झंझावात व फक्त झंझावात

झंझावात व फक्त झंझावात

युवराज सिंग हे भारतीय क्रिकेटमधले स्वयंसिद्ध कर्तृत्व होतं. कोणाचाही प्रभाव नसलेली पण स्वत: निर्माण केलेली शैली हे या खेळाडूचे वैशिष्ट होते. ज्या काळात भारतीय संघ विजयासाठी आसुसलेला होता, ज्याला सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूची नितांत गरज होती, अशा काळात युवराज भारतीय संघात आला आणि त्याने इतिहास घडवला. ११ जूनला युवराजने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आणि क्रिकेटविश्व हळहळले. अशा कर्तृत्ववान खेळाडूच्या कारकिर्दीचा घेतलेला हा लेखाजोखा.

इंग्लंडचा भारत दौरा: भारताची सव्याज परतफेड..
भारतासाठी अहमदाबाद कसोटीत विजय अत्यावश्यक
जनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)

२००० हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी कात टाकण्याचा काळ होता. क्रिकेटचे तंत्र वेगाने बदलत चाललं होतं. तो पर्यंत भारतीय संघ क्षेत्ररक्षणात कमकुवत मानला जायचा. प्रथम फलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला लक्ष्य देणं या ‘कम्फर्ट झोन’मध्ये भारतीय संघ कायम असायचा. पण लक्ष्याचा पाठलाग करण्याचे साहस भारतीय संघात नसायचे. त्यावेळी संघात अजय जडेजा सोडल्यास एकही मॅच फिनिशर नव्हता. संघात नवज्योत सिद्धू, अजहर, अजय जडेजा, रॉबिन सिंग असे मधल्या फळीत गुणवान पण पारंपरिक क्रिकेट खेळणारे फलंदाज होते. पण संघात ‘एक्स फॅक्टर’ नव्हता. अजय जडेजा आणि रॉबिन सिंग यांनी तो आणायचा प्रयत्न केला होता. पण त्यांच्या स्वत:च्या मर्यादा होत्या.
याच काळात भारतीय क्रिकेटला मुळासकट हादरून सोडणारं मॅच फिक्सिंगचं प्रकरण घडलं. अजय जडेजा, अजहर संघाबाहेर पडले. रॉबिन सिंगने ९९च्या वर्ल्डकपनंतर निवृत्ती घेतली. नवज्योत सिद्धूचा करिश्मा संपला होता. पण मॅच फिक्सिंगचं दुःखद, चीड आणणारं प्रकरण भारतीय संघाला वेगळ्या अर्थाने फायद्याचे ठरले. निवड समितीने काही खेळाडूंना अर्धचंद्र दिल्याने भारतीय संघात तरुण खेळाडूंना संधी मिळाली.
भारतीय संघाचं कर्णधारपद सौरव गांगुलीकडे गेले. त्याने नव्या दमाचा संघ बांधण्यास सुरूवात केली. संघात युवराजसिंग, मोहम्मद कैफ, झहीर खान, हरभजनसिंग, वीरेंद्र सेहवाग आले. आणि नंतरचा इतिहास सर्वांना माहितच आहे. पण सौरव गांगुलीकडे सूत्रे आल्यानंतर म्हणजे २००० पासून भारतीय संघाची प्रतिमा बदलत गेली. क्षेत्ररक्षणात मार खाणारा, लक्ष्याचा पाठलाग करू न शकणारा, मॅच फिनिशर्स नसलेला संघ अशी भारतीय संघाची ओळख हळूहळू पुसली जाऊ लागली. २००० साली युवराजला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. ‘आयसीसी नॉक आऊट चॅम्पियन्स ट्रॉफी’मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात ग्लेन मॅकग्रा सारख्या दिग्गज गोलंदाजाला जुमानलं नाही. या सामन्यानंतर तमाम क्रिकेट रसिकांना युवराज सिंग या नव्या करिष्म्याची ओळख होऊ लागली. पण हे सातत्य त्याला लगेच पुढे दाखवता आले नाही. पुढील दोन वर्षे त्याचे संघातले स्थान डळमळीत होते. तो संघाच्या आत बाहेर जात होता. कर्णधार गांगुलीला मात्र त्याच्या खेळातले सत्व लक्षात आले होते. २००२च्या इंग्लंड येथील नॅटवेस्ट सीरिजसाठी युवराजला संघात घेण्यात आले. ही सीरिज युवराज व मोहम्मद कैफच्या जिगरबाज खेळीने भारतीय संघाने जिंकली. सुरवातीला वाईट अवस्था आल्यावर नंतर खेळाचा नूर पालटणारी भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या भूमीत विशेष प्रभावी दिसली, कारण त्यावेळी युवराज सिंग नावाच्या ‘एक्स फॅक्टर’ने जन्म घेतला होता. नॅटवेस्ट सीरिजने भारतीय क्रिकेटमध्ये आत्मविश्वास आणला.

युवराजच्या येण्याने भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीतील उणीव भरून निघाली. या फळीत दमदार, खेळपट्‌टीवर टिकून दमदार फलंदाजाची आवश्यकता होती. ही कमतरता युवराजने भरून काढली. एवढंच नव्हे तर  भारतीय संघात ‘मॅच फिनिशर’ नव्हता, तेही स्थान युवराजने आपल्या दमदार फलंदाजीने भरून काढलं. भारतीय फलंदाजी कोलमडल्याची परिस्थिती दिसली की ‘युवराज है ना’, असं क्रिकेट रसिकांना वाटू लागले. लाखो रसिक त्याच्या भरवशावर राहू लागले.

युवराज संघात येण्यापूर्वी भारतीय फलंदाजीच्या वरच्या फळीत सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली हे दिग्गज खेळाडू बाद झाले की उरलासुरला संघही नांगी टाकायचा. पण युवराजच्या उपस्थितीमुळे, हा खेळाडू भारताला सामना जिंकून देऊ शकतो असा आत्मविश्वास क्रिकेट रसिकांमध्ये निर्माण व्हायला सुरूवात झाली.

सर्वसाधारण क्रिकेट रसिकांमध्ये शतक ठोकणाऱ्या फलंदाजाचे कौतुक होताना दिसते. आणि अशी कामगिरी सलामीला किंवा त्यानंतर येणाऱ्या तिसऱ्या-चौथ्या स्थानावर असलेल्या फलंदाजाकडून होत असते. मधल्या फळीत येऊन शतक ठोकणे ही कामगिरी तशी अवघडच.

२००१च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज माईक हेडनने भारतीय संघाबद्दल एक निरीक्षण व्यक्त केले होते. तो म्हणाला होता की, ‘भारतीय फलंदाजाने एखाद्या सामन्यात शतक ठोकलं की त्याला क्षेत्ररक्षणामध्ये सुमार कामगिरी वा झेल सोडले तरी सूट मिळते. त्याला कोणी दोष देत नाहीत.’

हेडनचा अंगुलीनिर्देश युवराजच्या फलंदाजीतल्या क्षमतेवर व क्षेत्ररक्षणातील लालित्यावर होता.

युवराजची फलंदाजी दमदार होती पण तो मधल्या फळीत फलंदाजी करत असल्याने त्याच्याकडून शतक ठोकले जात नसे. याचे नैराश्य त्याला आले. त्याने मानसोपचारतज्ज्ञांकडून सल्ले घेतले. मानसोपचार तज्ज्ञांनी त्याला समजावले की, तू जरी वरच्या फळीत बॅटिंग करत नसलास व त्याने तुझे शतक होत नसले तरी तू ‘मॅच फिनिशर’ हो. संघाला निर्णायक क्षणी विजय मिळवून दे. विजयासाठी शतकेच महत्त्वाची नसतात, तर महत्त्वाच्या खेळीही प्रभावी व्हाव्या लागतात. तू सामना जिंकताना फक्त खेळपट्टीवर राहा.’

मानसोपचारतज्ज्ञांच्या अशा सल्ल्यानंतर युवराजच्या मानसिकतेत जबरदस्त जोश, सकारात्मकता निर्माण झाली. त्याने सुरवातीला येऊन शतके मारण्याचा विचार सोडून देऊन मधल्या फळीवर संपूर्ण लक्ष केंद्रित करून भारताला सामने जिंकून देण्यास सुरूवात केली. लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकवून देताना युवराज खेळपट्टीवर अखेरपर्यंत असायचा. भारतीय संघाची प्रथम फलंदाजी असेल व पहिली फळी तंबूत परतली की युवराजचा करिष्मा मैदानावर दिसायचा. अशाने तो ‘मॅच फिनिशर’ झाला. या बळावर त्याने भारताला अनेक सामने जिंकून दिले.

डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची एक अजब शैली असते. त्यांच्यात सहजता असते. युवराजच्या शैलीत अशी सहजता होती. त्याचा क्रीझवरचा स्टान्स व चेंडू मैदानाच्या चोहोबाजूला टोलवण्याची शैली अफलातून होती. भारताच्या क्रिकेट विश्वात असा डावखुरा फलंदाज नव्हता, ती कसर युवराजने भरून काढली.

युवराजच्या तडाखेबाज शैली ही एकदिवसीय सामन्यात दिसून आली होती पण कसोटीमध्ये त्याचा जम बसला नव्हता. पाकिस्तानविरुद्ध तडाखेबंद शतक ठोकूनसुद्धा त्याला आपली जागा संघात पक्की करता आली नव्हती. पण २००८मध्ये इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत पाचव्या दिवशी अत्यंत कठीण खेळपट्टीवर मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने सचिन तेंडुलकरसोबत महत्त्वाची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला आणि कसोटीतही आपण चांगले खेळू शकतो हे दाखवून दिले.

२००७साल प्रत्येक क्रिकेट रसिकाला आठवत असेल. या वर्षी पहिला ट्वेन्टी-२०  ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत युवराजची प्रत्येक सामन्यातील कामगिरी लाखो क्रिकेट रसिकाच्या मनात कोरली गेली. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला एक षटकांत त्याने मारलेले सहा षटकार हा त्याचा खरा झंझावात होता. स्टेडियमच्या सर्व दिशांकडे टोलवलेले त्याचे षटकार त्याच्या ताकदीचे ऐलान होते. या सहा षटकारांमुळे युवराजची खेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद झाली. त्याच वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची अर्धशतकी खेळी त्याच्या कारकिर्दीतील एक जबरदस्त खेळी होती. त्याच्या त्या झंझावाती फलंदाजीने भारत ऑस्ट्रेलियाला हरवून अंतिम फेरीत पोहचला होता.

२०११च्या वर्ल्डकपमधील भारतीय संघाची कामगिरी ही अत्युच्च बिंदूवर पोहचली होती. या वर्ल्डकपचा मालिकावीर होता युवराज सिंग. फलंदाजीबरोबर गोलंदाजीतही चमक दाखवून युवराजने भारताला वर्ल्डकप जिंकून दिला होता. महेंद्रसिंग धोनीने तो प्रसिद्ध विजयी षटकार मारल्यानंतर युवराजने महेंद्रसिंग धोनीला मारलेली मिठी दोघांच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू, सचिनला दिलेली विजयाची भेट कोण विसरेल!

२०११ साल युवराजच्या आयुष्याला वळण देणारे ठरले. मैदानावर धुवाँधार खेळी करून भारताला विश्वचषक मिळवून देणाऱ्या या तडफदार खेळाडूला कॅन्सरला घेरल्याचे कुणाच्या गावीही नव्हते. खुद्ध युवराजलाही ते माहीत नसावं. पण जेव्हा त्याच्या कॅन्सरचं निदान झाले तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगत, क्रिकेट रसिक हळहळले. कॅन्सर झालेल्या अवस्थेतही युवराजने भारताला वर्ल्डकप जिंकून दिला यामुळे युवराजविषयी आदर वाढला. त्याने उपचार सुरू केले. २०११च्या एका आयपीएल सामन्यात केमोथेरपी घेत असलेला केशविहीन युवराज जगाने बघितला. तेव्हा प्रत्येकाचं काळीज चिरले गेलं.

कॅन्सरवर विजय मिळवून युवराजसिंग संघात परत आला पण डळमळीत परफॉर्मन्समुळे आणि संघातील काही अंतर्गत राजकारणामुळे युवराजचे स्थान धोक्यात आले. जी अवस्था त्याच्या कारकिर्दीच्या सुरवातीला आली होती, तशी ती पुन्हा उद्भवली. तेव्हा मात्र सौरव गांगुली हा त्याच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला पण तो पर्यंत परिस्थितीही बदलली होती.
२०१५च्या वर्ल्डकप संघ निवडीवरून प्रचंड वाद झाला. देशातल्या तमाम क्रिकेट रसिकांना युवराजसिंग संघात हवा होता. पण वर्ल्डकप संघात त्याला स्थान मिळालं नाही. युवीचे वडील योगराजसिंग यांनी मीडियासमोर तत्कालीन कर्णधार धोनीला दोषी ठरवत त्याच्यावर खूप आगपाखड केली होती. त्यापूर्वी झालेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये युवराजसिंगने जबरदस्त फलंदाजी करत पूर्वीच्या युवराजची आठवण करून दिली होती. पण अंतिम सामन्यात तो अपयशी ठरला होता. त्याच्या या कामगिरीवरून कर्णधार धोनी युवराजवर नाराज होता असे म्हटले जाते.

धोनीचे युग जाऊन विराट कोहलीचे युग आले. विराट व युवराजची मैत्री सर्वश्रुत होती. विराटने त्याला स्वत:च्या आयपीएल संघातही घेतले होते पण तोपर्यंत युवराजची कामगिरी समाधानकारक नव्हती. सध्या सुरू असलेला इंग्लंडमधील  वर्ल्डकप युवराजसिंग खेळेल अशी आशा अनेकांना होती पण आयपीएलमध्येच त्याला नीट संधी न मिळाल्याने त्याची भारतीय संघात निवड होण्याची सूतराम शक्यता नव्हती.

विश्वचषक सुरू असतानाच ११ जूनला युवराजने एकाएकी क्रिकेटमधून स्वत:ची निवृत्ती जाहीर केली. हा अनेकांना धक्का होता. युवराजसारखा लढवय्या खेळाडू मैदानावर निवृत्ती घेईल, असे वाटत असताना त्याने घेतलेली निवृत्ती मनाला चटका लावून जाणारी होती. आता निळ्या जर्सीतला युवराज मैदानावर पुन्हा कधीच दिसणार नाही, ही खंत आहे.

पण युवराजसारखे खेळाडू हे कधी स्वत:ला थांबवत नसतात. त्याने कॅन्सर रुग्णांसाठी ‘युवी कॅन’ ही संस्था सुरू केली आहे. त्या माध्यमातून तो सामाजिक कार्य करतोय. भविष्यात तो भारतीय संघाचा प्रशिक्षक किंवा समालोचक म्हणूनही दिसेलच. आपल्या शैलीचे धडे तो यापुढे क्रिकेटला देत जाईलच.

युवराज हे भारतीय क्रिकेटमधले एक पर्व होते. मैदानावर कर्करोगाला हरवणारा तो लढवय्या फलंदाज होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0