परिघावरचा दलित साहित्यिक – उत्तम बंडू तुपे

परिघावरचा दलित साहित्यिक – उत्तम बंडू तुपे

दलित उपेक्षित, शोषित मजूर आणि त्यांचे हेलावून टाकणारे दुःख तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी चाललेली अव्याहत धडपड हाच उत्तम बंडू तुपे यांच्या साहित्याचा गाभा आहे.

स्वातंत्र्यानंतर मराठी साहित्यात अनेक वाङ्मयीन प्रवाहांनी प्रवेश केला. यामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, कामगार साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य अशी काही ठळक नावे घेता येतील. यामध्ये महत्त्वाचा आणि स्वतःच्या अंगभूत गुणविशेषामुळे वाचक व समीक्षकांचे लक्ष वेधून घेणारा प्रवाह हा दलित साहित्याचा प्रवाह आहे. दलित साहित्याने मराठी साहित्यातील साचलेपणा दूर सारून त्याला गतिमान केले. दलित साहित्याने मराठी साहित्याची पारंपरिक चौकट ओलांडून नवा विषय- आशय, नवी अनुभवदृष्टी, नवे प्रतिमाविश्व दिले.

दलित साहित्याच्या मुळाशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी वैचारिक आणि सामाजिक क्रांती होती आणि आहे. आंबेडकरी विचारांनी प्रभावित झालेला इथला नवशिक्षित वर्ग अंतर्मुख होऊन आपला व आपल्या समाजाच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी धडपडत होता. या धडपडीत त्याला जाणवले की आपले पशुपातळीवर जगणे ह्याला जगणे म्हणताच येऊ शकत नाही. आपल्या समाजाची सगळ्याच पातळीवरील केली गेलेली ही कोंडी फोडली गेली ती काही संवेदनशील हातांनी. लेखक म्हणून असणारी सवर्ण समाजाची मक्तेदारी मोडीत काढून आपल्या जगण्याच्या आत्माभिमानी हुंकारांनी आपलं जगणं, आपलं भोगणं उसन्या शब्दांनी नव्हे तर तर स्वतःच्या अस्सल भाषेत, गावकुसाबाहेरचा हा परीघ विस्तारत त्यांनी मराठी साहित्यात आणला. दलित आत्मकथनांनी सुरुवात झालेला हा प्रवाह कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा समग्र अंगाने समृद्ध होत गेला.

१९७० नंतर लेखन करणाऱ्या दलित लेखकांमध्ये उत्तम बंडू तुपे हे महत्त्वाचे नाव. त्यांनी आपल्या साहित्यातून आपल्या व भोवतालच्या माणसांच्या व्यथा वेदनांना ताकदीने आपल्या लिखाणातून मुखर केले आहे. ज्यांच्या अनेक पिढ्यांनी गावकुसाबाहेरची अस्पृश्यता भोगली, ज्यांच्या कित्येक पिढ्या इथल्या व्यवस्थेचा गावगाडा आपल्या खांद्यावर वाहत नेस्तनाबूत झाल्या अशा अस्पृश्य वेदनेला त्यांनी बोलते केले. ते स्वतः मातंग समाजाचे असून सुद्धा त्यांच्यापेक्षाही अधिक पददलित जिणें जगणाऱ्या लोकांच्या जगण्याला त्यांनी साहित्यात आणले. त्यांचे आत्मकथन, ‘काट्यावरची पोटं’, कथासंग्रह : आंदण, कोंबरा, माती आणि माणसं, पिंड, तसेच त्यांच्या कादंबऱ्या : उजाळा, झुलवा, खाई, काळाशी, चिपाड, खुळी, झावळ, भस्म, लांबलेल्या सावल्या या याचीच साक्ष देतात.

सामाजिक बांधिलकी मानणारा हा लेखक आपल्या भोवतालचे समाजजीवन न्याहाळतो आणि जे डोळ्याला खुपते, सलते ते आपल्या साहित्यातून मांडत राहतो. इतर दलित साहित्यकृतीप्रमाणेच तुपे यांच्या साहित्यातून अभिव्यक्त झालेली माणसे उपेक्षित, दरिद्री, माणूसपण हिरावलेली, गावकुसाबाहेरचे असपृश्य जीवन भोगणारी, शहरी झोपडपट्टीतील बकाल जीवन जगणारी अशीच आहेत. त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा समाजाने त्यांच्याभोवती माणूस म्हणून जे प्रश्न उभे केले आहेत ते सोडविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आहेत.

अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा प्रभाव घेऊन येणारे तुपे यांचे लिखाण वेगळे ठरते ते त्यांच्या ‘काट्यावरचे पोटं’ या आत्मकथनातून. या आत्मकथनातून समोर येणारा ‘उत्तम’ त्याच्या मानवीय सुखदुःख, विकारांसकट वाचकांना भेटत राहतो. मांग म्हणून अस्पृश्यतेच्या खालच्या पायरीवरचे जगणे रेखाटताना तो नात्यातले ताणेबाणेही मांडताना दिसतो. बायकोचे लग्नाआधीच आलेले परपुरुषसंबंध स्वीकारताना तो इथल्या पुरुषप्रधान मानसिकता असलेल्या समाजासोबतही संघर्ष पत्करत जगतो, कुठल्याही प्रकारच्या उदात्तीकरणाचा हव्यास टाळून येणारे हे आत्मकथन अत्यन्त प्रामाणिक आणि नितळ मानवी भावभावनांचा, मानवी विकारांचा आलेखच जणू.

दलित उपेक्षित, शोषित मजूर आणि त्यांचे हेलावून टाकणारे दुःख तसेच प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी चाललेली अव्याहत धडपड हाच तुपे यांच्या साहित्याचा गाभा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तुपे यांच्या साहित्यातील त्यांच्या स्वजातीय दुःखाच्या वेणा तर आहेतच परंतु त्याही पलीकडं जाऊन ते भटके विमुक्त, मसणजोगी, देवदासी, भूमिहीन शेतमजूर आदी घटकांतील दुःखाना केंद्रबिंदू मानून त्यावर लिहितात. स्वजातीचा परीघ विस्तारून जे जे म्हणून इथल्या धर्मव्यवस्थेने लाचार झालेले, जे जे म्हणून इथल्या समाजव्यवस्थेने पिचलेले लोक आहेत त्यांच्या जाणिवा गोचर करण्याचे काम तुपे यांनी जोरकसपणे केलेले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘भस्म’ कादंबरी होय. मसणवटीत राहून राक्षसी जिणं भाग पाडणाऱ्या इथल्या गावगाड्याला आन वाळीत टाकण्याची धमकी देणाऱ्या जातपंचायतीच्या विरोधात कादंबरीचा नायक बंड करून उठतो.

उत्तम बंडू तुपे यांच्या कथा कादंबरीत भेटणारी स्त्री हा ही एक स्वतंत्र अभ्यास विषय ठरावा अशीच आहे. ही स्त्री इथल्या पारंपरिक पुरुप्रधान, धर्मपप्रवण व्यवस्थेला ठोकरणारी आहे. तत्कालीन मराठी वाङ्मयातून दिसणारे स्रीदर्शन हे एकतर अत्यन्त दैववादी अथवा परिस्थितीशरण असेच आलेले आहे. अगदी स्त्री लेखिकांही याला अपवाद नव्हत्या. तुपे यांच्या साहित्यकृतीतिला स्त्रिया परिवर्तनाचा वसा उचलणार्या दिसून येतात. ‘झुलवा’ कादंबरीतील , जगन जोगतीण आपल्या वाट्याला आलेले भोग हे इथल्या धर्मव्यवस्थेने आणि समाजव्यवस्थेमुळे आलेले आहेत याची ठाम जाणीव होऊन यल्लमादेवीच्या मुखवट्याने भरलेला जग नदीच्या पुरात फेकून देते. आसनी परंपरने लादलेल्या भोगदासीपणाला नकार देण्याचे सामर्थ्य दाखवते.

एवढी समृद्ध लेखनसंपदा असूनही समीक्षकांच्या दृष्टीने वंचित राहिलेले तुपे जास्त आघात करून जातात. भारतात माणूस म्हणून मोठं होण्याकरिता तो देहरूपाने मारावा लागतो हा जणू काही अलिखित नियमच आहे. ह्यात असताना अण्णाभाऊ साठेंची झालेली परवड त्यांच्या मृत्यूनंतर थांबली. तेच झुलवाकार असे टोपणनाव मिरवणाऱ्या तुपेंच्या बाबतीत होणार. तब्बल ५२ हून अधिक पुस्तकं. साहित्यकृतीच्या सगळ्यांच अंगांना स्पर्श करणारी लेखनशैली.  भस्म कादंबरीवर निघालेला चित्रपट,  झुलवा कादंबरीला नाटकाने मिळवून दिलेली झळाळी, सयाजी शिंदे या बावनकशी अभिनेत्याचा झालेला उदय. एवढं सगळं असूनही तुपे मराठी वाङ्मयीन समीक्षकांपासून वंचित का राहिले असावे हा प्रश्न माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला नक्कीच सतावतोय. की इथेही जात आडवी येते? की तुपे यांच्या साहित्यकृतीतून डोकावणारा समूह आपल्या प्रस्थापित पांढरपेशी जाणिवांचा तळ ढवळतच नाही?, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मराठी सारस्वतांवर उधार ठेऊन एक डोंगराएवढं व्यक्तिमत्त्व आपल्यातून कायमच हरवलं आहे.

संदर्भ: १) सुरेश पैठणकर यांचा इंटरनेटवर उपलब्ध असणारा शोधनिबंध, २)शोधगंगा महाजालावरून साभार.

COMMENTS