माझा शोध

माझा शोध

अहिंसा आणि सत्य हे माझे दैवत आहेत. मी अहिंसेकडे वळतो, तेव्हा सत्य मला म्हणते, ‘माझ्याद्वारे अहिंसेचा शोध घे’. आणि मी सत्याकडे वळतो, तेव्हा अहिंसा म्हणते, ‘अहिंसेतून सत्याचा शोध घे.’

कोरोनाचा नवा विषाणू युरोपात पोहोचला
बिल्कीसला न्याय मिळवून देणे ही आता भारताची जबाबदारी
‘द वायर’च्या संपादकांवर फिर्याद; मान्यवरांकडून निषेध

मी सत्याचा केवळ एक साधक मात्र आहे. सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मला सापडला आहे असे मला वाटते. सत्याचा शोध घेण्यासाठी मी अविरत प्रयत्न करीत आहे. असे असले तरी, सत्य पूर्णपणे मला गवसलेले नाही हे मला कबूल करायला हवे. कारण, सत्य संपूर्णपणे गवसणे म्हणजे आपण स्वत: आणि आपले भागधेय यांना पूर्णरूपाने जाणणे होय. माझ्यात असणाऱ्या उणिवांची दुखरी जाणीव मला आहे, आणि यातच माझे सामर्थ्य सामावले आहे असे मला वाटते, कारण स्वत:च्या उणीवांची जाण असणे ही फारच दुर्लभ गोष्ट आहे.

मी जर एक परिपूर्ण मनुष्य असतो, तर माझ्या शेजाऱ्याच्या दु:खाने मला व्यथित व्हायला नको. एका परिपूर्ण मनुष्यासारखेच मला त्यांची नोंद घ्यायला हवी, त्यावर इलाज सांगायला हवा आणि वादातीत अशा सत्याच्या बळाने माझ्या आत त्याची रुजवण करायला हवी. पण आता तरी मला एका काळोख्या काचेआडून पाहिल्यासारखे धूसर दिसते आहे. म्हणूनच हे कार्य मला अतिशय हळूवार, परिश्रमपूर्वक आणि नेहमीच यशाची खात्री न बाळगता पूर्णत्वास नेले पाहिजे.

मी संपूर्णपणे सत्याचा पाईक बनू पाहणारा आणि माझे विचार, शब्द आणि कृतीद्वारे पूर्ण अहिंसावादी होऊ इच्छिणारा एक पामर आत्मा आहे. परंतु मला ठाऊक असणाऱ्या आदर्शाप्रत पोहोचण्याची माझी धडपड निष्फळ होत आहे. हा चढाव वेदनादायी आहे, पण ही वेदनाही मला विधायक आनंदासारखी आहे. वरच्या दिशेने टाकलेल्या प्रत्येक पावलानिशी मी स्वत:ला अधिक सामर्थ्यवान बनल्याचा अनुभव घेतो आहे.

हा मार्ग मला ठाऊक आहेसे वाटते. तलवारीच्या धारेसारखाच सरळ आणि अरुंद असा हा मार्ग आहे. या मार्गावर चालताना मी आनंदित होतो. कधी पाय घसरला तर रडवेलासा होतो. देवाने म्हटले आहे, “प्रयत्नरत मनुष्य कधीही पूर्णपणे संपत नाही”. देवाच्या या वचनावर माझा भरवसा आहे. म्हणूनच माझ्या दुर्बलतेमुळे हजारवेळा जरी मला पराभव पत्करावा लागला, तरी माझी श्रद्धा मी लवमात्रही कमी होऊ देणार नाही. उलट, अटळ अशा अंतिम निवाड्यासाठी माझ्या देहाला सामोरे जावे लागेल; तेव्हा मला प्रकाशाचा किरण दिसावा अशी मी प्रार्थना करतो.

मी परमेश्वराला पाहिलेले नाही, आणि त्याला संपूर्णपणे समजून घेतले आहे असेही नाही. पण विश्वाची देवाप्रती असणारी श्रद्धा मी आत्मसात केली आहे. आणि माझी श्रद्धा चिरस्थायी असल्याने मी तिला अनुभवाच्या बरोबरीने माणतो. परंतु श्रद्धेची अनुभवाशी तुलना करणे काही लोकांना अप्रस्तुत वाटण्याची शक्यता आहे. असे करून मी अनुभावाशी प्रतारणा केली असे होईल. त्यामुळे, परमेश्वराप्रती माझ्या श्रद्धेचे वर्णन करण्यासाठी माझ्यापाशी शब्द नाहीत असे म्हणणे अधिक योग्य ठरेल.

मला नेहमीच असे वाटत आले आहे की, सत्याच्या साधकाने सदैव मौन असायला हवे. मौनाचे काही अप्रतिम असे फायदे मला ठाऊक आहेत. दक्षिण आफ्रिकेतील एका सुंदर अशा मठाला मी भेट द्यावयास गेलो होतो. तेथील बरेच मठवासी हे मौनाचे पालन करत असल्याचे मला आढळून आले. मठातील पाद्रीबुवांना मी याचे कारण विचारता तो म्हणाला, याचे कारण उघड आहे: ‘आपण सारे क्षुद्र मानव आहोत. बहुतेक वेळा, आपण काय म्हणतो हेच आपल्याला ऐकू येत नाही. मग आपण सदैव बडबड करीत राहिलो तर आपल्या आतून येणारा क्षीण आवाज आपल्याला कसा बरे ऐकू येईल? ही महत्त्वाची शिकवण मी त्या पाद्र्याकडून घेतली.

अहिंसा आणि सत्य हे माझे दैवत आहेत. मी अहिंसेकडे वळतो, तेव्हा सत्य मला म्हणते, ‘माझ्याद्वारे अहिंसेचा शोध घे’. आणि मी सत्याकडे वळतो, तेव्हा अहिंसा म्हणते, ‘अहिंसेतून सत्याचा शोध घे.’

सत्याचा मार्ग जसा सरळ आहे तसाच तो अरूंदही आहे. अहिंसेचा मार्ग याहून भिन्न नाही. या मार्गावरून चालणे म्हणजे तलवारीच्या पातीवरून कसरत करत चालण्यासारखे आहे. अप्रतिम अशा एकाग्रतेने एखादा दोरीवरून चालण्याचे कौशल्य आत्मसात करू शकेल, मात्र सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून चालायचे तर याहून अधिक एकाग्रतेची आवश्यकता आहे. इथे थोडे जरी लक्ष विचलित झाले तर थेट जमिनीवर आपटण्याचा धोका आहे. केवळ अथक अशा परिश्रमातूनच सत्य आणि अहिंसेला जाणून घेता येऊ शकेल.

बालपणापासूनच मी सदैव सत्याचा पाईक राहिलो आहे. ही माझ्यासाठी अतिशय नैसर्गिक अशी बाब आहे. माझ्या प्रार्थनारूपी शोधाने माझ्यासाठी साक्षात्कार घडविला आहे. तो म्हणजे, ‘सत्य हाच देव आहे’. देव म्हणजेच सत्य आहे, या पारंपरिक समजुतीच्या तो अगदी उलट असा आहे. या साक्षात्काराने जणू मला देवासमोर उभे राहण्याचे बळ दिले आहे. माझ्या प्रत्येक तंतूत तो भरून राहिला असल्याचा अनुभव मी घेतो आहे.

वैश्विक आणि सर्वव्यापी सत्याच्या चैतन्यासमोर उभे राहून थेट नजर भिडवण्यासाठी एखाद्याला स्वत:सारख्याच इतर क्षुद्र जीवांवरही प्रेम करता यायला हवे. आणि हे करू पाहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रापासून फटकून राहणे परवडणारे नसते. त्यामुळेच सत्याप्रती असणाऱ्या माझ्या आस्थेने मला या राजकीय आखाड्यात आणून उभे केले आहे. तसेच धर्म आणि राजकारण यांचा परस्परांशी काहीच संबंध नाही असे म्हणणाऱ्याला मी विनाविलंब सांगू इच्छितो की, धर्माचा अर्थच मुळी तुम्हाला समजलेला नाही.

मानवतेची सेवा करून मी परमेश्वराच्या दर्शनाची आस बाळगतो आहे, कारण परमेश्वर स्वर्गात अथवा पाताळात कुठेही वसत नसून तो प्रत्येकाच्या आत वसतो हे मला पक्के ठाऊक आहे.

क्षणभंगुर अशा पृथ्वीच्या साम्राज्याची मी कामना करीत नाही. मी वांच्छा करतो ती स्वर्गाच्या साम्राज्याची म्हणजेच मोक्षाची. आणि तो प्राप्त करून घेण्यासाठी मला कुठल्याही गुहेत आश्रय घेण्याची आवश्यकता नाही. अशी एखादी गुहा मला ठाऊक असलीच तर मी तिला माझ्यासोबत बाळगण्यात धन्यता मानेन. गुहेत राहूनसुद्धा एखादा हवेत इमले बांधू शकतो; तर महालात राहाणाऱ्या जनकाजवळ एकही इमला असत नाही. गुहेत राहूनही आपल्या विचारांचे पंख लेऊन जगभर विहरणाऱ्याला शांती म्हणून मिळणार नाही; याउलट दैनंदिनीच्या घटना आणि उत्सवाच्या मध्यभागी राहूनही जनक शांती प्राप्त करू शकतो.

माझ्यासाठी मुक्तीचा मार्ग म्हणजे, ‘राष्ट्राची आणि पर्यायाने मानवतेची सेवा करत अविरत कष्ट करणे’ हा आहे. जगत असणाऱ्या हरेकासोबत माझी ओळख जोडली जावी असे मला वाटते.

मला माझी ओळख आणि बंधुभाव फक्त मानव नावाच्या जीवाप्रती मर्यादित रहावी  असे वाटत नाही; तर सृष्टीतल्या सर्व जीवांप्रती; अगदी सरपटणाऱ्या जीवांशीही जोडली जावी असे वाटते. तुम्हाला कदाचित धक्का बसेल, पण माझी ओळख सरपटणाऱ्या कृमी-किटकांसोबतही जोडली जावी असे मला वाटते, कारण त्या एकाच देवाचे आपण सारे वंशज आहोत, म्हणूनच कुठल्याही स्वरूपात आता दिसणारे जीव हे मुख्यत: एकच आहेत.

आत्मा अमर आहे यावर माझा दृढ विश्वास आहे. हे स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला समुद्राचे उदाहरण देतो. सागर अनंत अशा थेंबांनी बनला आहे, त्यातील प्रत्येक थेंब हा त्याच्यापरीने स्वतंत्र असला तरी संपूर्ण सागराचा एक भागही आहे. या जीवनरूपी सागरातील आपण केवळ थेंबमात्र आहोत. आपणांस जीवनाप्रती आणि जगत असणाऱ्या हरेक जीवाप्रती बंधुभाव जोपासता येणं, आणि देवाच्या सान्निध्यात जीवनाचे सौंदर्य वाटून घेता येणं इतकाच माझ्या शिकवणुकीचा अर्थ आहे.

गांधीवाद अशा नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही, आणि माझ्यामागे मी एखादा पंथ सोडून जावे असेही मला वाटत नाही. कुठल्याही प्रकारच्या नव्या सिद्धांताचे मी प्रतिपादन केले आहे, असा माझा दावा नाही. आपले रोजचे जीवन आणि आपल्या समस्या यांच्याशी शाश्वत सत्याचा मेळ घालण्याचा मी केवळ यत्न केला आहे. सत्य आणि अहिंसा तर हिमालयाहून प्राचीन आहेत. यांत माझे म्हणून काही असलेच तर ते इतकेच की, या दोहोंत मी माझ्यापरीने पुष्कळ प्रयोग केले आहेत. या प्रयोगात कधी कधी मी चुकलोही आहे. आणि या चुकांपासून मी शिकतही आलो आहे. सत्य आणि अहिंसा यांचे पालन करीत असताना जीवन आणि तिच्या समस्या माझ्यासाठी असंख्य प्रयोगाचे विषय बनले आहेत.

सत्य आणि अहिंसा यांवरील माझी श्रद्धा सदैव विकास पावणारी अशीच आहे, आणि आयुष्यभर त्यांचे पालन करण्याच्या प्रयत्नात दरक्षणी माझाही विकास होतो आहे. त्यांचे नवनवे परिणाम मला दिसू लागले आहेत. येणाऱ्या प्रत्येक दिवशी, एका नव्या प्रकाशात मला त्यांचे दर्शन होऊ लागले आहे, नव्याने त्यांचा अर्थ उमगू लागला आहे.

महात्मा गांधी

भाषांतर- अभिषेक धनगर

(प्रस्तुत लेख लेखकाने सलग असा लिहिलेला नाही. महात्मा गांधींची आत्मकथा, हरिजन, यंग इंडिया इत्यादी वृत्तपत्रांमधील त्यांचे लेख यातील काही भागांचे हे संकलन आहे. मात्र या विचारातील आणि शीर्षकातील सुसूत्रता ध्यानी घेऊन प्रस्तुत लेख सलग अशा स्वरूपात दिला आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0