श्रीनगर : काही दिवसांपूर्वी पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्यास मुभा दिली असली तरी काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये फारसा उत्साह दिसत नसल्या
श्रीनगर : काही दिवसांपूर्वी पर्यटकांना काश्मीरमध्ये येण्यास मुभा दिली असली तरी काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये फारसा उत्साह दिसत नसल्याचे चित्र आहे.
ऑगस्टमध्ये जम्मू व काश्मीरचा विशेष दर्जा असलेले ३७० कलम रद्द केल्यापासून या केंद्रशासित प्रदेशात ७० दिवस अघोषित संचारबंदी आहे. इंटरनेट, मोबाइलवर बंदी आहे. त्यामुळे तेथील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठा बंद आहेत. सार्वजनिक परिवहन व्यवस्थाही व्यवस्थित चालत नाही. अशा परिस्थितीत देशातून, परदेशातून येणारे पर्यटक राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेत तिकडे जाणे टाळत आहेत. काश्मीरमधले टुरिस्ट एजंट, हॉटेल व्यावसायिक, शिकारा चालवणारे व्यावसायिक, टुरिस्ट गाईड यांचे जीवन संचारबंदीने बाधित झाल्याने पर्यटनाला गती मिळत नसल्याचे चित्र आहे.
या सर्वांचे म्हणणे आहे की, जो पर्यंत काश्मीरमध्ये इंटरनेट, मोबाइल व संचारबंदी उठवली जात नाहीत तोपर्यंत पर्यटक येथे फिरकणार नाहीत. वास्तविक सप्टेंबर व ऑक्टोबर महिना हा पर्यटकांचा सीझन असतो आणि हजारो पर्यटक या काळात काश्मीरकडे येत असतात. पण पर्यटकच इंटरनेट व मोबाइलवरील निर्बंधामुळे एकमेकांशी संपर्क साधू शकत नसतील तर ते येथे कसे येतील, आपले बुकिंग कसे करतील असा सवाल काश्मीर हॉटेल व्यावसायिक संघाचे अध्यक्ष आसिफ बुर्ज यांनी उपस्थित केला आहे.
बहुसंख्य पर्यटन व्यावसायिकांचे असे मत आहे की, दळणवळण यंत्रणेवर बंदी घातल्याने आम्हाला उर्वरित देशाशी संपर्क साधता येत नाही. त्यामुळे हॉटेल बुकिंग करता येत नाही. पर्यटकांचे व्यवस्थापन करता येत नाही. पर्यटकांमध्येही काश्मीरमधल्या परिस्थितीवरून भीतीचे वातावरण आहे. त्यांना सुरक्षा व्यवस्थेचे भय वाटत आहे.
गेल्या जूनमध्ये काश्मीरमध्ये सुमारे १ लाख ७४ हजार पर्यटक आले होते तर जुलैमध्ये ३,४०३ विदेशी पर्यटकांसह १ लाख ५२ हजार पर्यटक आले होते. पण ५ ऑगस्टला सर्व पर्यटकांना काश्मीर सोडून जाण्यास सांगितल्यानंतर गेल्या दोन महिन्यात पर्यटकांची संख्या पूर्णपणे थांबली आहे.
मूळ बातमी
COMMENTS