‘मी अजून जिवंत आहे याची मला लाज वाटते…’

‘मी अजून जिवंत आहे याची मला लाज वाटते…’

“तुम्हाला भारतात फक्त हिंदूच राहावे असे वाटते आणि दुसरे कोणीही शिल्लकच राहू नये असे तुम्ही म्हणता,” ते म्हणाले. “तुम्हाला खरोखरच माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर कुणालाही हा माथेफिरूपणा करू न देणे हे तुमचे कर्तव्य आहे.”

हिंगणघाट पीडितेचा संघर्ष अखेर संपला
‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे कार्यालय बंद
म्यानमारमध्ये आँग सान सूकींच्या पक्षाला बहुमत

महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत आहे. वास्तवात मात्र जमातवादाचा कुरूप चेहरा एकामागोमाग एका घटनेमधून सतत डोके वर काढत आहे. गांधींना त्यांच्या मृत्यूपर्यंत याच समस्येबाबत सर्वाधिक चिंता वाटत होती आणि दिल्ली येथे २ ऑक्टोबर, १९४७ रोजी, भारताचे स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर केवळ दीड महिन्यांनंतरच्या त्यांच्या ७९ व्या वाढदिवशी झालेल्या प्रार्थनेच्या वेळी तीच चिंता त्यांना सतावत होती.

गांधी हेरिटेज पोर्टल यांनी ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या ‘द कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी, भाग ८९’ मधील या प्रार्थनेचा काही अंश द वायरने आपल्यासाठी आणला आहे.

आज माझा जन्मदिवस आहे…माझ्याकरिता आजचा दिवस सुतकाचा आहे. मी अजूनही जिवंत कसा याचे मला आश्चर्य आणि लाज वाटते. मी तोच माणूस आहे, ज्याच्या शब्दाला देशातले कोट्यवधी लोक मान देत होते. मात्र आज कोणीही माझे ऐकत नाही. तुम्हाला तुम्हाला भारतात फक्त हिंदूच राहावे असे वाटते आणि दुसरे कोणीही शिल्लकच राहू नये असे तुम्ही म्हणता. आत तुम्ही मुस्लिमांना मारून टाकू शकता; पण उद्या काय कराल?”

आत्ता आपल्यामध्ये काही मुस्लिमही आहेत, जे आपले आहेत. आपण त्यांना मारायला तयार असलो, तर आधीच मी सांगून ठेवतो की मला ते मान्य नाही. मी जेव्हापासून भारतात आलो आहे, तेव्हापासून मी सर्व समुदायांमधील सलोख्यासाठी काम करणे हेच माझे काम मानले आहे आणि जरी आपले धर्म वेगवेगळे असले तरी आपण सर्वांनी प्रेमाने, भावाभावांसारखे राहावे हीच माझी इच्छा आहे. पण आज आपण एकमेकांचे शत्रू झालो आहोत असे वाटते. आपण ठामपणे म्हणू लागलो आहोत, की प्रामाणिक मुस्लिम मनुष्य असूच शकत नाही, सगळे मुस्लिम नालायक आहेत.

अशा परिस्थितीत, भारतात माझे स्थान काय उरले, आणि मी जिवंत असण्यामध्ये काय अर्थ उरला? मी १२५ वर्षे जगण्याचा विचार सोडून दिला आहे. मी १०० किंवा ९० वर्षांबद्दलही विचार करणे थांबवले आहे. मी आज माझ्या ७९ व्या वर्षात पदार्पण करत आहे, पण तेही मला वेदनादायीच आहे. मला समजू शकणाऱ्या – आणि असे अनेकजण आहेत – सर्वांना मी सांगतो, आपण असले पशुत्व सोडून दिले पाहिजे.

मुस्लिम पाकिस्तानात काय करतात याबाबत मी चिंता करत नाही. हिंदूंना मारून मुस्लिम फार थोर बनत नाहीत; तेसुद्धा जनावरच बनत आहेत. पण मग त्याचा अर्थ मीही तसेच जनावर बनावे, क्रूर, असंवेदनशील बनावे? मी ठामपणे याचा विरोध करतो आणि तुम्हीही असे काहीही करू नका असे सांगतो.

तुम्हाला खरोखरच माझा जन्मदिवस साजरा करायचा असेल तर कुणालाही असा माथेफिरूपणा करू न देणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि तुमच्या हृदयात राग असेल तर तो काढून टाका… तुम्हाला एवढे लक्षात राहिले तरी ती तुमच्याकडून घडलेली एक चांगली कृती आहे असे मी मानतो. एवढेच मला तुम्हाला सांगायचे आहे!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0