मोदी खोटे का बोलतात?

मोदी खोटे का बोलतात?

देशात गेल्या पाच वर्षांत मोठ्या दहशतवादी घटना घडल्याच नाहीत, असे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी वा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन वा अन्य कोणी म्हणते तेव्हा त्याचा उद्देश असतो केवळ आभास (पर्सेप्शन) निर्मिती. पर्सेप्शन कसले, तर मोदींच्या राष्ट्रवादी पौरुषत्वाचे! मोदींच्या प्रत्येक असत्य कथनामागे हेतू असतो तो हाच - त्यांच्याविषयीच्या विविधांगी पर्सेप्शन निर्मितीचा... पण हे सारे घडते कसे?

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान
१०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान
बायडेन विजयाच्या नजीक; सिक्रेट सर्व्हिसचे संरक्षण
लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

लक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान नेते आहेत, उपराष्ट्रपती बनण्याआधी व्यंकय्या नायडू म्हणाले होते त्याप्रमाणे ‘मोदी ही भारतास ईश्वराने दिलेली भेट आहे – गॉड्स गिफ्ट आहे’,  असे मानले व मोदी यांनी या देशात प्रचंड मोठी सामाजिक-सांस्कृतिक-नोटाबंदी वगैरे आर्थिक क्रांती केली यावरही भक्तीभावाने मुंडी हलवली, तरी एक सवाल उरतोच की ही ईश्वरी भेट वारंवार असत्याचा आसरा का घेते? मोदी सातत्याने खोटे का बोलतात?
त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे हे त्याचे एक उत्तर झाले. किंवा त्यांनी ‘एंटायर पॉलिटिकल सायन्स’मधील पदवी घेतली असल्याने त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि समज कमी पडते असेही काही लोक सांगतात. परंतु त्यात काही तथ्य नाही. ते कसे हे जाणून घेण्यासाठी मोदींचे ताजे असत्य कथन पाहू या.
नुकतेच बेंगळुरूतील एका प्रचारसभेतील प्रेक्षकगणांना ते विचारत होते, की ‘तुमच्या चौकीदाराच्या चौकीदारीच्या पाच वर्षांच्या काळात एक तरी मोठा दहशतवादी स्फोट झाला का देशात?’ या सवालांवर समोरील श्रोत्यांतून अर्थातच नकारार्थी उत्तरे येत होती. आता हा प्रश्न काही पहिल्यांदाच विचारला गेलेला नाही. भाजपच्या आयटी सेलमधील कर्मचा-यांकडून तो सातत्याने विचारला जात आहे. त्यांनी तर त्याच्या ध्वनिफिती आणि चित्रमय संदेश तयार केले आहेत. भाजपचे भक्तगण ते तमाम जनमाध्यमांतून प्रसारित करीत असतात.
भाजप नेत्या निर्मला सीतारामन या संरक्षणमंत्री आहेत. शिवाय राफेल वगैरे व्यवहारांबाबत सातत्याने खुलासे करावे लागत असल्यामुळे त्यांचे अर्थशास्त्रही पक्के आहे. शिवाय त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीही आहेत. त्यामुळे त्यांना कोणी व्हाट्सअँप विद्यापीठाच्या विद्यार्थिनी म्हणू शकणार नाही. परंतु त्यांनीही थेट भाजपच्या अधिवेशनात हा सवाल विचारून देशाला चकीत करुन सोडले होते. या प्रश्नातून त्यांना हेच सांगायचे असते, की देशात मोदींच्या कार्यकालात एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही, स्फोट झालेला नाही. कारण – ‘मोदी हे असे चौकीदार आहेत की ज्यांनी दहशतवाद्यांच्या काळजात भय निर्माण केले आहे.’  नगरच्या सभेत खुद्द मोदींनीच मोदींची अशी तारीफ केली होती.
स्वतःची स्तुती स्वतः करावी की नाही आणि तसे करतो तो कोण, हे येथे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे, ते त्या स्तुतीत किमान काही तथ्यांश आहे की नाही हे. आपण पठाणकोट, गुरुदासपूर, अमरनाथ यात्रा, उरी, पुलवामा येथे जे हल्ले झाले त्यांना दहशतवादी हल्ले म्हणणार नसू तर प्रश्नच मिटला. पण तसे म्हणायचे तर मग मोदी ज्यांच्या नावाने मते मागतात त्या शहिदांचे काय? यावर कोणी असा प्रतिवाद करू शकतो की मोदी म्हणताहेत ते जम्मू-काश्मीर सोडून अन्य भारताबद्दल. पूर्वीसारखे दहशतवादी हल्ले कुठे होताहेत तेथे? पण हा राजकीय ‘अल्झायमर’ झाला. कारण केंद्र सरकारची आकडेवारीच हे प्रश्न खोडून काढत आहे.
१९ डिसेंबर २०१८ रोजी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरानुसार जम्मूकाश्मीरमध्ये २०१५ ते १७ या काळात ८७२ दहशतवादी हल्ले झाले, ईशान्य भारतात याच काळात १३६६ दहशतवादी घटना घडल्या. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या ३०४५ घटना घडल्या.
यावरही प्रतिवादाला एक जागा असू शकते की मोदी बोलताहेत ते जम्मू-काश्मीरबाहेरच्या मोठ्या (मेजर) हल्ल्यांबाबत. दहशतवादी हल्ल्यांमध्ये मेजर आणि मायनर असे काय असते? खरे तर त्याची कोणतीही सरकारी वस्तुनिष्ठ व्याख्या नाही. हल्ल्यांत किती जिवीतहानी झाली, लक्ष्य कोणते होते अशा विविध घटकांवरून आपण त्याचे मोठे-छोटेपण ठरवत असतो. नाही म्हणायला, नवी दिल्लीतील ‘इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेन्ट’च्या साऊथ एशियन टेररिझम पोर्टलने मोठ्या हल्ल्यांची त्यांची एक व्याख्या दिली आहे की ज्यात तीन वा त्याहून अधिक नागरिकांचे वा सुरक्षा सैनिकांचे मृत्यू झाले आहेत तो हल्ला मोठा. त्या पोर्टलनुसार २०१४ ते २०१८ या काळात देशात अशा ३८८ घटना घडल्या आहेत. त्या विस्मरणात गेल्याच असतील, तर परवा दंतेवाडात झालेल्या नक्षलवादी हल्ल्याचे काय? त्यात तर चार सुरक्षा रक्षकांसह भाजपचे एक आमदार मृत्यूमुखी पडले होते.
मोदी, निर्मला सीतारामन प्रभृती दहशतवादी हल्ल्यांबाबत खोटे बोलत आहेत हे नि:संदेह म्हणता येते. पण खरोखरच मोदी वा त्यांच्या प्रचारकांकडे केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरील हे आकडेवारीचे पुरावे नव्हते? तसे असेल, तर मोदी हे राज्य करण्यास लायक नाहीत असेच म्हणावे लागेल. ते काही कोणी मोदीभक्त मान्य करणार नाही. तेव्हा राहता राहिला मोदींचा जाणूनबुजून केलेला खोटारडेपणा!!!
त्याची अशी किती तरी उदाहरणे देता येतील. पण त्यात दरवेळी हाच सवाल येईल की का बरे हा माननीय इसम खोटे का बोलत असेल? याचे कारण नीट समजून घेतले पाहिजे. देशात गेल्या ५५-५६ महिन्यांत मोठ्या दहशतवादी घटना घडल्याच नाहीत, असे जेव्हा मोदी वा सीतारामन वा अन्य कोणी म्हणते तेव्हा त्याचा उद्देश असतो केवळ आभास (‘पर्सेप्शन’) निर्मिती. पर्सेप्शन कसले, तर मोदींच्या राष्ट्रवादी पौरुषत्वाचे. मोदी सातत्याने मला पाकिस्तान घाबरतो, माझ्यामुळे दहशतवादी चळचळा कापतात, माझ्यामुळे देशाला जगात मानाचे स्थान मिळाले असे सांगतात तेव्हा ती एक जाणीवपूर्वक केलेली भाषिक कृती असते. ‘छप्पन इंची छाती’, ‘लाल आँखें’ हे शब्दप्रयोग हा त्याचाच एक भाग.  मोदींचे हे पोलादी-पौरुषत्व सातत्याने जनतेसमोर तेवत ठेवण्यात येत असते. त्याला मोठे अपवाद दोनच.
एक म्हणजे नोटबंदीनंतर मोदींनी पणजीत केलेले भाषण. त्यावेळी मोदींनी मंचावरून ‘अश्रू दोन ढाळले’ होते. पुरुषाने रडणे हे आपल्या पुरुषसत्ताकवादी मानसिकतेनुसार बायकी काम. अर्थात हल्लीचे मेट्रोसेक्शुअल पुरूष रडतातही. त्याला ‘समाजमान्यता’ही आहे. पण त्यावेळी मोदी रडण्याच्याही पुढे गेले होते. ते म्हणाले होते, ‘मला माहित आहे मी कोणत्या कोणत्या शक्तीविरोधात लढाई पुकारली आहे. मला माहित आहे कसे कसे लोक माझ्याविरोधात जातील. मला जिवंत सोडणार नाहीत ते. मला बर्बाद करून टाकतील. पण मी हार मानणार नाही…’ हे मोदींनी वापरलेले ‘व्हिक्टिम कार्ड’ होते.
असाच बिच्चारेपणाचा आव त्यांनी आणला होता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात. त्यावेळी काँग्रेसवाले पाकिस्तानशी मिळून माझ्याविरोधात कट रचीत आहेत अशी आवई त्यांनी उठवून दिली होती. (मणिशंकर अय्यरच्या घरी मनमोहन सिंग पाकिस्तानच्या दूतावासातील व लष्कर अधिकार्‍यांना भेटून तसे कारस्थान करत आहेत असा कांगावा कोणत्याही पुरव्याशिवाय त्यांनी बेधडक आणि मुद्दाम केला होता.)
मोदी दहशतावादासंबंधी छाती फुगवून बोलतात, कारण त्यांना त्यांच्या भोवती ही पौरुषत्वाची प्रभा हवी आहे, कारण लोकांना तसा नायक हवा असतो. ती प्रभा अधिक गडद व्हावी यासाठी ते काँग्रेसने केलेल्या कामाचे श्रेयही नाकारताना दिसतात. ज्या पक्षाचे दोन सर्वोच्च नेते दहशतवादाला बळी पडले आहेत, तो पक्ष दहशतवाद्यांचा सहानुभूतीदार असल्याचे ते बिनदिक्कत सांगत असतात. ज्या पक्षाच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, ज्या पक्षाच्या कारकिर्दीत पाकिस्तानात लक्ष्यभेदी हल्ले करण्यात आले, तो पक्ष पाकिस्तानशी लढण्यास घाबरतो असे ते बेछूटपणे सांगतात. आणि त्यावर असंख्य लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात. मोदींविषयीचे एक पर्सेप्शन तयार होते. त्यांच्या प्रत्येक असत्य कथनामागे हेतू असतो तो हाच – त्यांच्याविषयीच्या पर्सेप्शन निर्मितीचा.
यामागे प्रोपगंडाची काही तंत्रे आणि तत्त्वे आहेत. व्हाट्सअॅप. फेसबुक, ट्विटर यांसारख्या जनमाध्यमांतून आपल्यावर अनेकदा अत्यंत हास्यास्पद, धादांत खोटी, बनावट माहिती वा संदेश येऊन आदळत असतात. आपण अत्यंत सुशिक्षित, अनुभवी, जाणकार, माहितगार असूनही त्यातील कित्येक संदेशांवर विश्वास ठेवतो. त्या बनावटवृत्तांना ज्या प्रमाणे आपण बळी पडतो, त्याच प्रमाणे मोदींच्या खोट्या विधानांनाही!
आता आपण एवढे शहाणेसुरते, तरी त्याला कसे फसतो? याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुनरावृत्ती ही गोष्ट आपल्यावर काय परिणाम करीत असते हे पाहावे लागेल. अमेरिकेतील व्हँडरबिल्ट विद्यापीठातील संज्ञानात्मक मानसशास्त्र या विषयातील तज्ज्ञ लिसा फाझिओ यांनी यासंदर्भातमायावी सत्य (Illusory Truth)  ही संकल्पना मांडली आहे. त्यांच्या संशोधनप्रबंधाचे शीर्षक होते – ‘ज्ञान हे मायावी सत्यापासून आपले संरक्षण करू शकत नाही.’ त्यांच्या म्हणण्यानुसार एखादे नवे विधान आणि वारंवार केले जाणारे विधान या दोन्हींत तुलना केली, तर वारंवार केल्या जाणाया विधानाला खरेपणाचे अधिक गुण मिळतात. ते विधान अधिक खरे मानले जाते. यालाच म्हणतात मायावी सत्य परिणाम!
लोक ज्या अत्यंत सहजपणे एखादे विधान समजून घेत असतात त्यातच या मायावी सत्य परिणामाचे मूळ आहे. या सहजपणे विधान समजून घेण्याला त्यांनी समजण्याची सुकरता (‘प्रोसेसिंग फ्लूएन्सी’) म्हटलेले आहे. एखादे विधान सतत सांगत राहिले की होते काय, की ही जी सहजपणे समजून घेण्याची प्रक्रिया आहे, ती कोणत्याही नव्या विधानाच्या तुलनेत अधिक सुलभ होते. एखादी गोष्ट आपण दुस-यांदा, तिस-यांदा ऐकतो, तेव्हा ती समजून घेण्याची आपल्या मेंदूची गती एकदम वाढते. मेंदू तिला पटकन प्रतिसाद देतो. या पटकन प्रतिसाद देण्याला, ‘प्रोसेसिंग फ्लूएन्सी’ला तो फसतो. त्याला ‘गटफिलिंग’ येते – आतून वाटते – की त्याअर्थी ही गोष्ट खरीच आहे. अफवा अशा पसरतात आणि अफवांवर असा विश्वास ठेवला जातो. उदाहरणार्थ पाहा. आपल्या कार्यालयातील सहका-याकडून वा एखाद्या नातेवाईकाकडून आपल्या कानी एखादी अफवा येते. प्रारंभी आपल्याला त्यात फारसे तथ्य वाटत नाही. पण तीच गोष्ट जर आणखी दोघाचौघांकडून आपल्या कानावर आली की आपला त्यावर विश्वास बसू लागतो. पुनरावृत्तीने येथे आपले काम केलेले असते.
मोदी एकच खोटे सातत्याने बोलत असतात त्यांचे प्रचारक तीच गोष्ट सतत आपल्यावर आदळवत असतात, ते यासाठीच. आणि आपण असे वैचारिक आळशी की ती विधाने ब्रह्मवाक्ये समजून अग्रेषित करीत राहतो.
मोदीमोहिनी अधिक गडद होत जाते…

विसोबा खेचर, सर्व घटनांवर लक्ष ठेऊन असणारे, पट्टीचे लेखक आणि पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0