स्मृती इराणी कुटुंबियांच्या गोव्यातील रेस्तराँसाठी खोटी कागदपत्रे

स्मृती इराणी कुटुंबियांच्या गोव्यातील रेस्तराँसाठी खोटी कागदपत्रे

पणजीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या जोइश यांनी गोव्याच्या उत्तरेकडील आसगाव येथे चालवायला घेतलेले रेस्तराँ खोट्या कागदपत्रांवरून चर्चेत आले

सेक्स आणि इज्जत का सवाल!
पक्षांतराचे वारे, नेत्यांचे वातकुक्कुट
शैक्षणिक धोरणातले कौशल्यविकास कितपत फायद्याचे?

पणजीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या जोइश यांनी गोव्याच्या उत्तरेकडील आसगाव येथे चालवायला घेतलेले रेस्तराँ खोट्या कागदपत्रांवरून चर्चेत आले आहे. या रेस्तराँने एका मृत व्यक्तीच्या नावावर दारु विक्रीच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याची बाब उघडकीस आली आहे.

२१ जुलैला गोव्याचे अबकारी आयुक्त नारायण एम गाड यांनी जोइश इराणी संचालित सिली सोल्स कॅफे अँड बार या रेस्तराँला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये परवानाधारकाचा मृत्यू १७ मे २०२१ मध्ये झाला असतानाही परवान्याचे नूतनीकरण झाल्याचे नमूद केले आहे. या रेस्तराँने दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा व खोट्या कागदपत्रांचा उपयोग केल्याचाही आरोप या नोटीशीत आहे.

या रेस्तराँतील दारुविक्रीचा परवाना अँथनी डिगामा यांच्या नावावर करावा असे पत्र २२ जून २०२२ रोजी अबकारी खात्याला पाठवण्यात आले होते. वास्तविक अँथनी डिगामा यांचा मृत्यू गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. पण त्यांचा मृत्यू लपवून २०२२-२३ या काळासाठी परवान्याचे नूतनीकरण करावे यासाठी डिगामा यांच्यावतीने एक कायदेशीर विनंती पत्र दाखल केले गेले. या पत्रात येत्या सहा महिन्यात परवाना हस्तांतरित केला जाईल असे नमूद करण्यात आले होते.

रेस्तराँकडून झालेल्या कागदपत्र घोटाळ्याची तक्रार एक वकील आयरेस रॉड्रिग्ज यांनी अबकारी खात्याला केली, त्यानंतर प्रशासनाची चक्रे फिरू लागली.

रॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकारांतर्गत रेस्तराँची माहिती मागवली व एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी अबकारी खात्यातील अधिकारी व आसगाव पंचायतीतील संबंधित कसे सामील झाले व भ्रष्टाचार कसा झाला याची चौकशी करावी अशी तक्रार केली आहे.

या संदर्भातील पुढील सुनावणी येत्या २९ जुलैला होणार आहे.

रॉड्रिग्ज यांच्या मते, गोव्यातील कायद्यानुसार गोव्यातील बारचा परवाना हा चालू असलेल्या रेस्तराँना देता येतो. पण सिली सोल्स कॅफे अँड बारने गेल्या फेब्रुवारी महिन्यात अबकारी खात्याचे नियम धुडकावून विदेशी मद्य, भारतीयांनी तयार केलेले विदेशी मद्य व देशी दारु विक्रीचे परवाने मिळवले.

त्याच बरोबर मयत अँथनी डिगामा यांच्या नावाचे आधार कार्ड डिसेंबर २०२०मध्ये बनवण्यात आले होते. या कार्डवर त्यांचा पत्ता विलेपार्ले, मुंबई असा आहे.

रॉड्रिग्ज यांनी हा घोटाळा शोधून काढण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केले, त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर अँथनी डिगामा यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेतून मिळाले. हे प्रमाणपत्र मिळल्यानंतर रॉड्रिग्ज आश्चर्यचकित झाले की गोव्यातल्या १२०० चौ. मीटर क्षेत्रफळ आकारावर उभे राहिलेल्या या आलिशान रेस्तराँशी अँथनी डिगामा यांचा संबंध कुठून व कसा झाला?

यूट्यूबवर प्रसिद्ध खाद्य पदार्थ समीक्षक कुणाल विजयकर यांनी जोइश इराणी यांची एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सिली सोल्स हे गोव्यातील खाद्यपदार्थाचे मोठे आकर्षणाचे केंद्र होईल अशी प्रतिक्रिया जोइश इराणी यांनी एका प्रसंगात दिली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0