बाबासाहेब किंवा फुलेंनी आपल्या पत्नींची मूळ नावे तशीच ठेवली नाही म्हणून त्यांचे महानपण उणे समजणे वेडेपणाचे होईल. तसेच इतक्या थोर मंडळींच्या बायकांनी आपल्या नवऱ्याची नावे-आडनावे लावली हा अनुकरणीय आदर्श मानणेही बरोबर होणार नाही. या पूर्वसूरींच्या प्रति कृतज्ञ राहून त्यांच्या प्रयत्नांना आपण आपल्या काळात किती व कसे पुढे न्यायचे हे आपले आजचे व्यवधान असायला हवे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांच्या ‘गुंता आणि उकल’ या पुस्तकातील एक प्रकरण.. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांच्या ‘गुंता व उकल’ या पुस्तकातील एक प्रकरण..
फॉर्म बघून काऊंटरवरील बाई म्हणाल्या, “ह्या सुवर्णा भुजबळ तुमच्या कोण?”
“पत्नी. लिहिलंय तसं. मॅरेज सर्टिफिकेटही आहे.”
“आडनाव बदललं नाही?”
“नाही.”
“असं कसं?”
“माझी तयारी नव्हती. लहानपणासूनची ‘सुरेश सावंत’ ही ओळख लग्नानंतर अचानक बदलायची आणि ‘सुरेश भुजबळ’ करायचं, हे कसंतरीच वाटलं मला.”
मी दिलेल्या उत्तराने समोरच्या बाईंची मुद्रा चमत्कारिक झाली. त्यांना काय कळले ठाऊक नाही. त्यांचा प्रश्न माझ्या पत्नीच्या आडनाव न बदलण्याविषयी होता. तो मी मला लावून घेतला. अधिक काही न विचारता त्यांनी माझे काम मात्र केले.
..हा तसेच यासारखे प्रसंग स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेवेळी मी अनेकदा लिहिण्या-बोलण्यात नोंदवत असतो. ज्यांच्या बायकांची आडनावे लग्नानंतर बदललेली नाहीत त्या पुरुषांच्या वाट्याला असे प्रसंग अनेकदा येतात. त्यात त्रास असतो पण गमती अधिक. मात्र नावे न बदललेल्या बायकांच्या वाट्याला हरघडी व अनंत अडचणी. त्या खूपच त्रासदायक व वेदनादायकही. नात्यागोत्यात, नोकरीच्या ठिकाणी, सरकारी कामांत..जाईल तिथे येत असतात. एखाद्या बाईने घटस्फोटानंतर आपले मूळ माहेरचे आडनाव परत लावले तर तिचे लग्न झाले म्हणून काही जण चक्क अभिनंदन करतात. त्या बाईच्या दृष्टीने यात गंमत नसते. वेदना असते.
लग्नानंतर बाईचे नाव-किमान आडनाव बदलणे गृहीतच असते. आमच्या कॉलेजचे प्राचार्य आमच्या वर्गावर आले असताना एकदा गुलाबी मुद्रेने म्हणाले – ‘काय तुमच्या वर्गात आडनाव बदलण्याची मोहीम निघालीय असे कळतेय!’ हे ऐकून आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक गुलाबी झालो. आमच्या वर्गात मुलींची बहुसंख्या. प्रेमात पडलेल्यांचे प्रमाण आमच्या वर्गात थोडे जास्त होते हे खरे. तथापि, त्यातली लग्नापर्यंत (म्हणजे आडनाव बदलेपर्यंत) पोहोचलेली एखाद-दोनच. आमच्याकडे लग्नसमारंभात वधूला मंगळसूत्र घातल्यावर तिचे नवे नाव जाहीर करत तेही मला किशोरवयात एकदम रोमॅंटिक वाटे. स्वप्नरंजन सुरु होई. आपलीही कोणीतरी अशी पत्नी होईल. ती ‘आपली’ होईल. तिला आपण आपल्या आवडीचे नाव देऊ. आपले आडनाव ती लावेल..वगैरे वगैरे.
नव्या जाणीवा तयार झाल्यावर मात्र याची झीट येऊ लागली. ज्या नावाने लहानपणापासून आपल्याला ओळखले जाते. ज्या नावाशी आपले काही भावबंध तयार झालेले असतात ते मुलींनी लग्नानंतर अचानक बदलायचे? अगदी अन्यायकारक! माझ्या पत्नीमुळे मला ओळखू लागलेले लोक मला तिच्या आडनावाने हाक मारतात. मीही ओ देतो. त्यांची चूक दुरुस्त करायची खटपट करत नाही. आधीच्या स्वप्नरंजनाचे ते बहुधा परिमार्जन असते. त्यांनाच मग केव्हातरी कळते व मग ते सॉरी सॉरी म्हणतात. चळवळीत पडलेल्या आमची जाणीव बदलली तरी समाज काय त्या स्थितीला आलेला नव्हता. अजून आलेला नाही. त्यामुळे आमचे आडनाव न बदलण्याचे प्रयत्न हे अजूनही वैयक्तिकच असतात. ते वाढत चाललेत. त्याचा स्वीकारही वाढतोय. पण तो लक्षणीय म्हणावा असा नाही. आंतरजातीय-धर्मीय लग्नांचे प्रमाण लक्षणीय वाढते आहे. पण आडनाव तेच ठेवण्याची गती अजून मंद आहे. लग्ने सजातीय नसली तरी आडनावे बदलण्याचा परिपाठ सर्व जाती-धर्मांत सारखाच आहे. तो इथेही पाळला जातो.
मला झीट येते, आडनाव बदललेले सहन होत नाही, ते अगदी अन्यायकारक वाटते हे माझ्यापुरते किंवा अशा विचारापर्यंत आलेल्यांचे ठीक. पण काळाच्या आजच्या टप्प्यावरचा तो स्त्रीमुक्तीचा अपरिहार्य निकष मानायचा का? अशी आडनावे न बदलणारे पण व्यवहारात व वैयक्तिक जीवनात स्त्री-पुरुष नाते आदराने व संवेदनशीलतेने जपणारे, अशी आडनावे न बदलण्याचे स्वातंत्र्य मुलींना देणारे, त्यांच्या परजातीय जोडीदार निवडीचा सन्मान करणारे किंवा खळखळ न करता स्वीकार करणारे यांना स्त्रीमुक्तीच्या बाजूचे मानायचे की नाही?
समाजातील अशा सहृदयी मंडळींना ही सूट देता येईल. पण स्त्रीमुक्ती चळवळीतील किंवा एकूण परिवर्तनवादी चळवळीतील जाणत्या कार्यकर्त्या स्त्रियांना (आणि पुरुषांनाही त्यांच्या पत्नी-मुलींबाबतच्या व्यवहारासंबंधी) ही सूट देता येईल का? हल्ली एकूणच वैचारिक संभ्रमकाळात हे प्रश्न चळवळीतल्या समजल्या जाणाऱ्या सर्वांना पडतात असे नाही. पण एकेकाळी ते खूप धारदार असत व अंगावर येत.
स्त्री मुक्ती संघटनेच्या स्त्री-पुरुष समानता यात्रांमध्ये-विशेषतः विदर्भातल्या १९८६ च्या यात्रेत मी खूप तीव्रतेने हे अनुभवले. तुम्ही स्त्री मुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या आहात म्हणजे तुम्ही कुंकू लावता कामा नये, मंगळसूत्र घालता कामा नये, लग्नानंतर तुमची नावे-आडनावे बदललेली असता कामा नयेत हे मुद्दे तेथील चळवळीशी संबंधित तरुणांकडून आमच्यातल्या स्त्री कार्यकर्त्यांसमोर जाब विचारण्याच्या पद्धतीने ठेवले जात. आम्हालाही आमचे म्हणणे स्पष्ट करण्याचा त्यात हुकूम असे.
आमच्यातल्या पुढारी कार्यकर्त्यांपैकी काहीजणी त्यांच्या या निकषांवर पूर्ण उतरणाऱ्या तर काही जणी न उतरणाऱ्या होत्या. ‘स्त्री नाही देवी, स्त्री नाही दासी, स्त्री आहे माणूस’ या घोषणेतले माणूसपण स्त्रीला मिळावे, नवऱ्याच्या लाथा खायला लागू नयेत, मुलीचे मुलगी म्हणून शिक्षण थांबू नये, घरात मुलगी-मुलगा भेद होता कामा नये, नवऱ्याने सोडल्यावर बाई निराधार होऊ नये, लग्नात हुंडा दिला-घेतला जाऊ नये, बाईला मारहाण होत असेल तर ते नवरा-बायकोचे खाजगी भांडण म्हणून दुर्लक्ष न करता समाजाने त्यात हस्तक्षेप केला पाहिजे, समान कामाला समान वेतन हवे, कामाच्या जागी पाळणाघर हवे…’ यासारख्या बाबी आज प्राधान्याच्या आहेत. त्यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. कुंकू, मंगळसूत्र, आडनाव हे मुद्दे आज ऐरणीवरचे नाहीत. ते वैयक्तिक पातळीवर ज्याला जसे जमेल तसे त्यांनी अंमलात आणावे, असे या तप्त पुरोगामी कार्यकर्त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न करत असू. त्यातले काही यथावकाश आमच्याशी सहमत झाले. काही मतभेद राखून मित्र राहिले. काही फटकून दूर गेले.
त्यांची तीव्रता पुढारी कार्यकर्त्यांबद्दल अधिक होती. स्वतःला स्त्रीमुक्तीवाल्या म्हणवता, चळवळीचे पुढारीपण करता आणि तुमच्या कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र आणि नवऱ्याचे नाव-आडनाव या स्त्रीच्या स्वतंत्र अस्तित्वाला नाकारणारी गुलामीची चिन्हे कशी काय? त्यांना हे ढोंग वाटायचे. दुतोंडीपण वाटायचे.
…त्यांचे हे वाटणे अस्वाभाविक नव्हते. त्यांना ते प्रामाणिकपणे वाटत होते. त्यांना लक्षात येत नव्हती ती समाजाच्या बदलाची गती. त्यातले अंतर्विरोध. समग्रता. ही तरुण मुले ज्या गावांतून-कुटुंबांतून आलेली होती, खुद्द त्या त्यांच्या गावांत, कुटुंबांत त्यांचे हे म्हणणे कोणी समजून घेतले नसते. त्यांना ते प्रश्न आहेत हेही समजणे कठीण होते. या त्यांच्या कुटुंबांतून आलेल्या माणसांचा यात्रेत होणाऱ्या संघटनेच्या ‘मुलगी झाली हो’ आणि ‘हुंडा नको ग बाई’ या नाटकांना तुफान प्रतिसाद मिळत असे. मंचावरील नाटकातले विनोद, कारुण्य समोरच्या प्रेक्षकांच्या डोळ्यांतून उमटत-वाहत असे. कथावस्तूत काही सांस्कृतिक-आर्थिक फरक असले तरी त्यातील बाईपणाची वेदना त्यांना त्यांची वाटे. पुढारी कार्यकर्त्या असल्या तरी त्यांचेही कुटुंब असते. ते सांभाळून त्या चळवळीला वेळ देत असतात. कुटुंब त्यांना सहकार्य करत असते. त्यांचा स्वतःचा व कुटुंबातील इतरांचा जाणीवेचा थर एकच असतो असे नाही. कुटुंबात त्यांचा नव्या बदलासाठी संघर्ष असतो. या संघर्षात कुटुंबातले सगळेच कमी-अधिक बदलत असतात, तडजोडी करत असतात. पुढे जाणारा प्रवास सुकर नसतो. पुढे जाताना दोर तुटेल इतका ताणायचा नसतो. कुंकू, मंगळसूत्र, आडनाव हे महत्वाचे जरुर; पण मूलभूत महत्वाचे प्रश्न आज नाहीत, हे या पुरोगामी तरुणांना अशा संदर्भाने व खोलपणे समजून घेणे कठीण जात होते.
मी अलीकडेच कार्यकर्त्यांच्या एका गटात बोलताना मुद्दाम खोड काढली. म्हटले, ‘’महात्मा फुले स्त्रीमुक्ती चळवळीचे जनक. ‘मुलगी झाली हो’ नाटकात तर पहिलं नमन त्यांनाच केलं आहे. पण त्यांनी सावित्रीबाई फुलेंना मात्र आपलेच नाव व आडनाव लावले. …आणि बाबासाहेबांनी तरी काय केले. स्त्रीच्या गुलामीची संहिता असलेल्या मनुस्मृतीचे दहन करणारे, नवऱ्याला मित्र माना असे स्त्रियांना सांगणारे बाबासाहेब आपल्या पत्नीला आपलेच नाव व आडनाव लावतात. रमाईंचे सोडा. त्यांच्याशी बाबासाहेबांचे लग्न लवकर झाले. तेवढी समज त्या वयात नव्हती. पण माईसाहेबांबरोबर लग्न करताना ही चूक ते सुधारत का नाहीत? त्यावेळी तर बाबासाहेब घटना लिहीत होते. जगविख्यात विद्वान होते. माईसाहेबांचे ‘डॉ. शारदा कबीर’ हे मूळ नाव बदलून ‘डॉ. सविता भीमराव आंबेडकर’ असे ते ठेवतात. डॉक्टर बाई पण त्याही नवऱ्याच्या पुरुषीपणाला अशा शरण जातात. बाबासाहेब प्रेमाने त्यांना मूळ नावाने ‘शारू’ असेच म्हणत. पण अधिकृत नाव सविता आंबेडकर. बाबासाहेबही शेवटी पारंपरिक पुरुषासारखेच वागले ना?”
ऐकणाऱ्यांची गडबड होते. याचा कसा विचार करावा ते काही काळ कळत नाही. फुले किंवा बाबासाहेब इतर बाबतीत प्रगतीशील होते. पण नाव, आडनाव, कुंकू, मंगळसूत्र या बाबींत मात्र तसे मागासच होते असे कसे म्हणणार?
ऐकणाऱ्यांची अधिक परीक्षा न घेता मी मग ऐतिहासिकदृष्ट्या याकडे कसे बघायचे असते त्याची चर्चा केली. त्या काळात व त्या काळाने पुरवलेल्या संदर्भांत जेवढा पुढचा वेध घेता येणे शक्य आहे, तेवढा हे महामानव घेतच असतात. मुक्तीच्या कल्पना, निकष, संकेत विकसित होत असतात. ज्या काळाच्या टप्प्यावर ते होते, त्यावेळी त्यांनी काय केले व काय म्हटले यावरच त्यांचे मापन करायला हवे. शिवाजी महाराजांनी युनियन का काढली नाही, हा प्रश्न कारखाने-कामगार नसलेला तो काळ लक्षात न घेता विचारणे अयोग्य आहे. तसेच राजकीय हितसंबंध व राजघराणे लक्षात न घेता त्यांनी आठ बायका का केल्या, एकच का नाही, हाही प्रश्न अनैतिहासिक आहे. मानवाच्या प्रारंभीच्या काळातील टोळीजीवनात स्वैर संबंध ठेवणारे स्त्री-पुरुष हे आजच्या नैतिक संकेतांनी व्यभिचारी ठरवणे मूर्खपणाचे होईल. आपण काळाच्या पुढच्या टप्प्यावर आहोत. फुले, आंबेडकर आदिंनी पायाभरणी केलेल्या चबुतऱ्यावर आपण उभे आहोत. अधिक विकसित काळात आहोत. अशावेळी दृष्टिकोण, बदलाचे निकष व संकेतही प्रगत होत असतात. अर्थात ते आपोआप होत नाहीत. या महामानवांच्या व आपल्या काळादरम्यानचे अनेक ज्ञात-अज्ञात प्रयत्न व विचारांची पेरणी त्यामागे असते. अशावेळी बाबासाहेब किंवा फुलेंनी आपल्या पत्नींची मूळ नावे तशीच ठेवली नाही म्हणून त्यांचे महानपण उणे समजणे वेडेपणाचे होईल. तसेच इतक्या थोर मंडळींच्या बायकांनी आपल्या नवऱ्याची नावे-आडनावे लावली हा अनुकरणीय आदर्श मानणेही बरोबर होणार नाही. या पूर्वसूरींच्या प्रति कृतज्ञ राहून त्यांच्या प्रयत्नांना आपण आपल्या काळात किती व कसे पुढे न्यायचे हे आपले आजचे व्यवधान असायला हवे.
ज्या १९८६ च्या काळातल्या विरोधाचे मी वर्णन केले, तो विरोधही हवाहवासा वाटावा इतका संभ्रम व शैथिल्य किंवा मांद्य वैचारिक बाबतीत सभोवताली दाटून आलेले आहे. आम्हा चळवळीतील कार्यकर्त्यांच्या घरातलीही पुढची पिढी संमिश्र जाणीवांची आहे. आम्ही लग्न साधेपणाने केले म्हणून त्यांनी तसे करायला हवे असे नव्हे. साधेपणा हाही सापेक्ष असतो. आनंदासाठीच्या कृती व साधने हीही बदलती असू शकतात. पण आधुनिक जीवनशैली व लग्नातले विधी मात्र परंपरागत हे फ्यूजन म्हणजे नवनिर्मिती नक्की नव्हे. पुढे जातानाचा हा काहीतरी गोंधळ आहे. आधुनिकतेचे काही ताण, परात्मता जुन्यात आधार शोधायचा प्रयत्न करत असावी किंवा जगण्याची व्याख्या व उद्दिष्ट यांच्या स्पष्टतेचाही प्रश्न असावा.
मध्यमवर्गीय शिक्षित थरातील मुली मंगळसूत्राला किंमत देतात असे नाही. ते त्या नियमित घालतीलच असेही नाही. पण त्यांना ते हवे असते. वेगळ्या पद्धतीचे आधुनिक वगैरे. लग्नानंतर स्वतःचे नाव बदलत नाहीत. तशी सासरहूनही कोणी सूचना करत नाही. आडनावात वेगवेगळ्या तऱ्हा असतात. यातल्या काही आधीच्या पिढीतही सुरु झालेल्या आहेत. अलीकडे या मध्यमर्गीय शिक्षित थरात त्या वाढल्या आहेत. विवाहित अथवा बिनविवाहित स्त्री-पुरुषांच्या नावांच्या सध्याच्या एकूण रचना या अशा आहेतः
लग्नानंतर ‘स्वतःचे नाव + नवऱ्याचे नाव + नवऱ्याचे आडनाव’ ही पहिली व जुनी रीत. ती आजही प्रमुख रीत आहे. एक बदल पूर्वीच्या प्रगत विचारांच्या महिलांनी केला व आजच्या अनेक जणी तो अंमलात आणत आहेत तो म्हणजे आडनावे दोन लावणे-एक स्वतःचे व दुसरे नवऱ्याचे. आपली मूळ ओळख ठेवून सासरची ओळख दर्शवणे हा हेतू किंवा तडजोड त्यात असते. हा दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे, आपले मूळ नाव (स्वतःचे + वडिलांचे + वडिलांचे आडनाव) कायम ठेवण्याचा. यात स्त्रियांचे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राहते. मात्र त्यांच्या कुटुंबात मुलांना बहुधा वडिलांचेच नाव, आडनाव पारंपरिक पद्धतीने लावले जाते. त्या स्वतंत्र तरी त्यांच्यापासून झालेली मुले मात्र पित्याच्या मालकीची असा त्याचा अर्थ असतो. चौथा प्रकार, आडनावाजागी नवऱ्याचे नाव लावण्याचा. तो काहींना एकदम आधुनिक वाटतो. पण त्याचे कारण कळत नाही. नवऱ्याचे नाव आडनाव म्हणून लावणे म्हणजे त्याचे प्रभुत्व तत्त्वतः कबूल करणेच होय. बरे, अशी दोन शब्दांची नावे लावणाऱ्या मुलींचे नवरे तसे नाव लावताना (म्हणजे पहिले त्यांचे व आडनावाच्या जागी बायकोचे नाव) दिसत नाहीत. त्यांचे अस्तित्व स्वतंत्रच असते. बायकोचे मात्र त्यांच्यावर अवलंबून. पाचवा प्रकार ‘स्वतःचे नाव + आईचे नाव + वडिलांचे नाव’ हा. यात काही जण वडिलांचे नाव दोन क्रमांकावर व आईचे नाव तिसऱ्या क्रमांकावरही घेतात. इथे आडनाव नसते. नवऱ्याचे आडनाव लावणाऱ्या आयांच्या मुलांची आडनावे नवऱ्याचीच असतात. दोन आडनावे लावणाऱ्या आयांच्या मुलांची आडनावे दोन असत नाहीत. तिथे बापाचेच लावले जाते. पाचव्या प्रकारात मात्र पुढच्या पिढीतही तोच क्रम राहू शकतो. मूल + आई + वडिल. पितृप्रधानतेच्या दर्शनी ओळखीला इथे लगाम बसतो. ज्या आईने जन्म दिला ती केवळ साधनमात्र, खरा मालक बाप, या भूमिकेला नाकारुन आई व बाप या दोन्ही जन्मदात्यांना इथे समानतेने स्थान आहे. काहींनी वडिलांचे नाव नाकारलेले आहे. ते फक्त आईचेच लावतात. हा सहावा प्रकार. काहींनी मधल्या (बापाच्या) जागी आईचे व बापाच्या आडनावाजागी आईचे आडनाव लावलेले आढळते. हा सातवा प्रकार. तो धैर्याचा आहे. इतरांचे मधले नाव वडिलांचे असताना तिथे आईचे नाव असलेल्या मुलांना शाळेत त्यांच्या सोबत्यांकडून होणाऱ्या विचारणा त्रासदायक व न्यूनगंड तयार करणाऱ्या असतात. तर काहीजण ‘स्वतःचे + आईचे + वडिलांचे + वडिलांचे आडनाव’ अशीही रचना करतात. हा आठवा प्रकार. या आठव्या प्रकारात आईला किंमत दिली तरी आडनाव वडिलांचेच असल्याने पितृप्रधानतेला आव्हान मिळत नाही. त्यामुळे पाचवी म्हणजे ‘मूल + आई + वडिल’ ही किंवा ज्यांना काही कारणाने जन्मदात्या पुरुषाचा उल्लेख नाकारायचा/टाळायचा असेल त्यांची ‘मूल + आई’ ही सहावी पद्धत अधिक योग्य व स्त्रीमुक्तीच्या विकसित पुढच्या टप्प्याला अनुरुप अशी आहे. लग्नाचा व या पद्धतीच्या नावाच्या रचनेचा काही संबंध नाही. पती-पत्नींची आपापली नावे स्वतंत्र असतात. मुलांच्या नावात मात्र त्यांची नावे समान पातळीवर गुंफली जातात. यात व्यक्तीला महत्व मिळते. आडनावाने घराणे सूचित व्हायच्या (अनुषंगाने जात, धर्म या ओळखी जपणाऱ्या) सरंजामी प्रकाराला इथे आळा बसतो.
नव्या विचारांच्या अनेक मंडळींनी आपल्या जाणत्या वयात आपली पारंपरिक रचनेच्या नावाची ओळख रुढ झालेली असतानाही तत्त्व म्हणून वरील पितृप्रधानतेला नकार देणाऱ्या नावाच्या नव्या रचनेचा स्वीकार केलेला आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. तथापि, काहींना जुनी सर्वपरिचित ओळख बदलावी असे सध्या वाटत नाही. त्यास हरकत नाही. कारण आजच्या टप्प्यावरचा तो निकराचा मुद्दा नाही. मात्र आपल्या मुलांच्या बाबत जन्मतःच नावाची नवी प्रगत रचना (पाचवी किंवा सहावी) ते अंमलात आणू इच्छितात, हे स्वागतार्ह आहे. जे स्वतःची ओळख आज बदलू इच्छित नाहीत तसेच ज्यांची मुले मोठी आहेत व त्यांची नावे जुन्या पारंपरिक रीतीने लागलेली आहेत, अशांनी आपल्या मुलांना नव्या रचनेचा समज द्यायला हवा व त्यांच्या किंवा त्यांच्या पुढच्या पिढीबाबत असा निर्णय घेण्याची विनंती करायला हवी. तेवढे ते नक्की करु शकतात.
स्त्रीमुक्ती चळवळीच्या ऐतिहासिक विकासक्रमात नावातली स्त्रीमुक्ती हा अनिवार्य टप्पा आज नसला तरी अधिक प्रगत टप्प्यावर जाताना नावाची पारंपरिक पितृप्रधान रचना नाकारणे व नवी समानतेची रचना स्वीकारणे ही बाब स्त्रीमुक्तीला बळकटी आणणारीच आहे. ही नावातली स्त्रीमुक्ती आज ना उद्या व्हायलाच हवी.
गुंता आणि उकल
सुरेश सावंत
अक्षर प्रकाशन
पृष्ठेः २४३
मूल्यः २८० रु.
COMMENTS