निर्भय सत्याग्रहीः डॉ. एन.डी.पाटील

निर्भय सत्याग्रहीः डॉ. एन.डी.पाटील

शेतकरी, कामगार, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आपले अखंड आयुष्य वेचलेले लढवय्ये नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे सोमवारी वयाच्या ९३ व्या वर्षी कोल्हापूरात निधन झाले. प्रा. एनडींचे आयुष्य ही एक प्रेरणादायी ध्येयगाथा होती. काही वर्षांपूर्वी प्रा. एनडींच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ‘कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक’ या पुस्तकात प्रा. एनडींच्या संघर्षमय आयुष्याचा घेतलेला वेध...

रयतेचा आधारवड गेला
एन. डी. पाटील यांचे निधन
एन. डी. – एक धगधगते अग्निकुंड

आयुष्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रा. एन. डी. पाटील हे महाराष्ट्राच्या ‘पुरोगामी प्रबोधनाचे प्रवक्ते’ म्हणून अग्रभागी आहेत. त्या मागे कार्य सातत्य, विचारांची स्पष्टता, ध्येयावरील निष्ठा व सतत समाजास जागृत ठेवण्याची धडपड दिसून येते. या साऱ्या मागे आपण कधीतरी वंचित, उपेक्षित असल्याची जाण असते.

प्रा. एन. डी. पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील. ढवळी या छोट्या गावी ते जन्मले. घरची गरीबी, आई-वडील, आजी-आजोबा निरक्षर, आजोबांनी आपल्या दोन्ही नातवांना एकदमच शाळेत घातलं. जन्म, मृत्यूची नोंद सक्तीची असण्याचा तो काळ नव्हता. स्वातंत्र्यपूर्ण काळातील अर्धी शिक्षणेच्छू पिढी जून-जुलैमध्ये जन्मली. एनडी त्यापैकी एक. १५ जुलै ही त्यांची जन्मतारीख तशी सार्वत्रिक. विठ्ठल, मारुती मंदिरात लोकांचं येणं जाणं, घंटानाद (कधी कधी शंखनादही) यात भरणाऱ्या शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं.

तो काळ भटा-बामणांच्या शिक्षणाचा. कुणब्याच्या पोरानं गुरं राखायची अशी आजोबांची धारणा. पण हा दरिद्री नारायण ज्ञानश्रीमंत होता खरा. आजोबांनी गुरुजींकडे साकडं घालून लकडा लावून या नारायणास हायस्कूलात धाडलं. इथं एनडी यांना खैरमोडे नावाचे शिक्षक भेटले नि त्यांचं जीवन बदलून गेलं. खैरमोडे सर वाचन वेडे. एनडींनी त्यांच्याकडून वाचन संस्कार घेतले. राष्ट्रसेवा दलाच्या विचारांच्या संस्कारांनी त्यांना सामाजिक बनवलं. तो काळ ‘भारत छोडो’ आंदोलनाचा होता. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पत्री सरकारच्या प्रभावाचा तो काळ. किशोर वयातच यांनी दारुबंदी आंदोलनात भाग घेतला नि त्यांना अटक झाली.

पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात दाखल झाले. इथे त्यांना डॉ. अप्पासाहेब पवार, डॉ. विनायक गोकाक यांच्यासारखे इतिहास तज्ज्ञ, इंग्रजीचे व्यासंगी प्राध्यापक म्हणून लाभले. विद्यार्थी चळवळीत सतत सहभाग, अभ्यास वर्गांना उपस्थिती, शिबिरात सक्रियता, चळवळीतला सतत संचार या साऱ्यांतून त्यांच्यातील ध्येयवादी आकारला. शंकरराव मोरे यांचे ‘जनसत्ता’ पत्र ओरडत विकणारा नारायण ‘कमवा व शिका’चे धडे गिरवत आचार्य जावडेकर, कार्ल मार्क्स, महात्मा गांधी वाचू लागला व बघता बघता पुरोगामी बनला. सन १९४८च्या गांधी हत्येच्यावेळी महाराष्ट्रात मोठी जाळपोळ झाली. त्या वेळी पदवीधर झालेले एनडी आष्ट्याच्या ट्रेनिंग कॉलेजात शिकत होते. इथे त्यांनी गनीसाहेब आत्तारांचा सत्याग्रह पाहिला. एनडी निर्भय सत्याग्रही म्हणून आज आपणास दिसतात. त्या मागे संस्कार आहेत गनीसाहेब आत्तारांच्या निर्भय सत्याग्रहाचे. इथेच त्यांची भेट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी झाली. वडील व भाऊ एकाच वर्षी निधन पावले. निर्धन नारायणाला आईने कर्मवीरांकडे सुपूर्द केले. एनडी कर्मवीरांचे आज्ञापालक विद्यार्थी बनले. कर्मवीरांनी त्यांना आपल्याच रयत शिक्षण संस्थेत पुढे प्राध्यापक करून स्वावलंबी बनवलं.

प्रा. एन.डी. पाटील केवळ पुस्तक शिकवणारे शिक्षक नव्हेत. त्यांच्यात एक समाजशिक्षक सतत जागा असायचा. शिकवायची खरी जागा त्यांनी जाणलेली होती. तो काळ त्यांच्या वैचारिक द्वंद्वाचा होता. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा त्याग, सेवा एकीकडे खुणावत असताना दुसरीकडे केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख प्रभृतींचा शेतकरी संघ आकर्षित करत असायचा. एनडींनी शेतकरी, कामगारांचे कार्य करायचं पसंत केलं. पुढे ते विधिवत स्थापन झालेल्या शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते झाले. मजल दरमजल करत ते या पक्षाचे सरचिटणीस झाले. कार्यकर्ता ते पक्षप्रमुख असा त्यांच्या कार्याचा आलेख म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची निशाणीच. त्यांच्या जीवनातील प्रत्येक यशास कष्टाची अट असते.

सन १९६०-७०च्या दशकात मी पोरगेलासा होतो. कोल्हापूरच्या शिवाजी, मंगळवार पेठेतच माझा वावर होता. या काळात त्र्यं. सी. कारखानीस, दाजिबा देसाई, यांच्या निवडणुका मी पाहिल्या आहेत. कोपरा सभातील तरुण एनडींच्या घणाघाती भाषणांचा मी साक्षीदार आहे. पुढे आमदार म्हणून त्यांनी केलेलं कार्य पाहिलं आहे. सहकार मंत्री असताना एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांना भेटण्या, बोलण्याचा, निवेदन देण्याचा योग आला. त्यांची विधान परिषदेतील काही भाषणं ऐकल्याचं आठवतं. तो काळ माझ्या मंत्रालयातील येरझाऱ्याचा होता. या काळात मी अनुभवलंय की, या माणसामागे सतत कार्यकर्त्यांचं मोहळ असायचं.

प्रस्थापितांविरोधात सतत लढत देत त्यांनी कार्य व विचारांचे पुरोगामीपण, डावंपण जपलं. मधुकरराव चौधरी शिक्षणमंत्री असताना त्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करून शिक्षणात क्रांती घडवून आणत असल्याचा आव आणला. प्रा. एनडींनी महाराष्ट्र सरकारच्या श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरुप ‘कृष्ण पत्रिका’ पुस्तिका प्रकाशित करून त्यातील फोलपणा स्पष्ट केला. प्रा. एन. डी. पाटील यांनी आंदोलन चळवळीबरोबरच प्रबोधनपर लेखनही विपुल केलं.

सत्ताधारी असताना तत्त्व जपणारा अपवाद मंत्री म्हणून एन.डींचा लौकिक केवळ वादातीत. मुलास नियमाने प्रवेश घेणं, मंत्री म्हणून सवलती न घेणं, सत्तेबाहेर सत्ताकेंद्र विकसित न करणं. उपकृत न होणं इ. सारखे त्यांनी जाणीवपूर्वक पाळलेले नियम त्यांना निष्कलंक कार्यकर्ता, नेता, मंत्री, मित्र, सहकारी म्हणून नेहमी अग्रभागी ठेवत आलेत. एन्रॉन आंदोलन, जागतिकीकरण विरोधी चळवळ इ. पुरोगामी विचारवेधी कृतीचं नेतृत्त्व त्यांच्याकडे होतं ते आचार व विचारांच्या अद्वैतामुळे. हाकेसरशी पाच-दहा हजार माणसं जमवायची हिंमत असणारे एनडी म्हणून ‘नॉन डिस्पुटेबर पर्सन’ म्हणून सर्वपरिचित आहेत.

प्रा. एन. डी. पाटील यांचं नि रयत शिक्षण संस्थेचं अतूट असं नातं आहे. प्रथम विद्यार्थी नंतर शिक्षक, सदस्य, कार्यकारी सदस्य, आजीव सेवक, पदाधिकारी व अध्यक्ष अशा अनेक विणीतून रयतशी असलेलं त्यांचे संबंध दृढ होत गेले. पण आपली नाळ कायम रयतेशी जोडून ठेवली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांची मृत्यूपूर्व अंतिम इच्छा म्हणून रयत शिक्षण संस्थेने त्यांना सभासदत्व बहाल केलं. शिक्षणाच्या क्षेत्रात अध्यापन, प्रशिक्षण, लेखन अशा त्रिवीध मार्गांनी त्यांनी आपली छाप उमटवली. विद्यापीठीय व्यवस्थापनात सिनेट सदस्य, सल्लागार, तज्ज्ञ, कार्यकारी सदस्य, अधिष्ठाता म्हणून केलेल्या कार्याची लोक आजही आठवण काढत असतात.

रयत शिक्षण संस्थेचा एक चेहरा एन. डी. पाटील यांनी अनेक उपक्रमांतून जपला, जोपासला. आपण कधीकाळी वंचित होतो याचं भान ठेवत ते सतत ‘उपेक्षिकांसाठी शिक्षण’ ध्यास ठेवून योजना आखतात. त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालय उघडायला, शिक्षणाचा बाजार मांडायला रयतेतही विरोध केला. त्यापेक्षा त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करणं पसंत केलं. महाग शिक्षण घेऊन नोकरीस महाग होणारी सुशिक्षित बेरोजगारांची पलटण तयार करणारे कारखाने त्यांनी सुरू केले नाहीत. पब्लिक स्कूल धर्तीची शिक्षण केंद्रं सुरू करण्याऐवजी त्यांनी आश्रमशाळा उभारल्या. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी साखरशाळेचं त्यांनी जाळं उभा केलं. नापासांची शाळा सुरू करून एनडींनी शिक्षण वंचितांसाठी ज्ञानोदय विद्यालय सुरू केलं. बहुजन विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू केली. स्पर्धा परीक्षा केंद्रांवर भर दिला. मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना राबवली. दुर्बल शाखांसाठी विकास निधी जमवला. महर्षी विठ्ठलभाई रामजी शिंदे अध्यासन सुरू करून विठ्ठल रामजी शिंदेंच्या उपेक्षेची भरपाई केली. आपल्या शिक्षण संस्थांच्या खऱ्या समृद्धीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी सुरू करून शैक्षणिक प्रकाशने रुजवली. डॉ. आंबेडकर प्रबोधिनी, समाजवादी प्रबोधिनी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती सर्वांच्या माध्यमातून त्यांनी पुरोगामी आचार, विचार रुजवला. त्यांच्या या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याची नोंद घेऊन त्यांना अनेक विद्यापीठांनी डी. लिट. पदवी बहाल केली. अनेक पुरस्कार त्यांना लाभले. असे असले तरी त्यांची अनेक स्वप्नं अद्याप पूर्ततेच्या प्रतीक्षेत आहेत. संकटग्रस्त अनाथांना अभय देणारं नंदनवन, गोकूळ त्यांना सुरू करायचं आहे. शासकीय अनुदानाशिवाय लोकवर्गणीतून ते चालवावं अशी त्यांची जिद्द त्यांच्या भविष्यलक्ष्यी वृत्तीचं प्रतीक होय.

एनडी यांच समग्र कार्य, कर्तृत्व, विचार म्हणजे भोगलेल्या दैन्य, दुःखांचं विधायक उदात्तीकरण होयं. एनडींचं मोठेपण यातच दिसतं की ते भूतकालिन भोगात स्मरणकातर न होता त्यातल्या वेदनांची विधायक, रचनात्मक, सर्जक फलश्रुती कशी होईल याचा त्यांना ध्यास असतो. म्हणून ते केवळ आक्रस्ताळी गरळ ओकत नाही राहात. ते रचनात्मक पर्यायाच्या शोधात असतात. आपल्या पूर्वसुरींबद्दल ते कृतज्ञपणे भरभरून बोलत राहतात. ही असते त्यांची ऋजुता. ते विरोधकांवर तोफ डागतात. त्यांना वैचारिकदृष्ट्या नेस्तनाबूत करतात. प्रस्थापितांजागी विस्थापित, वंचित, उपेक्षित आले पाहिजे म्हणून ते धोरणात्मक रचना करतात. मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद इ.ची घोषणा न करतात ते त्या विचारांनाच आपला आचारधर्म, आपली आचारसंहिता बनवून टाकतात. मूल्यांशी प्रतारणा होणार नाही अशी ते सतत खबरदारी घेतात. कार्यात घराणेशाही त्यांना पसंत नसते. गुणवत्ता हा यशप्राप्तीचा ते राजमार्ग मानतात. शिक्षणास ते धर्मादाय कार्य न मानता राष्ट्रासाठी केलेली भविष्यलक्ष्यी पेरणी, गुंतवणूक म्हणून ते स्वीकारतात. अल्पमतात असतानाही विचार निष्ठेच्या बळावर बहुसंख्यांकांवर कुरघोडी करायची निर्भयचा दाखवावी एनडींनीच.

विचार व आचारांची दरी रुंदावत असतानाच्या काळात त्यांच्या जीवन, कार्यांच ऐतिहासिक मूल्य आहे. समाज गुणग्राहक व्हायचा तर गुणगौरव अनिवार्य असतो. प्रा. एन. डी. पाटील यांचा होणारा प्रत्येक गौरव रया गेलेल्या रयतेत पुन्हा एकदा गतचैतन्य भरेल.

(मूळ लेख डॉ. सुनीलकुमार लवटे लिखित कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक; या पुस्तकातील असून प्रकाशक अक्षर दालन कोल्हापूर हे आहेत.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: