उनाच्या झळया खाऊ खाउन आलेलो.. बसलो की डोळा लागला. घामेघुम एकतर मग फॅन नं गुंगी चढवली. खडखड आवाज झाला, लॅपटॉप पडला का काय म्हणून उठलो. हेडफोन हातात
उनाच्या झळया खाऊ खाउन आलेलो..
बसलो की डोळा लागला.
घामेघुम एकतर मग फॅन नं गुंगी चढवली.
खडखड आवाज झाला, लॅपटॉप पडला का काय म्हणून उठलो.
हेडफोन हातात धरलेला,
समोर बघितलं तर काळ्या कोटातले इजारीतले दोघं समोर थांबलेले ..
म्हणलं च्या आईला हे कोण आता,
त्येना विचारायच्या आधी ते म्हणले “राsअलघु~नंबोलीवलय.”
म्हणलं चूळ भर तंबाकू थुक न मग बोल.
मग तो आला सगळं उरकून अन म्हणला “रास-अल-घुल नं बोलीवलंय !!”
मी न्हंनलं, “क्वॉण????????”
काय बोलायच्या आधी उचलला मला त्येनी आणि बुलेरो मधी घातला
मी हेडफोन घट्ट धरून बसलेलो
डोळ्यावर पट्टी बांधल्याली
पट्टीला मळीचा वास हुता म्हणलं हि दलिंदरी कारखान्यावरनं आलीय वाटतंय
पर ते NH9 वरच्या जुनाट गुऱ्हाळात घिऊन आले. म्हणलं कशी आय घालावं, बोर्ड तर झाकायचा हुता की रस्त्याच्या कडंचा.
मी उतरलो तेव्हा क्रॉस व्युव मधून सूर्याची किरणं डोळ्यावर आली
डोळ्यासमोर हात धरत कोण कोण हाय त्याचा अंदाज घेत हुतो, साईडनं दिसलं..
“चिपडाच्या टेकाडावर बेन पसनं ब्रुनो पतुर शंभर एक व्हिलन बसलेली..
हार्ले क्वीन साडीत हुबारलेली गुऱ्हाळात तोंड जाळून घेतलेल्या टू फेस सोबत.
हुगो अन डेडशॉटच्या जवळ बसलेल्या तालियावर लाईन मारत मी पुढं जात होतो तोवर कोणतर मागनं कॉलर पकडली.
कोणाय बघितलं तर पेंग्विन हुता, “हाडंय, वळख नाय आपली, अंगाला झटु नको उगं भो%@$!$ ” म्हणत त्याला ढकलुन दिला अन फुढं आलो.
समदे थांबले
पुढं पाठमोरा हुबारलेला गॉगल वाला दिसला.
हातात कोयता
खांद्यावर शाल
राजदूत च्या हँडल वर पद्धतशीर हात टाकून हुबरलेला, तोंडातनं धूर निघत हुता..
त्यानं पाठ वळवली अन चिडीचूप शांतता पसरली. बीडी उडवून देत तो गॉगल काढत समोर उभा राहिला..
अफाट डोंगरासारखा ..
वाघासारखा क्रूर वाटत होता..
तोच होता..
तोच..
तो..
रास-अल-घुल !!
…….
मी म्हणलं, “काय फायजेल? मला कशाला आणला, मी काय घोडं मारलं. अन्नसुरक्षा कायद्यापसनं भूमीआधीग्रहणापतुर गप्पचाव की, आमी आपलं गपगुमान काम करून खाताव. माझ्याकडं काय न्हाय आता. काय फायजेल ??”
घुल न खालतं वरतं अंदाज घेत मला बघितला. मग म्हणला, “तू अजूनबी ब्रूस वेन सहकारी ला ऊस घालतो,
तुला मिळाली का कधी FRP
तुझ्या कांद्याला लागला का कधी भाव
तुझ्यावर मोठं झाले बॅटमॅन ऍरो
तुला काय शेट्ट मिळालं उदो उदो करून गळफासाशिवाय?”
..
मी सुन्न थांबलेलो
आजू बाजूची गर्दी मला घेरून होती
सगळ्या व्हिलन जमातीकडं बघत मी हात पसरून त्या विहिरीत उडी घेतली
मी म्हणलं, “तुझ्यासमोर थांबण्यापेक्षा मी विहिरीत जातो
तालिआ भाहेर आली
ब्रूस भाहेर आला
मीबी यीन ”
घुल म्हणला, “भ्रम आहे तुझा चांगलं वाईट काही नाही
तुझ्या जिंदगी समोर समाज झाट आहे
तू अलिप्त आहेसच तू विभक्त हो
तुला समाजानं बाजूला टाकलंय
ब्रूस वेन ला खायची चिंता नाय बे
तो पोटं भरलेल्यांचा हिरोय !!”
मी डोकं दाबून कान धरून गुढघ्यात डोकं घालून अंधारात बसलेलो
आवाज कमी कमी कमी होत गेला …
रात्रीचा वरून दुरून हसायलेला आवाज येत होता..
कोपऱ्यात खडखड झाली
मी बघितलं वळून तर तिथं गूढ हसणारा जोकर बसलेला …!
मी चाट पडलो, म्हणलं “तुला यांनी आत टाकला?”
तो म्हणाला, “न्हाई, मी तुला काढायला आलो.”
मी जरा दबकलो मनाला म्हणलं हे लै कडूय
डोक्यात मुंग्या सोडणार
जपून बोलाय पाहिजे.
माझ्या मनीचं वळखून जोकर म्हणला, ” काळजी करू नको, मी तुझ्या कोणत्याच धारणा बदलणार नाही . माझी दुश्मनी तुझ्याशी नाही ना तुझ्या धारणांशी ना तुझ्या परिस्थिती समाज जाती धर्माशी. माझी दुश्मनी दुतोंडी चांगुलपणाच्या बुरख्याशी आहे. वाईटं अन चांगलं काय नसतं रे”
मी चमकून वर बघितलं , मी काय बोलायच्या आधीचं तो म्हणला, “घुल माझेच शब्द वापरतो”
तो पुढं म्हणला, “तुला बाहेर मी काढतो
घुल च्या जाळ्यातनं सोडवतो
वाट बघू नको बॅटमॅन ऍरो किंवा ऑफिसर गॉर्डन येत नसतो
वकीलपत्र तुझं घेणाऱ्याला आधीच मी टू फेस करून टाकलाय
आतून तसा प्रत्येकजण नासलेलाच असतो.
हे बघ बॅटमॅन ऍरो अन रास-अल-घुल चे एकत्र फोटो !!
तुला वेड्यात काढतायत
चित न पट दोन्ही त्यांचीय.
तुझ्यासाठी तूच आहेस
तुला हात मी देतो
पण बॅटमॅन ला तुला सोडावं लागल.
मतं मला टाकावी लागतील.”
मी म्हणलं, “बाहीर काढ
वाट दाव मग बोलू”
तो म्हणाला, “चाप्टर आहेस ”
मी म्हणलं, “हो, पण नासका नाही
व्हिलन तूच राहशील सार्वभौम”
…..
रात्रीचा बाहेर आलो आम्ही
घुल समोर हुबारलेला
मी मागे बघितलं मागून जोकर मंद हसत होता
घुल म्हणला काय ठरवल मंग,
कोयत्याकड बघत मी म्हणलं, “तू खरं बोललास पण शब्द तुझे नाहीत त्यामुळं त्यामागची वृत्ती तुझी दूषित आहे. प्रस्थापित हिरो सोबत हात मिळवून तू बी स्वतःच्या अस्तित्वाच्या भुकेनंचं समाजाला पूर्वग्रहदोषी बनवतोयस. तो प्रस्थापित हिरो न तू प्रस्थापित व्हिलन अन तू व्हिलन असलेला मान्य बी करत नाहीस.
तुझ्यापेक्षा जोकर खरा, ते उघड उघड म्हणतंय मी वाईटाय म्हणून.
तुझ्या पापाचं वझं तू पोरीला दिलं, मॅडमॅक्स चं ब्रेनवॉश करू करून त्याच्या टकल्या करत त्येचा बेन बनवून त्याच्या डोक्यावर दिलं.
तू काय सांगतो बे क्रांतीच्या गप्पा
तुझ्या सोबत असलेले रॉबिन पसनं पेन्यूम्बरा पर्यंत सगळी बदनाम झाली अन तू महान म्हणवून घेत राहिला जगाला भ्रमात ठिवून.
बंद पडल्याल्या तुझ्या गुऱ्हाळापेक्षा अर्ध्या frpचा कारखाना बरा की रं, पोट तर भरतंय. हि गुऱ्हाळ बी तू लुबाडलंचं अशील ”
आसं समदं मी थरथरत एका दमात बोलून गेल्यावर घुल पिसाळला रागानं अन अंगावर कोयता उगारून आला. मी डोळं बंद केलं म्हणलं झाली काशी
जीभ आवरायला पाहिजेल हुती
तेवढ्यात कोयता खणानला, मला तर धक्का बसला न्हाई म्हणून अर्धा डोळा उघडून बघितलं तर विळ्यानं कोयता अडीवला हुता. समोरनं भरधाव यालेल्या ट्रॅक्टर च्या धुळीत समदी पळापळ व्हालेली दिसली
विळ्याचा हात बगीतला तर ज्याक्या स्पॅरो आन मागं डेक्स्टर हासत होता.
म्हणलं भावांनो मेल्यावर येणार हुताव काय
पुन्हा पुन्हा अंगावर यालेल्या रास-अल-घुल च्या अंगावर ट्रॅक्टर भरधाव वेगानं धूळ उडवत आला
मातीवर जोरात फिरवत 90° मारत नांगराच्या फाळानं घुल ला धक्का दिला
घुल त्येच्याच विहिरीत पडला
त्येच्यावर मातीची ट्रॉली पलटी करत ट्रॅक्टर मधनं तीनं उडी मारली
तीच ती
तीच
ती तीच क्रांतीची पुरस्कर्ती
फ्युरीओसा
तिला बेन aka मॅडमॅक्स दावला म्हणलं बघ त्येला
ज्याक्या नं दोन ट्रेलर भरून आणलेली समदी कामगार मजुरं हे धु धुवाली हुती प्रस्थापित्यांला
फिरून फिरून समदी पेंग्विन्या वर हात साफ करत हुती
व्हिलन सुदीक त्यालाच हाणत हुती
म्हणलं हे थोराय
हे धिंगाणा सगळीकडं
ज्याक्या नाचत हुता गुऱ्हाळाच्या कढईवर डुलत
म्हणलं लव्ह यू भावा
तूच रे तूच व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता
जग कितीही बदललं तरी तू महानायस
ज्याक्या म्हणला, “जग बदलत नसतं रे, जगायची ईच्छा कमी झालेली असते.. स्वातंत्र्याची आस कमी होते.. फार कष्टात आहोत हा तू मी न एकंदर कष्टकरी वर्ग..”
ज्याक्या म्हणला, “पण आपण जगायचं. शेवटचं युद्ध लढायचं. पुरून उरायच. नैतिक अनैतिक चांगल्या वाईट सगळ्या मार्गानं सगळ्याला एकत्र आणत प्रस्थापितांना जलसमाधी द्यायची.”
ज्याक्या म्हणला, “मी पाण्यावर स्वातंत्र्य टिकवायला हवेवर स्वार व्हायला लढलो, तू लढ नदिकिनाऱ्याच्या मळईचं स्वातंत्र्य समृद्ध करायला, नांगर धरून मातीवर स्वार व्हायला..”
धुळीत चाललेला गोंधळ तसाच मागं टाकत आम्ही प्रस्थापित व्हिलन न प्रस्थापित हिरोशिंला फाट्यावर मारून जोकरासंगं मॅडमॅक्स न फ्युरीओसा सोबत ट्रेलर भरून समदी व्हिलन जमात माणसात आणून घिऊन निघालो.
ज्याक्या म्हणलेला कोण वाईट नसतंय, म्हणून संमद्यास्नी हात दिला, ज्येनी धरला त्येंला घिऊन निघालो. ट्रॅक्टर च्या पुढं ईळा खुरपं बेडगं खोऱ्या बांधलेला एकतेचं प्रतीक म्हणून.
डोलणाऱ्या पिकाचा झेंडा टपाला लावून आम्ही खंगळ्यांग खंगळ्यांग करत निघालाव..
दुरं दिसणाऱ्या त्या बुझलेल्या विहिरीवर तालिआ बसलेली पाठमोरी..
हक्कासाठी लढतानाही शेवटी एखाद्यावर अन्याव होतोच..
तालिया कडं बघत-तुटत पुन्हा हे चक्र घडणार याची जाणीव उराशी ठेवत माझ्या गळ्याला पेंग्विन नं आवळलेली दोरी रगात येईस्तो जोरात वढत तोडली..
ते व्रण आजन्म तालियावर नकळत झालेल्या अन्यायाची जाणीव देतील म्हणून.
शेवटी काय न्याय एका रेषेत कधीच सगळ्याला मिळत नाही हेच खराय..
उतरलेल्या उन्हासंग पुन्हा मी गुंगीत जायला लागलो, अन खाडकन डोळे उघडले तर घरात सोफ्यावर तसाच शर्टाची अर्धी बटणं काढून पसरलेलो..
सुर्यास्ताच्या किरणांशिवाय आजूबाजूला काही दिसत नव्हतं.
म्हणलं च्या आईला क्रांती स्वप्नात झाली वाटत..
गळ्यावर व्रण उमटलेले जाणवत होते तरीही..
समोर बघितलं दोन हजाराचा सेनहाईजर हेडफोन तुकडे होऊन पडला होता . म्हणलं स्वप्नातल्या क्रांती नं 2 हजाराला घोडा लावलाय
आता प्रत्यक्षात तर आयुष्याला बांबू लावणार.
एकंदर अवघडाय म्हणत तालिया ला आठवत तोंडावर पाणी मारून ज्याक्या चं शब्द आठवत जोकर च्या सिरियसनेस सोबत पुन्हा गाडी काढून सुसाट शेताकडं निघालो..
मॅडमॅक्स च्या शांत आवृत्तीत ..
डिकीत नवीन विळा टाकून.
___________________
स्वातंत्र्य हे मिळवता येत नाही आणि निर्माणही करता येत नाही, तो बुद्धिवाद्यांकडुन भासवला जाणारा भ्रम आहे. गुलामी ही फक्त प्रतिकूल विचारांकडून अनुकूल विचारांकडे ट्रान्स्फर केली जाते किंवा होते.
इलेक्शन आहे.
………………………..
क्रमशः
आकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.
COMMENTS