महानगरीय जगण्याच्या कुत्तरओढीचे बहुपेढी विच्छेदन

महानगरीय जगण्याच्या कुत्तरओढीचे बहुपेढी विच्छेदन

कवी सुशिलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय ....! या कविता संग्रहाला या वर्षीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. या कविता संग्रहाची ओळख करून देणारा हा लेख..

मजरूह सुल्तानपुरी: दिलदार काळजाचा विद्रोही कवी
‘गावाबाहेर’च्या कविता
अर्नेस्तो कार्देनाल: विश्वनिर्मितीचा इतिहास मांडणारा कवी

रोज घडणाऱ्या सामाजिक घटितांच्या थपडा खात कवी जगत असतो, जखमी होतो. आतल्या आत घायाळ होतो. या जखमा दुसऱ्याकडून होणाऱ्या नसतात, तर त्या कवी स्वतःलाच करून घेत असतो. एकांतात कवी जखमांचे विश्लेषण करतो, आलेख काढतो. आपल्यापुरतेच एक सूत्र तयार करतो आणि आतून तिसऱ्या आवाजाच्या प्रतीक्षेत बसल्यावर दिक्कालात पाहावा तसा कुठेतरीच पाहत असतो. जखमांना इलाज नसतो. पण काही घटितांना शब्दबद्ध करून कागदावर मांडताना दाह नक्कीच कमी होत असतो. परंतु, घटितांच्या तुलनेत कवितांचा वेग ससा कासवाच्या वेगाशी तुलना व्हावी इतक्या फरकाचा असतो. कवीला खूप काही सांगायचं असतं. प्रत्येक वैयक्तिक, सामाजिक गोष्टीवर व्यक्त व्हायचं असतं. पण ते शक्य नसतं आणि तसं होवूही नये. कारण प्रत्येक वेळी व्यक्त होणं हे काम पत्रकारांचं असतं. कवीला जे काही मांडायचं आहे ते कला म्हणून मांडाव लागतं. त्यात केवळ निवेदन करून चालत नाही तर कलात्मक सौंदर्याची निर्मिती करावी लागते. प्रतिभेला पंख लावावे लागतात. मनाची माती अधिक कसदार करून घ्यावी लागते. मगच कवितेच्या शब्दातून सौंदर्याचे धुमारे फुटू लागतात.

कवी सुशिलकुमार शिंदे यांचा ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ हा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाकडून ऑगस्ट२०१६ला प्रसिद्ध झाला. हा कविता संग्रह महानगराचं बहुपेढी वास्तव समर्थपणे अंगावर घेतो, त्याचं काटेकोर विच्छेदन करतो. आणि म्हणून समकालीन येत असलेल्या ग्रामीण, अर्धनागरी जोरकस प्रवाहापासून सुशिलकुमार यांची कविता वेगळी ठरते. यातून महानगराचा एक अकल्पित जीवन व्यवहार वाचकांपुढे उलगडत जातो. कवीचं मुंबईतील वास्तव्य आणि त्याला पावलो-पावली होणारं तेथील दर्शन, हा या कवितेचा गाभा आहे. यातील महानगराची पैसाकेंद्री व्यवस्था, कोरडं बाजारूपण, रुक्ष माणूसपण, गलिच्छपणा, मानवी तस्करी, काळे धंदे, राजकीय दांभिकता, लखाकी श्रीमंती आणि टोकाचं दारिद्र्य हे विविधांगी वास्तव सुन्न करणारं आहे. आतून हलवून सोडणारं आहे.

‘कूस बदलणारी शहरं
पटापट बदलत गेली
साथीच्या रोगाची लागण व्हावी तशी
बदलत राहिले नकाशे
आणि आत्म्याने टाकून द्यावी कात
पण थोडाही गुणधर्म बदलू नये
तशी अजून विषारी
होत गेली शहरं’

औद्योगिकरणाचं फलित म्हणून अंगावर फोड यावीत तशी शहरावर कारखाने उगवू लागली. कैक वस्तीच्या गरजा भागवू शकणाऱ्या वीज, पाणी, भूमी या भौतिक बाबी एकटा कारखाना भस्म करू

कवी सुशिलकुमार शिंदे

कवी सुशिलकुमार शिंदे

लागला. एकीकडे कारखान्याचं शहरात होणारं खुलं स्वागत, तर दुसरीकडे पैशाच्या चणचणीत जगणं, असह्य झालेली असीम गर्दी. दमछाक होते आहे, घुसमट वाढते आहे. बेकाऱ्या शिवाय गल्ली आणि भिकऱ्या शिवाय रस्ता मिळणं कठीण झालंय. शहर माणसांना हल्ली तांदळातले खडे बाजूला काढावेत तसं बाजूला काढतं आहे. मग ही मंडळी शहराच्या गाभ्याकडं आशाळभूत पाहत शहराच्या आजूबाजूने वस्ती करत राहाते. इथे माणसांच्या गरजेला किंमत नसते, तर त्याच्या चलनीपणाला असते. चालू शकणारा अधिक वेगवान धावू शकतो, तर चालू न शकणारा थेट पांगळ्यात निघतो. अशांना आधार न देऊ शकणारं हे शहर कवीला ‘विषारी’ वाटणं अपरिहार्य आहे.

चालू काळ हा संभ्रमित करणारा आहे. प्रश्नाचं जाळ अधिक घट्ट करणारा आहे. घटनेतल्या समानतेसाठी मधेच कुठूनतरी एखादा आवाज उंच होतो. आणि कुणाला काहीच कळण्याआधी निवतो. दूर महाराष्ट्रभर विखुरलेली पोटार्थी माणसं यापासून अनभिज्ञ असतात. पिढ्यान्पिढ्या आपले कपाळभोग कुरवाळत राहतात. शक्यतो दोष कुणाला देत नसतात. दिला तर फक्त नशिबालाच देतात. महाराष्ट्रात आजही सत्तर टक्के कुटुंबे शेतकरीच आहेत. हा एवढा मोठा वर्ग इथल्या मुख्य सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शैक्षणिक, औद्योगिक उलथा-पालथीपासून कायम दूर असतो. यावरून इथल्या असमान व्यवस्थेची कल्पना येऊ शकते. विषमतेतून शेतकऱ्याचे प्रश्न आज खूपच गुंतागुंतीचे झालेले आहेत. बहुतांशी कवींच्या चिंतनाचा हा विषय होत आहे. या संग्रहातील ‘बिनचेहऱ्याची माणसं’ ही कविता त्या दृष्टीने शेतकऱ्याची ससेहोलपट, त्याच्या प्रश्नाची दाहकता लक्षात आणून देण्याला पुरेशी बोलकी आहे.

 ‘दुष्काळात जळून जात नाही फक्त पीक
सातबऱ्यावरचं नावही होत जातं फिक्कट
बाप घेतो फास
आणि जनावरे वाटचाल करतात कत्तलखान्याकडे
मोठ्या मुश्किलीने
माय धरते शहराची वाट
कत्तलखाण्याकडे जाणाऱ्या गाईसारखीच

नाईलाजाने शहराकडे निघालेल्या मायसाठी कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गाईची प्रतिमा ही एकंदर घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर होणारी शेतकरी कुटुंबाची ससेहोलपट प्रत्ययकारीपणे दाखवते.

२०१८ साल उजाडलं तेच एक विचित्र घटना घेऊन. महाराष्ट्राची सामाजिक संवेदनशीलता बधीर करणारी ती घटना होती. जातीच्या नावानं माणूस माणसापासून तोडत जातीच्या नावानं राष्ट्रीय ऐक्यावर घातलेला तो एक घाव होता. एका वादग्रस्त ऐतिहासिक घटनेवरून विवेकहीन अभिनिवेशाने जातीय दंगे घडवले गेले. महाराष्ट्र बंद करून लाखो लोकांना वेठीस धरण्यात आलं. करोडोचं नुकसान झालं. यावर कवींनी व्यक्त व्हायचं नाही तर कशावर व्हायचं? आजूबाजूला बॉम्बची शेती उगवत असताना साहित्यिक, विचारवंतांना आता हातावर हात ठेवून बसणं अशक्य आहे. असे बसणारे खूप वेगानं प्रवाहाबाहेर फेकले जातील. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तर त्यांची कामे करतच आहेत. (त्यांच्या नैतिकतेवर इथं बोलायला नको) पण साहित्यिकांनी निर्भीड भूमिका घेतली पाहिजे. सत्तेच्या बालिशपणावर डोळे वटारले पाहिजेत. इथे साहित्यिक निष्ठेचा कस लागत असतो. या दृष्टीने कवी सुशिलकुमारांची पुढील ओळ पाहण्यासारखी आहे,

‘धर्माच्या साग्रसंगीत प्रार्थना
करत राहतात दफन
माणसांचे हुंकार

 आणि याच कवितेतील शेवटच्या ओळी आहेत,

‘गाथा तारणाऱ्या इंद्रायणीच्या काठावर
 ऐकू येतेय विमानाची घरघर’

समाजातील विवेकशील सज्जनपणा गाडण्यासाठी टपून बसलेली हिंस्त्र शक्ती कुठल्याही काळी त्याच आवेशाने कार्यरत असते. जगात उजेड पेरायला निघालेल्या तुकारामाला क्रूरपणे संपवण्यात आलं, आणि काल्पनिक विमानात बसवून वैकुंठाला पाठवण्यात आलं. हे साधं सत्य चारपाचशे वर्षे झाली तरी इथल्या पंडिती कड्यातून बहुजन वारकरी महासागरात नीटपणे झिरपत नाही. यावरून आपल्याला इथल्या स्तरभेदीय समाजव्यवस्थेची कल्पना येऊ शकते.

या संग्रहातील ‘मार्क्स वाचवणारे शहर’, ‘मुके राहण्याचा गुन्हा’, ‘तूर्तास दिसेल जागा तिथे पसर’, ‘कुणबीनबाई’, ‘प्रस्थानखुणा’ या कविताही वेगवेगळं समाजवास्तव कवेत घेत संपन्न आशय व्यक्त करतात. प्रत्येक कविता वाचताना वाचक एका वेगळ्या भूमिकेत गुरफटून जातो. त्याच वेळी मनाच्या दुसऱ्या काठावर कवीचं राहून राहून कौतुक वाटतं. त्याचं आकलन, भाषा, भूमिका, तळमळ, एकूण जाणीवांची खोली जाणवत राहते.

एकंदर आजच्या नव्या दमाच्या कवितेच्या ताकदीची चुणूक पाहण्यासाठी तरी हा संग्रह नक्कीच वाचला पाहिजे. पोटपाण्यासाठी विविध भागातून शहरात स्थलांतरित झालेल्या कैक जीवांची गेल्या तीन दशकातील कुत्तरओढ या संग्रहात प्रकर्षाने शब्दबद्ध झालेली आहे. ‘शहरच्या… ‘ निमित्ताने मराठी कवितेच्या प्रांगणात निश्चितच एका आश्वासक कवीचे आगमन झालेले आहे.

(‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ – कवी- सुशिलकुमार शिंदे, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0