ती यशाची व्याख्या बनली

ती यशाची व्याख्या बनली

यश कसं असावं? लता मंगेशकर यांच्या यशासारखं! हे कुणा निष्ठावान लता-भक्ताचं म्हणणं नाही.

शोकाकुल वातावरणात लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
लताची विविधरंगी, विविधढंगी मराठी गाणी
वेगळी रेंज, भिन्न प्रकृतीही यशस्वी

आज यशाच्या शिखरावर असलेला शाहरुख खान याचे हे उद्गार आहेत. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या त्याच्या स्वतःच्या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेमध्ये कोणीतरी त्याला विचारले होतं.

‘यशाच्या बाबतीत तुमचा आदर्श कोण?’

“लताजी”! उत्तरासाठी क्षणभर न थांबता शाहरुखनं म्हटलं, “मला त्यांच्यासारखं यश हवं आहे. दीर्घकालीन टिकाऊ आणि निर्विवाद!”

शाहरुख खाननं त्याच्या कारकीर्दीत केलेलं बहुदा हे पहिलंच निर्विवाद, अचूक आणि योग्य विधान असेल! व्यक्ती म्हणून एखाद्याचे लताशी मतभेद असू शकतील. एखाद्याला लतापेक्षा दुसरा कोणी गायक पसंत असू शकतो. पण लताचं गायन वाईट आहे, किंवा तिचं यश अपघाती आहे, अथवा ती यशाला पात्र नाही, असं आजवर कुणीही म्हटलेलं नाही. (मी या लेखात लताबाईंना इथे एकेरी संबोधले आहे. दिलीपकुमारला, सुनील गावस्करला किंवा अगदी देवाधिकांना सुद्धा आपण एकेरीत संबोधतो, त्याच आदरार्थी!)

लताचं कर्तृत्व आहेच तसं असामान्य अन् सर्वमान्य. आवाज ही तिला दैवी देणगी असेल; पितृदत्त वारसा असेल. मात्र अफाट यश ही तिची स्वतःची कमाई आहे. स्वकष्टांची कमाई आहे. आपल्या गायनगुणाचं यशात रूपांतर करण्यासाठी तिनं जीवतोड मेहनत घेतली आहे; खडतर संघर्ष केला आहे.

लताच यश अनेकपदरी आहे. तसाच तिचा संघर्षदेखील! तिचं यश, तिचा लौकिक पार्श्वगायनापुरता मर्यादित राहिले नाही. एक व्यक्ती म्हणून महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनात तिनं अढळ स्थान मिळवलं. तिच्या संघर्षालाही असेच निरनिराळे आणि वैशिष्टपूर्ण पैलू होते. वडिलांच्या मृत्यूमुळे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी कुटुंबाचं कर्तेपण, पोशिंदेपण तिच्या कोवळ्या खांद्यावर आलं. वडिलांचा भलामोठा नावलौकिक काम मिळवण्यासाठी कामी आला नाही. त्याकरता कष्टच करावे लागले. पायपीट अन् वणवण होतीच; शिवाय हिंदीत काम मिळवण्यासाठी उर्दू शिकणे जवळपास सक्तीचं होऊन बसलं. तशी अट उघडपणे पुढे घातली नाही पण त्या काळात हिंदी चित्रपटव्यवसायात उर्दूभाषक लेखकांचा, गीतकारांचा आणि संगीतकारांचा भरणा होता. त्यामुळे गाण्यांच्या शब्दांवर (अन् चित्रपटांच्या संवादांवर) उर्दूचा पगडा होता. साहजिकच उर्दू येणं ही गायकांसाठी अलिखित, अनुच्चारित अट होऊन बसली.

मराठीभाषक लतासाठी ही अट पूर्ण करणं सोपं नव्हतं. पण मराठीच्या तुलनेत हिंदी चित्रपटांमध्ये जास्त काम म्हणजे पर्यायाने जास्त पैसा होता. मोठं कुटुंब चालवण्यासाठी तो आवश्यक होता. त्यातच कुणीतरी तिला उर्दू उच्चारांवरून ‘वरण-भात (शाकाहारी) खाणाऱ्यांच्या उर्दू उच्चारणला त्याचा वास येतो’ म्हणून डिवचलं होतं. त्यानं तिला बळ आलं आणि आव्हान समजून तिनं उर्दू भाषा शिकून घेतली.

नुसती कामापुरते नाही, तर लतानं त्या भाषेवर प्रभुत्व मिळवलं. इतकं, की उर्दूतल्या ‘चराग’ सारख्या शब्दांखालचे ‘नुक्ते’ सुद्धा (बिंदू/ टिंब) तिच्या गाण्यात स्पष्ट ऐकू येतात. मुळातच लताचं शब्दोच्चारण शुद्ध अन् स्पष्ट आहे. चित्रपटातली गाणी शब्दप्रधान असतात म्हणजे – लताच्या काळात होती! तो गुण गायन सुश्राव्य होण्याकरता उपयोगी पडला.

लताच्या बहराच्या काळात चित्रपटसृष्टीत साहिर लुधियानवी सारखे शुद्ध उर्दू लिहिणारे आणि भरत व्यास यांच्यासारखे शुद्ध हिंदी-संस्कृतचा प्रभाव असलेले हिंदी लिहिणारे प्रतिभावान गीतकार होते. ‘शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी’ ही कवीची कळकळ लतानं वेगळ्या अर्थी आणि शब्दशः आचरणात आणली. तिच्या गायनातला शब्द न् शब्द स्पष्ट ऐकू येतो; त्यामुळे समजतो. गाण्याचा अर्थ आणि त्यातल्या भावभावना लताचा गळा जणू टिप कागद आपल्याप्रमाणे टिपतो, आणि गाण्याच्या सुखी अथवा दुःखी परिणाम सहजसुंदरपणे निर्माण करतो. कठीणातलं कठीण गाणं आधी स्वतःच्या आणि नंतर ऐकणार्‍याच्या गळी उतरवतो, असो.

सुरुवातीच्या काळातल्या संघर्षात परकी भाषा (उर्दू) आत्मसात करण्याइतकाच लतापुढे मोठा प्रश्न असणार तो ध्वनी मुद्रणाच्या तंत्राशी जुळवून घेण्याचा. ते जमवल्याखेरीज निभाव लागणार नव्हता. गळा कितीही गोड असला तरी तंत्रज्ञानाचाही गड सर केला. म्हणूनच मराठी आणि हिंदी चित्रपट संगीतावर लवकरच तिच्या नावाचा जरतारी झेंडा फडकला आणि दीर्घकाळ फडकत राहिला. तंत्रज्ञानामुळे गाण्याची परिणामकारकता वाढते, हे तिच्या वेळीच ध्यानात आलं. त्यानंतर खूप वर्षांनी लतानं स्टेज प्रोग्राम्स केले आणि बघायला मिळाले, तेव्हा प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी लता दोन तास आधी येऊन सह-गायक आणि वादकांच्या बरोबर रिहर्सल करताना दिसली. त्याच बरोबर स्टेजवरचा प्रत्येक माईक, प्रत्येक दिवा यांचीही तपासणी करताना दिसली. हे कार्यक्रम करतेवेळी त्या साठीत होत्या. थक्क करणारी गोष्ट म्हणजे त्यांच्या आवाजातलं चापल्य स्टुडिओ बाहेर गाताना स्टेजवर देखील कायम होतं. बहुतेक सर्व गायक गायकांची ध्वनिमुद्रित गाणी त्यांचं गायनातलं चापल्य कमी होतं. ते खूपच संथ वाटतात. लता मात्र या गोष्टीला अपवाद आहे. आपण ध्वनिमुद्रिकाच ऐकतोय असा भास तिचं स्टेजवरचं गाणं ऐकताना होतो. तंत्रज्ञानाचा उपयोग आपलं गाणं खुलवण्याकरता कसा करून घ्यायचा हे लतानं शिकून घेतलं. मात्र आपलं गाणं खुलवण्यासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची गरज तिला पडली नाही.

आज पैशाला पासरी या हिशेबाने चित्रपटसंगीताचे कार्यक्रम निरनिराळ्या कारणांनी स्टेजवर होतात. अवाढव्य सेट्स, भपकेबाज सजावट, सप्तरंगी प्रकाशयोजना त्याची अविभाज्य अंग होऊन बसली आहेत. गायक-गायिकांनादेखील चित्रविचित्र पोशाखही परिधान करावे लागतात. गाताना नाचावं लागतं. लता मात्र कार्यक्रम मुंबई, पुणे अथवा कोल्हापूर येथे असो की लंडनच्या ‘अल्बर्ट हॉल’मध्ये, चिरपरिचित पांढऱ्या शुभ्र साडीत दिसली. समोरच्या ‘माइक’च्या शेजारच्या स्टॅण्डवर गाण्याची वही. गाणं सुरू झाल्यापासून लताचे डोळे त्या वहीवर खिळून रहायचे, ते गाणं संपल्यानंतरच तिथून निघायचे. गाण्यातली एखादी उंच तान किंवा ‘जागा’ घेताना लताच्या दोन्ही भुवयांची कमान व्हायची. बस्स, यापलीकडे कोणतीही हालचाल, कोणताही हावभाव दिसत नसे. लताला ‘परफॉर्म’ करायची गरज नव्हती. गाण्याचा भाव गळ्यातून उतरवण्याचे कौशल्य तिच्याकडे होतं ना! प्रकाशयोजनेनं लोकांचे डोळे दिपवण्याची आवश्यकता तिला भासली नाही. ही किमया करण्यासाठीदेखील तिचा गाता गळा समर्थ होता. त्यांच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायला साक्षात् दिलीपकुमार किंवा नूरजहाँ जातीने उपस्थित असायचे. मग बेगडी चकचकीत सजावटीची गरजच काय! असो.

यंत्र, तंत्र आणि मंत्र (भाषा) अभ्यासानं कमीजास्त वेळात आत्मसात करता येतात. पण माणूस नावाचा अनाकलनीय अन् गुंतागुंतीचा प्राणी ओळखणं महाकठीण! दगा, धोका, फसवणूक, नडवणूक यांचा पदोपदी सामना करत पाऊल घट्ट रोवायचं, आपल्याच हक्काचा, आपल्या कष्टाचा पैसा वसूल करण्यासाठी जिकीर करायची आणि हे सर्व करताना नाऊमेद न होता आपलं काम नीट पार पाडायचा, हा सव्यापसव्य होता.

अजाणत्या वयातल्या लतानं तो कसा जमवला असेल? वडिलांचं छत्र डोक्यावर होतं तोवर पैशाअडक्याचा व्यवहार करणं राहिलं दूर, त्याचा विचार करण्याचीही वेळ आली नसणार. आणि अवघ्या तेरा-चौदा वर्षाच्या अल्लड, परकरी मुलीला मनुष्यस्वभावाची जाण कुठून असणार? शाळेचं जेमतेम तोंड पाहिलेल्या लता दीनानाथ मंगेशकर नावाच्या मुलीने व्यवहारी दुनिया कशी समजून घेतली असेल? अकल्पित अडचणींना आणि लबाड लांडग्याना कसं खंबीरपणे तोंड दिलं असेल, अन् या त्रासाचा सुगावा कुटुंबीयांना लागू न देता घर कसं चालवलं असेल?

लताचा हा संघर्ष सर्वात मोठा आहे. या बाबतीत तिला मार्गदर्शन करायला कोणी वडील अथवा अनुभवी व्यक्ती नव्हती. किशोरवयीन लता एकटीच कामाला जात होती. आर्थिक व्यवहार सांभाळत होती. या अग्निदिव्यातून ती तावूनसुलाखून बाहेर पडली तेव्हा कणखर झाली; कडवट बनली नाही. तिच्या स्वाभिमानाबरोबरच तिची उपजत तल्लख विनोदबुद्धी कायम राहिली, हेदेखील तिचं मोठे यश आणि कर्तृत्व म्हटलं पाहिजे.

कडवट न होता, न कंटाळता केलेल्या या खडतर संघर्षामुळेच लताला अद्भुत म्हणावं असं यश मिळालं. तिचं यश हा दैवी न्याय होता. तिने आधी किंबहुना भोगलेल्या त्रासाची ती पुरेपूर भरपाई होती. हे यश नेत्रदीपक आणि देदीप्यमान या विशेषणांपलीकडचं होतं. ते अपूर्व यश होतं. लतानं यशाची व्याख्याच बदलून टाकली. किंबहुना लता म्हणजे यश अशी नवी व्याख्या तयार झाली. राजकपूर सारख्या स्वयंभू निर्माता-दिग्दर्शकाला ‘मेरा नाम जोकर’ पडण्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्यात लताचं गाणं नसणं हे वाटतं, तेव्हा ही व्याख्याच एका परीने सिद्ध होते.

म्हटलं तर राज कपूरचा अंधविश्वास होता, आणि म्हटलं तर लतावरचा गाढ विश्वास! ‘जोकर’ नंतरच्या ‘बॉबी’मध्ये लताला घेऊन त्यानं जणू या अपराधाचं प्रायश्चित्त घेतलं! सुखदाश्चर्य म्हणजे ‘बॉबी’ सुपर हिट झाला! लतानं राजचा विश्वास सार्थ ठरवला! यातला गमतीचा भाग सोडा, पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ‘जोकर’चं दारूण अपयश धुऊन काढण्यासाठी राज कपूरनं शस्त्र खाली ठेवून ‘आर. के. फिल्मस’च्या भविष्यकालीन चित्रपटातल्या अभिनयाची सूत्र चि. ऋषी कपूरकडे सोपवली आणि त्याला प्रस्थापित करण्यासाठी पूर्वासूरींना (शंकर-जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी) बाजूला ठेवून नव्या नायकासाठी नव्या संगीतकार गीतकाराबरोबर (लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आनंद बक्षी) नवा गायक (शैलेंद्र सिंग) घेऊन नवा डाव सुरू केला. मात्र नव्या नायिकेसाठी (डिंपल कपाडिया) नवी गायिका न घेता तिच्यासाठी लताचा आवाज कायम ठेवला!

‘बॉबी’च्यावेळी लतानं पन्नाशी पार केली होती. सुदैवानं तिच्या स्वरातील कोवळीक तरीही कायम होती. तिचं गाणं आणि गायनाचं तंत्र परिपक्व झालं होतं. जी. ए. कुलकर्णी त्यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘मधात बुडवलेल्या सोन्याच्या पातळ तारेसारख्या’ आवाजातला कोवळा गोडवा जसाच्या तसा होता. जेमतेम सोळा वर्षाच्या नवयौवना डिंपलला तिचा आवाज शोभला.

या कोवळीकीमुळे चित्रपटांतील बाल कलाकारांची गाणी नेहमी तिच्यावर सोपवली जायची. त्यातही आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे १९६२मध्ये ‘मै चूप रहूंगी’ या चित्रपटासाठी “तुमही हो माता पिता तुमही हो” हे गाणं बबलू या बाल कलाकारासाठी गाणाऱ्या लतानं त्यानंतर वीस-पंचवीस वर्षानंतर देव आनंदच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ मधल्या मास्तर सत्यजितसाठी ‘फूलों का तारों का सबका कहना है’ हे गायलं आणि गाजवलंही!

पार्श्वगायनातल्या थक्क करणाऱ्या विविधतेनं लताच्या गानगुणाचं ऐश्वर्य वाढवलं; आणि लतानं व तिच्या समकालीन (पार्श्व) गायकगायिकांनी चित्रपटसंगीत घरोघर पोचवलं. प्रथम शास्त्रीय संगीताच्या तुलनेत या संगीताला दुय्यम मानलं जात होतं. परंतु अनिल विश्वास, नौशाद, सी. रामचंद्र, आर. डी. बर्मन, सलील चौधरी, मदन मोहन, रोशन, शंकर-जयकिशन प्रभृती संगीतकारांनी शास्त्रीय रागदारीवर आधारित गाणी सातत्यानं देऊन चित्रपट संगीतालासुद्धा स्वतःचं व्यक्तिमत्व आहे, कस आहे, वेगळेपण आहे, हे सिद्ध केलं. चित्रपटांच्या कथांच्या प्रकारानुसार त्यांचे बरेच प्रकार निर्माण झाले. एकाच चित्रपटात लहानथोर सर्वच कलाकारांसाठी प्रणय गीत, अंगाई, भजन, जीवन तत्त्वज्ञान विषयक गाणी ऐकायला मिळू लागली. या सर्वसमावेशक संगीत प्रकारांना ठुमरीपासून लावणीपर्यंत आणि कोळी गीतापासून कव्वालीपर्यंत सर्व प्रकार आपलेसे केले. राजवाडे आणि कोठी यांच्यामध्ये बंदिस्त झालेल्यां संगीतचित्रपटांनी आणि (आकाशवाणीनं) देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवलं. शैलेंद्र, साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, भरत व्यास, इंदिवर, कैफी आजमी यानी धुंद प्रणय गीतांबरोबरच वात्सल्य, देशभक्ती, मानवता, समानता, कौटुंबिक व सामाजिक कर्तव्य, नव्या समाजाची बांधणी, जीवन मूल्य अशा जीवनाच्या सर्वांगाना स्पर्श करणारी गाणी समर्थपणे लिहिली.

गीतकार- संगीतकार – गायक यांच्या अप्रतिम सांघिक कामगिरीनं पाचव्या दशकात हिंदी चित्रपट संगीताचं सुवर्णयुग निर्माण केलं. या सर्व कलाकारांमुळे संगीत हा चित्रपटाचा अविभाज्य हिस्सा बनला. चित्रपट चालवण्याचा हुकमी एक्का ठरला.

चित्रपटसंगीताला मान्यता मिळाली. प्रतिष्ठा मिळाली आणि गायक, गीतकार आणि संगीतकार ‘स्टार’ बनले. नायक-नायिकांप्रमाणे त्यांचे चाहते – नवे, भक्त निर्माण झाले. हिंदी चित्रपटाला नाकं मुरडणारे देखील त्यांच्या संगीतावर आणि संगीतकार- गीतकारांना व गायकांवर फिदा होते. पु. ल. देशपांड्यांनी लताचा गौरव करताना म्हटलं आहे, ती गाते तेव्हा नायिका होते आणि आणि पडद्यावरच्या सुंदर नायिका पार्श्वनायिका होतात!

चित्रपटसंगीताला आणि पार्श्वगायनाला आता स्वतंत्र संगीताचा दर्जा मिळाल्यासारखा आहे. यात लताचा सिंहाचा हिस्सा आहेच. तरीही मराठीभाषकच नाही, तर संपूर्ण देशातले संगीतप्रेमी चित्रपटसंगीताच्या आजच्या वैभवाचं श्रेय देताना लताचं नाव सर्वप्रथम घेतील. कारण चित्रपटसंगीतातली सर्वाधिक चांगली गाणी लताच्या नावावर जमा आहेत, हे एक कारण संख्येनंही सर्वाधिक गाणी तिच्याच खात्यामध्ये असतील. पण सर्वात खरं कारण म्हणजे श्रोत्यापर्यंत पोचण्याचे सर्वाधिक सामर्थ्य तिच्याजवळ आहे. तिचा सूर त्यांच्या कानात नाही तर हृदयात शिरतो. ती म्हणजे हिंदी चित्रपटसंगीताचा चेहरा आहे. गायक नेहमीच गीतकार, संगीतकारांपेक्षा जास्त भाव खाऊन जातो. दिग्दर्शकापेक्षा अभिनेता लोकप्रिय असतो, तसेच इथे आहे. नटनटींमुळे  जसं लेखक- दिग्दर्शकाच्या कामगिरीला दृश्यरूप मिळतं, तसंच गीतकार-संगीतकाराचं कर्तृत्व गायकामुळे साकार होतं असतं.

ते साकार करण्यासाठी प्रत्येक गायकाजवळ गोड गळ्याखेरीज काही ना काही विशेष गुण असावा लागतो. लताचा खास गुण आहे तिच्या गायनातील दृश्यात्मकता. तिच्या गळ्यात जणू एक छुपा कॅमेरा आहे आणि तो त्या गाण्यामधल्या भावभावनांचा फोटो काढतो. चित्रपटातलं दृश्य पाहिलं नाही तरी काहीही बिघडत नाही. लताच्या गायनातून ते जसंच्या तसं तुमच्यापुढे उभा राहतं.

‘बैजू बावरा’मधील ती दोन अवीट गोडीची गाणी आठवा. ‘बचपन की मोहब्बत को दिल से ना जुदा करना’ आणि ‘मोहे भूल गये सांवरिया’. कोवळ्या हृदयभंगाचा दुःख मीनाकुमारीच्या सुकुमार चर्येवर ज्या पारदर्शीपणे दिसलं, तसंच ते लताच्या कंठातूनही जिवंत झालं. तसंच ते अतीव सुंदर गाणं- ‘थंडी हवाए लहराके आये.’ प्रेमाची उत्फुल्लता व्यक्त करताना त्या अंतऱ्याला गोड लकेरी घेणारा लताचा आवाज जणू दाही दिशा हिंडून येतो. जमिनीच्या झुल्यावरून आभाळाला हात लावून येतो.

‘मेरे ख्वाबो में खयालों में’ हे तर आजच्या भाषेत, ‘आऊट ऑफ धीस वर्ल्ड’ गाणं! गाण्याची अशी रचना फक्त सलील चौधरी करू जाणे ! या गाण्यात लताच्या वाट्याला शब्दच नाहीत. इथं ती प्रत्येक कडव्यानंतर फक्त लकेरी घेते. तिचा साथीदार सहजीवनाच्या स्वप्नांची भरारी घेत असतो, आणि ‘ती’ या लकेरीमधून त्याला साथ करत असते.

संघर्ष काळात छोट्या लतानं काही चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. तो तिने पडद्यापुढता सोडला, पण आपल्या गाण्यांमधून जपला. त्यामुळे तिच्या पार्श्वगायनातील रंगत वाढली. ‘पाकीजा’मधल्या ‘चलो दिलदार चलो’मधलं अस्फुट मोहक हास्य.. ‘चुडी नही है मेरा दिल है’ (गॅम्बलर) मधलं खट्याळ खळाळतं हसू.. ‘कितनी ठंडी है ये ऋत’ (तीन देवीयां) मध्ये ‘कापे है अंगडाई’मध्ये कडाक्याच्या थंडीनं अंगावर उभा राहिलेला शहारा.. ‘हम तुम, एक कमरे में बंद हो’मध्ये ‘शेर आ जाए’ असा उल्लेख होताच ‘बाबा मुझे डर लगता है’ हा तिने दिलेला भयभीत प्रतिसाद हे वाचिक अभिनयाचे सुंदर नमुने आहेत. ‘यहा हमे जमाना देखे, आवो चलो कहीं झुक जाए’ (‘आज मदहोश हुवा जाए रे’ –शर्मिली) या प्रियकराच्या सूचक मागणीला ‘अच्छा’ म्हणून तिनं दिलेला खोडकर प्रतिसाद ‘बागों में बहार है’ (आराधना) आणि ‘अच्छा तो हम चलते है’ मधे तर संपूर्ण गाण्यात ‘ति’ची आणि ‘त्या’ची सवाल जवाबांच्या कितीतरी सुंदर, सुरेल आठवणी कानांत आणि मनात साठवलेल्या आहेत. (एका स्टेज कार्यक्रमात ‘अच्छा तो हम चलते है’ हे गाणं सादर करताना लता त्याच्या शेवटापाशी आली तेव्हा हातातल्या पर्सला झोका देऊन गातगात ‘विंग’ मध्ये गेली होती, या उत्स्फूर्त क्षणाची सुखद आठवण इथे होते.)

हा वाचिक अभिनय हा लताच्या गायकीतला बुद्धीचा भाग आहे. काहीकाही माणसांना निसर्गतः एखाद्या कलेची किंवा कामाची देणगी मिळते. मात्र तिच्या बळावर कोणी चिरस्मरणीय कामगिरी बजावू शकत नाही. उपजत देणगीला अभ्यासाची जोड द्यावी लागते. कामगिरी उंचावण्यासाठी स्वतःचं तंत्र, स्वतःच्या पद्धती बसवाव्या लागतात. काळाबरोबर पावलं टाकावी लागतात आणि कार्यपद्धतीत वेळोवेळी बदल करावे लागतात; सुधारणा कराव्या लागतात. लता आणि सचिन तेंडुलकर हे सारं करतात म्हणूनच त्यांना अपूर्व यश  लाभतं.

या यशाचा धवल पैलू म्हणजे ते एकांगी नाही. लता आपल्या गायन क्षेत्रात अव्वल ठरलीच, शिवाय महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही सामाजिक, सांस्कृतिक जीवनातही तिला सदैव मानाचं स्थान मिळालं. महाराष्ट्रानं तिला डोक्यावर घेतलं! तिच्यातल्या कलाकाराइतकंच तिच्यातल्या माणसाचं, तिच्या स्वभावाचं महाराष्ट्रानं भरभरून कौतुक केलं. लताचं वाचनवेड, साहित्य आणि साहित्यिक यांच्याबद्दलची तिची आस्था, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सेनापती बापट यांच्याबद्दल तिला वाटणारा भक्तिभाव, तीच क्रिकेट प्रेम, तिचं फोटोग्राफीतलं कौशल्य, तिची पांढऱ्या (च) साड्यांची आवड, तिची साधी राहणी इत्यादी वैयक्तिक तपशील गेल्या चार पिढ्यांत तरी आवडीनं सांगितले आणि ऐकले गेले तसंच लिहिले आणि वाचले गेले.

महाराष्ट्राने लताला दिलेला सर्वात मोठा मान म्हणजे एका साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद (आळंदी, पुणे, १९९६) लतानं सुरेख भाषण करून साहित्याबद्दलची आपली जाण दाखवून दिली. आणि अर्थातच उपस्थितांची मनं जिंकली. या वेळी पद्याऐवजी गद्य भाषेतून! मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतल्या कुणाही एका व्यक्तीला समाजानं एवढं जवळ केलं नसेल, आपलं म्हटलं नसेल. ज्या भारतरत्न पदवीबद्दल उठसूठ उलटसुलट चर्चा आणि वादविवाद होतात, आणि जो एकेकाळी दुर्मिळ होता, तो देशातला सर्वोच्च मान लताला वेळीच मिळाला आणि त्याबद्दल चिमूटभर वाद नाही. एकही दुमत झालं नाही! मराठीत तिच्यावर लिहिली गेली तेवढी पुस्तकं क्वचितच अन्य कुण्या नामवंतांबद्दल लिहिली गेले असतील. ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांनी तर तिच्यावर एक कादंबरी लिहिली आहे, ‘कुहूकुहू’ या समर्पक नावानं! राज कपूरला ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ ची प्रेरणा लताबाईंनी  दिली.

‘ऐ मेरे वतन के लोगो’ सारखं अजरामर गीत भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या समोर गाण्याचा मान लतालाच मिळाला. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना त्यांच्या कविता स्वरबद्ध करण्याचा सन्मानही तिला लाभला. गेल्या काही वर्षात तिला किती पुरस्कार सत्कार, पदव्या अन् मानसन्मान मिळाले त्याची मोजदाद करणे मुश्कील आहे. एवढंच म्हणून पुरेसा आहे की, तिच्या कष्टाचं पुरेपूर चीजं झालं आहे आणि तिच्या कलागुणांना न्याय मिळाला आहे. अन् त्याला ती सर्वथैव पात्र आहे. ऐंशीव्या वर्षाच्या लताला ए. आर. रहमानसारखा संगीतकार तिच्या वयाला आणि गळ्यालाही साजेसं गाणं देतो. (‘रंग दे बसंती’ : लुकाछुपी बहूत हुई..) ही देखील लताची कमाईच आहे. ती करणं तिला जमलं. कारण एक तर तिचा लखलखीत शुद्ध कलागुण, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि अस्मिता. काय करावं आणि काय नाही हे तिला चांगलं समजतं. पार्श्वगायनाव्यतिरिक्तही ती गाऊ शकते, स्वतंत्र गायन करू शकते हे ‘मीरा’, ‘मोगरा फुलला’ यांनी दाखवून दिलं. (लताचा गळा लाभला तर अशा चाकोरीबाहेरच्या ध्वनिमुद्रिकांचाही रेकॉर्ड तोड खप होतो.)

मनात आणलं असतं तर लता शास्त्रीय संगीतही गाऊ शकली असती. पण ते सिद्ध करण्याच्या फंदात पडणं म्हणजे ज्या पार्श्वगायनानं तिला स्वरसम्राज्ञी बनवलं, ज्यानं तिला नवा संगीत प्रकार गाण्याचा आणि रुजवण्याचा आनंद दिला, त्याला अकारण कमी लेखण्यासारखं झालं असतं. पार्श्वगायनानं तिला मोठं केलं, तिनंही त्याला मोठं केलं. लोकमान्य अन् राजमान्य बनवलं. यानंतर लताला गानप्रभुत्व वेगळ्या रितीनं सिद्ध करण्याची गरज नव्हती. पाश्चिमात्य वळणाची आधुनिक गाणी लता गाऊ शकेल की नाही याबद्दल कुठूनसं प्रश्नचिन्ह झालं, तेव्हा ‘इन्तकाम’ मधलं ‘आ जाने जा’ हे कॅबेरे गीत आणि ‘चंदन का पलना’ मधलं ‘शराबी, शराबी मेरा नाम हो गया’ हे मदिरा गीत सुरेख गाऊन लतानं शंकासुरांना चोख प्रत्युत्तर दिलं. (या आगळ्यावेगळ्या गाण्यांच्या यादीत ‘क्या जानू सजन’ या ‘बहारों के सपने’ मधल्या गाण्याचाही अवश्य उल्लेख करायला हवा. ध्वनी/प्रतिध्वनीचं तंत्र त्यात कौशल्याने वापरलेलं आहे.)

पार्श्वगायनातलं सर्व वैविध्य आणि वैचित्र्य लताला गायला मिळालं. मीनाकुमारीसारख्या श्रेष्ठ अभिनेत्रीच्या कारकिर्दीतली सुरुवातीपासून शेवटपर्यंतची गाणी लताने गायली. शोभना समर्थ, नूतन, तनुजा, काजोल या एकाच घरातल्या चार प्रथितयश नायिकांसाठी लतानं आवाज दिला. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या पाच पिढ्यांच्या नायिकांना लताचा गाता गळा लाभला. सर्व वयाच्या सर्व नायिका, सहनायिका आणि चरित्र नायकांसाठी ती गायली. अमिताभ – पर्वात चित्रपटात तीन नायक व तीन नायिका घेण्याची प्रथा पडली त्याकरता निर्माते नायकांसाठी तीन वेगवेगळे गायक घ्यायचे पण तीनही नायिकांना मात्र  लताचा एकटीचा आवाज असायचा. ही फक्त भागवाभागव नव्हती. निर्मात्यांचा लतावर पुरेपुर विश्वास होता : तिन्ही नायिकांसाठी एक लता पुरेशी आहे, या विश्वासापोटी तिचे एकटीच मानधन तीन पुरुष गायकांपेक्षा जास्त आहे याबद्दल त्यांची तक्रार नव्हती.

अमिताभ बच्चनच्या बहराच्या काळात त्याला ‘वन मॅन इंडस्ट्री’ हे विशेषण लावलं जायचं. पार्श्वगायनाच्या क्षेत्रात लताच्या कर्तृत्वाचं वर्णन याच विशेषणाने करता येईल.

उगाच का शाहरुख खानला तिच्यासारखं यश मिळवावं, असं वाटतं?

(मूळ लेख, ‘स्वरप्रतिभा’ दिवाळी अंक २०१७मधून साभार. संपादक प्रवीण प्रभाकर वाळींबे)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0