भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कन्नान गोपीनाथन यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या देशात नागरिकां
भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कन्नान गोपीनाथन यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या देशात नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर अंकुश आणला जातोय आणि याविरोधात कोणीही बोलत नाही. आपला देश येमेन नाही की हे ७० दशक नाही, अशी प्रतिक्रिया गोपीनाथन यांनी ‘द वायर’ला दिली.
कन्नान गोपीनाथन यांनी आपल्या राजीनाम्यामागे, नागरी सेवेतून पदरी प्रचंड निराशा हाती आली असेही म्हटले आहे. या सेवेत पीडीत व शोषितांना न्याय देण्यासाठी आलो होतो. पण उत्तरोत्तर राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप, आयएएस अधिकाऱ्यांनी आपले आदेश राबवण्याचा त्यांच्याकडून येत असलेला दबाव व आपल्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम न तपासण्याची त्यांची मानसिकता याचा अखेरीस उद्वेग आला असे गोपीनाथ म्हणाले.
गोपीनाथन यांनी काश्मीरमधील ढासळत्या परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘भारताची राज्यघटना सशस्त्र उठाव वा परकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेऊ शकते. पण काश्मीरमध्ये नागरिकांचा आक्रोश हा अंतर्गत बंडाळी असल्याचे सांगत केंद्र सरकार तेथे दडपशाही आणत आहे. नागरिकांचे मूलभूत हक्क जसे काही तेथे अंतर्गत बंडाळीच आहे, असे मानून काढून घेतले गेले आहेत. वास्तविक आपल्या राज्यघटनेने ‘अंतर्गत बंडाळी’चे कलम केव्हाच रद्द केले आहे. गेली २० दिवस काश्मीर खोऱ्याची चोहोबाजूंनी कोंडी झाली आहे. नागरिकांच्या जगण्यावर अनेक बंधने आणली गेली आहेत. या राज्याची सूत्रे आता केंद्राकडे गेल्याने तेथे असलेले आयएएस अधिकारी फक्त केंद्राचे अधिकारच राबवू शकतात. नागरिकांना न्याय मागण्याचे अधिकार असले तरी न्यायालयेही स्वत:हून काही करत नाहीत. अशा परिस्थितीत मी मौन बाळगून बसू शकत नाही. त्यामुळे मी आयएएस सेवेचा राजीनामा दिल्यास मला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळेल आणि आता राजीनामा दिल्याने मी स्वत:चे मत मांडू शकतो’.
कन्नान गोपीनाथन यांनी प्रसारमाध्यमांबाबतही आपली भूमिका मांडली. आज माझ्या मालकीचे वर्तपानपत्र असते तर मी ‘२०’ असे काश्मीरमधल्या ढासळलेल्या परिस्थितीचे वर्णन करणारा मथळा छापला असता. गेले २० दिवस काश्मीरमधल्या नागरिकांचे सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
माझा राजीनामा स्वीकारल्यानंतरच मला माझे मत व्यक्त करायचे होते पण माझ्या राजीनाम्याची बातमी सहकाऱ्यापर्यंत पोहोचली व त्याने ही माहिती समाज माध्यमात दिली व पुढे ती केरळमधल्या प्रसार माध्यमांनी प्रकाशित केली असे कन्नान यांनी सांगितले.
२०१२मध्ये कन्नान गोपीनाथन भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. सध्या ते दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात असून त्यांनी २१ ऑगस्टला आपला राजीनामा दिला आहे. कन्नान यांना अरुणाचल-गोवा-मिझोराम या केंद्रशासित प्रदेशाचे काडर मिळाले होते. आणि आता कदाचित जम्मू व काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झाल्याने त्यांची तेथेही बदली होण्याची शक्यता आहे.
राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करणार आहे असा प्रश्न गोपीनाथ कन्नान यांना विचारला असता ते म्हणाले, मी अजून तसा विचार केलेला नाही पण जेव्हा २० वर्षांनी लोक मला विचारतील की तुम्ही काय केले तेव्हा मी त्यांना उत्तर देईन की २० वर्षापूर्वी या देशात आभासी आणीबाणी या देशात होती तेव्हा मी आयएएस सेवेचा राजीनामा दिला होता.
मूळ बातमी
COMMENTS