मुंबईः आरोग्य भरती, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटी प्रकरणात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना
मुंबईः आरोग्य भरती, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपर फुटी प्रकरणात शुक्रवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली. सुपे यांच्या अटकेमुळे या पेपरफुटीमध्ये खुद्ध आरोग्य व शिक्षण खात्याचेच वरिष्ठ अधिकारी सामील असल्याचे दिसून आले.
राज्य शासनाने टीईटी पेपर फुटी प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी समिती स्थापन केली आहे.
या पेपरफुटीबाबत पुणे पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत आरोग्य भरती परीक्षा, म्हाडा परीक्षा घोटाळ्याचा तपास करताना शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फुटीचे धागेदोरे लागल्याचे पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. या पेपरफुटी संदर्भात पोलिसांनी आरोपींकडून ८८ लाख रु. गोळा केले असून सुमारे साडे चार कोटी रु.चा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत गुप्ता यांनी पेपरफुटीचा घटनाक्रम उलगडून दाखवला. ते म्हणाले, आरोग्य भरती परीक्षा घोटाळ्याचा तपास करताना म्हाडा परीक्षा गैरव्यवहाराची माहिती मिळाली. म्हाडा परीक्षा होण्याआधीच जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचे प्रीतीश देशमुख व अन्य दोघांना अटक केली होती. यातील देशमुख यांच्या घरझडतीत शिक्षक पात्रता परीक्षेचे एक हॉल तिकिट मिळाले. त्यातून या परीक्षांचेही पेपर फुटल्याचा संशय आला. त्यानंतर गुरुवारी पुणे सायबर पोलिसांनी पिंपरीत राहणारे राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना घरातून ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीतून शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीची माहिती मिळाली. त्यानंतर सुपे यांना शुक्रवारी अटक करण्यात आली.
‘कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही’
दरम्यान, टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पेपरफुटी प्रकरणावर दिली.
टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहाराबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्या नंतर वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे गायकवाड यांनी सांगितले.
COMMENTS