मरण्याच्या नऊ दिवस आधी एक स्वतःचे पुस्तक जावेद अख्तरांना भेट म्हणून दिले आणि त्यावर लिहिलं होतं –
“जेव्हा मी राहणार नाही तेव्हा माझी खूप आठवण काढशील.” आणि जावेद अख्तर म्हणतात, “त्यांनी बरोबर लिहिलं होतं. मला त्याचं असणं उशिरा समजले.”

ख्रिस्तोफर लढाईतून परत घरी येतो. काही दिवसांनी आपल्या वडिलांबरोबर जंगलात फिरायला जातो तेव्हा सांगतो, “मी जाण्यापूर्वी तुम्हाला दुखावलं. तिकडे वाळवंटात आम्ही थकून, पहुडले असताना एका सैनिकाने ‘विनी द पुह’चे गाणं म्हणायला सुरवात केली, तेव्हा इतर सैनिकही ते गाणं म्हणायला लागले. ते आपल्या बालपणात गेले.. अतिशय बिकट परिस्थितीत त्या गाण्यामुळे त्यांना दिलासा मिळत होता.. तुम्ही त्यावेळी जे लिहिलं त्यामुळे लोकांना निराशेतून बाहेर यायला मदत झाली होती. इतक्या वर्षांनंतरही ही जादू कायम आहे.. हे जंगलही अजून तसेच आहे.. वाटलं होतं तितकं माझं बालपण वाईट गेलं नव्हतं ! आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज आपण परत एकत्र इथे आहोत…”

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0