नवी दिल्लीः शैक्षणिक पात्रतेच्या सत्यतेवरून चर्चेत आलेले नवनियुक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे कुचबिहारचे लोकसभा खासदार निसिथ प्रामाणिक यांची पदव
नवी दिल्लीः शैक्षणिक पात्रतेच्या सत्यतेवरून चर्चेत आलेले नवनियुक्त केंद्रीय गृहराज्यमंत्री व भाजपचे कुचबिहारचे लोकसभा खासदार निसिथ प्रामाणिक यांची पदवी आता गृह मंत्रालयाच्या वेबसाइटवरून गायब झाली आहे. पण या वेबसाइटवर दोन अन्य मंत्री नित्यानंद राय व अजय कुमार मिश्रा यांची शैक्षणिक पदवी उपलब्ध आहे.
गृहखात्याच्या वेबसाइटवर प्रामाणिक यांनी कुचबिहार येथील लालबहादूर शास्त्री विद्यापीठ, भेटागुरी येथून शिक्षण घेतल्याचे नमूद केले आहे.
द वायरने प्रामाणिक यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या सत्यतेसंदर्भात वृत्त दिले होते. प्रामाणिक यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात व संसदेत दिलेल्या पदवीविषयक माहितीत तफावत असल्याचे दिसून आले होते. या तफावतीबाबत अद्याप गृहखात्याने कोणताही खुलासा केलेला नाही.
काही दिवसांपूर्वी निसिथ प्रामाणिक यांचे नागरिकत्व बांगलादेशचे असून त्यांच्या नागरिकत्वाची तपासणी करायला हवी, असे पत्र काँग्रेसचे राज्यसभा सदस्य व आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष रिपुन बोरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले होते. या पत्रात बोरा यांनी प्रामाणिक यांच्या बांगलादेशी नागरिक नसल्याची खात्री करून घ्यावी असेही नमूद केले होते. या पत्राबाबतही पंतप्रधान कार्यालयाने खुलासा केलेला नाही.
देशाच्या गृहखात्यात बांगलादेशी नागरिक मंत्रिपदावर असणे हे देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर बाब असून त्यांच्या सर्व कागदपत्रांची सखोल तपासणी व्हायला हवी अशी बोरा यांची मागणी होती.
प्रामाणिक हे बांगलादेशी नागरिक असल्याचे वृत्त बराक बांग्ला, रिपब्लिक टीव्ही त्रिपुरा या वृत्तवाहिन्यांनी तसेच इंडिया टुडे, बिझनेस स्टँडर्ड या डिजिटल माध्यमांनी दिले आहे, याकडेही बोरा यांनी आपल्या पत्रात लक्ष वेधले होते.
प्रामाणिक यांचा जन्म बांगलादेशच्या गैबांधा जिल्ह्यातल्या हरिनाथपूर येथे झाला असून ते कम्प्युटर स्टडिजसाठी प. बंगालमध्ये आले होते असे बोरा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. कम्प्युटर स्टडिजमधील पदवी घेतल्यानंतर प्रामाणिक राजकारणात आले, त्यांनी पहिले तृणमूल काँग्रेसमध्ये काम केले व आता ते भाजपमध्ये असल्याचे बोरा यांनी म्हटले होते.
पण प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी ते भारतीय नागरिक असून त्यांचा जन्म, पालनपोषण व शिक्षण हे भारतातच झाल्याचे स्पष्ट केले होते. प्रामाणिक हे सच्चे भारतीय आहेत, त्यांच्या मंत्रि होण्यावरून अन्य देशात आनंद व्यक्त केला जात असेल तर त्याचा अर्थ ते दुसर्या देशाचे नागरिक होतात का, असा सवाल प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी केला होता. कॅनडामधील भारतीय वंशाची एखादी व्यक्ती तेथे मंत्री झाल्यास त्याचे अभिनंदन त्यांच्या भारतातील नातेवाईंकांकडून झाल्यास त्यावर कॅनडाचा मंत्री काय करेल असा सवाल प्रामाणिक यांच्या निकटवर्तीयांनी उपस्थित केला होता.
प्रामाणिक यांच्या पदवीवरही शंका
गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. त्यामध्ये गृहराज्यमंत्रीपद प्रामाणिक यांना देण्यात आले होते.
पण प्रामाणिक यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली शैक्षणिक पात्रता संसदेमध्ये सादर केलेल्या शैक्षणिक पात्रता माहितीपेक्षा वेगळी असल्याचे आढळून आले होते.
निसिथ प्रामाणिक हे कुचबिहारचे भाजपचे खासदार असून त्यांनी नुकतीच झालेली प. बंगालची विधानसभा निवडणूकही लढवली होती व ते कमी मतांनी निवडून आले होते. पण नंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन खासदारकी कायम ठेवली होती.
त्यांनी विधान सभेसाठी १८ मार्च २१ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व लोकसभेसाठी २५ मार्च २०१९मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता माध्यमिक शिक्षण असे नमूद केले होते.
मात्र लोकसभेच्या वेबसाइटवर त्यांनी आपली शैक्षणिक पात्रता बॅचलर्स ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (बीसीए) अशी नोंद केलेली आढळून आली आहे. त्यांनी ही पदवी बालाकुरा ज्युनियर बेसिक स्कूल येथून मिळवली असून बीसीए हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. या पदवीसाठी १२ वी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
प्रामाणिक यांनी संसद व निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रात सादर केलेली शैक्षणिक पात्रतेविषयीची विसंगत माहितीवरून तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार उदयन गुहा यांनी टीका केली होती. प्रामाणिक यांनी मार्चमध्ये माध्यमिक परीक्षा दिली होती व जुलै महिन्यात ते आपल्याकडे पदवी असल्याचे नमूद करत आहे. त्यांनी आपली उच्च माध्यमिक परीक्षा केव्हा उत्तीर्ण केली असा सवाल गुहा यांनी उपस्थित केला होता.
प्रामाणिक यांनी लोकसभेला दिलेल्या माहितीत ते ज्युनिअर स्कूलमध्ये होते असे म्हणत आहेत, पण येथे असला कोणताही कोर्स उपलब्ध नसून या शाळेमध्ये ५ वी पर्यंत शिकणारे ज्युनियर स्कूल असा उल्लेख करतात. मग येथे पदवी कुठून मिळाली असाही प्रश्न गुहा यांनी उपस्थित केला होता.
कुचबिहारचे तृणमूलचे माजी खासदार पार्थ प्रतिम रॉय यांनीही प्रामाणिक यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
निशिथ प्रामाणिक हे कुचबिहारमध्ये पूर्वी तृणमूल काँग्रेसचे युथ विंगचे नेता होते. २०१८मध्ये त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले. नंतर ते मुकुल रॉय यांच्या सोबत भाजपमध्ये गेले. भाजपने प्रामाणिक यांना लोकसभेचे तिकिट दिले. २०१९च्या लोकसभा निवडणुकांत प्रामाणिक यांनी मोठा विजय मिळवला होता. पण नंतर भाजपने विधानसभा निवडणुकांत त्यांना दिनहाटा जागेचे तिकिट दिले. हा विजय मात्र त्यांनी निसटता मिळवला होता.
मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकही पक्षात परत जातील अशा शंका उपस्थित केल्या जात होत्या. पण प्रामाणिक यांनी विधानसभेत जाण्याऐवजी लोकसभेत राहणे पसंद केले व आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होते.
२०१९च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रामाणिक यांनी आपल्यावर ११ पोलिस खटले आहेत असे नमूद केले होते. नंतर २०२१मध्ये विधानसभा निवडणुकांत त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्यावर खून, दरोडा, चोरी व स्फोटके ठेवणे अशा स्वरुपाचे १३ खटले असल्याचे नमूद केले होते.
मूळ बातमी
COMMENTS