मार्गारेट चटर्जी : नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या तत्त्वज्ञ

मार्गारेट चटर्जी : नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेल्या तत्त्वज्ञ

मार्गारेट चटर्जी यांचे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील मौलिकतेचे अजूनही पूर्ण मूल्यांकन आणि कदर झालेली नाही.

‘तुम्ही जाता तेव्हा’
अवलिया ‘अनिल’ माणूस !
चॉकलेट, लाइमज्यूस, आइस्क्रीम, टॉफिया

एक सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि गांधी विचारांच्या अभ्यासक मार्गारेट चटर्जी या १९५६ ते १९९० या काळात दिल्ली विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक होत्या. ३ जानेवारी, २०१९ रोजी, ९१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ज्या काळात शैक्षणिक संस्थांमध्ये अगदी थोड्या महिला जबाबदारीच्या स्थानांवर काम करत होत्या, त्या काळात तत्त्वज्ञान विषयात उच्च शिक्षणाचा विकास करण्याप्रती असलेली त्यांची बांधिलकी त्यांचे विद्यार्थी आणि सहकारी यांच्या नेहमी स्मरणात राहील.

मी त्यांना प्रथम भेटले १९६७ साली. विश्वभारतीच्या सेंटर ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीज इन फिलॉसॉफीद्वारे आयोजित एका राष्ट्रीय सेमिनारमध्ये त्या एकट्याच महिला प्रतिनिधी होत्या. सेमिनारमध्ये परस्परसंवादांच्या वेळी त्या ठाम आणि निश्चयी सुरात बोलत असल्या तरीही कधीच आक्रमक होत नसत. त्यांच्या डोळ्यात नेहमी एक मिश्किल चमक असे आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. त्या लगेचच आमच्या आवडत्या ‘मार्गारेट-दी’ बनल्या.

१९७०च्या दशकाच्या सुरुवातीला मार्गारेट-दी घरातल्या गंभीर वैद्यकीय समस्यांशी झुंजत होत्या, मात्र तीन दिवसांच्या यूजीसी-प्रायोजित ‘यंग स्कॉलर्स’ संमेलनामध्ये त्या रोज यायच्या तेव्हा त्यांच्या वर्तणुकीतून ते जराही जाणवत नसे. त्यांनी सहभागी तरुणांना लोकशाही मूल्यांचा पाठ दिला आणि वरिष्ठ प्राध्यापकांच्या सर्व प्रकारच्या पोथीवादापासून आम्हाला वाचवले. आम्ही जबाबदार प्रौढ, स्वतंत्र संशोधक म्हणून वागावे, उच्च दर्जाचे अभ्यासक म्हणून स्वतःला प्रदर्शित करावे अशी आमच्याकडून अपेक्षा असे. कोणत्याही प्रकारच्या आयत्या घासांना परवानगीच नव्हती. विद्यार्थ्यांना त्यांच्याबाबत अतीव आदर वाटे.

मार्गारेटदींच्या अभ्यासाची प्रचंड व्याप्ती, पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताबद्दलची त्यांची सखोल जाण, साहित्याबद्दलचे प्रेम यामुळे एक दुर्मिळ तत्त्वज्ञानात्मक दृष्टी त्यांना लाभली होती व त्यातून तत्त्वज्ञानात्मक समस्यांच्या प्रती पाहण्याचा एक नावीन्यपूर्ण दृष्टिकोनही निर्माण झाला होता. अनेकदा हुशार शिक्षक तर भेटतात, पण खरा तत्त्वज्ञ क्वचितच भेटतो. मार्गारेटदींकडे रोजच्या सामान्य अनुभवांच्या आधारे खोल तत्त्वज्ञानात्मक चर्चा घडवण्याचा दुर्मिळ गुण होता. त्या चांगल्या पियानिस्ट होत्या, कवी होत्या. अनेक विद्याशाखांमधील त्यांच्या संचारामुळे एका समस्येला भिडण्याचे अनेक पर्यायी मार्ग त्यांना दिसत. झापडबंद संकुचित दृष्टिकोनाबद्दल त्यांना कधीच प्रेम नव्हते, त्यांना नेहमीच अनेक तत्त्ववाद आणि त्याच्या परिणामांबाबत आस्था होती. त्यांच्या लिखाणात तत्त्वज्ञान, समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहारज्ञान या सर्वांची सांगड दिसते.

सर्वसाधारणपणे, तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ नेहमी ठोकळेबाज तांत्रिक भाषेत लिहिले जातात. मार्गारेटदी अपवाद होत्या. त्यांच्या युक्तिवादाची दृढता न गमावता त्या प्रवाही बोली भाषेत, हेवा वाटावा अशी अचूक अभिव्यक्ती करत.  पुढच्या काही ओळी त्याचे प्रमाण आहेत:

…All this shows what a rich primeval experience there is behind our sense of surrounding. … The surrounding is a barricade which protects, a thicket which ensnares, an enveloping fog which blinds vision, a hurdle over which the adventurer may wish to leap. It can also be a source of excuses. (Lifeworlds and Ethics: Studies in Several Keys, 2007)

(…आपल्या सभोवतालाच्या जाणिवेमध्ये किती समृद्ध आदिम अनुभव आहे हे यातून दिसते…सभोवताल हा एक संरक्षक बांध आहे, लुभावणारे रान, दृष्टी हरवणारे दाट धुके, एक अडथळा ज्याच्यावरून उडी मारून साहसी व्यक्तीला पलिकडे जावेसे वाटेल. आणि तो बहाणेही पुरवतो. (लाईफवर्ल्ड्स अँड एथिक्स: स्टडीज इन सेव्हरल कीज, २००७)

पुस्तकाच्या शीर्षकातील ‘कीज’ हा शब्द संगीताच्या क्षेत्रातून थेट उचलला आहे. ‘Surrounding’  म्हणजेच ‘सभोवताल’ या शब्दाच्या अनेक छटा स्पष्ट करण्यासाठी एकामागून एक किती रूपकांचा मनोरा उभा केला आहे पाहा. त्यांना ज्या सूक्ष्म छटा ठळक करून दाखवायच्या आहेत, त्यांचा अभाव असणारे एकमितीय ‘context (संदर्भ)’ किंवा ‘situation (परिस्थिती)’ हे नेहमीचे शब्द वापरण्याऐवजी त्यांनी ‘surrounding’ हा शब्द वापरला आहे.

तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांच्या मौलिकतेचे अजूनही पूर्ण मूल्यांकन आणि कदर झालेली नाही. त्यांचे विचार प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या स्वरूपात दस्तावेजित आहेत. आपल्या बेपर्वाईमुळे आपण त्यांची योग्यता ओळखू शकलेलो नाही. आज आपण आंतरविद्याशाखीय अभ्यासांचा आपल्या अभ्यासक्रमांमध्ये समावेश केल्याबद्दल आपलीच पाठ थोपटून घेतो, प्रतिच्छेदनात्मकतेचे विविध स्तर ओळखण्याचा प्रयत्न करत आपला मेंदू झिजवतो, मात्र मार्गारेटदींनी कष्टपूर्वक आपल्यासाठी तयार केलेल्या खजिन्याकडे दुर्लक्ष करतो. कधीतरी तत्त्वज्ञान आणि संस्कृती अभ्यासाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे आपल्याकडे लक्ष जाईल याची तो खजिना वाट पाहत आहे.

दिल्ली विद्यापीठात शिकवत असताना, मार्गारेट चटर्जी यांनी विश्व-भारती, शांतिनिकेतन येथे तुलनात्मक धर्म या विषयात प्राध्यापकपद स्वीकारले. त्या खऱ्या अर्थानेतुलनात्मक अभ्यासक होत्या, कारण त्या नेहमी म्हणत, “मी संपूर्ण जगभरातून सामग्री गोळा करते, त्यातल्या समान बाबी आणि विविधता दोन्हींचा शोध घेते.” एकाच चर्चेत त्या अगदी सहजपणे वेदांत, जैनिझम, हसरल, जॉर्ज इलियट आणि वेद या सगळ्यांचे दृष्टिकोन गुंफत असत.

त्या किती कार्यक्षमतेने विविध कामे पूर्ण करू शकत हे पाहिले तर त्यांचे बहुपैलुत्व लगेच लक्षात येते. अनेक वर्षे त्या द स्टेट्समन करिता संगीत समीक्षक होत्या. त्या सिमलामधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडीच्या संचालक होत्या. त्यांच्या कुशाग्र व्यवस्थापनामुळे संस्था अनेक पुस्तके प्रकाशित करू शकली. सिमल्यामध्ये केवळ शैक्षणिक क्षेत्रालाच त्यांचे नेतृत्व लाभले असे नाही, तर त्यांच्या काटेकोर गृह-व्यवस्थापनामुळे राष्ट्रपती निवासाची शोभाही वृद्धिंगत झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या आपल्या देशातील एक आघाडीच्या विचारवंत म्हणून ओळखल्या जात. त्या ड्र्यू आणि कॅलगेरी विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक होत्या, मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड येथे तत्त्वज्ञान शिकवत. त्यांनी केंब्रिज येथे टीप व्याख्याने दिली होती आणि जेरूसलेम येथील हिब्रू विद्यापीठामध्ये ‘द लेडी डेव्हील व्हिजिटिंग’ प्रोफेसर होत्या. इंटरनॅशनल सोसायटी फॉर मेटाफिजिक्सच्या त्या अध्यक्ष होत्या.

त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून मार्गारेटदी त्यांचे वाचन आणि लिखाण करत. अगदी त्यांचं वय ८० च्या घरात असतानाही, मी त्यांना एकदा भेटायला गेले तेव्हा त्या पलंगावर बसलेल्या होत्या आणि आजूबाजूला पुस्तके आणि कागद पसरलेले होते. त्या कांटच्या मूळ जर्मन क्रिटिक ऑफ प्युअर रीझन आणि नॉर्मन केंप स्मिथचे इंग्रजी भाषांतर यांची तुलना करून विसंगती नोंदवत होत्या.

मार्गारेटदी सुंदर बंगाली बोलायच्या आणि इंग्रजी बोलताना किंवा पत्रे लिहिताना त्या त्यात बोली भाषेतले बंगाली शब्द पेरत. ८५व्या वर्षी त्यांच्या रोजच्या व्यायामाबद्दल बोलताना त्यांनी प्रति अंग (प्रत्येक अवयव) असे शब्द वापरले, आणि त्यांच्या व्यायामात त्या कशा प्रत्येक सांध्याची हालचाल करतात ते दाखवण्यासाठी मनगट फिरवून दाखवले.

त्याच भेटीत त्यांना त्यांचा पियानो दुरुस्त करायला कोणी मिळत नव्हते म्हणून त्या नाराज होत्या. पियानोच्या काही पट्ट्या नादुरुस्त होत्या. त्या डोळे मिचकावत म्हणाल्या, ‘त्या पट्ट्यांचा वापरच करावा लागणार नाही असे संगीताचे तुकडे मी शिकतेय.’ अशा होत्या त्या – अगम्य. मी निघाले तेव्हा त्या दाराशी आल्या, हाताने नृत्यासारखे हावभाव करत म्हणाल्या, ‘झेंडा फडकावत ठेव,’ आणि थोडं थबकून, ‘जो कुठला झेंडा असेल तो.’ त्यांच्या जीवनाचे तेच तत्त्वज्ञान होते. त्यांच्या हातात झेंडा फडकत राही.

शेफाली मोईत्रा, जादवपूर विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकवतात.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0