जेएनयूच्या चार बंडखोऱ्या

जेएनयूच्या चार बंडखोऱ्या

जेएनयूचा उदारतावादी विचार, सामाजिक बांधिलकी, समानतेचे वातावरण आणि उच्च गुणवत्ता या गोष्टी त्याच्या टीकाकारांना अस्वस्थ करतात. याची कारणे कोणती?

शेतीपंप वीजवापर नावाखाली १२ हजार कोटींची चोरी
साथींचा इतिहास – फ्ल्यू
‘क्वाड’च्या निमित्ताने भारतासमोर पेच

भारताच्या प्रिय दक्षिणपंथी, नवउदारतावादी, चिंतातुर नागरिकांनो, हे तुमच्यासाठी आहे.

हा लेख म्हणजे या ‘तुमच्या’ भारतमातेच्या विरोधात जेएनयूने ज्या चार बंडखोऱ्या केल्या आहेत त्याबद्दलची प्राथमिक माहिती आहे.

तो तुमच्या दोन नेहमीच्या शंकांची उत्तरेही देईल: जेएनयू सतत चर्चेत का असते, आणि जेएनयूमध्ये सतत काही ना काही दंगा का चालू असतो?

आयआयटी आणि आयआयएममधली शांती आणि नीरवता यांच्याशी तुम्ही जी तुलना करता ती योग्यच आहे. शेवटी तुमच्या दृष्टिकोनातून, जैसे थे परिस्थिती राखणे हीच राष्ट्रवादी कृती आहे.

या सगळ्या प्रश्नांची खरे तर सोपी किंवा सहज मान्य होतील अशी उत्तरेच नाहीत. तसेच तुमचे विचार  काहीसे अपरिपक्व तरीही द्वेषाने भडकलेले आहेत, हे पाहता तुम्हाला जेएनयूची विचारप्रणाली ‘डावी’ किंवा ‘कॉमी’ किंवा केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीआरपीएफला बजावले त्याप्रमाणे अर्बन नक्षली आहे याची खात्री असणार यावर मी पैज लावायला तयार आहे.

तुम्ही कधीकधी उदार होता, तेव्हा तुम्हाला ‘उदारतावादी’ विचारप्रणालीपर्यंत खाली उतरायला हरकत नसते. पण तेच तुच्छतापूर्ण शब्द वापरायचे तर : फक्त फॅब इंडिया कुर्ते घालणारी आणि ‘खान मार्केट गटा’सारखा विचार करणारी व्यक्ती एवढ्यापुरतेच.

तुम्ही तुमच्या वाईन पार्टी, किटी पार्टी, कार्ड पार्टी आणि राजकीय पार्ट्यांमध्ये या विद्यापीठाची निंदानालस्ती करता. पण शेवटी एक वस्तुस्थिती राहतेच : जेएनयू नेहमीच तुम्हाला सतावत राहते, अस्वस्थ करते, अपघाताने खाजकुयलीला स्पर्श झाल्यासारखे.

जेएनयूमुळे तुम्हाला ही जी वैतागवाणी खाज सुटते, ती तुमच्या संकुचित, सुरक्षित जीवनात ते वादळ निर्माण करेल या भीतीमुळे. तुमच्या मानसिक डीएनएच्या मूलभूत रचनेतच जे लहान नवउदारतावादी, उजवे, पारंपरिक आणि प्रतिक्रियावादी कोड आहेत त्या सगळ्यांच्या विरोधात जेएनयू बंड करते. तुम्हाला ते तुमच्यापासून दूर जावे असे वाटते, पण जेएनयूच्या बाबतीत तुमच्या इच्छांप्रमाणे सर्व काही होत नाही.

पहिले बंड म्हणजे उदारतावादी विचार.

हे काय भयंकर! इथे विद्यार्थ्यांना स्वतःचा स्वतः विचार करायला प्रोत्साहित केले जाते ! लेक्चर्सची संख्या इतपतच असते, की विद्यार्थी वाचनालयात जाऊन आणखी वाचन करू शकतील. कमी लेक्चर्स याचा अर्थ कमी काम असा होत नाही. त्यांच्याऐवजी ट्यूटोरियल्स असतात, समाजशास्त्रामध्ये एमए करणाऱ्या सर्वसाधारण विद्यार्थ्याला दर १०-१२ दिवसांना एक पूर्ण करावे लागते.

त्यांच्या त्या अभ्यासक्रमासाठी जे शिक्षक असतील त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या बरोबरच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांचे सादरीकरण करावे लागते. त्यात आपल्या मुद्द्याचे समर्थन करावे लागते. सबमिशनचे गुणांकन होण्यापूर्वी कल्पनांवर वादविवाद झडावे लागतात. शिक्षक असेच गुण देऊन संपवू शकत नाहीत. त्यांच्या अभ्यासक्रमात सहभागी असलेल्या सर्वांच्या उपस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याला असे गुण का दिले त्याचे त्यांनाही स्पष्टीकरण द्यावे लागते. तर असं आहे.. ही कायमस्वरूपी परस्परसंवादी मानसिक बंडखोरी जेएनयूमध्ये सततच चालत असते.

हे विद्यार्थी त्यांची ही बंडखोर मने घेऊन सार्वजनिक ठिकाणी जातात आणि कुणी शत्रुत्वाच्या भावनेने बोलू लागला तर त्याला पार जमिनीवर लोळवतात. जेएनयूविरोधाचा जुनाट आजार असलेल्या वाहिन्यांच्या ‘वार्ताहरांना’ त्यांच्यापैकी काहींनी कसे उभे आडवे सोलले आहे त्याचे ऑनलाईन व्हिडिओ तुम्ही पहायला हवेत.

अशा प्रगल्भतेचे काळजीपूर्वक संवर्धन केले पाहिजे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वाचनालय सुविधा आणि वाचनालयाची वेळ वाढवून का पाहिजे असे आपल्याला वाटते? आणि या प्रशासनाला हे दोन्ही कमी का करायचे असावे?

दुसरी बंडखोरी म्हणजे सामाजिक बांधिलकी.

भारताच्या अत्यंत वेड्यावाकड्या सामाजिक वातावरणामध्ये, जेएनयूने स्वप्न पाहण्याची हिंमत केली आहे. त्याने शक्य तितक्या जास्तीत जास्त प्रमाणात प्रवेशामध्ये समान संधी धोरणाचे स्वप्न पाहिले आहे. त्याने दलित, वंचित, शोषितांना त्यांच्या प्रवेशद्वारातून आत येण्यासाठी आणि जागा, खाणेपिणे, वाचनालय, सामाजिक परस्परक्रिया यांच्या उपलब्धतेच्या बाबतीत कोणतेही अडथळे न येता उच्च जाती वर्गातील मुलांबरोबर अभ्यास करण्यासाठी सक्षम करण्याचे स्वप्न पाहिले आहे.

तुमच्यासाठी जेएनयूचे स्वप्न म्हणजे भयंकर दुःस्वप्न आहे, जात, पंथ, धर्म, लिंग यांच्या आधारे होणाऱ्या हजारो अत्याचारांनी ग्रस्त समाजात समतेचे दुःस्वप्न.

२०१७ पूर्वी काठावरच्या आणि वंचित सामाजिक गटांसाठी घटनेनुसार सक्तीचे असलेले आरक्षण विचारात घेऊन प्रवेश दिले जात. प्रदेश, लिंगभाव आणि पंथ यासारखे वंचिततेचे इतर मापदंड लक्षात घेऊन वंचिततेचे ज्यादा गुणही दिले जात.

लिंगभावावर आधारित वंचितता गुण जादूसारखे काम करतात. जेएनयू अशी जागा बनली आहे, जिथे मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत वर्गांमध्ये, वाचनालयांमध्ये, सेमिनार्समध्ये आणि त्याच्या अनेक धाब्यांवरही जास्त असते. आणि या सगळ्याचा खरेच उपयोग होत असल्यामुळे २०१६ मध्ये सत्तेवर आलेल्या प्रशासकीय राजवटीला हे सर्व बंद करणे भाग होते.

आणि त्यामुळे लगेचच जो विध्वंस झाला, त्याच्याकडे एक नजर तर टाका. प्रति महिना रु. ६,००० इतके उत्पन्न असलेल्या (हो, खरेच असे लोक अजून असतात, तुमच्या भद्र संवेदनांना कितीही धक्कादायक वाटले तरीही) विद्यार्थ्यांचे प्रमाण २०१६-१७ मध्ये २५.७% पासून २०१७-१८ मध्ये ९.८% इतके खाली घसरले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण २०१६-१७ मध्ये ४८.४% पासून २०१७-१८ मध्ये २८.२% इतके खाली घसरले.

तिसरी बंडखोरी म्हणजे आपले विद्यार्थी आणि इतर रहिवाश्यांना जे संवेदनशील आणि मानवी वातावरण पुरवण्याचा जेएनयूचाप्रयत्न.

जेएनयूचा मानववाद सर्वप्रथम त्याच्या सामाजिक खुलेपणा आणि सुकरता यांच्यामध्ये आहे. सर्व सार्वजनिक जागांवर सर्वांना मुक्त प्रवेश आहे, किंवा होता..प्रिय दक्षिणपंथी, तुमचा परंपरावाद येईपर्यंत होता.

या खुलेपणाचे सर्वात ठळक प्रतिनिधी म्हणजे धाबे, चहाची दुकाने आणि आकाशनिरीक्षकांसाठीची सन्माननीय जागा – पार्थसारथी रॉक्स.

होस्टेलच्या मेसवरच्या कंटाळवाण्या अन्नाला थोडी चविष्ट जोड देऊ इच्छिणाऱ्यांना धाबे खाणेपिणे पुरवतात. पण ते धाबेही बंडखोर आहेत. ते कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, वादविवाद करण्यासाठी, राजकीय कार्यक्रमांची परीक्षा घेण्यासाठी चैतन्यशील अवकाश पुरवतात.

आता हे ऐकून तर नक्कीच तुमच्या नवउदारतावादी पोटात डचमळेल. विद्यार्थी अभ्यासासाठी येतात ना, मग त्यांनी राजकारण का करावे, तुम्ही चिडून विचाराल.

तुमच्या या चिंतेला जेएनयूचे बंडखोर उत्तर असेल ‘अभ्यास आणि संघर्ष’. धक्कादायक आहे ना?

तुमच्या नैतिकतेला आणखी धक्कादायक वाटणारी गोष्ट म्हणजे या खुलेपणामुळे होणारे भावनिक परिणाम : इथे लोकांना प्रेम, लैंगिक संबंध, त्यांच्या लैंगिकतेशी जुळेल अशी मैत्री मिळते. पार्थसारथी रॉक्स प्रेमासाठीची आणि आकाश निरीक्षण करण्यासाठी किंवा जाणारी-येणारी विमाने पाहण्यासाठीची जागा आहे.

तुमची अभिमुखता कोणतीही असू दे, जेएनयू त्याला वाव देते. नाही, तुम्ही म्हणाल, याला परवानगी देता येणार नाही. तुमच्या उच्च नैतिकतेचा अपमान होतो अशाने, मला माहित आहे.

तुम्ही ज्या सत्ताधारी राजकीय पक्षाचा जयघोष करता ना, त्यांच्यापैकीच एकजण जेएनयूच्या भोवतीने कंडोम आणि रिकाम्या बियरच्या बाटल्या मोजत फिरला होता. त्यापैकी बहुतांश तर त्याच्या मनातच होते.  पण त्याच्या या प्रयत्नांतून उपदेश काय मिळतो: जेएनयूमधले वापरलेले कंडोमसुद्धा बंडखोर आहेत.

प्रिय दक्षिणपंथी, जेएनयूने केलेली चौथी बंडखोरी म्हणजे एका सरकारी विद्यापीठाला त्याने उच्च गुणवत्तेचा स्त्रोत बनवले.

तुम्ही तर खाजगीकरणाचे गुणगान गाता, आणि बरीच शक्यता आहे की तुमची मुले खाजगी संस्थेतच शिकत असतील. कारण खाजगी संस्था ‘गुणवत्तेला’ महत्त्व देतात, आणि जगाकडे पाहण्याच्या तुमच्या महान दृष्टिकोनानुसार सरकारी विद्यापीठे म्हणजे आरक्षणामुळे कलंकित झालेली!

तुमचा कष्टाने कमावलेला पैसा अनेक वर्षे कुठल्याशा दुर्बोध विषयावर संशोधन करण्यात घालवणाऱ्या आणि शिवाय आणखी सोयी-सवलती मागणाऱ्या लोकांसाठी वाया जात आहे याबद्दल तुम्हाला खरोखर त्रास होत आहे.

कृपया हे लक्षात घ्या, की सरकारी विद्यापीठे ही घटनेने शासनावर सोपवलेली जबाबदारी आहे आणि नागरिकांनी आपला हा अधिकार बजावला पाहिजे. तुमचे कराचे पैसे त्या दिशेने काम करत असतील, तर तुम्हाला उलट आनंद झाला पाहिजे. आणि हेही लक्षात घ्या, की हे तुम्हाला कितीही वेदनादायी वाटले तरीही ते तुमच्या फायद्याचेच आहे.

जेएनयूमधील सुमारे ४०% मुले १२,००० रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमधून येतात. आणि हे विद्यार्थी त्यांच्या आधीच तुटपुंज्या असलेल्या शिष्यवृत्तीमधून, आणि नॉन-नेट फेलोशिपमधून पैसे वाचवून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी घरी पाठवतात.

शिवाय, तुम्हाला हे माहित आहे का, की इतर केंद्रीय विद्यापीठांपेक्षा जेएनयूमध्ये होस्टेलमध्ये राहण्यासाठी खरे तर जास्त पैसे द्यावे लागतात? आणि अलिकडेच या शुल्कामध्ये जी वाढ झाली आहे, त्यामुळे ते आणखी खूप जास्त पैसे भरतील. जर सवलतींची गरज कुणाला असेल तर ती त्यांनाच आहे.

जाता जाता, तुम्ही तुमची एलपीजी सवलत सोडली का हो? तुम्ही तुमच्या कारच्या इंधनटाकी मध्ये डिझेल भरता तेव्हा तुम्हाला मिळणाऱ्या सवलतींमुळे बरे वाटते ना? किंवा आजकाल दिल्लीमध्ये कमी झालेल्या विजेच्या बिलाबद्दल आनंद होतो ना?

तर मग, हे सगळं एकंदरित कुठे जाते? तुमच्यासारख्या ज्या लोकांना त्वरित तोडगे आणि परतावा हवा असतो त्यांच्या दृष्टिने शिक्षण म्हणजे केवळ उपयोगात आणण्याची वस्तू आहे. जेएनयूमध्ये, आम्हाला ती सार्वजनिक वस्तू वाटते, सार्वजनिक वस्तू म्हणजे लोकांच्या भल्याकरिता काम करणारी.

जेएनयूचा हाही विश्वास आहे, की शिक्षणामधून ज्ञानसाठा वाढला नाही (नाही, गूगलमधून तुम्ही प्रत्येक मिनिटाला उचलता ती माहिती नाही) तर त्याचा उद्देश सफल होत नाही, आणि म्हणूनच या विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन दिले जाते. संशोधन सावकाश होणारी प्रक्रिया आहे, चांगली वाईन कशी मुरावी लागते? (वाईनचं उदाहरण समजलं असेलच तुम्हाला, तरीही संशोधनाचं नसेल समजलं).

लक्षात घ्या : जर एखाद्याने २१ व्या वर्षी एमए पूर्ण केले, आणि एमफिल/पीएचडीसाठी २२ व्या वर्षी प्रवेश घेतला, तर जात, जमात, पर्यावरण, लिंगभाव आणि अशाच अनेक समस्यांवर संशोधन करून तो २९ किंवा ३० व्या वर्षी बाहेर पडेल.

तुमच्या लक्षात येतं का, की जेएनयूमधली संशोधक, तिच्या आयुष्यातील सर्वात क्रियाशील वर्षे सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा ज्ञानसाठ्याच्या निर्मितीसाठी देत आहे? आणि कशासाठी? महिन्याला ५,००० किंवा तीन वर्षांनंतर महिन्याला ८,००० रुपयांसाठी.

आणि शेवटी, अशाच अन्य संशोधकांबरोबरही तुलना करून पहा. उदाहरणार्थ अमेरिकेतील. अमेरिकेमध्ये समाजशास्त्रामध्ये पीएचडी मिळवण्याचे सरासरी वय ३३ वर्षे आहे. गूगल मला सांगते, अमेरिकन विद्यापीठामध्ये पीएचडीचा खर्च दर वर्षी २८,००० डॉलर ते ४०,००० डॉलर इतका होतो. आणि विद्यार्थ्यांना त्यापैकी बहुतांश किंवा संपूर्ण काळासाठीही निधी मिळू शकतो.

अर्थातच तुमचा आदर्श आहे आयआयटी आणि आयआयएम. तुम्हाला माहिती आहे का, की या संस्थांमध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या ३% विद्यार्थी शिकतात, पण उच्च शिक्षणासाठी सरकारी निधीपैकी ५०% निधी या संस्था वापरतात?

ही प्रचंड सवलत घेऊन यापैकी अनेक विद्यार्थी काय करतात? बॅग भरतात आणि सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी प्रोग्रॅम लिहायला किंवा मग अर्थातच NYSE मध्ये बुल्स आणि बेअर्स खेळायला अमेरिकेत जातात.

आता जेएनयूमध्ये संशोधकाला मिळणाऱ्या ५,००० रुपयांशी याची तुलना करा आणि थोडी शरम वाटून घ्या. पण ती तर तुमच्याकडे नाहीच, कारण तुम्ही नवउदारतावादी, जेएनयूला ठोकणारे, दक्षिणपंथी बहुसंख्यांकवादी आहात.

एखाद्या आयआयटीयन किंवा आयआयएमियनला विज्ञान किंवा अर्थशास्त्रातले नोबेल पारितोषक केव्हा मिळते त्याची मी वाट पाहत आहे. तुमच्या अत्यंत बंडखोर, ‘राष्ट्रविरोधी’ जेएनयूला मात्र  आपल्या नोबेल पारितोषक विजेत्याचा अभिमान आहे.

रजत दत्ता हे जेएनयू मधील सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीज येथे प्राध्यापक आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0