गांधी माझा…!

गांधी माझा…!

गांधी समजून घेताना…- म. गांधी यांची मानवी जीवनाला समजून घेणारी सत्य व अहिंसावादी विचारसरणी अनेकांना आकर्षून घेणारी आहे. त्यांचे साधे जगणे हाच एक विश्वशांतीचा संदेश आहे. या संदेशाकडे आकर्षून अनेकांनी म. गांधी यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक जण म. गांधींच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न आपल्या जीवन प्रवासात करत आहेत. अशा काही वाचकांचे गांधी समजून घेतानाचे काही निवडक अनुभव आम्ही म. गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध करणार आहोत. त्यापैकी हा एक लेख…

मुलीच्या शिक्षणाचे लॉकडाऊन होऊ नये म्हणून….
बॅ.नाथ पै: एक मनोज्ञदर्शन
त्रिपुरा मुस्लिमविरोधी हिंसाचार: सत्यशोधन पथकातील दोघांवर गुन्हे

कधी कधी मी माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींचा, घडलेल्या अनेक बाबींचा विचार करतो. त्या व्यक्तीचे, घटनांचे माझे आयुष्य घडवण्यात, विचारांना दिशा देण्यात असलेले योगदान मापण्याचा तोकडा प्रयत्न करतो. तोकडा यासाठी, की काही व्यक्ती, काही घटना इतक्या भव्य, इतक्या उदात्त असतात, की त्यांना कवेत घेणे आपल्या कुवतीबाहेरचे काम असते. त्या कितीही समजल्या असे आपल्याला वाटले, तरी त्या अनाकलनीयच राहतात! माझ्या जीवनाला वळण देणाऱ्या, आयुष्य घडवणाऱ्या अशा व्यक्तींची यादी करायला घेतली, तर त्यात महात्मा गांधीजींचे नाव अगदी शीर्षस्थानी असेल!

गांधी नावाचा हा माणूस माझ्या आयुष्यात मी अगदी लहान असतानाच आला. या बाबतीत मी स्वतःला खूपच सुदैवी समजतो. माझे काही समविचारी मित्र आहेत. त्यातील काहीजण आधी गांधीजींचा द्वेष करायचे, त्यांना शिव्या घालायचे. नंतर ते गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांच्या मार्गाकडे वळले. माझ्या बाबतीत असे काही घडले नाही. गांधीजींचा द्वेष करण्याची ‘फेज’ माझ्या आयुष्यात कधी आलीच नाही. जसे थोडेफार कळायला लागले, तसे माझे अन् बापूंचे सूर जुळले ते आजतागायत कायम आहेत. आजही बापू मला अनेक प्रसंगी मार्ग दाखवतात, मी काही चुकीचे करत असेल तर ते लगेच मला कानाला पकडून योग्य मार्गावर आणून सोडतात. अनेकदा तारुण्यसुलभ स्वभावाला धरून मी भरकटते, त्यांच्यावर चिडतो, ओरडतो, त्यांच्यावर रुसतो. पण प्रत्येकवेळी ते मला शांत करतातच. त्यांच्याकडे कसली जादू आहे तेच जाणोत!

मला तो प्रसंग अजून आठवतोय. मी तेव्हा दुसरी-तिसरीत असेल. आम्हाला मराठीच्या पुस्तकात गांधीजींच्या ‘सत्याचे प्रयोग’मधील एक उतारा अभ्यासासाठी होता. त्यात गांधीजींनी कसे दृढनिश्चयाने गीतेचे ७०० श्लोक पाठ केले, याचे वर्णन होते. तो पाठ मला इतका आवडला, तो मी इतक्यांदा वाचला, की तो माझा तोंडपाठ झाला. शाळेत १५ ऑगस्टचा कार्यक्रम सुरू होता. पाहुणे मंडळींची, शिक्षकांची भाषणे चालू होती. एक वक्ते भाषण संपवून जागेवर बसले. मला एकाएकी काय झाले कोणास ठाऊक, मी जागेवरून उठलो आणि स्टेजवर गेलो. शिक्षकांना वाटले की हा पाणी पिण्यासाठी उठला असावा. पण मी ‘मला भाषण करायचंय, मला माईक द्या’ म्हणू लागलो. तोपर्यंत माझ्याएव्हढ्या छोट्या मुलाने आमच्या गावात कधी भाषण केले नव्हते. शिक्षकांनी काहीशा विस्मयाने व बऱ्याचशा कौतुकाने माझ्याकडे बघत माझ्या हाती माईक सोपवला. आणि मग काय? मी धडाधड तो पाठ असलेला गांधीजींचा उतारा म्हणून दाखवला! आज जेव्हा त्या घटनेकडे पाहतो, तेव्हा तो गांधीजींच्या विचारांचा माझ्या मनातील पहिला उत्कट आविष्कार असल्याचे जाणवते.

पुढे चालत जाऊन गांधीजी सतत मनात राहिले. गावात त्यांची पुस्तके, साहित्य उपलब्ध असण्याचा प्रश्नच नव्हता. जिथे रोजचे वर्तमानपत्र भेटणे कर्मकठीण, तिथे अशी अवांतर पुस्तकांची अपेक्षा करणे म्हणजे पापच होते. पण गांधीजी शांत बसणारे नव्हते. ते भेटत गेले शाळेतील इतिहासाच्या पुस्तकांमधून! भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास शिकणे मला खूप आवडायचे आणि आजही आवडते. तेव्हा गांधीयन तत्वे, त्यांची शिकवण, विचारधारा यांच्याशी अगदी नगण्य ओळख होती, नव्हती म्हटले तरी चालेल. पण अशा इतिहासामधून गांधीजींची एक प्रतिमा मनात तयार होत गेली. गांधी हा माणूस खास आहे, वेगळा आहे हे जाणवू लागले. त्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्याचे देशावर अनंत उपकार आहेत हेही समजू लागले. स्वातंत्र्यदिनाच्या प्रभातफेरीत ‘महात्मा गांधी की जय’, ‘एक रुपया चांदीचा, सारा देश गांधींचा!’ या घोषणा अधिक जोरकसपणे देऊ लागलो.

पुढे कॉलेजच्या निमित्ताने गावाच्या बाहेर शेजारच्या तालुक्याच्या गावी जाऊ लागलो. तेथे विविध गावांतील, अनेक घरांतील मुले, माणसे भेटू लागली. गांधीजींसारख्या माणसावरही टीका करणारी, त्यांचा द्वेष करणारी, त्यांना शिव्या घालणारी माणसेही असतात हे पहिल्यांदा कळले. कुणी गांधीजींविषयी भलतेसलते बोलू लागले की कसेसेच वाटे. अजूनही गांधीजींविषयी, त्यांच्या तत्वांविषयी, कार्याविषयी पुरेसे ज्ञान नव्हते, वाचन नव्हते. त्यामुळे अशा लोकांशी प्रतिवाद करू शकत नव्हतो. पण माझे बापू असे नाहीत याची अगदी मनापासून खात्री असायची. त्यामुळे समोरच्याचे ऐकून घेऊन सोडून द्यायचो, तो द्वेष, विखार कधी मनात घर करू शकला नाही.

माझ्या आयुष्यातील खरे गांधीपर्व सुरू झाले, ते नोकरी लागल्यावर! पगार मिळत होता. हातात थोडेसे का होईना, पैसे पडत होते. वाचनाची आवड पूर्वीपासून होतीच. आता अवांतर पुस्तके खरेदी करणे शक्य होऊ लागले. वाचनाच्या कक्षा रुंदावू लागल्या. सोबतीला स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही सुरू होता. एमपीएससीचा अभ्यासक्रम खूप छान आहे. तो जर तुम्ही केवळ परीक्षेपुरता, त्याच दृष्टीने न अभ्यासता अगदी मनापासून, त्याचे रसग्रहण करीत केला, तर त्यामुळे तुम्हाला परीक्षेत यश मिळो वा न मिळो; पण तो तुम्हाला नक्कीच एक चांगला, विचारशील, विवेकी माणूस बनवतो. याच अभ्यासाने मला तत्कालीन भारतातील विविध व्यक्ती, विविध वैचारिक प्रवाह, त्यांचे गुण-दोष यांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. गांधीजींचे महत्त्व अधिकच अधोरेखित होऊ लागले.

यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे हातात पैसा येऊ लागला. त्यातून स्मार्टफोन खरेदी केला. सोशल मीडियाशी जोडला गेलो. विशेषतः फेसबुक हे माझ्यासाठी विविध विचारांचे भांडार ठरले. येथे अनेक अभ्यासू माणसांशी ओळखी झाल्या. त्यांचे विश्लेषणात्मक लेख वाचायला मिळू लागले. याच सुमारास आज माझे चांगले मित्र असलेले संकेत मुनोत व त्यांनी सुरू केलेला ‘नोइंग गांधीझम’ समूह यांच्याशी परिचय झाला व तो या सगळ्या प्रवासातील मैलाचा दगड ठरला. ही सारी तरुण मंडळीही गांधीजींच्या विचारांनी झपाटलेली होती. त्यांचे विचार आचरणात आणण्याचा, त्यांचा प्रसार करण्याचा, गांधीजींविषयीचे विविध गैरसमज दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न करत होती. या समूहाकडून अनेक उपक्रम, जसे की, व्याख्याने, चर्चा, गेट टुगेदर, विविध प्रसंगी फिल्ड वर्क इ. राबविले जातात. मला या सगळ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायला कधी जमले नाही. याला अनेक कारणे आहेत. त्यात माझा अंतर्मुख स्वभाव, शारीरिक मर्यादा इ. प्रमुख आहेत. पण तरीही या सगळ्या प्रयत्नांत आपला खारीचा वाटा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो. या सगळ्यांच्या सहवासामुळे माझ्या विचारसरणीचे विविध पैलू घडत गेले. विचार परिपक्व होऊ लागले. जगाकडे, त्यातील घटनांकडे पाहण्याची एक व्यापक व विवेकी दृष्टी विकसित होऊ लागली. सर्वांविषयी प्रेम, शांततेचे आकर्षण, साध्या राहणीकडे कल, संतुलित विचार करण्याची क्षमता, भेदभावांविषयी व अन्यायाविषयी चीड ही मूल्ये आत्मसात होऊ लागली. या बाबतीत आज मी अशा टप्प्यावर आहे, की जिथून सर्व मानव एकच दिसतात, भेदभावांच्या भिंती निरर्थक वाटू लागतात, निरर्थक रुढींमधील फोलपणा दिसू लागतो. नुसत्या विचारांइतकेच, किंबहुना त्याहूनही जास्त त्या विचारांचे प्रत्यक्ष जीवनातील आचरण महत्त्वाचे आहे हे पटते. हे सगळे मला समजते. ते अमलात आणण्याचे धैर्यही हळूहळू येत आहे,पण ते दुसऱ्यांपर्यंत पोचवण्याचे, त्यांच्या गळी उतरवण्याचे कौशल्य मात्र अजून फारसे विकसित झालेले नाही.

गांधीजींची तत्वे सांगणारे, त्यांच्या शिकवणुकीचा सार असणारे मला आत्तापर्यंत सर्वात जास्त आवडलेले पुस्तक म्हणजे ‘मंगल प्रभात’ होय! या पुस्तकाची मी आत्तापर्यंत तीन-चार पारायणे केली आहेत. गांधीजींनी सांगितलेली ‘एकादश व्रते’ त्यांनीच या पुस्तकात अगदी बारीकसारीक विवेचनासह स्पष्ट केली आहेत. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात वेळोवेळी अनेक महान तत्त्वांचे प्रतिपादन केले. त्यांनी वेळोवेळी सांगितलेली सर्व प्रमुख तत्वे ‘एकादश व्रते’ यात समाविष्ट आहेत. ‘एकादश व्रतां’त सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, अस्वाद, निर्भयता, स्पर्शभावना, सर्वधर्म समभाव व स्वदेशी यांचा समावेश होतो. याशिवायही त्यांनी व्रतांचे पालन करण्यासाठीचा निग्रह, दृढनिश्चय, स्वावलंबन, सेवावृत्ती, स्वयंपूर्णता, अन्यायाला विरोध इ. अनेक तत्त्वे सांगितली आहेत. खरे तर ही तत्वे भारतीय संस्कृतीत खूप प्राचीन काळापासून अस्तित्वात होती, पण गांधीजींनी त्यांना एक सुसंगत रूप दिले व त्यांचे विविध बारकावे सांगितले. म्हणून या सर्वांना आपण सोयीसाठी गांधीविचार असे म्हणूया.

आता या गांधीविचारांचा मी माझ्या प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याचा कसा प्रयत्न करतो, हे थोडक्यात स्पष्ट करतो. येथे एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो, की हे सर्व मी माझी बढाई मारण्यासाठी किंवा मोठेपण मिरवण्याची सांगत नसून मी नेमका कोठे उभा आहे, मला कोणत्या सुधारणांची आवश्यकता आहे हे माझ्या लक्षात येण्यासाठी करीत आहे. त्यातून इतरांना काही मिळाले, काही फायदा झाला, तर मला आनंदच होईल.

सत्य आणि अहिंसा ही गांधीजींची सर्वात महत्त्वाची व तितकीच प्रसिद्धी पावलेली तत्वे. अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याची हिंसा करणे नव्हे, तर तिला यापेक्षाही अनेक विविधार्थी पदर आहेत. मी स्वतः शाकाहारी आहे. तसेच इतर प्राण्यांना कोणत्याही कारणाने मारण्याआधी किंवा इजा पोचवण्याआधी अनेकदा विचार करतो. पण ही अहिंसेची ढोबळ व्याख्या झाली. सूक्ष्मार्थाने अहिंसेचे पालन करण्याचा मी प्रयत्न करतो. म्हणजे दुसऱ्यांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक वेदना होणार नाही याची काळजी घेतो. अर्थात ते मला अजून पूर्णपणे साधत नाही. माझ्या बोलण्यातून किंवा कृतींतून इतरांना काही त्रास होत असेल तर त्याची जाणीव मात्र होते आणि मनाला वेदनाही होतात. हे मी योग्य मार्गावर असल्याचे लक्षण आहे असे मी मानतो. मी शक्यतो दुसऱ्यांविषयी काही निर्णय घेताना किंवा दुसऱ्याशी बोलताना-वागताना त्यांच्या जागेवर मला स्वतःला ठेऊन पाहतो. त्यामुळे आपल्या हातून दुसऱ्यांना दुखावण्याची शक्यता कमी होते.

सत्य म्हणजे खरे बोलणे व वागणे. आता रोजच्या व्यवहारात पूर्णपणे सत्य वर्तन मला साधत नाही. अनेकदा परिस्थितीवश किंवा प्रसंगवश खोटे बोलण्यात येते. तरीही जेवढे जास्त शक्य होईल, तेवढे सत्य वागण्याचा मी प्रयत्न करतो. विनाकारण आपल्याकडून खोटे बोलले जाणार नाही, याची काळजी घेतो. खोटे बोलण्याचे नैतिक दुष्परिणाम तर आहेतच, पण व्यवहारातही त्याचे अनेक तोटे आहेत. खोटे बोलून कधीकधी आपला तात्कालिक फायदा होत असेलही, पण एक खोटे शंभर खोट्यांना जन्म देते याची मला जाणीव आहे. रोजच्या वागण्यातही काही बारीकसारीक गोष्टींची मी काळजी घेतो. जसे की, समजा आपण एखाद्याला म्हटले, की थांब मी दहा मिनिटांत आलोच, तर ती दहा मिनिटांनी मर्यादा पाळण्याचा प्रयत्न करणे, एखाद्याला काही करण्याविषयीचे दिलेले आश्वासन कसे पूर्ण करता येतील हे पाहणे इ. या गोष्टी दिसताना छोट्या दिसतात, पण त्या आपल्या स्वभावाला एक वळण देतात.

अस्तेय म्हणजे चोरी न करणे. यात प्रत्यक्ष चोरी करण्याचे मी टाळतोच, पण दुसऱ्याच्या हक्काची एखादी गोष्ट बळकावणे, व्यवसायात खोटी वजनेमापे वापरणे, एखाद्यकडून अनावधानाने जास्त पैसे मिळाले, तर ते ठेऊन घेणे हेही टाळतो. तरुण वयाचा परिणाम म्हणून काही भावना या स्वाभाविक असल्या, त्यांमुळे अनेकदा माझे मन भलत्याच गोष्टींकडे भरकटत असले, विविध आकर्षणांना व तारुण्यसुलभ भावनांना बळी पडून तिकडे धाव घेऊ पाहत असले तरी त्यामुळे माझे मन व चारित्र्य मलिन होणार नाही याची मी शक्य तेवढी काळजी घेतो. अपरिग्रहाच्या बाबतीत खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला खूप संपत्ती मिळवायची आहे, श्रीमंत व्हायचे आहे, पैशांच्या जोरावर लोकांवर सत्ता गाजवायची आहे, या भावनांवर मी नियंत्रण मिळवू शकलो नाही. तरीही त्यातल्या त्यात माझ्या गरजा कमीत कमी कशा ठेवता येतील, राहणीमान साधे कसे राखता येईल, किमान साधनांचा उपयोग करणे या गोष्टींचा मी प्रयत्न करतो.

बँकेतल्या नोकरीमुळे शरीरश्रमास वाव मिळत नाही. तसेच मला अल्पदृष्टीचा त्रास असल्याने शरीरश्रम करण्यावर अनेक मर्यादा येतात. तरीही जेव्हा शरीरश्रम करण्याची संधी मिळेल, तेव्हा तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.

गांधीजींच्या सर्व तत्वांत मला सर्वात जास्त आवडलेले तत्व म्हणजे आस्वाद. आस्वाद म्हणजे कोणत्याही गोष्टीचा-अन्न, कपडे व इतर गोष्टी- केवळ इंद्रियसुखांसाठी रसास्वाद न घेणे, तर त्या केवळ शरीराचे भरणपोषण व संरक्षण करण्याच्या दृष्टीने वापरणे. मी शक्यतो जेवण करताना चव थोडी कमीजास्त झाली तरी तक्रार करण्याचे टाळतो. ताटात जे काही येईल, ते गोड मानून खातो. पण अजूनही काही थोडे पदार्थ मी खाऊ शकत नाही. कपड्यांच्या बाबतीतही तसेच. आस्वाद हे तत्व प्रभावीपणे अमलात आणता आले, की इतर तत्वांचे पालन करणे सोपे होते, असे गांधीजीनी एके ठिकाणी म्हटले आहे. निर्भयतेच्या बाबतीतही मी थोडीफार प्रगती केली आहे. निरर्थक गोष्टींची, उदा. भूत, देवाचा कोप, अंधार, विविध प्राणी यांची भीती मनातून काढून टाकण्यात मी मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो आहे असे मला वाटते. अन्यायाच्या विरोधात कोणाविरुद्ध निर्भयपणे उभे राहण्यास मात्र मन अजूनही कचरते.

स्वावलंबन व स्वयंपूर्णता साध्य करण्यास पुन्हा माझे अपंगत्व आड येते, पण त्यावर मात करून जास्तीत जास्त स्वावलंबी होण्याचा, स्वतःच्या गोष्टी स्वतःच करण्यास शिकण्याचा, दुसऱ्यावरील अवलंबित्व कमी करण्याचा माझा प्रयत्न असतोच. निश्चयाचा बाबतीतही एखादी गोष्ट विचारांती ठरवली, तर ती कशी पूर्ण करता येईल यासाठी माझे प्रयत्न असतात. पण अनेक गोष्टींत मी निश्चय पार पाडू शकलो नाही, जसे की सकाळी लवकर उठणे, चालायला जाणे, व्यायाम इ. कदाचित माझ्यातील आळस यात आडवा येत असावा! गांधीजींचा एक गुण म्हणजे वक्तशीरपणा व वेळेचे नियोजन. उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त प्रभावी व उत्पादक वापर कसा करता येईल यासाठी नियोजनाची कला व त्याच्या जोडीला आत्मनियंत्रण पाहिजे. हे साध्य करण्याचाही माझा प्रयत्न आहे.

स्पर्शभावना म्हणजे अस्पृश्यता न मानणे. मी अलीकडे कुणालाही त्याची जात विचारत नाही. जरी एखाद्याची माहीत पडली तरी त्यामुळे त्याच्याशी माझ्या व्यवहारात फरक पडत नाही. आज मी येथपर्यंत पोचलो आहे, की खाण्याच्या बाबतीत जातीचा विचार मनाला शिवत तर नाहीच, शिवाय आता जेव्हा आयुष्याचा जोडीदार निवडण्याची वेळ येऊन ठेपली आहे, तेव्हाही जात हा फॅक्टर माझ्या मनापूरता तरी आड येईल असे मला वाटत नाही. पण माझा हा दृष्टिकोन माझ्या आपल्या माणसांना मी कितपत समजावून सांगू शकेल? असो! पूर्णपणे जातमुक्त होण्यासाठी मात्र खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. सर्वधर्म समभावाच्या बाबतीतही तसेच. कोणत्याही धर्माच्या लोकांबद्दल व त्यांच्या धर्माबद्दल माझ्या मनात द्वेष नाही हे मी माझे भाग्य समजतो. स्वदेशीचे पालन आज कसे करता येईल, याबाबत मला विचार करायचा आहे. महात्मा गांधींची वृत्ती अतिशय सेवाभावी होती. त्यांच्या मार्गावर चालताना मी शक्य होईल तेवढी इतरांची विशेषतः दुर्बलांची, गरजू लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. गांधीजी असे म्हणत असत, की एखादी गोष्ट मी म्हणतो म्हणून स्वीकारू नका, तर ती तुमच्या बुद्धीला पटली, तरच स्वीकारा. येथे ते चिकित्सक वृत्तीचा पुरस्कार करतात. मी माझ्या विचारसरणीला चिकित्सेची सवय लावण्याचा प्रयत्न करत आहे.

या विवेचनावरून गांधीविचारांचा माझ्या जीवनात उपयोग करण्याचा मी कसा प्रयत्न करतो, याची कल्पना आली असेल. माझी आपणास विनंती आहे, की हे वाचल्यानंतर मला कृपया कोणी थोर व्यक्ती किंवा साधक समजण्याची चूक करू नका. मी अगदी सामान्यातील सामान्य व्यक्ती असून अनेक चुकांचा व दोषांचा मूर्तिमंत पुतळा आहे. गांधीविचारांचे पालन करण्याच्या बाबतीत मी अजूनही अगदी प्राथमिक अवस्थेत वा पहिल्या पायरीवर आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी आणि गांधीजींचा केवळ जयजयकार न करता त्यांचा एक सच्चा अनुयायी बनण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असतील हे मात्र नक्की!

या लेखाचा शेवट करण्यापूर्वी गांधीविचारांचा मी कितपत अंगीकार करू शकलो, यासंदर्भात स्वतःच्या विचार व वर्तनाचे निरीक्षण करीत असताना अलीकडील तीन अतिशय छोट्या घटनांची मला नोंद घ्यावीशी वाटते.

एक

माझी महात्मा गांधीजींचे ‘मंगल प्रभात’ व विनोबांचे ‘मधुकर’ वाचण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. तसे मी ‘मंगल प्रभात’ मागे एकदोनदा वाचले होते, पण पुन्हा एकदा बारकाईने वाचावे असे वाटत होते. इंटरनेटवर थोडे शोधल्यावर या दोन्ही पुस्तकांची पीडीएफ मला मिळाली. पण मला डोळ्यांच्या त्रासामुळे पीडीएफपेक्षा हार्ड कॉपी वाचणे सोईचे जाते. पण या पीडीएफची प्रिंट कशी काढायची? बँकेत माझ्या टेबलवर एक प्रिंटर ठेवलेले आहे. त्याचा वापर करून प्रिंट काढायची का? तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीप्रमाणे आपल्या ताब्यातील बँकेच्या मालमत्तेचा वैयक्तिक किरकोळ कामांसाठी वापर करणे सामान्य बाब आहे. मागे मीही बँकेच्या प्रिंटरवरून काही वैयक्तिक प्रिंट्स काढल्या आहेत. पण यावेळी बँकेच्या संपत्तीचा परवानगीशिवाय असा फायदा घेणे योग्य वाटले नाही. मग माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी का? मग विचार केला, माझ्या रोजच्या संबंधांमुळे म्हणा, किंवा कामासाठी मला खुश ठेवण्याकरिता म्हणा, वरिष्ठ परवानगी तर देतीलच. पण असा बँकेच्या संपत्तीचा फायदा घेणे योग्य नाही. बँकेने प्रिंटर बँकेच्या कामासाठी दिला आहे,माझ्या खाजगी कामासाठी नाही. शेवटी त्यावरून प्रिंट्स काढण्याचा विचार सोडून दिला व नेटवर अजून थोडे शोधकार्य करून दोन्ही पुस्तके विकत मागवली.

दोन

मागे माझे एक ट्रेनिंग होते व ट्रेनिंगनंतर त्यावर आधारित एक परीक्षा होती. परीक्षेदरम्यान एका मुद्द्यावर मला संभ्रम निर्माण झाला. त्या मुद्द्यावर पाच-सहा मार्कांचे प्रश्न आले होते. तो मुद्दा माझ्या शेजाऱ्याला विचारून स्पष्ट करून घेणे मला शक्य होते. पण माझ्या मनाने तसे करण्यास मनाई केली! असे करून मी माझे मलाच फसवतोय याची जाणीव झाली. बाकी सोडवलेल्या प्रश्नांवरून पास होण्याची खात्री होतीच. असे विचारणे मी टाळले.

तीन

याच ट्रेनिंगमध्ये आम्हाला वर्गात नोट्स काढण्यासाठी एक वही दिली होती. पण मी मला घरच्या दुसऱ्या विषयांच्या अभ्यासाच्या नोट्स काढण्यासाठी उपयोगी पडेल या हिशेबाने त्या वहीवर वर्गात काहीही न लिहिता ती वही तशीच कोरी घरी आणली.

वरील तीनही घटना तशा अगदी क्षुल्लक! त्यांची दखल घेण्याचे वा त्यांच्याविषयी लिहिण्याचेही खरे तर काही कारण नाही. पण घटना क्र. एक व दोनमध्ये मी माझ्या मनाला भटकण्यापासून व चुकीचे कृत्य करण्यापासून परावृत्त करू शकलो ह्याचे मला समाधान वाटते. तरीही मुळात असे चुकीचे वर्तन करण्याचे विचारच मनात कसे आले? चुकीचे कृत्य करण्याची प्रेरणा मनात उत्पन्न होण्याचे रोखण्यापर्यंत मजल मारायची आहे. दुसरे म्हणजे, घटना क्र दोनमध्ये जर मला बाकीच्या प्रश्नांवरून पास होण्याची खात्री वाटत नसती तर मी शेजाऱ्यांनी मदत घेतली असती का? आता घटना क्र तीनच्या संदर्भात : ती वही बँकेने मला वापरण्यासाठी दिली होती व ती नंतर घरी घेऊन जाण्याचीही परवानगी होती. पण तिच्यात मी वर्गात शिकवत असलेल्या विषयांवर नोट्स काढणे अपेक्षित होते. मी ती वही बँकेशी संबंधित नसणाऱ्या दुसऱ्याच विषयाच्या नोट्ससाठी घरी आणली. एखादी वस्तू आपल्याला ज्या कामासाठी वापरण्यास दिली आहे, त्याव्यतिरिक्त दुसऱ्याच उद्देशासाठी ती वापरणे ही चोरीचा होय असे गांधीजी ‘मंगल प्रभात’मध्ये म्हणतात. या न्यायाने माझे हे वर्तन चोरी म्हणूनच गणले पाहिजे. त्यासाठी बँक मला शिक्षा करणार नाही, पण नैतिक दृष्टीने ते वर्तन चुकीचेच होते.

शेवटी मी एवढेच म्हणेन, की गांधी ही केवळ एक व्यक्ती नसून ती एक प्रवृत्ती आहे, विचारधारा आहे. ती संपूर्ण जगाला, मानवी वर्तनाच्या विविध पैलूंना व्यापून अंगुळभर उरलीच आहे! गांधीजींना लौकिकार्थाने या जगातून जाऊन ७२ वर्षे झाली. त्यांचे कित्येक विचार, त्यांनी मांडलेली तत्वे एक शतकांहूनही अधिक जुनी आहेत. पण आजही ती तितकीच, किंवा त्याहूनही जास्त कालसुसंगत आहेत.

‘ही पृथ्वी प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकते,पण कुणाचीही हाव पूर्ण करू शकत नाही’, हे त्यांचे वाक्य वानगीदाखल घ्या. आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात ते किती कालसुसंगत व मार्गदर्शक आहे हे पदोपदी जाणवतेच की नाही? तसेच इतरही बाबतीत दिसून येईल. गांधी त्यांच्या विचारांचा रूपाने आजही जिवंत आहे, हातात दीप घेऊन आपल्याला दिशा दाखवतो आहे. आता त्याने दाखवलेल्या प्रकाशात त्याच्या मार्गावर चालून हे जग अधिक प्रकाशमान करायचे की नाही हे आपणच ठरवायचे आहे!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0