व्हिलेज डायरी भाग ५ : मिलु बरबडा ते ऊस

व्हिलेज डायरी भाग ५ : मिलु बरबडा ते ऊस

सिमेंटच्या पायपाची पाईपलाईन अन ५ ची मोटर.. ७२ ला आज्यानं अकलूजच्या फॅक्टरीला ऊस घालवल्याला.. वाड्याखालच्या अंबरीत, न शेतातल्या पेवत पांढरी ज्वारी हुत

सरकार व शेतकरी दोघेही संभ्रवास्थेत
प्रलंबित दाव्यांच्या दंडात्मक व्याजापासून शेतकरी वंचित
व्हिलेज डायरी भाग ४ तिथून इथपर्यंत

सिमेंटच्या पायपाची पाईपलाईन अन ५ ची मोटर.. ७२ ला आज्यानं अकलूजच्या फॅक्टरीला ऊस घालवल्याला..
वाड्याखालच्या अंबरीत, न शेतातल्या पेवत पांढरी ज्वारी हुती.. गावाला वाटू वाटून संपवली..
मग बरबडा न मिलु..
७३ ला गुऱ्हाळ चालू केलं आज्यानं..
२० एक वर्ष अव्याहत चालू होतं..
गावं जगली ४ आजूबाजूची
अजूनही लोकं येतात
पाणावलेल्या डोळ्यांनी सांगतात ३-३ किलो वजन वाढायच गुऱ्हाळवर,
पाटलांनं जोड गव्हाशिवाय चपाती खाऊ घातली न्हाई.. लै जपलं !
पुढं वाडा फुटला ..
२०००-०१ च्या आसपास दुष्काळ पडला पुन्हा..
वडलांनी शेतीला सुरुवात केलेली..
दुष्काळात ऊस लावला..
तालुक्यात बेंणं नव्हतं कुठं दूरदूर..
भावकीला फुकट वाटलं..
जमीन घेतली..
क्षेत्र वाढलं थोडंफार..
४ ला पहाटं दाराला काकडत २० किलोमीटर शेतात जाऊन पुन्हा ६ ला शाळेत सकाळचा ज्यादा तास बीजगणित भूमिती घ्यायला हजर..
ती साधना, कष्ट, तपश्चर्या अव्याहत चालूच आहे..
किती पळतंय बघू म्हणणांऱ्या थोरल्याशिंच कधी आतलं शब्दं मला समजलं न्हाईत.. अन आता ते ईख समजून घ्यायचं बी न्हाई.. काळ असतो वृत्ती बदलणारा, माणसं सगळी ज्याच्या त्याच्या आयामात चांगलीच असतात..
बाभळी उगवायच्या आशीर्वादानं सुरू केलेला प्रवास चारचार हजार फुटांच्या पाईपलाईनिसोबत ७.५ – १० च्या मोटारा, दोन बोर, ५-७.५ पाणबुड्या करत ड्रीपमार्गे २५०-३००-४०० करत ५०० ते दशसहस्त्रचा खानदानातला न भूतो न भविष्यती झेंडा गाडला..…..
गुऱ्हाळाचा ध्यास पुन्हा घिऊन तीन वर्षांखाली पाय टाकला, दोन पिढ्यांपासून मानगुटीवरचा दुष्काळ वारश्यात मलाबी मिळाला.. गुऱ्हाळाच्या गूळ फॅक्टरी या सुंदर स्वप्नाच्या चर्चा रेंगाळल्या पण मी धडपडत गेलो.. अन मग जेवढा धडपडील तेवढा घुसत गेलो आत आत आत.
अंधार डोळ्यांना व्यापून टाकेपर्यंत..
अन त्या अंधारात मग चालायला शिकलो..
दुष्काळानं मागच्या दोन पिढ्यांना धाडस न समृद्धी दिली पण मला काहीसं वेगळं देत जगण्याची नजर देऊन गेला दुष्काळ.. उतावीळपणा वाळवून गेला.. स्थिर भूमिका देऊन गेला..
समृद्धीपलीकडचा व्यापक विचार देऊन गेला..
घाट पुन्हा घालणार हायच आता गुळाचा पण भूमिका भूक विचार बदललाय..
त्या सुखी चित्रात मी वर होतो पूर्वी, मोकळ्या उत्तुंग आभाळाला हात लावत..
आता खाली फाउंडेशन मध्ये गाडून घेतोय मी स्वतःला, संपूर्ण डोलारा उचलायला…
ही उसातल्या दंडातली सावली त्या मागच्या दोन पिढ्यांच्या प्रवासाची साक्षय..
मी गाडून घेतलंय स्वतःला त्या उद्याच्या पिकाच्या मुळाशी..
त्या ७२ ला पेरलेल्या स्वप्नाच्या तळाशी..
…….

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

द वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग
एक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी

हा सेल्फीय..
त्या नदीलगतच्या मळईतला जीचा सात-बारा नावावर करून घ्यायला आज्या आयुष्यभर राबला..
चुलत्यानं बापानं त्यो टिकवायला रगात आटवून घाम गाळला..
याच मातीत त्या आज्याची राखाय..
हा सेल्फी त्या राखंचाय !
ही दगडं माती गोष्ट सांगतात त्या अगणित पिढ्यांची..
या मातीत जीवाय,
भेंचोद तुम्ही काय गप्पा हाणताय सजीव उत्क्रांतीच्या
मला माझ्या सावलीत दिसतो मी अंधुक पाहिल्याला आज्या..
पाटीकली सोडून,
गाव शिव भाव भावकी ला जमीन सोडून दुसऱ्या गावात ईस्थापित झाल्याला .
जीवावर खेळून गुऱ्हाळ बागायतिचा डाव मांडल्याला..
कधीतर बिनपटक्याचा उभा राहून कमरंवर हात ठिवून सगळा डाव बघत उभारला आशीलचं की ..
मला या मातीत दिसतेत चुलतं,
आज्याच्या जागी मी बघत आलेलो लहानपणापसनं
बैलावर ट्रक्टरवर गुऱ्हाळावर राबल्यालं .
टोपी नं घाम पुसून कमरंवर हात ठिवून कधीतर खदाखदा हासलं अस्त्यालं की ..
मला या दगडाच्या राळ्यात दिसतेत चुलत्या,
रोज पायली पायली वाड्यात दळलेल्या,
शंभर सव्वाशे भाकरी रोज थापलेल्या,
लुगड्या वरचं अवजड शालगट बाजूला टाकून कधीतर चोरून सावली पहिली अशीलच की ..
मला या उन्हात उजेडात दिसते,
कष्टानं झुकल्याली बोटं वाकडी झाल्याला म्हातारी आज्जी,
अन वाड्यावर सत्ता गाजवलेली आत्या .
या दगडात ऐकू येतं गाणं मला,
आई गायची ..
रानात मळईतल्या येलीखाली
पदराखाली धरून,
रवी गेला रे गेला सोडुन आकाशाला..
आई गायची,
वाड्यानं तुबकल्याली
कवाडामागं दाबल्याली जावंची
अर्ध्या तुकड्यावरल्या खळ्याची गोष्ट
आई गायची,
तिच्या बा ला उंबऱ्याबाहेर ठेवलेली
येशीवरनं शिदोरी परत पाठवल्याली
धाकल्याच्या नासलेल्या डोक्याची गोष्ट
आई गायची..
पाटलाच्या वाड्याच्या सासुरवाशिनीची गोष्ट ..
मला या मातीत दिसतात मी न पाहिलेल्या वाटण्या,
या मातीत दिसतो एका पावसाळ्यात आज्या गेल्यावरचा बापाचा चिखलातलाआक्रोश !!
हा सेल्फीय,
माझा
धाकल्याचा
माझ्या बाचा अन आईचा
चुलता चुलतींचा
मला अंगाखांद्यावर खेळवलेल्या चुलत भावंडांचा
बालविधवा आत्याचा
मेलेल्या आज्याचा
म्हाताऱ्या आज्जीचा
त्या कित्येक पूर्वजांचा
हि माती तुडवलेल्या सेपियन्स चा
सेपियन्स च्या पूर्वज क्रो मॅग्नन चा
क्रो मॉर्गन च्या इरेक्ट्स बापाचा..
अन माझ्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचा !
हा सेल्फीय माझा
रंग रूप चेहरा मला नाही
माझं अस्तित्व या दगड धोंड्यात मातीताय
धनीची राख बी इथंच मिसळनाराय ..
….
पेटलेल्या फडाच्या धगीत मोठं झालोय लहानाचं..
आयुष्यातलं अगदी खोल खोल दडलेलं अंधुक काय आठवतं नकळत्या बोलायला यायच्या आधीच्या वयातलं तर फडात पडलेल्या टोळ्यांचा मुक्काम,
रात्रीची गाणी,
ज्वारीच्या भाकरी न हरबऱ्याची भाजी,
बा ची राजदूत डिकीवर लिहिलेल्या चटके बंधूची..
बाभळीचा झोका,
HMT ची वरची धडधड ट्रॉल्या अन गवळणी,
वाड्याच्या माळदावरनं टोळीला दूर जाईपर्यंत चुलत भावंडं आम्हाला काखंला घिऊन त्यांना हात करायची ..
कळायला लागलं तसं पालातली त्यांची गाणी शेकोटी जेवणं त्या कोपटात चालणारं सगळं दुसऱ्या विश्वात घेऊन जायचं..
गाव सोडताना फड सोडताना डोळे पाणावायचे..
वाहनावर बसलेली म्हातारी तरणी थोरली अन लहान लहान पोरं सोरं नजरेआड होईपर्यंत हात करायची..
अजूनही डोळं दर बारीला भरत्यातं..
टोळीला भर आहेर पॅन्ट शर्ट साडी चोळी टोपी टॉवेल असतो दर वर्षी, मागच्या पिढीतल्या आमच्या बा चं काळीज याच फडातल्या परंपरेचंय अन आम्हीबी हळूच चोरलंय थोडं..
अन टोळ बी परतीचा भर आहेर करती !!!
गुऱ्हाळ आठवत नाही फारसं,
पण गुऱ्हाळानं जोडल्याली गुऱ्हाळावर राबल्याली चार गावंची माणसं गोष्टी सांगतेत उसाच्या
काकवी च्या,
चरवी नं रस पिलेल्या,
चुलत्यानं पाक काढल्याला अन फड फोडलेल्या,
मला मात्र फक्त चुलत्यानं सोलुन दिल्याला ऊस आठवतो..
पण ऊस जन्मापासूनचा आठवतो..
फड संपला तरी त्याचा खोडवा जाईपर्यंत गोडवा जात नाही.
जिभेवरून..
मातीतून..
मनांमधून..
अन खोडवा काय प्रत्येक लागणी नंतर हायच !
या मळीच्या वासाची अटॅचमेंट आत्म्याशीय..
जगायची भूक आस या ऊसानं लावलीय..
मळीच्या वासात तीन पिढ्यांच्या खानदानाचा इतिहास दरवळतो ..
अभिमन्यूनं ऐकलं अशील नशील गर्भातनं म्हाईत न्हाई,
पर आमच्या आई नं पाहिलेला हिरवागार ऊसाचा फड न मळी चा वास पाचवीला सटवाई पुजायच्या आधी आम्हाला जोडला गेलाय..
…..
ते पलीकडले समदे म्हणले ऊस गोड कसा होतो..
त्येंला म्हणलं कर्ज काढून उधार उसनवारी करून लेकाराबाळाच्या हट्टाचा गळा दाबून ही ३२००-३६०० रुपये क्विंटलची युरिया नावाची कित्येक क्विंटल तुरट साखर ऊसात, लाखाच्या हजार लिक्विड डोसासोबत फॉस्फेस्ट १०-२६-२६ सोबत मिळून टाकली की त्या मेलेल्या मारलेल्या भावनांचं मिश्रण होतं अन मग त्या बांबूच्या आत्म्याला ऊस हुण्यापुरती गोडी चढते..
पेरलेल्या स्वप्नांची..
त्याच्या स्वाभिमानाची..
तिच्या नवसाची..!

क्रमशः
आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0