नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या अवमानकारक टिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच
नवी दिल्लीः प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या अवमानकारक टिकेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव खराब झाले अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी एएनआयला दिलेल्या दीर्घ मुलाखतीदरम्यान व्यक्त केली.
नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाने भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव खराब झाले. ही खराब झालेली प्रतिमा दुरुस्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील, संवादावर भर द्यावा लागेल. चुकीच्या माहितीमुळे भारताविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली आहे, तसा भारत हा नाही, तो हा वेगळा देश आहे, हे आपल्याला पटवून द्यावे लागेल, असे डोवाल म्हणाले. जेव्हा एखाद्या मुद्द्यावर जनमत संवेदनशील होते तेव्हा त्यांचे वर्तन थोडेस विचलित होते असेही डोवाल म्हणाले.
डोवाल यांनी अफगाणिस्तानातील शीखांच्या प्रार्थनास्थळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबतही चिंता व्यक्त केली. भारताने अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक शीख नागरिकांना व्हीसा दिले आहेत, त्यांना भारतात येण्यासाठी विमानाचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. काही शीख भारतात आले आहेत, या समुदायाशी भारत भावनात्मकदृष्ट्या बांधला गेला आहे, असे डोवाल म्हणाले.
काश्मीरमधील पंडितांवर वाढत्या हल्ल्याच्या संदर्भात डोवाल म्हणाले, २०१९नंतर काश्मीरमधील परिस्थिती बदलली आहे. तेथील नागरिक पाकिस्तान वा दहशतवादाचा समर्थक राहिलेला नाही. आज हुरियत कुठेही दिसत नाही. सरकारने अनेक गटांना आपल्याकडे वळवले आहे. काही दहशतवादी गट अशा प्रयत्नांमध्ये खोडा घालताना दिसत आहेत. सरकार दहशतवादापेक्षा अतिरेक्यांशी दोन हात करत आहे. येत्या काही महिन्यात काश्मीरमधील परिस्थिती सुधारेल असा विश्वास डोवाल यांनी व्यक्त केला.
काश्मीर पंडितांविषयी डोवाल म्हणाले, त्यांचे संरक्षण करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. त्यांना असुरक्षित वाटत नाही पण हा समुदाय नक्कीच दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. कोणतेही सरकार प्रत्येक नागरिकाला संरक्षण देऊ शकत नाही, पण आम्ही दहशतवाद निपटून काढण्यासाठी आक्रमक आहोत असे डोवाल म्हणाले.
पाकिस्तानशी संवाद करण्याच्या संदर्भात डोवाल म्हणाले, एकाच वेळी शांतता व युद्ध होऊ शकत नाही. भारताच्या काही शर्ती आहेत, त्यावरच पाकिस्तानशी संवाद शक्य आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान काय प्रयत्न करू शकतो हेही महत्त्वाचे असल्याचे डोवाल म्हणाले.
लडाखमधील चीनच्या घुसखोरीबाबत डोवाल म्हणाले, चीनसोबत कित्येक वर्षे सीमावाद आहे, तो सोडवण्यासाठी चर्चाही सुरू आहेत. काही प्रश्न सुटले आहेत, आम्ही त्यांच्यापुढे आमची भूमिका स्पष्टपणे ठेवली आहे. काही मुद्द्यांवर असहमती आहे, त्यावर प्रयत्न सुरू आहेत, आम्ही सीमांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे चीनला स्पष्ट केले असल्याचे डोवाल म्हणाले.
COMMENTS