लॉकडाऊननंतर ३७८ श्रमिकांचा मृत्यू

लॉकडाऊननंतर ३७८ श्रमिकांचा मृत्यू

लॉकडाऊन पुकारल्यानंतर घरच्या ओढीने लाखो श्रमिक आपल्या घराकडे परतू लागले आहेत. पण यात अनेक श्रमिकांचे मृत्यू रेल्वे, रस्ते अपघाताबरोबरच सतत चालल्यामुळे, वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे, पोलिस अत्याचार, अतिश्रम, उपासमार व आत्महत्या यामुळे झाले आहेत.

कोविड-१९- तिसरी लाट रोखण्याच्या सूचना जाहीर
विधीमंडळ अधिकाराचा संकोच; राष्ट्रपतींना पत्र
अल जझिराची पत्रकार इस्रायल सैनिकांच्या कारवाईत ठार

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात औरंगाबाद नजीक एका मालगाडीखाली १६ श्रमिक जिवंत चिरडले गेले. हे सर्व श्रमिक म. प्रदेशात आपल्या गावी जात होते. रस्त्यावरून चालताना पोलिसांचा जाच नको म्हणून या श्रमिकांनी रेल्वे रुळाचा मार्ग धरला होता. रात्री विश्रांती हवी म्हणून ते रुळावरच झोपले. रेल्वेची मालवाहतूक सेवा सुरू आहे याची त्यांनी कल्पना नव्हती. पहाटे गाठ झोपेत असतानाचा सव्वापाचच्या सुमारास त्यांना मृत्यूने गाठले.

औरंगाबादनजीक जालना जिल्ह्यातल्या एका खासगी पोलाद कारखान्यातले हे सर्व श्रमिक होते. २४ मार्च रोजी पहिला लॉकडाऊन पुकारल्यानंतर त्यांना पगारही देण्यात आला नव्हता. लॉकडाऊनच्या काळात खिशातले पैसे संपले, उपासमारीची वेळ आली, रोजगारही हिरावून गेला होता अशा परिस्थितीत अंतिम पर्याय म्हणून या सर्व श्रमिकांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. चालत चालत, मिळेल त्या वाहनाने घरी कधीतरी पोहचू अशा आशेवर हे श्रमिक होते पण परिस्थितीचे ते बळी ठरले.

अशीच एक घटना गेल्या आठवड्यात शनिवारी रात्री म. प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात घडली. येथे आग्र्याला जाणारा ट्रक उलटल्याने ५ जण ठार झाले. या ट्रकमधून १८ श्रमिक प्रवास करत होते. हा ट्रक हैदराबादहून आग्र्याला जात होता.

थिजेश जीएन, कनिका शर्मा व अमन यांनी लॉकडाऊननंतर घरी परतरणार्या श्रमिकांबाबत माहिती गोळा केली आहे. या माहितीनुसार लॉकडाऊननंतर आजपर्यत ३७८ श्रमिक घरी जाताना वेगवेगळ्या दुर्घटनेत, अतिश्रमाने मरण पावले आहेत. या मरण पावलेल्या ३७८ श्रमिकांमधील ६९ श्रमिक रेल्वे, रस्ते अपघातात ठार झाले आहेत. या माहितीमध्ये श्रमिकांचे मृत्यू रेल्वे, रस्ते अपघाताबरोबरच सतत चालल्यामुळे, वेळीच वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे, पोलिस अत्याचार, अतिश्रम, उपासमार व आत्महत्या यामुळे झाले आहेत. या घटना लॉकडाऊनचे परिणाम झाल्यामुळे घडल्याचा दावा या माहितीत आहे.

ही माहिती, आकडेवारी सतत बदलत असते, देशात रोज घडणार्या घटनांचा त्यात उल्लेख होत असतो. देशातील विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, इंटरनेटवरील वर्तमानपत्रे, सरकारी माहिती यांच्या माध्यमातून ही माहिती गोळा केली जाते, असे कनिका शर्मा यांनी द वायरला सांगितले. कनिका शर्मा या अमेरिकेतील अटलांटा येथील एमरॉय विद्यापीठात समाजशास्त्र विषयातल्या पीएचडी धारक आहेत.

या तिघांच्या मते औरंगाबादमध्ये रेल्वे अपघाताची घटना ही सर्वात मोठी दुर्घटना असून लॉकडाऊननंतर एवढ्या मोठ्या संख्येने श्रमिकांचे मृत्यू झालेले नाहीत. २८ मार्चला कर्नाटकात रायचूर येथे घरी परतणारे ८ श्रमिक रस्ते अपघातात ठार झाले, त्यानंतर घडलेली ही मोठी दुर्घटना आहे.

पण लॉकडाऊनच्या काळात आत्महत्या करणार्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या आत्महत्यांमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांचा समावेश नाही. पण बेरोजगार झाल्याने, कोरोना संसर्ग झाल्याची भीती, दारु मिळत नसल्याने ८३ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यानंतर झालेले मृत्यू उपासमार, वेळीच उपचार न मिळाल्याने, शेकडो किमी चालल्यानंतर अतिश्रमाने झालेले आहेत. तामिळनाडूत एका बस स्टॉपनजीक राहणार्या ८० वर्षाच्या एका वृद्ध भिकार्याचा उपासमारीने मृत्यू झाला. तर १२ वर्षाची एक लहान मुलगी आपल्या पालकांसोबत लॉकडाऊननंतर घरी परतत असताना १०० किमी अंतर पार केल्यानंतर अतिश्रमाने मरण पावली.

कनिका शर्मा या माहिती संदर्भात सांगतात की लॉकडाऊननंतर मरण पावलेल्यांची जी आकडेवारी विविध माध्यमातून आलेली आहे, त्यानुसार मृतांमध्ये अधिकतर श्रमिक, स्थलांतरीत मजूर, रोजंदारीवर काम करणारे कामगार आहेत. यात महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी आहे. पण महिलांमधील मृत्यू हे आत्महत्येमुळे अधिक आहेत. कारण आपल्या घरी परतू शकणार नाहीत या भावनेतून महिलांनी आत्महत्या केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात वेळीच वैद्यकीय उपचार, मदत न मिळाल्यानेही मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. तेलंगणामध्ये एका गर्भवती महिलेला सहा रुग्णालयांनी प्रवेश नाकारला. या महिलेने  कोरोनाची चाचणी केली होती, त्याचा निकाल नंतर निगेटिव्ह आला. पण या कारणामुळे अनेक रुग्णालयांनी तिला प्रवेश दिला नाही. अखेर उशीर झाल्यानंतर अत्यंत वाईट परिस्थितीत तिने मुलाला जन्म दिला पण ते मूल दगावले व नंतर दुसर्या दिवशी त्या महिलेचाही मृत्यू झाला.

अशाच स्वरुपाची घटना जम्मू व काश्मीरमध्ये घडली. अनंतनाग जिल्ह्यात एका महिलेने जुळ्यांना जन्म दिला पण तिला वैद्यकीय उपचार नाकारण्यात आले. कारण ती ज्या भागात राहात होती तो भाग रेड झोन म्हणून घोषित केला होता. डॉक्टर तिला उपचार देण्यास तयार नव्हते.

वर उल्लेख केलेल्या तिघांच्या मते, लॉकडाऊननंतर देशात असे अनेक मृत्यू झाले असतील ज्यांची नोंद झालेली नसेल, प्रसार माध्यमात त्या संदर्भात वृत्ते आली नसतील किंवा एखादी व्यक्ती मृत झाली ती कशाने झाली याचे कारणही पुढे आले नसेल. त्यामुळे खरी संख्या नेहमीच गुलदस्त्यात राहणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0